पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तोशाखाना प्रकरणात 14 वर्षांचा तुरुंगवास

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना तोशाखाना प्रकरणात 14 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे.
कोर्टाने बुशरा बीबी यांना अटक करण्याचे आदेशही दिले आहेत. या दोघांनाही दंडापोटी प्रत्येकी 78 कोटी पाकिस्तानी रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत.
तोशाखाना प्रकरण काय आहे?
तोशाखाना म्हणजे मराठीत कोषागार किंवा भांडार. हा पाकिस्तानच्या कॅबिनेटअंतर्गत येणारा विभाग आहे.
मंत्री, खासदार, अधिकारी किंवा इतर सरकारी पदावरील व्यक्तींना मिळालेल्या महागड्या भेटवस्तूंची जबाबदारी या विभागाकडे असते.
यात प्रामुख्यानं इतर देशांतील पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटवस्तूंचा समावेश आहे.
पाकिस्तानातील कायद्यानुसार कुणाला अशी भेटवस्तू मिळाली, तर ती तोशाखानात जमा करणं गरजेचं असतं.
पंतप्रधान आणि राष्ट्रपती 30 हजार पाकिस्तानी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या भेटवस्तू स्वतःसाठी ठेवू शकतात. पण त्यापेक्षा जास्त किंमतीच्या वस्तू तोशाखानात जमा कराव्या लागतात.
यात एक पळवाटही आहे. एखाद्या पदाधिकाऱ्याला मिळालेली महागडी भेटवस्तू स्वतःसाठी ठेवायची असेल, तर त्या वस्तूच्या किंमतीच्या काही टक्के पैसे मोजून ते ही वस्तू स्वतःसाठी ठेवू शकतात.
2001 सालच्या नियमांनुसार 15 टक्के तर 2011 सालच्या नियमांनुसार 20 टक्के रक्कम मोजून अशा भेटवस्तू ठेवता येत असत. 2018 साली ही किंमत 50 टक्के करण्यात आली.
गेल्या 21 वर्षांत सर्वच पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी काही ना काही भेटवस्तू अशी किंमत मोजून स्वतःसाठी विकत घेतल्या आहेत.
यात अननस, चहा, कॉफी, बेडशीट्स अशा साध्या गोष्टींपासून, लॅपटॉप, आयफोन, सिगार बॉक्स, दागिने, महागडी घड्याळं, गाड्या आणि रायफल-बंदुकांसारख्या शस्त्रांचाही समावेश आहे.
पण इम्रान यांनी भेटवस्तू म्हणून मिळालेल्या काही घडाळ्यांची माहिती तोशाखानाला कळवली नाही, आणि पाकिस्तान इन्फर्मेशन कौंसिलने त्याविषयी विचारणा केल्यावरही त्यांनी ही माहिती लपवली, असे आरोप त्यांच्यावर होते.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी पररारष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना सायफर प्रकरणात काल (30 जानेवारी 2024) रोजी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
इम्रान खान सत्तेत असताना डिप्लोमॅटिक केबल सार्वजनिक करून देशाच्या गोपनीयता कायद्याचे उल्लंघन केल्याच्या घटनेला सायफर प्रकरण म्हटलं जातं.
मंगळवारी (30 जानेवारी) विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अबुल हसनत जुलकरनैन यांनी या प्रकरणाची सुनावणी घेतली. त्यानंतर कोर्टाने हा निकाल दिला आहे.
शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा इम्रान खान आणि शाह मेहमूद कुरेशी कोर्ट रूममध्ये उपस्थित होते.
ही शिक्षा घटनेविरोधात आणि बेकायदेशीर असल्याचं पीटीआयने सोशल मीडियावरील निवेदनात म्हटलं आहे.
राजकीय हेतूने करण्यात आल्याचा खान यांनी याआधी आरोप केला होता.
29 जानेवारीपासून विशेष न्यायालयात ही सुनावणी सुरू होती.
या दरम्यान, इम्रान खान आणि शाह मेहमूद कुरेशी यांच्याविरुद्ध 25 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले.
कोर्टरूममध्ये उपस्थित पत्रकार रिजवान काझी यांनी बीबीसीला सांगितले की, कोर्टाने इम्रान खान यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं.
तेव्हा कोर्टाने इम्रान खान यांना विचारले की, "तुमच्याकडे सायफर आहे का?"
त्यावर खान म्हणाले की, "सायफर माझ्याकडे नसून माझ्या कार्यालयात आहे आणि तिथली सुरक्षा माझी जबाबदारी नाही. तर लष्करी सचिव आणि प्रधान सचिव यांची असते."
सुनावणीच्यावेळी कोर्टाने दोघांचे केवळ जबाब नोंदवले. त्यानंतर कोणतीही उलटतपासणी झाली नाही.
तुरुंग प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, विशेष न्यायालयाचे न्यायाधीश यांनी निर्णय दिला आणि तिथून निघून गेले. त्यावर पक्षकारांनी अंतिम युक्तिवाद देखील केला नाही.
खान यांनी एका रॅलीत दाखवला होता 'तो' गोपनीय कागद
2022मध्ये इम्रान खान सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. त्यानंतर त्यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं होतं.
याच दरम्यान एका रॅलीमध्ये खान यांनी एक कागदाचा तुकडा दाखवत त्यांच्याविरोधात परदेशी षड्यंत्र असल्याचे म्हटलं होतं.
"इम्रान खान यांना सत्तेवरून हटवल्यास सर्वांना माफ केले जाईल, असं त्या गोपनीय कागदावर लिहिलं होतं", असा दावा खान यांनी केला होता.
इम्रान खान यांनी त्यावेळी कोणत्याही देशांचं नाव घेतलं नव्हतं. मात्र, त्यानंतर त्यांनी अमेरिकेवर जोरदार टीका केली होती.
या घटनेनंतर खान आणि कुरेशी यांच्यावर सायफर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
इम्रान खान सध्या एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील केसमध्ये तीन वर्षांची शिक्षा भोगत आहेत.
पाकिस्तानमध्ये लवकर सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्याआधीच हा निकाल देण्यात आला आहे. त्यामुळे खान यांना आता निवडणूक लढवता येणार नाहीये.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








