You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भूमी चौहानसाठी अहमदाबादचं ट्रॅफिक ठरलं 'वरदान', 5 मिनिटं उशीर झाल्याने चुकलं विमान
- Author, भार्गव पारिख
- Role, बीबीसी प्रतिनिधी
गुरुवारी दुपारी लंडनला जाणारं फ्लाईट अवघ्या 5 मिनिटांनी चुकलं, त्यामुळं 30 वर्षीय भूमी चौहान खूप नाराज झाल्या होत्या.
पण काही वेळातच त्या चुकलेल्या विमानाच्या अपघाताबाबत समजलं तेव्हा त्यांच्या इतकं नशीबवान कोणी ठरलं नाही, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
कारण त्यांचं जे विमान चुकलं होतं, ते लंडनकडे जाणारं एअर इंडियाचं विमान होतं. गुजरातमधील अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच ते कोसळलं होतं. या विमानात प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह 242 जण होते.
भूमी यांचं फ्लाईट मिस झालं नसतं तर हा आकडा 243 असता.
भूमी चौहान या गुजरातमधील अंकलेश्वर येथून अहमदाबादला आल्या होत्या. तेथून त्या लंडनला विमानाने जाणार होत्या.
'पाच मिनिटं उशीर, आणि...'
"आम्ही अहमदाबादमध्ये वेळेत पोहोचलो होतो, पण शहरातील वाहतूक कोंडीमुळे मी विमानतळावर पाच मिनिटं उशिरा पोहोचले. मला विमानतळावर प्रवेश मिळाला नाही," असं चौहान यांनी बीबीसीला सांगितलं.
"सुरुवातीला मी अस्वस्थ झाले होते, कारण माझ्या तिकिटाचे पैसे वाया गेले होते. तसंच कदाचित नोकरीही जाईल, असं मला वाटलं होतं. पण आता मी खूप आभारी आहे, माझे पैसे गेले असतील, पण आयुष्य वाचलं आहे," असं भूमी म्हणतात.
भूमी चौहान आधी शिक्षणासाठी ब्रिटनमध्ये गेल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी ब्रिस्टलमधील बँक कर्मचारी केवल चौहान याच्याशी त्यांचं लग्न झालं.
"मी युकेला शिक्षणासाठी गेले होते आणि तिथे पार्टटाइम काम करत होते. लग्नानंतर दोन वर्षांनी मी माझ्या मूळगावी अंकलेश्वरला परत आले," असं त्यांनी सांगितलं.
"मी दीड महिन्यापासून इथं होते. सुट्टी संपल्यामुळं परत जात होते," असं त्यांनी सांगितलं.
'मी खूप विनंती केली'
ट्रॅफिकमध्ये अडकल्याने भूमी यांनी ऑनलाइन चेक-इन केलं होतं. पण त्यांना फ्लाइटमध्ये चढू दिलं नाही, असं त्यांनी सांगितलं.
"एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, उशीर झाला आहे. इमिग्रेशन आणि बोर्डिंगही पूर्ण झालं आहे. त्यामुळं मी फ्लाइट पकडू शकणार नाही," असं भूमी यांनी 'बीबीसी'ला सांगितलं.
"मी खूप विनंती केली, माझी नोकरी जाऊ शकते असं मी त्यांना सांगितलं. पण कुणीही माझं ऐकलं नाही. मी रिफंडचीही विनंती केली, पण त्यांनी नकार दिला," असंही त्यांनी सांगितलं.
'देवाचे आभार मानले'
विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर परत जाताना चहा घेण्यासाठी भूमी एका ठिकाणी थांबल्या होत्या. तेव्हा त्या ज्या विमानानं जाणार होत्या, ते कोसळल्याचं त्यांना समजलं.
आम्ही चहा प्यायला थांबलो होतो. ट्रॅव्हल एजंटशी रिफंड कसा मिळू शकेल याबाबत आम्ही बोलत होतो. त्यावेळीच अंकलेश्वरहून फोन आला आणि मी ज्या विमानात जाणार होते ते कोसळलं आहे, असं समजल्याचं भूमी म्हणाल्या.
"आम्ही ताबडतोब एका मंदिरात जाऊन देवाचे आभार मानले. अहमदाबादच्या ट्रॅफिकनं माझा जीव वाचवला," असं भूमी म्हणाल्या.
भूमी यांच्या सासू हीना चौहान म्हणाल्या, "भूमीचे प्राण वाचले याबद्दल आम्ही देवाचे आभार मानतोय. तिचा जीव वाचला याबद्दल आनंदी आहोत पण या अपघातात गेलेल्या लोकांप्रती आम्हाला फार दुःख होतंय."
तिचे सासरे रमणिक चौहान म्हणाले, "ती आत गेली तेव्हा ती विमानात बसली असेल असं आम्हाला वाटतं होतं. पण दहा मिनिटांतच ती बाहेर आली. तिचं विमान चुकल्याचं कळलं. त्यानंतर विमानाला अपघात पडल्याचं समजलं. तिचे प्राण वाचल्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानत आहोत."
लंडनमध्ये जाणाऱ्या बोईंग 787-8 विमानात एकूण 169 भारतीय, 53 ब्रिटिश, सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन प्रवासी होते.
प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश होता.
अपघाताचं अधिकृत कारणं अद्याप समजू शकलेलं नाही. या अपघातात 241 जणांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातातून एक ब्रिटिश नागरिक बचावला आहे, असं पोलिसांनी सांगितलं. बचावलेल्या विश्वास कुमार रमेश यांनी पत्रकारांना सांगितलं की, "टेकऑफनंतर तीस सेकंदांनी जोरदार आवाज आला आणि त्यानंतर विमान कोसळलं. हे सगळं खूप वेगानं घडलं."
पण भूमी यांनी मात्र विमान चुकल्यानं त्यांचा जीव बचावल्यानं देवाचे आभार मानले आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)