You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'आमची मुलगी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत एअर होस्टेस झालेली', पनवेलच्या मैथिली पाटीलचे कुटुंबीय काय म्हणाले?
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
"हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण करून आमची मुलगी एअर होस्टेस झाली, या घटनेने आम्हाला धक्का बसला."
हवाई सुंदरी मैथिली पाटील यांचे निकटवर्तीय बीबीसी मराठीशी बोलताना सांगत होते.
मैथिली अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमानात क्रू मेंबर होत्या. गुरुवारी (12 जून) हे विमान कोसळून झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेत 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. एअर इंडियाने या माहितीला दुजोरा दिला आहे. एअर इंडियाच्या या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. या विमानात 2 वैमानिक आणि 10 कर्मचारी होते. या विमानाची धुरा कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्याकडे होती, अशी माहिती डीजीसीएने दिली आहे.
मैथिली पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील आहेत.
गुरुवारी (12 जून) मैथिलीची नेमणूक अहमदाबाद ते लंडन विमान क्रमांक ए1-171 वर असल्याने त्या बुधवारी (11 जून) मुंबई मार्गे अहमदाबाद असा प्रवास करुन कामावर रुजू झाल्या होत्या.
दुपारनंतर विमान दुर्घटनेच्या बातमीनंतर मैथिलीचे कुटुंबीय चिंतेत होती. मैथिली यांची कोणतीही माहिती मिळत नसल्याने तिचा शोध घेण्यासाठी ते अहमदाबादकडे रवाना झाले.
आई-वडील, दोन बहिणी आणि भाऊ अशा कुटुंबातील मैथिली या थोरली आणि घरातील कर्ती मुलगी. मैथिलीच्या जाण्याने पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
न्हावा गावातील टी. एस. रहेमान शाळेत बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या मैथिलीने अगदी लहानपणापासूनच हवाई सुंदरी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले आणि दोन वर्षापूर्वी ती एव्हिएशनचे शिक्षण पूर्ण करून एअर इंडियात कामाला लागली होती.
या दुर्घटनेनंतर मैथिलीबद्दल बीबीसी मराठीच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांचे नातेवाईक व न्हावा गावचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे यांनी सांगितलं, "मैथिली हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून एअर होस्टेस झाली होती. या घटनेने आम्हाला धक्का बसला. आमच्या कुटुंबातील काही लोक अहमदाबादला गेले आहेत. सरकार-प्रशासनाला आमची विनंती आहे की, आमची गेलेली व्यक्ती परत येणार नाही, मात्र त्यांनी कुटुंबाला आधार द्यावा."
मैथिली पाटीलचे वडील पनवेलजवळ असणाऱ्या ओएनजीसी कंपनीमध्ये लेबर वर्कर आहेत.
मैथिली अतिशय शांत, हुशार विद्यार्थिनी
मैथिली पाटील ही मुलगी अत्यंत शांत , शिस्तप्रिय , हुशार आणि इतरांना प्रोत्साहित करणारी विद्यार्थिनी होती, असं म्हणत एलकेएम स्कूलच्या मुख्याध्यापिका डेझी पॉल यांनी तिच्या आठवणींना उजाळा दिला.
त्यांनी सांगितलं की, तिचं पहिली ते बारावीपर्यंतचं शिक्षण आमच्या शाळेत झालं होतं.
दोन महिन्यांपूर्वी शाळेत माजी विद्यार्थ्यांना बोलविण्यात आले होते. तेव्हा ती आली होती. तिने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना या क्षेत्रातील करिअर संधींबद्दल सांगितलं होतं, असं पॉल यांनी सांगितलं.
एकमेव कमावती व्यक्ती हरवली
पाटील कुटुंबात आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. मैथिलीचे वडील मोरेश्वर पाटील हे ओएनजीसी कंपनीत कंत्राटी पद्धतीने कामाला होते, मात्र काही वर्षांपूर्वी त्यांना आजारपणामुळे नोकरी सोडावी लागली.
आई गृहिणी असून त्यांच्या उत्पन्नाचा कोणताही स्रोत नव्हता. अशा वेळी मैथिलीने आपल्या कुटुंबाची संपूर्ण आर्थिक जबाबदारी उचलली होती.
ती घरातील एकमेव कमावती व्यक्ती होती. मैथिली पश्चात तिची धाकटी बहीण दृष्टी पाटील ही आहे, जी सध्या B.tech शिकत आहे.
वडिलांचे आजारपण आणि घरच्या परिस्थितीमुळे दृष्टी मागील 15 वर्षांपासून मामाकडे राहत होती. मात्र तिच्या शिक्षणाची जबाबदारी पूर्णपणे मैथिलीने उचलली होती. आता तिच्या निधनामुळे पाटील कुटुंब आर्थिक आणि मानसिक संकटात सापडलं आहे.
उड्डाणानंतर लगेचच अपघात
हे विमान एअर इंडियाचे Flight AI171 होते. उड्डाणानंतर लगेचच हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. 242 प्रवाशांसह हे विमान लंडनला गॅटविक येथे जात होते.
हे विमान मुलांच्या वसतिगृहावर कोसळलं आहे. बीबीसीशी बोलताना रुग्णालयात काम करणाऱ्या एका व्यक्तीनं सांगितलं, "घटनेनंतर सर्वत्र काळाधूर पसरला, रुग्णवाहिका तिकडे धावल्या. तेथे लोकांच्या देहाचे तुकडे पडलेले होते. मुलांच्या वसतिगृहालाही धक्का बसला असेल. या घटनेमुळे 2001 मध्ये झालेल्या भूकंपाची आठवण झाली.''
टाटा समूहाकडून या अपघातावर तीव्र दुःख व्यक्त करण्यात आलं आहे. या दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 1 कोटींची मदत देणार असल्याच टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये सांगितलं.
त्याचबरोबर जखमी झालेल्यांच्या उपचाराच्या खर्चाचा भारही उचलणार असल्याचं टाटा समूहानं स्पष्ट केलं आहे. तसंच बी.जे.मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीचं पुन्हा बांधकाम करण्यासाठी मदत करणार असल्याचंही चंद्रशेखरन म्हणाले आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)