You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विजय रुपाणी : म्यानमारमध्ये जन्म, वकिली सोडून RSS चे प्रचारक ते गुजरातचे मुख्यमंत्री, असा होता प्रवास
- Author, दिलीप गोहिल
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
अहमदाबादमध्ये 12 जून 2025 रोजी एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 270 वर पोहोचला आहे.
या भीषण दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झालं. आज (16 जून) विजय रुपाणी यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
ऑगस्ट 2016 मध्ये आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर विजय रुपाणी यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर 2021 च्या मध्यापर्यंत त्यांनी ही जबाबदारी निभावली.
म्यानमारमध्ये जन्मलेले विजय रुपाणी राजकारणात कसे आले? त्यांचा प्रवास कसा होता? जाणून घेऊया.
वकिली सोडून बनले संघाचे प्रचारक
विजय रुपाणी विद्यार्थी असल्यापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (ABVP) सक्रिय होते. तिथपासून ते मुख्यमंत्री होईपर्यंत त्यांचा राजकीय प्रवास दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण असा राहिला.
केशुभाई पटेल, चिमनभाई शुक्ला आणि वजूभाई वाला यांच्यासारख्या त्या काळच्या दिग्गज नेत्यांमध्ये संयमानं राजकारण करत त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.
त्यांच्या राजकीय वाटचालीचा पाया राजकोट महानगरपालिकेच्या राजकारणात रोवला गेला. राजकोट ही त्यांच्या कारकिर्दीची कर्मभूमी ठरली. पण त्यांची जन्मभूमी मात्र, म्यानमारची राजधानी रंगून ही आहे.
विजय रुपाणींचा जन्म 2 ऑगस्ट 1956 रोजी रंगूनमध्ये झाला. त्यांच्या कुटुंबाने व्यवसायासाठी म्यानमारमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, 1960 मध्ये ते राजकोटला परतले. तिथेच त्यांचं बालपण गेलं आणि शिक्षणही झालं.
1971 मध्ये कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी ABVP आणि पुढं जनसंघात प्रवेश केला. त्याचवेळी RSS मध्येही ते सक्रिय होते.
आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगवासही सहन करावा लागला. ABVP मध्ये सक्रिय झाल्यानंतर त्यांनी राजकोटमधील धर्मेंद्रसिंह कॉलेजचं सचिवपद मिळवलं.
पुढं कायद्याचं शिक्षण घेत वकिलीची पदवी मिळवली. पण कोर्टात प्रॅक्टिस करण्याऐवजी 1978 ते 1981 या काळात त्यांनी RSS प्रचारक म्हणून काम केलं.
त्यानंतर शेअर मार्केटचा मार्ग स्वीकारला आणि राजकोट स्टॉक एक्सचेंजचे संचालकही राहिले.
संघामुळे राजकारणात प्रवेश
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून 1980 च्या दशकात अनेक कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षात पाठवलं जात होतं. त्याच काळात विजय रुपाणी यांनीही सक्रिय राजकारणात प्रवेश केला.
राजकारणात आल्यानंतर 1987 मध्ये त्यांनी राजकोट महानगरपालिकेची निवडणूक लढवली.
त्यानंतर 1988 पासून पुढील एक दशक ते महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. 1996 मध्ये ते राजकोट महानगरपालिकेचे महापौर झाले.
महापौरपदाच्या काळात आणि महानगरपालिकेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना राज्यस्तरीय भाजप संघटनेत स्थान मिळालं. नंतर 1998 मध्ये ते गुजरात भाजपचे सरचिटणीस झाले.
याशिवाय 2006 ते 2012 या काळात त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम केलं.
कॅबिनेटमंत्री ते मुख्यमंत्री
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर गुजरातमध्ये आनंदीबेन पटेल मुख्यमंत्री झाल्या. त्यांच्या सरकारमध्ये विजय रुपाणी कॅबिनेटमंत्री होते.
मात्र, मोदी-शाह यांची जोडी दिल्लीला गेल्यानंतर गुजरातमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. आनंदीबेन पटेल यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात पाटीदार आरक्षण आंदोलन तीव्र झालं आणि परिस्थिती हाताबाहेर गेली.
अखेर, ऑगस्ट 2016 मध्ये आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिला.
त्या वेळी मुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात होतं. पण शेवटच्या क्षणी विजय रुपाणी यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करण्यात आलं.
त्यावेळी विजय रुपाणी भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष होते आणि अमित शाह यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.
पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळालं पण...
2017 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमधील भारतीय जनता पक्ष वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेला होता. सगळ्यांना एकत्र आणून निवडणूक जिंकणं हे मोठं आव्हान होतं.
अशा परिस्थितीतही विजय रुपाणी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणूक जिंकली खरी, पण 2017 चे निकाल धक्कादायक ठरले. भाजप फक्त 99 जागांवर विजयी झाला आणि पक्षाचं वर्चस्व धोक्यात आलं.
त्यामुळे अनेकांना वाटलं की गुजरातला नवीन मुख्यमंत्री मिळेल. पण तरीही पक्षाने पुन्हा एकदा रुपाणी यांच्यावर विश्वास दाखवला.
गुजरात भाजपमध्ये आधीच अंतर्गत नाराजी होती. त्यामुळे नवीन नेतृत्व आणून अनावश्यक संघर्ष ओढवण्याऐवजी, भाजपने स्थैर्य जपण्याचा निर्णय घेतला आणि रुपाणी यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद दिलं, असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं.
रुपाणी यांनी 2021 च्या मध्यापर्यंत ही जबाबदारी सांभाळली. त्या वेळेस त्यांचा जाहीर सत्कारही करण्यात आला.
मात्र दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतरही पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी राजीनामा द्यावा, असा संकेत मिळाला.
रुपाणी यांनी दोन टर्ममध्ये 5 वर्षे 35 दिवस मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. पण 11 सप्टेंबर 2021 रोजी त्यांनी थेट एका जाहीर कार्यक्रमात राज्यपालांकडे राजीनामा सादर केला.
हा कार्यक्रम अहमदाबादच्या सरदारधाममध्ये झाला होता. त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअली केलं होतं.
या दरम्यान, राजकोटमध्ये त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे आणि आता आम आदमी पक्षात सामील झालेले इंद्रनील राजगुरू यांनी रुपाणींवर कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.
कोरोनाकाळात केलेल्या काही वादग्रस्त विधानांमुळे रुपाणी यांना टीकेचा सामनाही करावा लागला होता.
मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर 2022 मध्ये भाजपनं त्यांना तिकिट नाकारलं होतं. त्यानंतर गेल्या काही दिवसांत ते सक्रिय राजकारणात नव्हते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)