You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अहमदाबाद विमान दुर्घटना : विमानातील 242 पैकी 241 जणांचा मृत्यू, अपघाताबद्दल आतापर्यंत कोणती माहिती समोर?
अहमदाबादमध्ये विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. एअर इंडियाने या माहितीला दुजोरा दिला आहे.
एअर इंडियाच्या या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते.
भारतीय वंशाचे एक ब्रिटीश प्रवासी या दुर्घटनेतून बचावले आहेत.
अपघातानंतर अहमदाबादला पोहोचलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं की, "बहुतेक सर्व प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. सव्वा लाख लीटर इंधन असल्यामुळे तापमान इतके जास्त झाले होते की कोणीही वाचण्याची शक्यता नव्हती."
हे विमान अहमदाबाद शहरात विमानतळाजवळ मेघानीनगर या रहिवाशी भागात कोसळलं आहे. दुर्घटनाग्रस्त विमान कंपनीचं ड्रीमलायनर प्रकारातलं 787-8 हे विमान होतं.
या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचंही निधन झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांनी माध्यमांशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रुपाणी हे विमानानं लंडनला जात होते. त्यामुळं त्यांचं निधन ही भाजपसाठी मोठी हानी असल्याचं सी.आर.पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या अपघातातून ब्रिटिश नागरिक असलेले एक प्रवासी वाचले आहेत. विश्वास कुमार रमेश असं त्यांचं नाव असून ते विमानातील 11A क्रमांकाच्या सीटवर होते अशी माहिती अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी.एस. मलिक यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोताना दिली.
"विमानानं उड्डाण घेताच 30 सेकंदातच मोठा आवाज झाला आणि विमान कोसळलं. हे एवढ्या कमी वेळात घडलं की, काही समजलं नाही," असं विश्वास माध्यमांशी बोलताना म्हटल्याचं समोर आलं आहे.
विश्वास कुमार रमेश यांचे लेस्टर शहरातील नातलग अजय वालगी यांच्याशी आम्ही संपर्क केला.
ते म्हणाले, "विश्वास यांनी कुटुंबीयांना फोन करुन आपण सुखरुप असल्याचं सांगितलं. प्रवाशांमध्येच असणारे त्यांचे बंधू अजय यांच्याबद्दल काही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं.
त्यांचे नातेवाईक जमायला सुरुवात झाली. आम्ही त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत. विश्वास यांना पत्नी आणि एक मूल आहे."
विश्वास यांचा भारतात जन्म झाला आणि गेली अनेक वर्षं ते इंग्लंडमध्ये राहात आहेत अशी माहिती बीबीसीला मिळाली आहे.
उड्डाणानंतर लगेचच अपघात
हे विमान एअर इंडियाचे Flight AI171 होते. उड्डाणानंतर लगेचच हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. 242 प्रवाशांसह हे विमान लंडनला गॅटविक येथे जात होते. या अपघातस्थळी अग्निशमन दलाची वाहनं, पोलीस तसेच मदतकार्य करणारी पथकं कार्यरत झाली असून गुजरात सरकार आणि केंद्र सरकार मदतकार्य करत आहेत.
हे विमान मुलांच्या वसतिगृहावर कोसळलं आहे. बीबीसीशी बोलताना रुग्णालयात काम करणाऱ्या एका व्यक्तीनं सांगितलं, "घटनेनंतर सर्वत्र काळाधूर पसरला, रुग्णवाहिका तिकडे धावल्या. लोकांच्या देहाचे तुकडे पडले होते. मुलांच्या वसतिगृहालाही धक्का बसला असेल. या घटनेमुळे 2001 साली झालेल्या भूकंपाची आठवण झाली.''
टाटा समूहाकडून या अपघातावर तीव्र दुःख व्यक्त करण्यात आलं आहे. या दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 1 कोटींची मदत देणार असल्याच टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये सांगितलं.
त्याचबरोबर जखमी झालेल्यांच्या उपचाराच्या खर्चाचा भारही उचलणार असल्याचं टाटा समूहानं स्पष्ट केलं आहे. तसंच बी.जे.मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीचं पुन्हा बांधकाम करण्यासाठी मदत करणार असल्याचंही चंद्रशेखरन म्हणाले आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या अपघाताबद्दल म्हणाल्या, "अहमदाबादमध्ये झालेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेमुळे मला अत्यंत दुःख झालं आहे. ही हृदयद्रावक दुर्घटना आहे. माझ्या भावना आणि प्रार्थना पीडित लोकांसोबत आहेत. या दुःखाच्या क्षणी संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा आहे."
या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. "अहमदाबादमधील दुर्घटनेनं आम्हा सर्वांना स्तब्ध आणि दुःखी केलं आहे. हे शब्दांत व्यक्त करता येणार नाही. या दुःखद क्षणी माझ्या सहवेदना पीडितांसोबत आहेत. मदतकार्यात गुंतलेल्या संबंधित मंत्र्यांशी आणि प्रशासनाशी मी संपर्कात आहे," असं त्यांनी म्हटलं आहे.
अहमदाबाद-लंडन विमान भीषण अपघात अत्यंत हृदयद्रावक, वेदनादायक असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातातील मृत आणि नातेवाईंकांप्रती संवेदना प्रकट केली आहे. "अनेकांनी आपल्या घरातील कर्ते आणि जीवलग गमावले आहेत. काळाने घातलेली ही झडप अनेक कुटुंबियांसाठी शब्दांच्या पलिकडली आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. या सगळ्यांच्या दुःखात आम्ही सर्व, महाराष्ट्राची जनता सहभागी आहे. त्यांना या दुःखद आघातातून सावरण्याची शक्ती मिळो, अशी ईश्वचरणी प्रार्थना करतो", असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
अमित शाह यांची घटनास्थळाला भेट
संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घटनास्थळी माहिती दिली. यावेळेस अमित शाह यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीमध्ये दुःख व्यक्त केले आहे.
ते म्हणाले, "मी घटनास्थळी जाऊन आलो. जवळपास सर्व मृतदेहांना बाहेर काढण्यात आले आहेत. येथे उपस्थित असलेल्या नातलगांचे डीएनए नमुने घेण्यास सुरुवात झाली आहे. परदेशी नागरिकांच्या नातलगांनाही यासाठी निरोप पोहोचवले आहेत. जवळपास 1000 डीएनए चाचण्या गुजरातमध्ये करण्यात येतील. डीएनए चाचणीनंतर नातलगांना ते मृतदेह सोपवण्यात येतील. नातलगांच्या राहाण्याच्या, मानसिक मदतीची सोय करण्यात आली आहे. हवाई वाहतूक विभागाने तपासाला सुरुवात केली आहे. या मदतकार्यात ज्यांनी सहभाग घेतला त्यांचे मी आभार मानतो. ज्या कुटुंबीयांनी आपले नातलग या घटनेत गमावले आहेत त्यांच्याप्रती मी सहवेदना व्यक्त करतो."
1. विमानात किती प्रवासी होते?
या विमानात 242 प्रवासी होते अशी माहिती एअर इंडियाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये दिली आहे. तसेच या विमानात 2 वैमानिक आणि 10 कर्मचारी होते. या विमानाची धुरा कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्याकडे होती अशी माहिती डीजीसीएने दिली आहे.
एअर इंडियाच्या माहितीनुसार 242 पैकी 169 प्रवासी भारतीय होते, 53 ब्रिटिश नागरिक होते, 1 व्यक्ती कॅनेडियन होता तर 7 लोक पोर्तुगालचे होते.
2. पोलिसांनी काय माहिती दिली?
अहमदाबाद झोन-4 चे डीसीपी कानन देसाई यांनी या परिसरात विमान अपघात झाल्याचे पीटीआयशी केलेल्या संवादात स्पष्ट केले आहे.
अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी.एस. मलिक यांनी पीटीआयला सांगितले की, "विमानतळाजवळील मेघानीनगर परिसरात एक विमान कोसळले आहे. ते कोणत्या प्रकारचे विमान होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही."
अग्निशमन अधिकारी जयेश खाडिया म्हणाले, "विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या आहेत."
दुसरीकडे, एएनआयने नागरी उड्डाण महासंचालक (डीजीसीए) यांचे निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, "कॅप्टन सुमित सभरवाल यांना 8200 तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता. तसेच सह-वैमानिकाला 1100 तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता. एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोलर) नुसार, या विमानाने अहमदाबादहून दुपारी 1.38 वाजता उड्डाण केले. त्यांनी एटीसीला डिस्ट्रेस कॉल केला, परंतु त्यानंतर एटीसी कॉलला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवर पडले. अपघातस्थळावरून काळा धूर निघताना दिसत होता."
अशा प्रकारचा विमान अपघात घडतो, तेव्हा तपासकर्त्यांना विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा शोध असतो. त्यामुळे, या विमानातील ब्लॅक बॉक्सचा देखील शोध घेतला जाईल. ब्लॅक बॉक्स विमानाच्या मागच्या भागात लावलेला असतो.
3. गुजरातचे मुख्यमंत्री काय म्हणाले?
राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही अहमदाबादमधील विमान अपघाताच्या घटनेवर दुःख व्यक्त केले आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती दिली आहे. ते लिहितात, "अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या प्रवासी विमान अपघाताच्या दुर्घटना घडल्यामुळे मला दुःख झाले आहे. मी अधिकाऱ्यांना अपघातात त्वरित मदतकार्य हाती घेण्याचे आणि जखमी प्रवाशांवर युद्धपातळीवर त्वरित उपचार करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत."
जखमींना तात्काळ मदत करण्यासाठी देण्यात आलेल्या सूचनांबाबत त्यांनी पुढे लिहिले की, "जखमी प्रवाशांना उपचारासाठी नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था करण्याच्या आणि रुग्णालयात सर्व उपचार व्यवस्था प्राधान्याने सुनिश्चित करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत."
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी लिहिले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही त्यांच्याशी बोलून या विमान अपघातात बचाव आणि मदत कार्यासाठी एनडीआरएफ पथके आणि केंद्र सरकारचे पूर्ण सहकार्य मिळण्याचे आश्वासन दिले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्सवर लिहिले आहे, "अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमुळे मी अत्यंत व्यथित झालो आहे. आपत्ती निवारण दल तात्काळ दुर्घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. मी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गृहमंत्री हर्ष संघवी आणि अहमदाबादचे पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला आहे."
गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी 'एक्स'वर पोस्ट करत लिहिलं आहे की, "मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना रुग्णालये आणि विमानतळांवर तैनात करण्यात आलं आहे, जेणेकरून जीव वाचवता येतील.
एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम्स घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. पंतप्रधान कार्यालय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि क्षणोक्षणी अपडेट घेत आहे व सूचना देत आहे. गृहमंत्री अमित शहा राज्य प्रशासनाच्या संपर्कात आहेत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत."
4. एअर इंडियाने काय म्हटले?
अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणाऱ्या फ्लाईट AI171 ला आज टेकऑफनंतर अपघात झाल्याच्या वृत्ताला एअर इंडिया दुजोरा देत आहे. अहमदाबादहून दुपारी 1.38 वाजता निघालेल्या या बोईंग 787-8 विमानात 242 प्रवासी आणि क्रू सदस्य होते. यापैकी 169 जण भारतीय नागरिक आहेत, 53 ब्रिटिश, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक विमानात होते. जखमींना जवळच्या हॉस्पिटल्समध्ये नेण्यात येतंय. अधिक माहितीसाठी आम्ही 1800 5691 444 ही पॅसेंजर हॉटलाईन सुरू केली आहे. या अपघाताचा तपास करणाऱ्या यंत्रणांना एअर इंडिया पूर्ण सहकार्य करत आहे. यापुढे X हँडल (https://x.com/airindia) आणि http://airindia.com या वेबसाईटवरून नियमित माहिती एअर इंडियाद्वारे दिली जाईल.
हवाई वाहतुकीवर लक्ष ठेवणाऱ्या फ्लाइट रडार 24 ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अॅक्सवर लिहिले की, "अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान AI171 क्रॅश झाल्याचे वृत्त आहे. टेकऑफ झाल्यानंतर काही सेकंदांनी आम्हाला शेवटचा सिग्नल मिळाला."
फ्लाइट रडार 24 नुसार, अपघातग्रस्त विमान 787-8 ड्रीमलायनर प्रकारचे होते.
एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे. ते लिहितात, "अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारं एअर इंडिया फ्लाईट 171 आज दुर्दैवाने अपघातग्रस्त झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना मला खेद वाटतो आहे. या दुःखद घटनेचा परिणाम ज्या कुटुंबांवर आणि त्यांच्या प्रियजनांवर होतोय त्यांना आमच्या सहवेदना आहेत. या क्षणी या कुटुंबाना आणि व्यक्तींना मदत करणं आमचं प्राथमिक उद्दिष्ट आहे.
"घटनास्थळी असणाऱ्या इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम्सना आम्ही आमच्यापरीने सगळी मदत करत आहोत आहोत आणि ज्यांच्यावर याचा परिणाम झालाय, त्यांचीही काळजी घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणखी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर आम्ही पुढील माहिती देऊ. कुटुंबांना माहिती मिळावी यासाठी इमर्जन्सी सेंटर सुरू करण्यात आलंय आणि सपोर्ट टीम स्थापन करण्यात आलेली आहे."
5. Mayday कॉल म्हणजे काय?
- विमानामध्ये इमर्जन्सी असते तेव्हा Mayday चा कॉल दिला जातो.
- हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा Distress signal - म्हणजे विमान अडचणीत असल्याचं सांगणारा सिग्नल आहे.
- Help Me या अर्थाच्या फ्रेंच m'aider या शब्दावरून हा शब्द आलाय.
- विमानासोबतच बोटीही या कॉलचा वापर करतात. 1923 पासून इंग्लिशमध्ये या शब्दाचा वापर होतोय.
- 1927 पासून अमेरिकेने हा शब्द ऑफिशियल रेडिओग्राफ डिस्ट्रेस सिग्नल म्हणून स्वीकारला.
- Mayday हा शब्द पुन्हापुन्हा बोलून कंट्रोल टॉवरचं लक्ष वेधून घेतलं जातं किंवा परिस्थितीचं गांभीर्य खुणावलं जातं.
6. अहमदाबाद विमानतळावर काय स्थिती आहे?
या घटनेबाबत, अहमदाबाद विमानतळाच्या प्रवक्त्याने बीबीसी गुजरातीला दिलेल्या निवेदनात होते आहे की, विमान अपघातामुळे अहमदाबादचे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या बंद करण्यात आले आहे.
पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या एअरलाइनकडून पुढील माहिती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर संध्याकाळी 4.05 वाजल्यापासून विमानतळावरील उड्डाणं सुरू करण्यात आली.
7. युनायटेड किंग्डमच्या सरकारनं काय सांगितलं?
या विमानात 53 ब्रिटिश नागरिक होते. या पार्श्वभूमीवर युके सरकारनेही एक माहिती प्रसिद्ध केली आहे.
'आम्हाला अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेची माहिती आहे. भारतातील स्थानिक अधिकाऱ्यांबरोबर यूके सरकार तातडीने तथ्यांची चौकशी करण्यासाठी आणि संबंधितांना मदत करण्यासाठी कार्यरत आहे. ज्या ब्रिटिश नागरिकांना मदतीसाठी दूतावासाशी संपर्क साधायचा आहे किंवा नातेवाईकांची चौकशी करायची आहे, त्यांनी कृपया 020 7008 5000 या क्रमांकावर संपर्क साधावा', असं युनायटेड किंग्डमच्या सरकारनं म्हटलं आहे.
8. अपघात झालेले बोईंग 787-8 ड्रीमलायनर कसे असते?
बोईंग कंपनीने 14 वर्षांपूर्वी हे एअरक्राफ्ट लाँच केलं. या ड्रीमलायनर विमानांद्वारे 1 अब्ज प्रवाशांनी प्रवास केल्याचं कंपनीने सहा आठवड्यांपूर्वी म्हटलं होतं.
जगभरात 1,175 बोईंग 787 ड्रीमलायनर विमानं वापरात आहेत. अपघातग्रस्त झालेलं विमान बोईंग 787-8 प्रकारचं होतं.
न थांबता प्रवास करण्याच्या या विमानाच्या क्षमतेमुळे नॉनस्टॉप फ्लाईट्ससाठी ही विमानं वापरली जातात.
9. विमान जिथं कोसळलं तिथं काय स्थिती?
अहमदाबादमधील बी.जे. मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात, जिथे एअर इंडियाचं विमान कोसळल्याचं सांगितलं जात आहे, तिथे किमान तीन विद्यार्थ्यांसह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी पारेख यांनी तिघांचा मृत्यू जवळपास निश्चित असल्याचं म्हटलं आहे. यात एक महिलेचा समावेश असून, त्या एका कर्मचाऱ्याच्या (स्टाफ मेंबर) घरी कामाला होत्या.
"हे विमान हॉस्टेलच्या मेसवर आदळलं आणि मग उडून हॉस्टेलच्या आणखी एका इमारतीवर जाऊन कोसळलं," असं डॉ. मीनाक्षी पारेख म्हणाल्या.
दुपारी 1.40 च्या सुमारास विमान कोसळलं, त्यावेळी अनेक विद्यार्थी मेसमध्ये जेवण करत होते, असं डॉ. पारेख यांनी बीबीसीचे प्रतिनिधी जुगल पुरोहित यांना सांगितलं.
त्या पुढं म्हणाल्या, "बहुतेक विद्यार्थी वाचले... पण इमारतीला आग लागली आणि धुराचे लोट प्रचंड होते. त्यामुळे 10-12 विद्यार्थी अडकले होते... आम्ही आमच्या कॉलेजमधील प्रत्येक विद्यार्थ्याला फोन करून ते सुरक्षित असल्याची खात्री करत आहोत. त्यामुळे आतापर्यंत आम्हाला जे समजलं आहे, त्यानुसार तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूची शक्यता जवळजवळ निश्चित मानली जात आहे."
डॉक्टरांच्या घरी काम करणाऱ्या एका महिलेचा देखील मृत्यू झाला आहे, असंही डॉ. पारेख यांनी सांगितलं.
10. विमान वाहतूक तज्ज्ञांचा काय अंदाज आहे?
विमान वाहतूक तज्ज्ञांनी बीबीसीला सांगितलं की, विमान उड्डाण करताना त्याच्या पंखांच्या फ्लॅप्सची स्थिती ही एक समस्या असू शकते.
आम्ही व्हेरिफाय केलेल्या एक व्हीडिओत पाहिलं की, विमान खाली उतरत आहे आणि जमिनीवर आदळताच मोठा स्फोट झाला.
विमान तज्ज्ञ जेफ्री थॉमस म्हणतात, "जेव्हा मी हे पाहिलं, तेव्हा अंडर कॅरेज अजूनही खाली आहे, पण फ्लॅप्स मागे घेतले गेल्याचे दिसते."
याचा अर्थ फ्लॅप्स पंखांशी समांतर होते, आणि ते टेकऑफनंतर इतक्या लवकर अशा स्थितीत असणं खूपच असामान्य आहे, असं ते म्हणतात.
त्यांनी सांगितलं की, "साधारणपणे, अंडर कॅरेज 10-15 सेकंदांत मागे घेतले जाते, आणि त्यानंतर फ्लॅप्स 10-15 मिनिटांच्या कालावधीत मागे घेतले जातात."
आणखी एक तज्ज्ञ, टेरी टोझर म्हणतात, "व्हीडिओवरून हे निश्चितपणे सांगणं खूप कठीण आहे, फ्लॅप्स विस्तारलेले दिसत नाहीत, आणि तेच विमानाचे उड्डाण योग्यरित्या न होण्याचं एक स्पष्ट कारण असू शकतं."
"जर फ्लॅप्स योग्यरित्या सेट केलेले नसतील, तर ते संभाव्य मानवी त्रुटीकडे निर्देश करेल," असं माजी पायलट आणि बकिंगहॅमशायर न्यू युनिव्हर्सिटीचे वरिष्ठ व्याख्याते मार्को चॅन म्हणाले, "पण व्हीडिओची गुणवत्ताही इतकी कमी आहे की, तेही निश्चित करता येत नाही."
11. मराठीतून माहिती, मदतीसाठी कुठे संपर्क करायचा?
अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया AI 171 या विमानाच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आपत्कालीन संचालन केंद्रामार्फत नागरिकांसाठी मदत व माहिती सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
या विमान अपघातात प्रभावित झालेल्या प्रवाशांचे नातेवाईक व संबंधित नागरिकांनी आवश्यक माहिती आणि साहाय्यासाठी 022-22027990, 022-22794229 भ्रमणध्वनी 9321587143, आपत्कालीन मदत क्रमांक 1070 या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक सतीशकुमार खडके यांनी केले आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.