You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दक्षिण कोरियातील विमान अपघात पक्षी धडकल्यामुळे झाला का? नेमकं कारण काय? वाचा
रविवारी (29 डिसेंबर) सकाळी दक्षिण कोरियात झालेल्या विमान अपघातात 170 हून अधिक जणांचा मृत्यू झाला.
दक्षिण कोरियाच्या नैऋत्येला असणाऱ्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर द जेजू एअर विमान कंपनीचं विमान धावपट्टीवरून घसरून भिंतीवर आदळल्यामुळे हा भीषण अपघात झाला.
हे विमान बँकॉकहून परत येत होतं. विमानात 181 प्रवासी होते. त्यातील 179 प्रवाशांचा या अपघातात मृत्यू झाला. तर विमानातील दोन कर्मचाऱ्यांना विमानाच्या ढिगाऱ्यातून वाचवण्यात आलं.
संबंधित अधिकारी हा विमान अपघात नेमका का झाला, याचा तपास करत आहेत.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी, हा विमान अपघात पक्षी विमानाला धडकल्यामुळे (बर्ड स्ट्राईक) आणि खराब हवामानामुळे झाल्याचं सूचित केलं आहे.
पक्षी धडकल्यामुळे विमान अपघात झाला का?
बोईंग 737-800 प्रकारातील फ्लाईट क्रमांक 7C2216 असलेलं हे विमान जेजू एअर कंपनीचं होतं. जेजू एअर ही दक्षिण कोरियातील सर्वांत लोकप्रिय बजेट एअरलाईन आहे.
हे विमान मुआन विमानतळावर स्थानिक वेळेनुसार साधारणपणे 09:00 वाजता (00:00 GMT) पोहोचलं होतं.
दक्षिण कोरियाच्या परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे विमान धावपट्टीवर उतरण्याच्या प्रयत्नात होतं. मात्र एअर ट्रॅफिक कंट्रोलनं पक्षी आदळण्याची धोक्याची सूचना दिल्यामुळे, त्याचं धावपट्टीवर उतरणं रोखण्यात आलं. विमानाची पक्षांशी टक्कर होण्याचा धोका टाळण्यासाठी अशाप्रकारची सूचना दिली जाते.
त्यानंतर जवळपास दोन मिनिटांनी पायलटनं 'मेडे'चा संदेश दिला. विमान आपत्कालीन स्थितीत असतं तेव्हा पायलट हा संदेश एअर ट्रॅफिक कंट्रोलला देतो. परिस्थिती लक्षात घेऊन एअर ट्रॅफिक कमांडनं पायलटला विमान विरुद्ध दिशेनं उतरवण्याची परवानगी दिली, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
विमानातील एका प्रवाशानं त्याच्या एका नातेवाईकाला मेसेज पाठवला. त्यात म्हटलं होतं की, "विमानाच्या पंखात पक्षी अडकला आहे" आणि त्यामुळे विमान धावपट्टीवर उतरू शकत नाही, अशी बातमी स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
एका व्हीडिओमध्ये दिसतं की, विमानाची चाकं (लँडिंग गिअर) न वापरता विमान खाली धावपट्टीवर उतरताना दिसत आहे. विमान धावपट्टीवर घसरत गेलं आणि एका भिंतीवर आदळलं. त्यानंतर विमानात आग लागली.
योनहाप दक्षिण कोरियातील वृत्तसंस्थेला एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, त्यांनी एक मोठा आवाज ऐकला आणि त्यानंतर स्फोटांची मालिका सुरू झाली.
विमानातून धुराचे लोट निघून ते आकाशात जात असल्याचं घटनास्थळाच्या व्हीडिओंमध्ये दिसत होतं. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी विमानाला लागलेली आग विझवली.
ली जिऑंग-ह्यून मुआन अग्निशमन दलाचे प्रमुख आहेत. त्यांनी माध्यमांना सांगितलं की, "विमानाचा शेपटीकडचा भाग ओळखता येण्याच्या स्थितीत आहे. मात्र विमानाचा उर्वरित भागाचा आकार ओळखता येण्यापलीकडच्या स्थितीत आहे."
पक्षी धडकल्यामुळे आणि खराब हवामानामुळे हा विमान अपघात झाला असावा, असं ते म्हणाले. मात्र विमान अपघातामागच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जातो आहे. विमानातील फ्लाईट रेकॉर्डर आणि व्हॉईस रेकॉर्डर ताब्यात घेण्यात आले आहेत.
योनहाप या वृत्तसंस्थेनुसार, की हा विमान अपघात विमानाच्या देखभालीशी निगडीत समस्यांमुळे झालेला नाही, असं जेजू एअरच्या व्यवस्थापन प्रमुखांनी सांगितलंय.
तर, विमानाचा मुख्य वैमानिक 2019 पासून हे काम करतो आहे. त्याला 6,800 तासांहून अधिक उड्डाण तासांचा अनुभव आहे, असं दक्षिण कोरियाच्या परिवहन विभागानं सांगितलं.
बर्ड स्ट्राईक म्हणजे काय?
बर्ड स्ट्राईक म्हणजे पक्षी विमानाला धडकणं. उड्डाण करणारं विमान आणि पक्षी यांच्यातील टकरीला बर्ड स्ट्राईक म्हणतात. युनायटेड किंगडममध्ये (युके) विमानाची पक्षाशी टक्कर होण्याचे प्रकार अतिशय सामान्य आहेत.
युकेतील नागरी विमान प्राधिकरणाच्या माहितीनुसार, तिथे 2022 या एका वर्षातच 1,400 हून अधिक बर्ड स्ट्राईक नोंदवण्यात आले होते. त्यापैकी जवळपास 100 धडकांचा विमानावर परिणाम झाला होता.
सर्वांत परिचित बर्ड स्ट्राईक 2009 मध्ये झाला होता. त्यावेळेस गूझ या पक्षांच्या (राजहंसासारखा दिसणारा पक्षी) थव्याशी एअरबसच्या विमानाची टक्कर झाल्यानंतर ते विमान न्यूयॉर्कच्या हडसन नदीत कोसळले होते. त्या अपघातात विमानातील सर्व 155 प्रवासी आणि कर्मचारी वाचले होते.
प्राध्यापक डुग ड्रूरी ऑस्ट्रेलियातील सीक्यू विद्यापीठात (CQUniversity Australia)हवाई उड्डाण हा विषय शिकवतात. 'द कॉन्झर्वेशन' या मासिकासाठी त्यांनी या उन्हाळ्यात एक लेख लिहिला होता.
त्यात त्यांनी लिहिलं होतं की, बोईंगच्या विमानांमध्ये टर्बोफॅन इंजिन असतात. पक्षांशी टक्कर झाल्यानंतर त्या विमानांचं गंभीर स्वरुपाचं नुकसान होऊ शकतं.
ते म्हणाले की, "पहाटेच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी पक्षी सर्वाधिक सक्रिय असतात. त्यामुळे त्या वेळेस सर्वांत जास्त सतर्क किंवा सावध राहण्याचं प्रशिक्षण वैमानिकांना दिलं जातं."
विमानात कोण होतं?
दक्षिण कोरियात अपघात झालेल्या विमानात 175 प्रवासी होते आणि 6 विमानातील कर्मचारी होते. यातील 2 प्रवासी थायलंडचे होते आणि उर्वरित प्रवासी दक्षिण कोरियातील होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यातील बहुतांश प्रवासी नाताळच्या सुट्टीवरून परत येत असल्याचं सांगितलं जातं.
या भीषण अपघातात 179 जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण कोरियाच्या इतिहासातील हा सर्वांत भयानक विमान अपघात ठरला आहे.
या विमानातील सर्वच्या सर्व प्रवासी आणि विमानातील चार कर्मचाऱ्यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत अधिकाऱ्यांनी 88 मृतदेहांची ओळख पटवली आहे.
मृतांपैकी 5 जण 10 वर्षांखालील वयाची मुलं होती. यातील सर्वांत लहान प्रवासी फक्त तीन वर्षांचा एक मुलगा होता. तर विमानातील सर्वांत वयस्कर प्रवासी 78 वर्षांचा होता. प्रवाशांच्या यादीतील माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी हे सांगितलं.
दक्षिण कोरियाच्या नॅशनल फायर एजन्सीनुसार, या विमान अपघातात विमानातील दोन कर्मचारी, एक पुरुष आहे आणि एक महिला हे बचावले आहेत. अपघातानंतर ते विमानाच्या शेपटीकडच्या बाजूला सापडले होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, अशी माहिती या एजन्सीनं दिली.
विमान अपघातानंतर मदतकार्य करण्यासाठी 1,500 हून अधिक आपत्कालीन कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलं आहे. यात अग्निशमन दलाचे 490 कर्मचारी आणि 455 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ते अपघातस्थळी धावपट्टीच्या आजूबाजूच्या परिसरात विमानातील प्रवासी आणि विमानाच्या भागांचा शोध घेत आहेत.
अपघातानंतर काय पावलं उचलण्यात आली?
दक्षिण कोरियाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष चोई सँग-मोक यांनी मुआनमध्ये विशेष आपत्ती क्षेत्र घोषित केलं आहे. त्यामुळे स्थानिक सरकार आणि विमान अपघातातील पीडितांना दक्षिण कोरियाच्या केंद्र सरकारचा निधी उपलब्ध होणार आहे.
मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारी आणि तिथून जाणारी सर्व विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.
विमानातील प्रवाशांचे नातेवाईक, कुटुंबीयांनी विमानतळाकडे धाव घेतली आहे. आपल्या प्रियजनांचं काय झालं हे जाणून घेण्यासाठी ते तिथे जात आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या व्हीडिओमध्ये अधिकारी विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नाव मोठ्यानं वाचताना दिसत आहेत.
विमानतळ प्राधिकरण आणि रेड क्रॉसनं पीडित कुटुंबांना खासगीपणानं शोक करता यावा यासाठी विमानतळावर डझनभराहून अधिक तंबू उभारले आहेत.
विमानतळाच्या टर्मिनलवर लोक रडत असल्याचे आवाज ऐकू येत होते. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी आणखी किती वेळ लागणार, यामुळे काहीजण निराशही झाले आहेत.
जेजू एअरनं विमानातील सर्व प्रवाशांच्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे.
"विमान कंपनीला अपघातांचा कोणताही इतिहास नाही," असं जेजू एअरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानं पत्रकार परिषदेत सांगितलं.
2005 मध्ये ही विमान कंपनी सुरू झाल्यापासून रविवारी (29 डिसेंबर) झालेला अपघात हा एकमेव जीवघेणा अपघात झाल्याचं मानलं जातं आहे.
अपघातग्रस्त विमान हे बोईंग या जगप्रसिद्ध विमान उत्पादक कंपनीचं विमान होतं. त्यामुळे या विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयासाठी बोईंगनं शोक व्यक्त केला आहे.
दक्षिण कोरियाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष चोई सँग-मोक म्हणाले, "या अपघातात मृत्यू पावलेल्यांसाठी मी मनापासून शोक व्यक्त करतो. या अपघातात जखमी झालेले लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी सर्व प्रयत्न करेन."
दक्षिण कोरियन सरकारनं पुढील सात दिवसांसाठी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीत सरकारी कार्यालयांमधील झेंडे खाली उतरवले जातील.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.