You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमुळं बोईंग कंपनीलाही धक्का, 787 ड्रीमलायनर कोसळण्याची पहिलीच वेळ
- Author, जोनाथन जोसेफ्स
- Role, बीबीसी न्यूज
गुजरातमध्ये 242 प्रवाशांसह लंडनकडे उड्डाण केलेलं विमान गुरुवारी (12 जून) दुपारी कोसळलं. हे विमान अहमदाबाद येथील विमानतळाजवळील मेघानी नगर या रहिवाशी भागात कोसळलं.
विमान एअर इंडियाचे Flight AI 171 होते. उड्डाणावेळेस हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. एअर इंडियाचे हे बोईंग कंपनीचे 787-8 ड्रीमलायनर मॉडेलचं विमान होतं.
एअर इंडियाच्या ड्रीमलायनर विमानाच्या अपघाताचा बोईंग कंपनीलाही मोठा धक्का बसला आहे.
बोईंग 787 विमान अशा प्रकारे कोसळण्याची ही एअर इंडियाची पहिली दुर्घटना आहे.
हे मॉडेल 14 वर्षांपूर्वी लाँच करण्यात आले होते आणि अवघ्या सहा आठवड्यांपूर्वीच विमान उत्पादक कंपनीने याचं कौतुक केलं होतं.
ड्रीमलाइनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विमानाच्या या मॉडेलनं 1 अब्ज प्रवाशांचा वाहतूक टप्पाही गाठला आहे.
सीईओ ऑर्टबर्ग यांच्यासाठी कसोटीचा काळ
अहमदाबादमधील विमान कोसळण्याच्या दुर्घटनेचा बोईंग कंपनीलाही मोठा धक्का बसला आहे.
कारण बोईंग कंपनी त्यांच्या 737 प्रोगाममध्ये जीवघेण्या दुर्घटनांसह (क्रॅश) अनेक समस्यांवर मात करण्यासाठी प्रयत्न करत होती.
लवकरच आपल्या पदाची वर्षपूर्ती करणारे सीईओ केली ऑर्टबर्ग यांच्यासाठी हा प्रसंग अत्यंत कसोटीचा असेल.
दरम्यान, बोईंग कंपनीने या दुर्घटनेवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
"आम्हाला प्राथमिक अहवालांची माहिती मिळाली आहे. याबाबत अधिक माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे," असं बोईंगनं निवेदनात म्हटलं आहे.
जगभरातील 1,175 हून अधिक 787 विमानांच्या ताफ्यानं जवळपास 5 लाख उड्डाणं पूर्ण केली आहेत.
तसंच 30 दशलक्षाहून अधिक उड्डाण तासांचा प्रवास केला असल्याचं कंपनीनं नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात सांगितलं होतं.
न थांबता प्रवास करण्याच्या या विमानाच्या क्षमतेमुळे नॉनस्टॉप फ्लाईट्ससाठी ही विमानं वापरली जातात.
अनुभवी कॅप्टन सुमित यांच्याकडे होती जबाबदारी
या विमानात 242 प्रवासी होते. तसेच विमानात 2 वैमानिक आणि 10 कर्मचारी होते.
या विमानाची जबाबदारी कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्याकडे होती, अशी माहिती डीजीसीएने दिली आहे.
एअर इंडियाच्या माहितीनुसार 242 पैकी 169 प्रवासी भारतीय होते, 53 ब्रिटिश नागरिक, 1 व्यक्ती कॅनेडियन तर 7 लोक पोर्तुगालचे होते. हे विमान लंडनला गॅटव्हिक येथे जात होतं.
दरम्यान, एएनआयनं नागरी उड्डाण महासंचालक (डीजीसीए) यांचे निवेदन प्रसिद्ध केलं.
त्यानुसार, "कॅप्टन सुमित सभरवाल यांना 8200 तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता. तसेच सह-वैमानिकाला 1100 तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता.
"एटीसीनुसार (एअर ट्रॅफिक कंट्रोलर), या विमानानं अहमदाबादहून दुपारी 1.38 वाजता उड्डाण केलं. त्यांनी एटीसीला डिस्ट्रेस कॉल केला, परंतु त्यानंतर एटीसी कॉलला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
"धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळलं. अपघातस्थळावरून काळा धूर निघताना दिसत होता."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)