You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ते दोन शब्द उच्चारले आणि ओळख पटत नसलेला डॉन पोलिसांच्या जाळ्यात अलगद सापडला
- Author, जयदीप वसंत
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
अब्दुल लतीफ. या नावाची चर्चा गुजरातच्या अंडरवर्ल्डमध्येच नव्हे, तर अगदी राजकारणातही आजही होते.
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाआधी लतीफ दुबईला गेला आणि तेथून त्याने पाकिस्तान मधील कराची गाठलं. सगळं काही सुरळीत झालंय असं वाटल्यावर तो भारतात आला.
देशाचं रक्षण करणारा गुप्तहेर असो वा अंडरवर्ल्डमध्ये सामील असणारा एखादा गुन्हेगार, चुका करणं टाळतो. पण लतीफने चूक केली.
त्यामुळे लतीफचा ठावठिकाणा शोधण्यात गुजरात एटीएसला यश आलं. संशयित व्यक्ती लतीफ आहे की नाही याबाबत तपास पथक संभ्रमात असताना लतीफच्या तोंडून दोन शब्द बाहेर पडले आणि पोलिसांना तो सापडला.
तुरुंगात असताना लतीफने आणखी एक चूक केली, त्यामुळे त्याचा अंत झाला. 29 नोव्हेंबरला 1997 अहमदाबाद पोलिसांशी झालेल्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला आणि गुजरातमधील गुन्हेगारीचा एक अध्याय संपला.
एकेकाळी अहमदाबादचा डॉन म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या अब्दुल लतीफचं 'साम्राज्य' कसं संपलं?
• अहमदाबादचा कुख्यात गँगस्टर अब्दुल लतीफ 29 नोव्हेंबर 1997 रोजी पोलीस चकमकीत मारला गेला.
• गोळीबार, दारूचा व्यापार आणि बॉम्बस्फोट यांसारख्या गुन्ह्यांशी संबंधित अब्दुल लतीफ पोलिसांच्या हाती कसा लागला?
• 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटापूर्वी लतीफ दुबईहून कराचीला पोहोचला आणि नंतर प्रकरण मिटल्याचं लक्षात आल्यानंतर तो भारतात परतला.
• खंडणी वसूलीच्या चुकीमुळे पोलिसांना त्याचा ठावठिकाणा सापडला.
• त्या दिवशी लतीफच्या तोंडून दोन शब्द बाहेर पडले आणि पोलिसांनी त्याला पकडलं.
फोनने केला गेम
अंडरवर्ल्डमध्ये सामील असणारा एखादा गुन्हेगार असो वा देशाचं रक्षण करणारा गुप्तहेर, चुका करणं टाळतो. जसं की, ते सतत एकाच ठिकाणी जाणं येणं टाळतात.
दिवसाचा दिनक्रम तोच ठेवत नाहीत. एकाच दुकानात वस्तू खरेदी करणं, ठराविक ठिकाणी जाणं, येणं त्यांच्यासाठी जीवघेणं ठरू शकतं.
ही बाब लतीफच्या लक्षात आलीच नाही. लतीफने नवरंगपुरा टेलिफोन एक्सचेंज अंतर्गत दोन फोन नंबरवर खंडणीसाठी फोन केले.
लतीफ भारतात परतल्यानंतर गुजरात एटीएसने (दहशतवादविरोधी पथक) त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांना दिल्लीहून एक फोन सतत येत असल्याची माहिती मिळाली. मग सुरु झालं 'ऑपरेशन थिएटर'
एटीएसचे तत्कालीन डीआयजी कुलदीप शर्मा दिल्लीत पोहोचले. त्यांनी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) स्पेशल टास्क फोर्सचे अधिकारी नीरज कुमार यांची मदत घेतली. ते दिल्ली पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त होणार होते. त्यांनी त्यांच्या 'डायल डी फॉर डॉन' या पुस्तकाच्या पाचव्या प्रकरणात लतीफ संबंधित घटनाक्रमावर प्रकाश टाकला आहे. ते लिहितात,
'त्यावेळी मोबाईल फोन फारसे प्रचलित नव्हते. लँडलाईनचा वापर जास्त होता. याशिवाय पाळत ठेवण्याची सुविधा आता सारखी आधुनिक नव्हती. शर्मा यांच्या विनंतीनंतर महानगर दूरसंचार निगम लिमिटेडच्या अधिकार्यांशी संपर्क साधून काही व्यावहारिक अडचणी मांडण्यात आल्या.'
'दिल्लीतील ज्या क्रमांकावरून फोन येत होता त्याची माहिती काढण्यासाठी तो फोन किमान दहा ते 13 मिनिटं सुरू राहणं आवश्यक होतं. नवरंगपुरा एक्स्चेंजने फोन आल्यावर अहमदाबादच्या डी-टॅक्स (डिजिटल टेलिफोन ऑटोमॅटिक एक्सचेंज) ला माहिती द्यावी असं ठरलं.'
'जेव्हा फोन सुरू होईल तेव्हा डी-टॅक्सने दिल्लीत तात्काळ माहिती द्यावी. दिल्लीत असे दोन डिटॉक्स होते. याशिवाय, दिल्लीत एकूण 30 टेलिफोन एक्सचेंज कार्यरत होते. फोन नॉन-इलेक्ट्रिक एक्सचेंजमधून गेला असता तर तो ट्रेस करणं कठीण झालं असतं. पण बहुतेक एक्सचेंज रात्री नऊ वाजल्यानंतर रिकामे असतात त्यामुळे बरोबर संधी साधता आली.'
एटीएस व्यतिरिक्त आयबी, अहमदाबाद क्राइम ब्रँच आदी अधिकारीही तपास करतच होते. अशाच एका अधिकाऱ्याला शर्मा गुजरात भवनात भेटले. तेव्हा डीआयजी शर्मा म्हणाले, 'आमच्या ऑपरेशन मध्ये व्यत्यय आणू नका. मला वाटतं की तुम्ही अहमदाबादला परत जावं.' आणि अशा प्रकारे गुन्हे शाखेचे अधिकारी अहमदाबादला परतले.
लतीफच्या पुढच्या दातांवर सोन्याची कॅप असल्याची माहितीही एटीएसला मिळाली होती. या माहितीचं पत्र गुजरात एटीएस, सीबीआय आणि एमटीएनएलच्या अधिकार्यांना देण्यात आलं. त्या पत्रावर तारीख होती 10 ऑक्टोबर 1995.
ते दोन शब्द
लतीफने केलेले बहुतेक फोन संध्याकाळी 7 ते 10 च्या दरम्यानचे असायचे. लतीफसाठी त्याचाच दिनक्रम घातक ठरला आणि सुरक्षा यंत्रणांच्या ते पथ्यावर पडलं.
असा एक फोन 13 मिनिटं चालला आणि अपेक्षेप्रमाणे सगळं घडलं.
दिल्लीच्या ऐतिहासिक जामा मशीद परिसरातील एका पीसीओ वरून दोन फोन आले. हा पीसीओ दरियागंज एक्सचेंज अंतर्गत येत होता.
सुरक्षा यंत्रणांनी फोनचे रेकॉर्ड तपासले असता, त्याच फोन नंबरवरून पूर्वीही फोन आले होते. त्यामुळे या संपूर्ण कारवाईसाठी एसटीएफ, एटीएस आणि एमटीएनएलची टीम संध्याकाळी साडेसहा ते रात्री साडेदहापर्यंत दरियागंज एक्सचेंजमध्ये बसायची.
फोन पीसीओ वरून येत होता. पोलिसांनी त्या भागाची रेकी केली असता तो भाग खूप गजबजलेला असल्याचं त्यांना आढळलं. त्यामुळे पोलिसांचं एखादं चुकीचं पाऊल त्यांना महागात पडलं असतं.
दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि सीबीआय अधिकाऱ्यांना लतीफचा व्हीडिओ दाखवण्यात आला. त्याच्या संभाषणाचे रेकॉर्ड दाखविण्यात आले. जेणेकरून त्याची हालचाल आणि त्याचं बोलणं लगेच ओळखता येईल.
दिल्ली पोलिस आणि गुजरात एटीएसची एक टीम पीसीओच्या समोरील मैदानात तैनात राहील असं ठरलं. त्यांना वॉकीटॉकीऐवजी वायरलेस सेट देण्यात आले, जेणेकरून ते लवकर संवाद साधू शकतील.
पहिल्या दिवशी एकही फोन आला नाही, पण दुसऱ्या दिवशी जे-टीई पीसीओ वरून उदयपूरला एक फोन गेला. एटीएसचे डीआयजी पीसीओ वरील आवाज ऐकत होते. हा फोन उदयपूरला केला होता म्हणून पहिल्यांदा शंका आली नाही. पण संभाषण पुढे चालूच राहिल्यावर खात्री पटली की हा फोन लतीफचाच आहे.
लतीफ नेहमीच्या संभाषणात विचारायचा की, 'आयशा कुठे आहे?' लतीफने त्या दिवशी उदयपूरहून आलेल्या फोनवरही हेच विचारलं.
खात्री करण्यासाठी डीआयजी शर्मा यांनी नीरज कुमार यांना हेडफोन दिले. नीरज कुमार यांनीही तो आवाज लतीफचा असल्याचं सांगितलं.
पीसीओवर तैनात असलेल्या टीमला ताबडतोब सतर्क करण्यात आलं आणि पीसीओवर बोलणाऱ्या व्यक्तीची खातरजमा करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
पीसीओच्या केबिनमध्ये 45-50 वर्षांचा एक माणूस लुंगी नेसून बसला होता. मात्र, त्याच्या चेहऱ्यावर लतीफ सारख्या मिशा नव्हत्या. मात्र तरीही पोलिसांनी त्याच्याशी बोलायचं ठरवलं. यावेळी त्याने तोंड उघडताच त्याचा सोन्याचा दात चमकला. आणि लतीफ अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
दिल्ली पोलिस आणि एटीएसच्या पथकाने लतीफला बंदुकीचा धाक दाखवून ताब्यात घेतलं. जवळच उभ्या असलेल्या पोलिसांच्या गाडीत त्याला बसविण्यात आलं. काही मिनिटांतच टीम लतीफला घेऊन दरियागंज पोलिस ठाण्यात पोहोचली.
अखेर कारागृहात रवानगी...
यापूर्वी लतीफने आत्मसमर्पण करण्याबाबत विचारणा केली होती. पण गुजरात पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांकडून चौकशी न करण्याच्या, वेगवेगळ्या पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी चौकशी न करण्याच्या त्याच्या अटी फेटाळण्यात आल्या.
लतीफ अहमदाबादमधून पळून गेल्यानंतर त्याच्या टोळीचं कंबरडं मोडण्यात आलं. त्यांचे अनेक साथीदार तुरुंगात होते. आता टोळीचा म्होरक्याही पकडला गेला.
एटीएसचं पथक दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता इंडियन एअरलाइन्सच्या विमानातून लतीफला घेण्यासाठी निघाले. नीरज कुमार यांनाही सोबत येण्याची विनंती केली, जी त्यांनी मान्य केली.
डीजीपी स्वतः विमानतळावर पोहोचले. आदल्या दिवशी शर्मा यांनी त्यांच्या वरिष्ठांना आणि तत्कालीन मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांना याबाबत माहिती दिली होती. नीरज कुमार यांना मुख्यमंत्र्यांनी सर्किट हाऊसवर बोलावलं.
सकाळी डीजीपींनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन लतीफच्या अटकेची माहिती दिली. दुपारी नीरज कुमार यांच्यासह शर्मा यांनी मुख्यमंत्री पटेल यांची भेट घेतली. केशुभाईंनी त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. सायंकाळी पोलीस मेसमध्ये विशेष कार्यक्रमही पार पडला.
कायद्याची प्रक्रिया सुरू झाल्यावर लतीफवर एकामागून एक खटले भरले गेले. प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांनी त्याला सहकार्य केलं. काही प्रकरणांमध्ये साक्षीदार गायब झाल्यामुळे किंवा पुराव्याअभावी तो निर्दोष सुटला. त्यामुळे लतीफने आत्मसमर्पण केलंय की नाही, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले.
शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला 'रईस' चित्रपट लतीफच्या जीवनावर आधारित असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र निर्मात्यांनी या अफवा असल्याचं म्हटलं होतं.
आणखीन एक चूक
लतीफ तुरुंगात गेल्यानंतर सुरेश मेहता आणि शंकरसिंह वाघेला हे गुजरातचे मुख्यमंत्री बनले. राज्यसभेचे खासदार रौफ वल्लीउल्ला आणि राधिका जिमखाना हे प्रकरण अजूनही मिटलं नव्हतं, त्यामुळे लतीफच्या डोक्यावर टांगती तलवार कायम होती.
दारु व्यवसायातील आरोपी हंसराज त्रिवेदी शिवाय राधिका जिमखान्यात आठ जणांचा मृत्यू झाला होता. मार्च 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटासाठी आणलेल्या शस्त्रांपैकी एक एके-47 बंदूक ऑगस्ट 1992 च्या हत्याकांडात वापरण्यात आली होती.
लतीफने जुहापुरा येथील बिल्डर सगीर अहमद यांना खंडणीसाठी धमकावलं होतं. एकेकाळी लतीफच्या जवळ असलेल्या या बिल्डरने पैसे द्यायला नकार दिला आणि पोलिस संरक्षणासाठी अर्ज केला. यामुळे लतीफ चिडून होता.
23 नोव्हेंबर 1997 च्या संध्याकाळी अहमदाबादच्या दानिलिम्दा परिसरात सगीर अहमदची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येमागे लतीफचा हात असल्याचं पोलीस आणि राजकारणी जाणून होते.
पुढील तपासात उघड झालं की जामनगर येथील जडेजा बंधू आणि स्थानिकाच्या मदतीने ही हत्या घडवून आणली आहे. मात्र हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर सर्वांची निर्दोष मुक्तता झाली.
सगीर अहमद अनेकदा तत्कालीन मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांच्यासोबत व्यासपीठावर दिसला होता. तो पक्षाशीही संबंधित होती. दिलीप पारीख मुख्यमंत्री होऊन एक महिनाही उलटला नसेल, वाघेला यांच्याकडे सत्तेची सूत्रं सोपविण्यात आली. हे सगळ्यांसाठी उघड सत्य होतं.
सगीर अहमदच्या हत्येनंतर आठवडाभरातच लतीफ पोलिसांच्या ताब्यातून सुटला आणि फरार झाला. पुढे तपास सुरू झाल्यावर नरोदा क्रॉसिंगजवळ (29 तारखेला) झालेल्या चकमकीत लतीफ मारला गेला.
मुंबईतील गुन्हेविषयक बातम्यांचं वृत्तांकन करणारे वरिष्ठ पत्रकार आशु पटेल यांनी मुंबईतील अंडरवर्ल्डच्या घडामोडींवर दस्ताऐवज नावाचं पुस्तक लिहिलं आहे.
या पुस्तकात तथ्यं आणि घटना वास्तविक आहेत. मात्र ते मनोरंजक बनविण्यासाठी कादंबरीसारखं लिहिलेलं आहे. त्यात (पृष्ठ क्र. 296) पटेल लिहितात,
'पोलिसांनी परवानगी दिली तरच बहुतेक गुंड टोळीप्रमुख बनतात. पोलिसांच्या सहकार्याशिवाय टोळी चालवणं अवघड असतं. अब्दुल लतीफला अहमदाबादच्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केली त्यामुळेच लतीफ अहमदाबादचा डॉन बनू शकला.'
'पण लतीफ प्रकरण पोलिसांना जड जाऊ लागल्यावर त्याचं आयुष्य थांबलं. सुरुवातीला पोलिसांचं छत्र असलेल्या लतीफच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला. नाहीतर त्याआधी लतीफने जवळपास दोन दशकं अहमदाबादच्या अनेक भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांचे खिसे भरले होते.'
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)