Mumbai Underworld : हाजी मस्तान ते करीम लाला, मुंबईच्या अंडरवर्ल्डचा थरारक इतिहास

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

एकेकाळी मुंबईच्या माझगाव डॉक्समध्ये शेर खान पठाण नावाचा गुंड हमालांकडून हप्ता वसूल करायचा. हप्ता द्यायला नकार देईल त्याला त्यांचे गुंड मारहाण करत असत.

डॉकमध्ये काम करणारे हाजी मस्तान रोज हे चित्र पाहायचे. बाहेरची एक व्यक्ती डॉकमध्ये येऊन हमालांकडून असे कसे पैसे उकळू शकतो, हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं.

हाजी मस्तान यांनी शेर खानचा सामना करायचं ठरवलं. पुढच्या शुक्रवारी शेर खान गुंडांबरोबर हप्ता वसुली करायला आला, त्यावेळी हमालांच्या रांगेतून 10 जण बेपत्ता असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

त्यांच्या काही लक्षात येण्याआधीच मस्तान आणि त्यांच्या 10 सहकाऱ्यांनी शेरखान आणि त्याच्या गुंडांवर हल्ला केला.

शेरखानकडं रामपुरी चाकू, गुप्ती अशी शस्त्रं होती. तरीही मस्तान आणि त्यांचे सहकारी गुंडांवर भारी ठरले. अखेर रक्ताच्या थारोळ्यातच शेर खान आणि त्याच्या सहकाऱ्यांना जीव वाचवण्यासाठी तिथून पळून जावं लागलं.

या घटनेमुळं हाजी मस्तान हमालांचे नेते बनले, पण त्यामुळं 'मस्तान लिजंड'ची जणू सुरुवात झाली.

1975 मध्ये आलेल्या दिवार चित्रपटात यश चोप्रानं हे दृश्य जसच्या तसं दाखवलं होतं.

प्रसिद्ध पत्रकार वीर सांघवी यांचं आत्मचरित्र 'अ रूड लाइफ' नुकतंच प्रकाशित झालं आहे. त्यात त्यांनी "दिवार चित्रपटातील अमिताभ बच्चनचं पात्र हे ढोबळ मानानं हाजी मस्तानच्या जीवनावर आधारित होतं. फक्त 786 बिल्ला क्रमांक 786 ची कहाणी खरी नसल्याचं त्यांनी मला सांगितलं होतं,'' असं म्हटलं आहे.

"मस्तान यांनी नंतर विनोदी कलाकार मुकरी यांनी त्यांच्या जीवनावर तयार केलेल्या चित्रपटातही अभिनय केला होता. या चित्रपटात त्यांच्या जीवनातील ग्लॅमर असलेला भाग दाखवण्यात आला होता. चित्रपटात मस्तान यांनी विरळ केस लपवण्यासाठी विग परिधान केली होती," असं सांघवी सांगतात.

करीम लाला आणि वरदराजन मुदालियारशी हात मिळवणी

मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये शक्तिशाली बनण्यासाठी केवळ पैसा आवश्यक नसल्याचं, मस्तान यांच्या लक्षात आलं होतं.

"मस्तानला मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी शक्तीची गरज होती. त्यासाठी त्यांनी शहरातील दोन प्रसिद्ध डॉन करीम लाला आणि वर्दराजन मुदालियार यांच्याशी हात मिळवणी केली," असं मुंबईच्या अंडरवर्ल्डवर आधारित असलेलं प्रसिद्ध पुस्तक 'डोंगरी टू मुंबई सिक्स डिकेड्स ऑफ द मुंबई माफिया' यात एस. हुसेन झैदी यांनी लिहिलं आहे.

1956 मध्ये हाजी मस्तान यांचा संपर्क दमनचे डॉन सुकुर नारायण बखिया यांच्याशी झाला. लवकरच ते दोघं पार्टनर बनले आणि त्यांनी काही भाग आपसांत वाटून घेतले. मुंबई बंदराचा भाग मस्तानकडं तर दमन बंदराचा भाग बखियाकडे होता.

"दुबईहून तस्करी करून आणलेलं सामान दमनमध्ये उतरवलं जायचं. तर अदनहून आणलेलं सामान मुंबईत उतरवलं जायचं. बखियाच्या सामानावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी मस्तानची होती, असं हुसेन झैदी यांनी लिहिलं आहे.

युसूफ पटेलला मारण्यासाठी मस्तानने दिली सुपारी

मस्तान वार्डन रोड आणि पेडर रोडच्या दरम्यान असलेल्या सोफिया कॉलेज लेनच्या एका बंगल्यात राहू लागले होते.

"मी 1979 मध्ये हाजी मस्तान यांची मुलाखत घ्यायला गेलो होतो. त्यांच्या गार्डनमध्ये एक जुना ट्रक उभा असायचा. त्या ट्रकबाबत एक कथा प्रसिद्ध होती. मस्तान यांनी त्यांच्या पहिल्या कामाच्या (कॉन्ट्राबँड) डिलिव्हरीसाठी तो ट्रक वापरला होता असं सांगितलं जात होतं. मी याबाबत मस्तान यांना विचारलं होतं, पण त्यांनी त्याला नकार दिला. पण त्यांच्या जागी कोणीही असतं तरी, नकारचं दिला असता, असं वीर सांघवी लिहितात.

वीर सांघवी यांनी मुंबई अंडरवर्ल्डमधील आणखी एक व्यक्ती युसूफ पटेल यांच्याबरोबर झालेल्या भेटीचाही उल्लेख केला आहे.

"युसूफ यांना पाय हलवण्याची सवय होती. तसं करताना त्यांच्या पायाच्या पोटऱ्या दिसायच्या. त्याचवेळी माझ्या लक्षात आलं होतं की, ते पँटच्या आतमध्ये पायजमा परिधान करतात. मी आजवर कुणालाही पँटमध्ये पायजमा परिधान केलेलं पाहिलेलं नव्हतं. एकदा मी त्यांना काही जुन्या विषयांवर बोलण्यासाठी राजी केलं होतं," असं त्यांनी म्हटलं आहे.

"त्यांनी स्वतः मला सांगितलं होतं की एकदा हाजी मस्ताननं त्यांना मारण्यासाठी करीम लालाच्या गुंडांना सुपारी दिली होती. ते रस्त्यावरून जात असताना दोघांनी त्यांना गोळी मारली आणि ते मेले असल्याचं समजून पळून गेले होते. पण त्यांचा मृत्यू झाला नव्हता. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं आणि ते वाचले," असं सांघवी यांनी म्हटलं आहे.

हत्येच्या आरोपात हाजी मस्तान आणि करीम लाला यांना अटक

हुसेन झैदी यांनीही त्यांच्या पुस्तकात या घटनेचा उल्लेख केला आहे.

"मुंबई माफियांच्या इतिहासात पहिली सुपारी हाजी मस्तान यांनी 1969 मध्ये 10 हजार रुपयांत दिली होती. एकेकाळी त्यांच्याबरोबर काम केलेल्या युसूफ पटेल यांना मारण्यासाठी ती दिली होती. हे काम करीम लाला यांच्या मूळच्या पश्तूनमधील असलेल्या दोन गुंडांना सोपवण्यात आलं. त्यांनी पटेल यांच्यावर मिनारा मशिदीच्या जवळ हल्ला केला होता," असं त्यांनी लिहिलं आहे.

"त्या दोघांनी रमझानच्या महिन्यात युसूफ पटेलवर मशिदीच्या गर्दी असलेल्या परिसरात गोळी झाडली. पटेल जमिनीवर कोसळले आणि अंगरक्षकांनी त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्यावर झेप घेतली. मारेकऱ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण गर्दीनं त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. युसूफ पटेल यांच्या हाताला दोन गोळ्या लागल्या, पण त्यांचा अंगरक्षक मारला गेला होता. तो दिवस होता 22 नोव्हेंबर 1969."

"नंतर पोलिसांनी या प्रकरणात हाजी मस्तान, करीम लाला आणि इतर 11 जणांना अटक केली.''

हाजी मस्तान आणि युसूफ पटेल यांची पुन्हा मैत्री

वीस सांघवी यांनी जेव्हा हाजी मस्तान यांना याबाबत विचारलं तेव्हा त्यांनी हे खरं असल्याचं मान्य केलं.

"मस्तान म्हणाले की, युसूफनं एका प्रकरणात त्यांच्याशी दगा केला होता. हाजी मस्तानला दगा देऊन कोणी जीवंत राहू शकत नसल्याचं मस्तान म्हणाले," असं सांघवी यांनी लिहिलं आहे.

"पटेल मारले गेले हे समजलं तेव्हा मला बरं वाटलं, पण नंतर मला समजलं की, युसूफ पटेल बचावले आहे. तेव्हा मी हा देवाचा संकेत असल्याचा विचार केला. जर युसूफनं आता मरावं असं ईश्वराला वाटत नसेल, तर मी ईश्वराच्या इच्छेचा सन्मान करायला हवा असं त्यांना वाटलं. काही दिवसांनी हाजी मस्तान आणि युसूफ पटेल पुन्हा मित्र बनले," असं त्यांनी लिहिलं आहे.

रुखसाना सुल्तान आणि हाजी मस्तान यांची भेट

हाजी मस्तान नेहमी पांढरे कपडे परिधान करायचे. त्यामुळं त्यांचं व्यक्तिमत्त्वं अधिक खुलून येतं, असं त्यांच्या सहकाऱ्यांचं म्हणणं होतं.

"एकदा काँग्रेस नेत्या, संजय गांधींच्या मैत्रीण आणि अभिनेत्री अमृता सिंह यांच्या आई रुखसाना सुल्तान यांनी मला हाजी मस्तानशी प्रथम भेटीचा एक किस्सा ऐकवला होता. त्यांना कॅमी साबण वापरण्याची सवय होती. त्याकाळी भारतात तो साबण मिळत नव्हता. त्यामुळं त्या तस्करांकडून साबण खरेदी करायच्या," असं सांघवींनी म्हटलं आहे.

"एकदा त्यांनी मुंबईच्या गर्दी असलेल्या एका बाजारात गाडी पार्क केली आणि साबण खरेदीसाठी गेल्या. त्यांना कुठंही साबण मिळाला नाही. सध्या साबण येत नाहीत, असंच सगळ्यांनी सांगितलं. त्या कारजवळ परत आल्या तेव्हा त्याठिकाणी लोकांची गर्दी झाली होती.''

''कारच्या आणखी जवळ गेल्या त्यावेळी त्यांनी कारच्या मागच्या सीटवर शेकडो कॅमी साबणांचा ढीग पाहिला. त्यांच्या कारजवळ पांढरे कपडे परिधान केलेला एक व्यक्ती उभा होता. तो आधी हसला आणि नंतर स्वतःची ओळख करून देत म्हणाला, मला हाजी मस्तान म्हणतात."

वरदराजन मुदालियार यांनी मिळवली ओळख

ज्यावेळी हाजी मस्तान मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये जम बसवण्याचा प्रयत्न करत होते, त्याचवेळी आणखी एक हमाल वर्दराजन मुदालियार व्हिक्टोरिया टर्मिनस स्टेशनवर उदरनिर्वाह करण्यासाठी झगडत होते.

मुदालियार यांचा जन्म तमिळनाडूच्या वेल्लोर शहरात झाला होता. त्यांनी शिक्षण पूर्ण केलं नाही, पण इंग्रजी आणि तमिळ लिहिता आणि वाचता येणारे ते कुटुंबातील एकमेव व्यक्ती होते.

मुंबईतील प्रसिद्ध क्राईम रिपोर्टर प्रदीप शिंदे यांच्या मते, "वर्दासाठी काम करणारे लोकं हे सर्व सामान्यांना मुंबईचा नागरिक बनवण्यासाठी रेशन कार्ड, बेकायदेशीर वीज आणि पाणी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत प्रशासनापेक्षाही लवकर कामं करायचे. हेच त्यांच्या शक्तीचं रहस्यही होतं.''

''त्यांची शक्ती एवढी अधिक होती की, सामान्य लोक हे डोळे मिटून त्यांचं काम करायला तयार असायचे. तमिळनाडूहून येणाऱ्यांना मदत करण्यासाठी वर्दराजन यांनी दोन सर्वात विश्वासू टॉमस कुरियन उर्फ खाजा भाई आणि मोहिंदर सिंह विग म्हणजेच बडा सोमा यांना जबाबदारी दिली होती."

हाजी मस्तान आणि वर्दराजन मुदालियार यांची भेट

हाजी मस्तान आणि वर्दराजन मुदालियार दोघं तमिळनाडूचे होते.

हुसैन झैदी यांनी एक किस्सा सांगितला आहे. "एकदा वर्दा यांना पोलिसांनी कस्टम्स डॉक परिसरातून अँटिना चोरल्याच्या आरोपात अटक केली होती. चोरीचा माल कुठं ठेवला आहे, त्या जागेचा पत्ता पोलिसांनी विचारला. पत्ता सांगितला नाही, तर थर्ड डीग्रीचा वापर करण्याचा इशारा दिला होता."

"वर्दा आझाद मैदान लॉकअपमध्ये आता पुढं काय करायचं याचा विचार करत होते. त्याचवेळी हातात 555 सिगारेट असलेली एक व्यक्ती तुरुंगात त्यांच्या कोठडीजवळ आला. त्यांनी वर्दा यांना हळू आवाजात तमिळमध्येच म्हटलं- वणक्कम थलइवा'. हे ऐकूण वर्दा यांना धक्का बसला. 'थलइवा' शब्द तमिळमध्ये 'प्रमुख' किंवा बॉस अशा अर्थानं वापरला जातो."

"याआधी वर्दा यांच्याशी एवढ्या आदरानं कोणीही बोललं नव्हतं. ती व्यक्ती होती, हाजी मस्तान."

"मस्तान वर्दराजनला म्हणाले, तुम्ही यांना अँटिना परत करा, त्यापेक्षा जास्त पैसे तुम्हाला कमावता येतील याची खात्री मी देतो. वर्दराजननं सुरुवातीला याकडं दुर्लक्ष केलं. पण मस्तान त्यांना म्हणाले,- मी तुम्हाला अशी ऑफर देत आहे जी हुशार व्यक्ती कधीही नाकारू शकत नाही. अँटिना परत करा आणि सोन्याच्या व्यापारात माझे पार्टनर बना."

"वर्दाने त्यांना विचारलं यामुळं तुमचा काय फायदा होईल? मस्ताननं उत्तर दिलं, मला तुमच्या शक्तीची मदत हवी आहे. एका सुटा बुटातल्या व्यक्तीनं कशाप्रकारे गावंढळ दिसणाऱ्या आणि पांढरं बनियान तसंच लुंगी, चप्पल परिधान करणाऱ्या व्यक्तीशी हात मिळवला होता, याचे साक्षीदार काही पोलिसही होती. ते कधीही ही बाब विसरले नाही."

मस्तान, करीम लाला आणि वर्दाची मैत्री

वर्दा तुरुंगातून सुटल्यानंतर मस्तान त्यांचा वापर स्वतःच्या कामासाठी करू लागले. वर्दराजनला लोकांची नस उमगलेली होती. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते कायम घरीच राहायचे. धार्मिक असल्यामुळं ते माटुंगा स्टेशनबाहेरच्या गणेश मंडळात मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करू लागले.

हळू-हळू त्यांच्या ऐपतीनुसार मंडळाचा व्याप वाढू लागला. वर्दा यांच्यावर नायकन, दयावान आणि अग्निपथ असे अनेक चित्रपटही बनले. अग्निपथमध्ये अमिताभ बच्चन यांनी वर्दा यांच्या आवाजाची नक्कल केल्याचं दाखवलं आहे.

दुसरीकडं मस्तान यांच्या साम्राज्याचा व्यापही वेगानं वाढत होता.

"मस्तान विदेशात जी चांदी पाठवायचे, ती शुद्धतेसाठी एवढी प्रसिद्ध होती की तिला, 'मस्तानची चांदी' असं ब्रँड नेम मिळालं. मस्तान यांनी मलाबार हिलमध्ये आलिशान बंगला आणि अनेक मोठ्या कार खरेदी केल्या. त्यांनी मद्रासच्या सबिहा बी यांच्याशी लग्न केलं. त्यांच्यापासून मस्तानला कमरुन्निसा, महरुन्निसा आणि शमशाद या तीन मुली झाल्या," असं हुसेन झैदी यांनी लिहिलं आहे.

"70 चं दशक येईपर्यंत दक्षिण आणि पश्चिम मुंबईत हाजी मस्तान आणि मध्य मुंबईत वर्दराजन मुदालियार आणि करीम लाला यांच्या शक्तीचं वर्चस्व निर्माण झालं."

गँगवॉरमध्ये मध्यस्थी

हाजी मस्तानला आधी 1974 आणि नंतर 1975 मध्ये आणीबाणीदरम्यान अटक करण्यात आली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर मस्ताननं तस्करी सोडली आणि बांधकाम क्षेत्रात प्रवेश केला.

दरम्यान मुंबई पोलिसांचे अधिकारी यादवराव पवार यांनी वर्दराजनला मुंबईतून पळवून लावण्यासाठी मोहीम सुरू केली होती. त्यात त्यांना यशही आलं. वर्दराजनला अखेर मुंबई सोडून मद्रासला जावं लागलं. त्याठिकाणी काही वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला.

80 च्या दशकात आलमझेब, अमीरजादा आणि इब्राहीम यांच्या कुटुंबांमध्ये गँगवॉरला सुरुवात झाली. हाजी मस्ताननं या दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

दाऊद इब्राहीम आणि आलमझेबनं तेव्हा कुरानवर हात ठेवून शपथ घेतली. यापुढं एकमेकांविरोधात हिंसाचार न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पण दुसऱ्याच दिवशी दोन्ही गँगनी एकमेकांवर दिवसाढवळ्या गोळीबार सुरू केला.

हाजी मस्तानला दिलेल्या वचनाची कुणालाही फिकिर नव्हती. हाजी मस्तानचं वर्चस्व कमी होत होतं, हे यावरून स्पष्टच होतं. नंतर दाऊद इब्राहीमनं भारत सोडला आणि दुबईतून काम करू लागला, त्यानंतरची कहाणी सर्वांनाच माहिती आहे.

डॉन बनला बिल्डर

अंडरवर्ल्डवर आधारित असलेल्या चित्रपटांमध्ये अनेकदा डॉन हे बिल्डरकडून खंडणी उकळत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. पण प्रत्यक्षात डॉनच बिल्डर बनले.

"मस्तान आणि यूसुफ हे अनेकदा म्हणायचे की, रियल इस्टेटचा व्यवसाय तस्करीपेक्षा जास्त फायद्याचा आहे. पण असं ते काही गमतीत बोलत नव्हते. तर ते याबाबत अगदी गंभीर असायचे. त्याचं कारण होता, बॉम्बे रेंट अॅक्ट हा कायदा. त्यात खासगी संपत्तीचा विचार करता मालक आणि भाडेकरू एकाच रांगेत आले होते," असं सांघवी लिहितात.

"समजा तुमच्याकडे एक फ्लॅट आहे आणि तो तुम्ही भाड्यानं दिला आहे. जर तुम्हाला भाडेकरूकडून फ्लॅट रिकामा करून हवा असेल तर, भाडेकरूपेक्षा तुम्हाला त्या फ्लॅटची अधिक गरज आहे, हे कोर्टात सिद्ध करावं लागायचं. त्यावर भाडेकरू कायम त्यांच्याकडं दुसरी जागा उपलब्धच नसल्याचं कारण पुढं करायचे."

पोलिसांच्या भीतीने विदेशात पलायन

या सर्वांचा परिणाम म्हणज्ये मध्ये मुंबईची अवस्था वाईट होऊ लागली. घरमालकांनी घरांची देखरेख करणं सोडलं.

तर हुशार भाडेकरू हे त्यांच्या फ्लॅटमधला अर्धा भाग इतरांना भाड्यानं देऊ लागले. अशी घरं अंडरवर्ल्डनं घरमालकांकडून स्वस्तात खरेदी करायला सुरुवात केली. त्यानंतर ते भाडेकरूंना फ्लॅट सोडायला सांगायचे आणि जो नकार देईल, त्याला त्याचे परिणाम भोगावे लागायचे.

डॉनच्या भीतीपोटी भाडेकरू फ्लॅट रिकामे करू लागले आणि नंतर डॉन त्याठिकाणी नवी घरं तयार करून ती महागात विकू लागले. या सर्वाचा परिणाम म्हणजे, रियल इस्टेटच्या या व्यवसायात अंडरवर्ल्डचे डॉन तस्करीपेक्षाही अधिक पैसा कमवायला लागले.

80 च्या दशकात त्यांच्यावर पोलिसांचा दबाव वाढला तेव्हा त्यापैकी अनेकांनी विदेशात जाण्याचा मार्ग स्वीकारला. पण तिथूनही त्यांनी अंडरवर्ल्डचं काम सोडलं नाही, पण त्याची कहाणी पुन्हा कधी-तरी ऐकू.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)