You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एजाज लकडावाला: दाऊदचा एकेकाळचा साथीदार असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठी
मुंबई पोलिसांनी गुरुवारी रात्री अंडरवर्ल्ड डॉन एजाज लकडावाला याला पाटणाहून अटक केली.
एजाज लकडावाला हा दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्याबरोबर काम करायचा. एजाज लकडावालावर 25 खंडणी, खून आणि खूनाचा प्रयत्न असे 25 गुन्हे, इतर 80 तक्रारी दाखल आहेत. त्याचबरोबर 4 मोक्का केसेस दाखल आहेत.
एजाज लकडावाला हा मूळ दाऊदच्या टोळीचा सदस्य होता. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर लकडावाला दाऊदच्या टोळीपासून वेगळा झाला. तेव्हापासून 2008 पर्यंत लकडावाला हा छोटा राजनच्या टोळीबरोबर काम करत होता.
2002मध्ये लकडावालावर छोटा शकीलकडून बँकॉकमध्ये हल्ला करण्यात आला होता. त्या हल्यात त्याला 7 गोळ्या लागल्याची माहिती पोलिसांकडे आहे. काही आर्थिक कारणांवरून मतभेद झाल्यामुळे एजाज लकडावाला हा छोटा राजन टोळीपासून वेगळा होऊन स्वतंत्र टोळी चालवत होता.
एजाज लकडावाला याचे कॅनडा, यूके, कंबोडिया, अमेरिका, मलेशिया या भागात वास्तव्याला असल्याचीही माहिती पोलीसांना मिळाली. मुंबई पोलिसांनी एजाज लकडावाला याची मुलगी शिफा शाहिद शेख ऊर्फ सोनिया एजाज लकडावाला हिला सुध्दा अटक केली आहे.
कसं रचलं मुंबई पोलिसांनी ऑपरेशन?
मुंबई पोलीस हे गेले अनेक वर्षांपासून एजाज लकडावालाच्या शोधात होते. एजाज लकडावालाची मुलगी शिफा हिने खोटं नाव वापरून पासपोर्ट बनवला होता. मनिष अडवाणी हे वडिलांचं खोटं नाव शिफा वापरत होती.
तिच्या वास्तव्याबद्दलची माहिती ही मुंबई पोलिसांना हेरांकडून मिळाली होती. त्या माहितीद्वारे लकडावालाच्या मुलीला अटक करण्यात आली. 28 डिसेंबरपासून लकडावालाची मुलगी ही पोलिसांच्या ताब्यात असल्याचं मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त संतोष रस्तोगी यांनी सांगितलं.
लकडावालाच्या मुलीची चौकशी करताना एजाज लकडावाला हा बिहारला येणार असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी बिहार पोलीसांशी संपर्क साधला त्यांना विश्वासात घेऊन 8 जानेवारीला मुंबई पोलिसांची टीम बिहारमध्ये दाखल झाली.
पोलिसांना सोर्सेसकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि बिहार पोलिसांच्या मदतीनं एजाज लकडावालाला पाटण्यातून अटक करण्यात आली आणि त्याला आज मुंबईत न्यायालयात हजर करण्यात आलं.
मुंबई पोलिसांची ही कारवाई अभिनंदनास पात्र आहे. आम्ही त्यांना याबाबत बक्षीस घेण्यासंबंधी नक्की विचार करू, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)