गोलरिझ घाहरमनः दुकानातून हँडबॅग चोरणाऱ्या न्यूझीलंडच्या खासदाराचा राजीनामा

    • Author, कॅथरिन आर्मस्ट्रॉंग
    • Role, बीबीसी न्यूज

दुकानांमधून चोरी केल्याच्या आरोपांमुळे न्यूझीलंडच्या एका खासदारांना राजीनामा द्यावा लागला आहे. या आरोपांचा तपास पोलीस करत आहेत.

गोलरिझ घाहरमन असं त्यांचं नाव असून त्या ग्रीन पार्टीच्या खासदार आहेत. त्यांनी ऑकलंड आणि वेलिंग्टनमधील दोन दुकानांतून तीन वेळा चोरी केली असा त्यांच्यावर आरोप आहे.

संयुक्त राष्ट्रात मानवाधिकार वकील म्हणून पूर्वी कार्यरत असणाऱ्या गोलरिझ 2017 साली खासदार झाल्या.

न्यूझीलंड सरकारमधील त्या पहिला निर्वासित समुदायातील मंत्री आहेत. त्यांच्याकडे पक्षाच्या न्यायविभागाचा पदभारही होता.

'कामाच्या ताणामुळे आपल्याला असं विचित्र वागावं लागलं,' असं त्या सांगतात.

'मी अनेक लोकांना निराश केलं असून मला दुःख झालं आहे,' असं त्या म्हणाल्या.

गोलरिझ लहान असताना आपल्या कुटुंबासह इराणमधून बाहेर पडल्या. त्यांनी न्यूझीलंडमध्ये राजकीय आश्रय घेतला.

ऑकलंडमधील एका दुकानातून हँडबॅग चोरत असल्याचं सीसीटीव्ही चित्रिकरण प्रसिद्ध झाल्यावर मंगळवार 16 जानेवारी रोजी त्यांनी राजीनामा दिला.

"निर्वाचित प्रतिनिधींनी सार्वजनिक ठिकाणी कसं वागायचे याचे उच्च मापदंड असतात ते पूर्ण करण्यास माझ्या कृतीमुळे मी कमी पडले," असं त्यांनी जाहीर केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

"मी त्या कृतीबद्दल स्पष्टीकरण देऊ शकत नाही कारण ते वागणं अतार्किकच आहे. वैद्यकीय तपासणीनंतर माझी तब्येत ठीक नसल्याचं माझ्या लक्षात आलेलं आहे. अर्थात आपल्या कृतीसाठीचं हे कारण नाही," असंही त्यांनी सांगितलं.

मी ज्यांच्याकडे मानसिक आरोग्यासाठी मदत घेत आहे, त्यांच्या माहितीनुसार माझं सध्याचं वागणं हे ताणामुळे आणि पूर्वीच्या एखाद्या धक्क्यामुळे असावं.

या राजीनाम्याबद्दल बोलताना ग्रीन पार्टीचे नेते जेम्स शॉ म्हणाले, "गोलरिझ यांची संसदेत निवड झाल्यापासून त्यांना लैंगिक हिंसा, शारीरिक हिंसा तसेच हत्येच्या धमक्या येत आहेत. इतर खासदारांना असलेल्या ताणापेक्षा त्यांना या सर्व गोष्टीमुळे जास्त ताण आला."

"त्या संसदेत असल्यापासूनच्या आतापर्यंतच्या काळात नेहमीच सतत पोलीस तपासही सुरू राहिला. त्यामुळे अशा धमक्यांचा ताण आणि व तो ताण याची परिणती या कृतीत झाली," जेम्स शॉ म्हणाले.

त्यांच्या इराणी वंशाच्या असण्यामुळे, महिला असण्यामुळे, विविध मुद्द्यांवर उघड भूमिका घेतल्यामुळे आपल्यावर वैयक्तिक आणि ऑनलाईन हल्ले होतात हे त्यांनी यापूर्वीही सांगितलं होतं.

2021 साली त्यांनी राष्ट्रीय वृत्तवाहिनीशी बोलताना या धमक्यांमुळे आपल्या सिक्युरिटी अलार्म आणि सुरक्षारक्षक घेऊन फिरावं लागलं असं सांगितलं होतं.

अलीकडच्या काळात त्यांच्यावर पॅलेस्टाइनला पाठिंबा देणाऱ्या आंदोलनांत सहभागी झाल्याबद्दल टीका झाली होती.

ग्रीन पार्टीच्या नेत्या मारामा डेव्हिडसन म्हणाल्या, "गोलरिझ यांनी राजीनामा दिला हे योग्य केलं परंतु त्यांच्यावर फार ताण होता हे स्पष्ट झालं आहे आणि त्यांच्यामागे आपण उभे राहू."

डेव्हिडसन म्हणाल्या, "गेली अनेक वर्षं आम्ही महिलांना सार्वजनिक क्षेत्रात मिळणारी वागणूक आणि विशेषतः वेगळ्या वर्णांच्या महिलांना सार्वजनिक क्षेत्रातील पदांवर काम करताना येणारा अनुभव यावर बोललो आहोत.”

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)