अपघातानंतर 40 दिवसांनंतर मुलं सापडली जिवंत

    • Author, ऑईफ वॉल्श
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

गेल्या महिन्यात कोलंबियाच्या अॅमेझॉन जंगलातील विमान अपघातात हरवलेली 4 मुलं जिवंत सापडली आहेत. प्रदीर्घ अशा शोध मोहिमेनंतर मुलांना वाचवण्यात यश आलं आहे.

या मुलांमध्ये 13, 9, 4 आणि 1 वर्षाच्या मुलाचा समावेश असून या मुलांचा अखेर पत्ता लागल्यानं कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांनी आनंद व्यक्त केला असून ही बाब संपूर्ण देशासाठी आनंददायी घटना असल्याचं म्हटलं आहे.

1 मे रोजी एक विमान कोलंबियाच्या अॅमेझॉन जंगलात कोसळल्याने महिला आणि दोन पायलट यांचा मृत्यू झाला होता. यात 4 मुलं बेपत्ता होती.

घटनेची माहिती मिळताच कोलंबिया सरकार आणि लष्कराने स्थानिकांच्या मदतीने मुलांना वाचवण्यासाठी मोहीम हाती घेतली.

राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी या दिवसाचं वर्णन जादुई दिवस म्हणून केलंय. ते म्हणाले, ही मुलं जगण्याचा आशावाद आहेत. त्यांची गाथा इतिहासात कायम राहील.

राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी ट्विटमध्ये 40 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भावंडांची काळजी घेत असलेल्या लष्करी आणि स्थानिक समुदायातील अनेक सदस्यांचे छायाचित्र शेअर केलं आहे.

यातील एका सैनिकाने सर्वात लहान मुलाच्या ओठावर बाटली धरली होती. तर दुसरा एकजण दुसऱ्या मुलाला आपल्या हातातील भांड्यातून चमच्याच्या सहाय्यानं जेवण भरवताना दिसतो आहे.

दरम्यान कोलंबियाच्या संरक्षण मंत्रालयाने एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये या मुलांना हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं उंचच उंच झाडांमधून एअरलिफ्ट करताना दिसत आहे. मुलांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी देशाची राजधानी बोगोटा येथे पाठविण्यात आले आहे.

मुलांची आजी फातिमा व्हॅलेन्सिया यांनी मुलांची सुटका झाल्यानंतर पृथ्वीप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

त्यांनी सांगितलं की, आई कामावर जात असल्याने या चार भावंडांमधील मोठ्याला आपल्या इतर तीन भावंडांची काळजी घेण्याची सवय होती. त्यामुळे जंगलात तग धरून राहण्यास त्यांना मदत झाली.

इव्हीएनशी बोलताना आजी व्हॅलेन्सियांनी सांगितलं की, "त्या मुलांना पीठ आणि कसावा ब्रेड, झुडूपांमधील फळं खायला देत. त्यामुळे काय खावं याचं ज्ञान त्या मुलांना होतं."

सेस्ना 206 या छोट्या विमानातून चार मुलं आणि त्यांची आई प्रवास करत होते. अॅमेझोनास प्रांतातील अराराकुआरा येथून सॅन जोसे डेल ग्वाविअरेकडं या विमानानं उड्डाण केलं होतं. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळं याबाबत अॅलर्ट जाहीर करण्यात आला होता.

या अपघातानंतर तीन प्रौढांचे मृतदेह लष्कराला अपघातस्थळी सापडले होते, पण ही मुलं ढिगाऱ्यातून दिसून आली नव्हती. मुलं बचावल्यानं मदत शोधण्यासाठी या पर्जन्यवनात भरकटली होती.

मे महिन्यात सुरू झालेल्या बचाव मोहिमेत जंगलात मुलांचं सामान सापडलं होतं. यामध्ये कात्री, दुधाची बाटली, केस बांधण्याचा रबर आणि तात्पुरता निवाऱ्याचा समावेश होता.

याशिवाय अनेक ठिकाणी लहान मुलांच्या पायाचे ठसेही दिसले. त्यामुळे मुलं जिवंत असल्याची आशा निर्माण झाली.

ही मुलं हुइटोटो स्थानिक समुदायाची आहेत. त्यांना असलेल्या जंगलाच्या माहितीमुळे, जंगली फळांचं ज्ञान मिळाल्यामुळं त्यांना जिवंत राहण्यास मदत मिळेल अशी आशा या समुदायातील सदस्यांनी व्यक्त केली होती.

शोधमोहीम सुरू असताना, मुलांसाठी हुइटोटो भाषेत आजीच्या आवाजातील रेकॉर्ड केलेला संदेश लष्करी हेलिकॉप्टरमधून वाजवण्यात आला, जेणेकरून मुले एका ठिकाणी थांबू शकतील किंवा सिग्नल देऊ शकतील.

मुलं सापडल्यानंतर मुलांचे आजोबा फिडेनसिओ व्हॅलेन्सिया यांनी अधिकाऱ्यांकडे मुलांचा ताबा मागितला. तसेच मुलांना बोगोटापासून अंदाजे 130 किलोमीटर अंतरावर असलेल्या विलाव्हिसेन्सिया मधील आपल्या कुटुंबाकडे आणण्याची परवानगी मागितली.

इव्हीएनशी बोलताना मुलांचे आजोबा म्हणाले की, "देशाचे सर्वोच्च नेते म्हणून मी राष्ट्राध्यक्षांना विचारतोय. त्यांना त्रास दिल्याबद्दल मला खेद वाटतोय, पण तो माझा अधिकार तर आहेच शिवाय माझं कर्तव्य ही आहे. ती मुलं माझं कुटुंब आहे, मला त्यांना विलाव्हिसेन्सियोमध्ये घेऊन यायचं आहे."

यापूर्वी राष्ट्राध्यक्षांनी मुलांच्या आजोबांशी संवाद साधल्याचं सांगितलं होतं

गेल्या महिन्यात कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या ट्विटर खात्यवरून मुलं सापडल्याचं ट्विट करण्यात आलं होतं. मात्र मुलं सापडली नसल्याने त्यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

कोलंबियाच्या बालकल्याण संस्थेने याला दुजोरा दिला नसल्याचं म्हणत राष्ट्राध्यक्षांनी दुसऱ्या दिवशी ट्विट हटवलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)