You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लैंगिक संबंधांशिवाय मगर गरोदर
कोस्टा रिका येथील प्राणीसंग्रहालयात मगरीने विनासंभोग अंडी दिल्याची घटना समोर आली आहे.
तिने दिलेल्या अंड्यांमधील विकसित गर्भ अनुवांशिकदृष्ट्या 99.9% मादी मगरीसारखा होता.
काही सरपटणाऱ्या प्राणी, पक्षी, माशांमधील मादया विनासंभोग फलित अंडी किंवा बाळांना जन्म देऊ शकतात. पण मगरी मध्ये हा गुण ऐकून शास्त्रज्ञांसमोर एक नवं कोडं उभं राहिलंय.
शास्त्रज्ञांच्या मते, डायनासोर देखील विना संभोग अंडी देण्यास सक्षम असावेत. त्यामुळे त्यांचा हा गुण वारशाने मगरींना देखील मिळालेला असू शकतो.
बायोलॉजी लेटर्स या रॉयल सोसायटी जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
जानेवारी 2018 मध्ये अमेरिकेतील पार्क रेप्टिलानिया येथील 18 वर्षीय मादी मगरीने ही अंडी घातली होती. अंड्यातील गर्भ पूर्णपणे तयार झाला असला तरी पिल्लं मृत निघाली.
मादी मगर 2 वर्षांची असताना या पार्क मध्ये आणण्यात आली होती. ती ज्या बाजूला राहत होती त्या परिसरात एकही नर मगर नव्हता. तिला इतर मगरींपासून वेगळं ठेवण्यात आलं होतं. हे कसं घडलं जाणून घेण्यासाठी पार्कच्या वैज्ञानिक टीमने बेलफास्टमधील डॉ. वॉरेन बूथ यांच्याशी संपर्क साधला. वॉरेन बूथ हे व्हर्जिनिया टेकमधील उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ आहेत. यालाच पार्थेनोजेनेसिस असंही म्हणतात.
त्यांनी मगरीच्या गर्भाचं विश्लेषण केले असता त्यांना आढळलं की, हा गर्भ अनुवांशिकदृष्ट्या 99.9% त्याच्या आईसारखा होता. नर मगरीचा यात सहभाग नव्हता.
बीबीसी न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितलं की, या घटनेचं त्यांना कोणतंही आश्चर्य वाटलेलं नाही.
ते म्हणाले की, "शार्क, पक्षी, साप आणि सरडे यांच्यामध्ये पार्थेनोजेनेसिस हा गुण अगदीच सामान्य आहे."
पार्थेनोजेनेसिस म्हणजे लैंगिक संबंधांशिवाय नवीन जीवाची उत्पत्ती करणे.
मगरींमध्ये पार्थेनोजेनेसिस दिसत नाही कारण लोकांनी त्याची उदाहरणंच शोधली नाहीत.
''जेव्हा लोक साप पाळू लागले तेव्हा पार्थेनोजेनेसिसची उदाहरणं मोठ्या प्रमाणावर दिसू लागली. पण लोक मगर पाळत नाहीत, त्यामुळे ती उदाहरणं दिसण्याचा प्रश्नच येतं नाही."
एका सिद्धांतनुसार एखादी प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असते तेव्हा त्यांच्यात पार्थेनोजेनेसिस घडू शकते. डॉ. बूथ यांनी बीबीसी न्यूजशी बोलताना सांगितलं की, पर्यावरणातील बदलांमुळे डायनासोरची संख्या कमी होत असताना काही प्रजातींच्या बाबतीत असं घडलं असावं.
''प्रजाती वेगवेगळ्या असूनही त्यांच्यात पार्थेनोजेनेसिसची यंत्रणा मात्र सारखीच असते. त्यामुळे हे अतिप्राचीन देणं वारशाने मिळत गेलीय. थोडक्यात डायनासोर देखील याचपद्धतीने पुनरुत्पादन करायचे या कल्पनेला आधार मिळतो."