You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मांजराच्या गुरगुरण्यामागे एवढा अर्थ असतो तर...
- Author, स्टीफन डॉलिंग
- Role, बीबीसी प्रतिनिधी
प्रेमाने खेळल्यावर आणि गुदगुल्या केल्यावर मांजरं गुरगुर करतात हे सगळ्यांनीच पाहिलेले आहे. मात्र संवाद साधण्याची त्यांची ही पद्धत आपल्याला वाटते त्यापेक्षा कैक पटींनी क्लिष्ट आहे.
मांजराच्या गुरगुरण्याचा नक्की अर्थ आपल्याला माहीत आहे, असे आपल्याला वाटते.
मांजराची गुरगुर ही निर्विवादपणे तिच्या आनंदाची एक खूण मानली जाते. मांजराला कुरवाळल्यावर केलेली आनंददायी गुरगुर आणि मालकाच्या मांडीवर तासन् तास लोळत पडून राहणे हे मांजर खुशीत असल्याचे द्योतक आहे.
पण याचे विश्लेषण एवढ्यावर थांबत नाही. आपण अपेक्षाही केली नसेल अशा काही गोष्टी या गुरगुरण्यामागे दडलेल्या आहेत.
मांजराची गुरगुर हा नक्की कसला आवाज असतो हा जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून वादाचा मुद्दा ठरलेला आहे.
हृदयाच्या उजव्या बाजूला अशुद्ध रक्त वाहून नेणारी मुख्य रक्तवाहिनी, जिला 'अध:स्थ महानीला' म्हणतात, तिच्यातून होणार्या रक्तप्रवाहाचा हा आवाज असतो असा काहींचा अंदाज आहे.
परंतु हा आवाज मांजराच्या स्वरयंत्रातल्या स्नायूंचा असावा असा अंदाज अधिक संशोधनातून समोर आला आहे. स्वरयंत्राचा 'ग्लॉटिस' नावाचा भाग, जो स्वरतंतूंच्या भोवती असतो, तो मांजराच्या प्रत्येक हालचालीसोबत आकुंचन-प्रसरण पावत असतो.
प्रत्येक श्वासाला हवेच्या होणार्या कंपनांचा परिणाम म्हणून मांजराच्या स्वरयंत्रातून हा आवाज येत असावा.
विज्ञानाला या प्रक्रियेबद्दल जवळजवळ खात्री असली तरी यामागचे कारण अजूनही ठामपणे सांगता आलेले नाही.
मांजराच्या मेंदूत असलेल्या चेतासंस्थेशी याचा संबंध असू शकतो हीच सगळ्यात मोठी शक्यता विज्ञानाने मानली आहे. मात्र थेट कारणमीमांसा अजून समजू शकलेली नाही.
मांजराच्या चेतासंस्थेचा हा आंदोलक (oscillator) केवळ मांजर आनंदी असेल तरच उत्तेजित होतो असंच असतं का?
कधीकधी हो, पण फक्त कधीकधीच !
मर्जान डेबव्हर्व नावाच्या एक कॅट शेल्टर फोटोग्राफर लंडनमध्ये आहेत. मांजरांच्या मानसशास्त्रामध्ये त्या सध्या पदवी घेत आहे.
क्लाइव, हुला, लुईगी आणि आर्ची अशा चार मांजरांच्या त्या पालक आहेत. त्यांच्या या मांजरांचे इन्स्टाग्रामवर ३३ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.
त्यांच्या म्हणण्यानुसार आपण नेहमी मांजरांना तेव्हाच गुरगुरताना बघतो जेव्हा आपण त्यांना प्रेमाने कुरवाळतो म्हणून त्यांना कुरवाळलेले आवडते असे आपल्याला वाटते. मात्र मांजर आपल्यापासून दूर असतानाही गुरगुर करत असते आणि प्रत्येक मांजरानुसार त्या गुरगुरण्याचे प्रमाण बदलते.
त्या सांगतात, प्रत्येक मांजर वेगळं असतं. काही मांजरं अजिबात गुरगुरत नाहीत, तर काही मांजरं दिवसभर सतत गुरगुर करत राहतात.
त्यांच्या लुईगी आणि आर्ची या दोन मांजरांची तुलना करून त्या सांगतात.
लुईगी ही एक रस्त्यावर सापडलेली मांजर कोणाच्यातरी मागेमागे त्यांच्या ऑफिसमध्ये गेली आणि मग त्यांनी तिला शेल्टरमध्ये आणले; दुसर्या बाजूला आर्ची ही मांजर अगदी सहजपणे त्यांच्यात मिसळून गेलेली. लुईगी थोडीच गुरगुरते, तर आर्ची खूप गुरगुरते, असं त्या सांगतात.
त्या म्हणाल्या, "आतापर्यंत मी 3000पेक्षा जास्त मांजरींचे फोटो काढले आहेत आणि कोणतीच मांजर दुसर्या मांजरासारखी नसते. अनेकदा मी मांजर झोपताना आणि अगदी शेवटचे काही क्षण मोजत असतानाही गुरगुरत असल्याचे पाहिले आहे. पशुवैद्यक अनेकदा अशी विधानं करतात की अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मांजर गुरगुरत होती आणि लोकांनाही वाटते की मांजर आनंदी असतानाच गुरगुरते."
कुत्र्यांच्या तुलनेत मांजरांची वागणूक आणि संवाद साधण्याची पद्धत यावर कमी प्रमाणात संशोधन झाले आहे. कुत्र्यांना खाण्याचे आमिष दाखवले की सहजपणे ते आपल्याला सहकार्य करतात.
अलीकडेच मांजरांच्या गुरगुरण्याबद्दल अधिक संशोधनाने वेग घेतला आहे.
सॅन दिएगो ह्युमन सोसायटीचे कार्यकारी अधिकारी आणि पशुवैद्यकतज्ज्ञ गॅरी वेत्झ्मन म्हणतात, "आपल्याला हळूहळू या गुरगुरण्याबद्दलची माहिती मिळू लागली आहे आणि त्यात अनुत्तरित प्रश्नच अधिक आहेत. मांजराची गुरगुर हे सामान्यतः आनंद दाखवत असले तरी काहीवेळा ते भीती, ताण किंवा अस्वस्थतेचेही लक्षण असू शकते. मात्र सुदैवाने अनेकदा गुरगुर ही आनंदाची असते."
वेत्झ्मन म्हणतात, "अनेक दशके हे मानण्यात आले होते की मांजरांची गुरगुर हे त्यांच्या संवाद साधण्याचे एक माध्यम आहे. सन 2000च्या सुरुवातीच्या काळात असे गृहीतक मांडले गेले की गुरगुरण्यामागे इतरही कारणे असू शकतात. एलिझाबेथ वोन मग्गेंथलर, कॅरेन ओवेरल इत्यादींच्या अभ्यासाने मांजरींच्या गुरगुरण्यामागची इतर कारणं समोर यायला मदत झाली. मांजरीची गुरगुर हा एक संवाद आहे, त्यांच्या मनातले समाधान आहे आणि त्यांची रोगनिवारक शक्तीही आहे."
मांजराची पिल्लं अगदी काही दिवसांची असल्यापासून गुरगुर सुरू करतात ज्यामुळे त्यांच्या आईला त्यांना शोधणं सोप्पं जातं.
मोठ्या मांजरीही पिल्लांना दूध पाजताना गुरगुरतात किंवा आपल्या मालकाला जेवणाची वेळ झाली हे सांगायलाही मोठ्या मांजरी गुरगुर करत राहतात.
नवीन वातावरणाचा अनुभव घेताना किंवा नवीन जागा काळजीपूर्वक न्याहाळताना मांजरी मोठ्याने गुरगुर करतात.
थक्क झाल्यावरही मांजरी गुरगुर करू शकतात किंवा कुत्र्याच्या पाठलागातून सोडवून घेण्यासारख्या तणावपूर्ण प्रसंगानंतरही त्यांची गुरगुर चालू असते.
विज्ञान जितके या गुरगुरण्याच्या मुळाशी जात आहे तितक्या नवनवीन गोष्टी कळत आहेत. "सामान्य गुरगुर आणि भुकेची गुरगुर अशा दोन प्रकारांची नोंद वैज्ञानिकांनी घेतली आहे," मांजरांच्या वर्तन-तज्ज्ञ आणि लेखिका असलेल्या सीलिया हॅडन सांगतात.
"मांजरांचे मालक नसलेली माणसेही या दोन गुरगुरण्यातील फरक सांगू शकतील. सामान्य लहानशा गुरगुरण्यामागे जास्त कंपनांचे रडणे असू शकते. लहान बाळासारख्या रडण्याबद्दल संवेदनशील असलेल्या माणसाला या गुरगुरीमागचे रडणेही जाणवते आणि आपोआप आपण त्याला प्रतिसाद देतो," असं त्यांनी सांगितले.
युनायटेड किंगडमच्या RSPCA या प्राण्यांशी निगडित संस्थेचे वैज्ञानिक अधिकारी असलेले सॅम वॉटसन म्हणतात की, अजूनही मांजरी या गुरगुरण्याच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद कसा साधतात, हे समजू शकलेले नाही. मात्र वरवर पाहता त्या एकमेकांना उत्तेजन देण्यासाठी ही गुरगुर करत असाव्यात.
"मला ती गोष्ट हवी आहे म्हणून असेल किंवा आपण ही गोष्ट आपापसांत वाटून घेऊया म्हणून असेल, पण नक्की कोणत्या कारणाने त्या हा संवाद साधतात किंवा त्यांना नक्की काय म्हणायचे असते हे अज्ञात आहे. मार्जारविश्वातल्या संवाद साधण्याच्या पद्धतींबद्दल जे संशोधन आतापर्यंत झाले आहे त्यापेक्षा कित्येक पटींनी अधिक संशोधन होणे गरजेचे आहे."
एक गृहीतक असे की मांजराची गुरगुर ही एक रोगनिवारक प्रक्रिया आहे. या गुरगुरण्यामध्ये अंतर्भूत असणार्या कंपनांमुळे मांजराला स्वतःचा तणाव दूर करायला मदत होते. या कंपनांची फ्रिक्वेन्सी साधारण 20 हर्टस् ते 150 हर्ट्स असते. ही फ्रिक्वेन्सी हाडे मजबूत करायला उपयोगी ठरते असे म्हटले जाते.
कंपनांच्या विरोधात हाडे आपली ताकद लावत असल्याने हळूहळू हाडे मजबूत होत जातात. इतर फ्रिक्वेन्सी याच प्रकारचा परिणाम टिश्यूजवर दाखवू शकतात.
"25 ते 100 हर्ट्सच्या दरम्यानच्या फ्रिक्वेन्सीचे गुरगुरणे हे मानवाच्या रोगनिवारक थेरपीसाठी उपयोगी सिद्ध झालेल्या फ्रिक्वेन्सीचेच असते. तज्ज्ञांच्या मते हाडे 20-25 हर्ट्स या फ्रिक्वेन्सीला तर त्वचा आणि टिश्यूज 100 हर्ट्स पर्यंतच्या फ्रिक्वेन्सीला प्रतिसाद देतात," वेत्झ्मन म्हणतात.
यामुळेच आपण मांजरांना अनेकदा झोपेत गुरगुरताना ऐकतो. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा हा त्यांचा मार्ग आहे.
आजकालची मांजरं बहुतेकदा जखमा टाळण्यासाठी दिवसभर पडून राहून, लोळत राहून आराम करणे पसंत करतात. मात्र त्यांची गुरगुर ही त्यांच्या हाडांना आणि स्नायूंना बळकट ठेवण्याचा उत्तम पण कमी ऊर्जा खर्च होणारा मार्ग आहे. त्यांची ही गुरगुर केवळ त्यांच्या स्वतःसाठीच नव्हे तर त्यांचे मालक आणि पालक असलेल्या माणसांसाठीही तितकीच उपयोगाची ठरू शकते.
मांजर पाळणे हा तणावमुक्तीचा सोपा आणि परिणामकारक मार्ग असल्याचे सिद्ध झालेले आहे. मांजर पाळणे, त्याची काळजी घेणे या गोष्टी हृदयविकाराच्या शक्यता दोन तृतीयांश प्रमाणात कमी करतात. त्यांच्या गुरगुरण्याच्या फ्रिक्वेन्सी या केवळ त्यांच्याच नव्हे तर आपल्याही तब्येतीवर चांगला परिणाम करतात.
"मांजरांची गुरगुर ही माणसासाठीही फायदेशीर आहे," वेत्झ्मन म्हणतात.
"केवळ शारीरिकदृष्ट्याच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही त्यांच्या या गुरगुरण्याला आपण नेहमीच प्रतिसाद देत असतो. त्यांच्या या गुरगुरण्याने आपल्यालाही आनंद होतो आणि शांत वाटते. या शांततेच्या कारणामुळेच माणसाने आपसूकच जास्त गुरगुर करणार्या मांजरींना जवळ केलं असावं."
हॅडन या म्हणण्याला दुजोरा देतात. "जेव्हा तुमच्या पायाशी मांजर खेळत असते, रेंगाळत असते, लुडबुडत असते, तुमच्याकडे प्रेमाने बघत असते, खाण्याच्या कपाटाकडे किंवा फ्रीजकडे बघत असते आणि मोठयाने गुरगुरत असते तेव्हा आपोआपच तुम्हाला कळतं की तिला भूक लागली आहे. इतक्या गोड फूड रिक्वेस्टकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. सकाळी झोपेतून जागे करण्यासाठी या गोड गुरगुरण्याचा वापर करता येऊ शकतो. अनेकजण स्वतःआधी मांजरीला खाऊपिऊ घालतात. यावरूनच कळते की मांजरांचे हे गुरगुरणे किती परिणामकारकरित्या संवाद साधते."
मांजरांच्या गुरगुरण्याची कारणे शोधण्याची ही धडपड अंतिमतः मांजराच्या वर्तनाला समजून घेण्यात मदत करेल आणि मांजर आणि तिच्या पालकांचे नाते अधिक दृढ करायला मदत करेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)