You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गाढवाला रंगवून केला झेब्रा : इजिप्तमधील प्राणी संग्रहालयावर आरोप
तुम्ही कधी झेब्रा पाहिला आहे का? अंगावर काळे पट्टे असणारा हा उमदा प्राणी तुम्ही प्रत्यक्षात पाहिला नसला तरी फोटोत मात्र नक्कीच पाहिला असेल. 'Z for Zebra' तर लहानपणापासून घोटवून दिलेलं असतं. याच प्राण्यावरून इजिप्तमध्ये एक मजेशीर वाद झाला आहे.
इजिप्तमध्ये एका प्राणी संग्रहालयावर गाढवाला रंगवून झेब्रा म्हणून दाखवलं जात असल्याचा आरोप होत आहे.
झालं असं की महमूद सरहान या विद्यार्थ्याने राजधानी कैरोच्या इंटरनॅशनल गार्डन म्युनिसिपल पार्कला भेट दिली. तिथं त्याने एका झेब्राच्या बाजूला उभं राहून फोटो काढले आणि ते त्याने फेसबुकवर टाकले.
काही वेळातच ते फोटो व्हायरल झाले. या प्राण्याच्या तोंडावरील काळे डाग, त्याचा लहान आकार आणि टोकदार कानाकडे लक्ष वेधत, तो प्राणी झेब्रा नसून गाढव असावा, असं अनेक जण कमेंट्समध्ये बोलले.
या दाव्यांची पडताळणी करायला स्थानिक Extranews.tv वृत्तवाहिनीने एका जनावराच्या डॉक्टरशी संपर्क साधला. या डॉक्टरनेही झेब्राच्या नाकाजवळचा भाग काळा असतो, शिवाय अंगावरील काळे पट्टे समांतर आणि सातत्यपूर्ण असतात, अशी माहिती दिली.
सरहान याने या वृत्तवाहिनीला सांगितलं की त्या प्राणिसंग्रहालयात तसे दोन प्राणी होते आणि ते दोन्ही रंगवण्यात आले होते.
पण या प्राणी संग्रहालयाने हे आरोप फेटाळले आहेत. प्राणी संग्रहालयाचे संचालक मोहंमद सुलतान यांनी हे खरेखुरे झेब्रा असल्याचं एका स्थानिक नोगूम FM रेडिओ स्टेशनला सांगितलं.
एखाद्या प्राणी संग्रहालयावर अशा प्रकारचे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही.
2009मध्ये गाझाच्या एका प्राणी संग्रहालयातही गाढवांना असं रंगवून झेब्रा म्हणून लोकांना दाखवण्यात आलं होतं.
गाझातीलच आणखी एका प्राणी संग्रहालयाने 2012मध्ये प्राण्यांच्या कमतरतेमुळे मृत प्राण्यांमध्ये भाता भरून त्यांना लोकांपुढे प्रदर्शित केलं होतं.
2013 मध्ये चीनमधील हेनान प्रांतात तिबेटियन मास्टिफ हा कुत्रा आफ्रिकन सिंह म्हणून दाखवण्यात आला होता.
ग्वांग्शी प्रांतातील प्राणी संग्रहालयात प्लास्टिकचे फुगवलेले पेंग्विन ठेवण्यात आले होते.
ग्वांग्शी मध्येच आणखी एका प्राणी संग्रहालयाला प्लास्टिकचे फुलपाखरू दाखवल्यामुळे लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)