You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिपरजॉय : सौराष्ट्र आणि कच्छला ऑरेंज अलर्ट जारी, मुंबईत पाऊस आणि लाटा
अरबी समुद्रातील 'बिपरजॉय' चक्रीवादळीची तीव्रता आणखी वाढली असून, वादळाचा मार्ग बदलला आहे. हे अतितीव्र चक्रीवादळ गेल्या 12 तासात उत्तरेकडे सरकलं आहे.
भारतीय वेळेनुसार आज (ता. 12) पहाटे 5.30 वाजता हे वादळ पोरबंदरपासून सुमारे 340 किमी, देवभूमी द्वारकेपासून 380 किलोमीटर नैर्ऋत्येस, जाखाऊ बंदरापासून 460 किमी दक्षिणेकडे होती.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.मुंबई आणि उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
सोमवारी (ता.12 जून ) मुंबईच्या किनाऱ्यावर उंच लाटा उसळत आहेत. समुद्राला भरती आल्याने पाण्याची पातळी वाढली असून, किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत.
खासगी हवामान संस्था स्कायमेटच्या अहवालानुसार, मान्सूनपूर्व तयार होणारी चक्रीवादळे त्यांचा मार्ग बदलू शकतात. तसंच या वादळाचा नेमका मार्ग आधीच ठरवणं फार कठीण काम आहे.
सध्या तरी या वादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरात किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या वादळामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता भारतीय हवामान खात्याने गुजरातच्या किनारी भागातील मच्छिमारांना सूचना देणारं पत्रक जारी केलं आहे. मच्छिमारांना 15 जूनपर्यंत पश्चिम-मध्य अरबी समुद्रात आणि 12 ते 15 जूनपर्यंत उत्तर अरबी समुद्र आणि लगतच्या मध्य अरबी समुद्रात जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे.
सौराष्ट्र आणि कच्छमध्ये मच्छिमारांना 15 जूनपर्यंत किनारपट्टीपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पुढील चार दिवसांच्या अंदाजानुसार, चक्रीवादळामुळे गुजरातच्या किनारपट्टीवर हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. यासोबतच पुढील पाच दिवस सौराष्ट्र-कच्छ आणि दीवमधील सर्व जिल्ह्यांमध्ये 30 ते 50 किमी वेगाने वारे वाहू शकतात.
अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र रुप धारण करत आहे. हे वादळ येत्या काही दिवसांत गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरातमधील सर्व बंदरांसाठी 'इशारा' जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळ सध्या ताशी आठ किलोमीटर वेगाने पुढे सरकत आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या ताज्या अपडेटनुसार, बिपरजॉय चक्रीवादळ सध्या गुजरातमधील पोरबंदरपासून 510 किलोमीटर अंतरावर आहे. तर मुंबईपासून जवळपास 600 किलोमीटर अंतरावर आहे.
अरबी समुद्रात आलेले हे या वर्षातील पहिलं वादळ आहे. यापूर्वी बंगालच्या उपसागरात मोखा नावाचं वादळ निर्माण झालं होतं आणि नंतर त्याचंही तीव्र चक्रीवादळात रूपांतर झालं होतं.
दरम्यान, बिपरजॉय वादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, कोकण आणि गोवा किनारपट्टीलगतच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
वादळाचा परिणाम काय होणार?
चक्रीवादळ बिपरजॉयने गेल्या 12 तासांत दिशा बदलली आहे आणि पाकिस्तान हवामान खात्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ते मध्यम वेगाने उत्तर आणि उत्तर-पूर्व दिशेने सरकत आहे.
पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, चक्रीवादळ कराची बंदरापासून 870 किमी अंतरावर आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी या वादळाबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, "वादळामुळे गुजरातच्या किनारी भागात वेगाने वारे वाहू शकतात. सध्या वादळामुळे वाऱ्याचा वेग सर्वाधिक आहे. तो वादळाच्या केंद्राभोवती अंदाजे 125 ते 150 किमी प्रति तास आहे. हा वेग उद्या पर्यंत 150 किमी तास इतका वाढू शकतो."
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्र किनाऱ्याभोवती 10 ते 14 मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात.
महापात्रा यांनी पुढे म्हटलं की, "बिपरजॉयचा भारतीय किनारपट्टीवर कोणताही थेट परिणाम होणार नाही."
वादळ किती वेगानं पुढं सरकतंय?
6 जून रोजी समुद्रात निर्माण झालेलं हे वादळ झपाट्यानं पुढं सरकत आहे. ते अपेक्षेपेक्षा अधिक वेगानं धोकादायक होत चालल्याचं दिसत आहे. 7 तारखेला त्याचं तीव्र चक्रीवादळात रूपांतर झालं.
8 तारखेच्या सकाळी, हे वादळ पोरबंदरपासून 965 किमी आणि मुंबईपासून 930 किमी अंतरावर होतं.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आठ जूनच्या सकाळपर्यंत हे वादळ ताशी 40 किलोमीटर वेगानं पुढं सरकत आहे. असं असलं तरी त्याच्या प्रगतीचा दर सतत बदलत आहे. कधीकधी ते ताशी 3 किमी ते 9 किमी वेगानं पुढं जात आहे.
हवामान खात्यानुसार, हे वादळ सध्या समुद्रात पुढे सरकत असून ते आणखी उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्राचे तापमान सध्या 30 ते 32 अंश सेल्सिअस आहे. त्यामुळे हे वादळ आणखी तीव्र होत असून 12 जूनपर्यंत ते तसंच राहण्याची शक्यता आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)