डिस्को डान्सर जेव्हा देशात-परदेशात मिळून 100 कोटींचा गल्ला जमवणारा पहिला भारतीय सिनेमा ठरला होता...

    • Author, वंदना
    • Role, टीव्ही एडिटर, बीबीसी इंडिया

"डिस्को डान्सर चित्रपटातला हिरो गरीब असतो पण त्याच्याकडे असणाऱ्या प्रतिभेमुळे, मेहनतीने चमकतो आणि डिस्को सुपरस्टार बनतो. मिथुन या रोलसाठी एकदम परफेक्ट होता. गरिबीतून येऊनही त्याला त्याच्या सुपरस्टार असणाऱ्या अजिबात गर्व नाहीये. त्याच्या या रोलमुळे उझबेकिस्तानमधल्या लोकांची मनं त्याने जिंकली."

उझबेकिस्तान मध्ये फेमस म्युझिक बँड चालवणारे 'रुस्तमजान इरामातोव' हिंदी सिनेमांचे आणि 'डिस्को डान्सर' फेम मिथुन चक्रवर्तीचे मोठे फॅन आहेत.

ते सांगतात, "मी स्वतः एक आर्टिस्ट आहे, पण मला गाणंबजावणं कधी शिकता आलंच नाही. मी ठरवलं होतं की, जेव्हा मला मुलंबाळं होतील तेव्हा मी त्यांना हे सगळं शिकवीन. आज उझबेकिस्तानमध्ये आमचा डिस्को डान्सर सारखा एक म्युझिकल बँड आहे." रुस्तमजान असे एकटेच नाहीयेत. जगभरात असे खूप सारे लोक आहेत ज्यांचा भारताशी काहीच संबंध नाहीये मात्र ते मिथुन दां च्या 'डिस्को डान्सर'चे जबरदस्त फॅन आहेत.

"मी दहा वर्षांचा होतो तेव्हा 'डिस्को डान्सर' चित्रपट रिलीज झाला होता. त्या दिवसापासून आजतागायत मिथुन चक्रवर्ती आमच्या देशात फेमस आहेत.

जॉर्जियामध्ये माझ्या मिथुनदा सोबतच्या खूप साऱ्या आठवणी आहेत."

कल्ट फिल्म

हे लिहिणारे डेव्हिड आज 48 वर्षांचे आहेत. ते भारतापासून चार हजार किलोमीटर दूर असलेल्या जॉर्जियामध्ये राहतात, पण त्याचं मिथुन प्रेम जगजाहीर आहे.

17 डिसेंबर 1982 मध्ये रिलीज झालेल्या 'डिस्को डान्सर' चित्रपटाला आज 40 वर्ष उलटली. या चित्रपटाला कल्ट फिल्मचा दर्जा दिला जातो ज्याची मोहिनी अजूनही उतरलेली नाही.

बी सुभाष यांनी दिग्दर्शित केलेला, राही मासूम रझा यांनी लिहिलेला , तर बप्पी लाहीरींनी संगीतबद्ध केलेला 'डिस्को डान्सर' फक्त भारतातच नव्हे तर चीन, तत्कालीन सोव्हिएत युनियन आदी देशांमध्ये हिट झाला होता. आजही तिथले लोक 'जिमी जिमी' या गाण्यावर ठेका धरतात. जर तुम्ही 'डिस्को डान्सर' चित्रपट पाहिला नसेल तर... यात जिमी नावाच्या एका गरीब मुलाची गोष्ट दाखवली आहे. त्याच्या आईला अपमानित होऊन मुंबई सोडावी लागते. हा मुलगा मोठा होऊन डिस्को डान्सर जिमी बनतो. लहानपणी जो अपमान झालेला असतो, त्याचा बदला तो आपल्या डान्स आणि-संगीतातून घेतो. आलिशान स्टेज, चकचकीत बेल बॉटम्स, लाऊड ​​म्युझिक, चमचमणारे बल्ब, स्टेजवर गिटार घेऊन आपल्या चाहत्यांना 'आय एम ए डिस्को डान्सर सांगणारा' जिमी आणि त्याच्या म्युजिक थिरकणारे त्याचे ते फॅन्स. हा फक्त फिल्म मधला सीन नव्हता तर, जिथं कुठं हे गाणं वाजवलं जायचं तिथं तिथं हा सीन अपल्या मनाने तयार व्हायचा.

यात ड्रामा, रोमान्स, रिव्हेंज, अॅक्शन असं सगळं काही असलं तरी चित्रपटाची ओळख ही म्युजिकल डान्स फिल्म अशीच होती. आणि याचमुळे हा चित्रपट यशस्वी होऊ शकला. आणि किती यश मिळावं या चित्रपटाला? तर या चित्रपटामुळे मिथुन चक्रवर्ती एका रात्रीत 'इंटरनॅशनल स्टार' बनले. मिथुन दा चा हा रोल आजपर्यंतचा सर्वात गाजलेला रोल आहे. रशियन फॅन्स सोबत मिथुन दा चे जुने फोटो सतत व्हायरल होत असतात. यातून मिथुनची क्रेझ दिसून येते. त्याचं 'जिमी जिमी' हे गाणं इतकं फेमस आहे की, आजही ते एखाद्या डान्स क्लब मध्ये हमखास वाजवलं जातं.

'जिमी जिमी' जेव्हा चीनमध्ये व्हायरल होतं...

मागच्या महिन्यात चीनमध्ये कोव्हिड लॉकडाऊन लावलं होतं. या दरम्यान लोकांच्या घरातला तांदळाचा साठा संपला होता.

त्यानंतर काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यात लोक जिमी जिमी या गाण्यावर ठेका धरून त्यांची रिकामी भांडी दाखवत होते.

खरं तर मॅन्डरिन भाषेत 'जी मी जी मी' चा अर्थ आहे 'मला तांदूळ द्या', त्यामुळेच हे लोक रिकाम्या भांड्यांसह हे गाणं पोस्ट करत होते. याआधी सप्टेंबर 2022 मध्ये शांघाय कॉर्पोरेशन समिट (SCO) दरम्यान, इंटरनॅशनल मीडियासाठी आयोजित कार्यक्रमात 'आय एम ए डिस्को डान्सर' आणि 'जिमी जिमी' हे गाणं वाजवण्यात आलं होतं.

रशियात सुद्धा मिथुनची क्रेझ

ज्येष्ठ चित्रपट समीक्षक गिरीश वानखेडे सांगतात, "डिस्को डान्सर मधली गाणी इंटरनॅशनल लेव्हलवर खूप अपिलिंग होती. आठही गाण्यांचे वेगवेगळे रिदम होते. विशेष करून पार्वती खानच्या 'जिमी जिमी' या गाण्याची बातच काही और होती. डिस्को डान्सर ने रशियामध्ये छप्परफाड कमाई केली होती."

"डिस्को डान्सरची स्टोरी लोकांना सुद्धा आवडली, कारण यात एका गरीब मुलाची स्टोरी होती, जो पुढं जाऊन मोठा डान्सर बनतो. यात इमोशनल कनेक्ट होता, यातली आई आणि मुलाची गोष्ट लोकांच्या मनाला स्पर्शून गेली."

"आई - मुलाचे इमोशनल सोबतीला गाण्यांचं जबरदस्त कॉम्बिनेशन यामुळे परदेशातही हा चित्रपट लोकांना आवडला. चित्रपटात मनोरंजन आहे, कुठंही तो कंटाळवाणा वाटत नाही. आणि म्युजिक हा यातला सर्वात मोठा फॅक्टर आहे. 'याद आ रहा है तेरा प्यार', 'गोरों की न कालों की..' सगळीच गाणी एकदम सुपरडुपर हिट होती."

उझबेकिस्तानपासून जॉर्जियापर्यंत मिळाली प्रसिद्धी...

उझबेकिस्तानमधील रुस्तमजान सांगतात, "मला 'गोरों की न कालों की' हे गाणं प्रचंड आवडतं. गरिबीतून पुढं येऊन तो मुलगा स्टार बनतो. गेल्या वर्षी उझबेकिस्तानमध्ये फिल्म फेस्टिवल भरवलं होतं, त्याला मिथुन चक्रवर्तीनी हजेरी लावली होती. त्यावेळी आम्ही हिंदी गाणी गाऊन त्यांचं स्वागत केलं होतं."

"ते एवढे फेमस आहेत पण तरीही खूप विनम्र आहेत. आम्ही सोव्हिएत प्रभावात लहानाचे मोठे झालो. त्याकाळी रेडिओवर भारतीय गाणी वाजवली जायची. जेव्हा जेव्हा हिंदी चित्रपट रिलीज व्हायचे, तेव्हा तेव्हा आम्ही हातातला कामधंदा सोडून चित्रपट बघायला जायचो. भारतीय चित्रपटांवर प्रेम करण्याचा वारसा आम्हाला लाभलाय."

"जेव्हा माझी पत्नी बाळंत होणार होती, तेव्हा टीव्हीवर एक भारतीय चित्रपट लागणार होता. हा चित्रपट चुकू नये म्हणून आम्ही तिचं बाळंतपण घरीच करायचं ठरवलं."

सोशल मीडियावर सर्च केलं तर डिस्को डान्सरच्या लोकप्रियतेचे खूप सारे किस्से सापडतील. जसं की, जॉर्जियाची राजधानी असलेल्या तिबिलिसी मध्ये एक रेस्टॉरंट होतं, ज्याचं उद्घाटन राजीव कपूर यांनी केलं होतं. आणि विशेष म्हणजे या रेस्टॉरंटचं नाव होतं 'जिमी जिमी'.

मिखाईल गोर्बाचेव्हचा किस्सा

तसं पाहायला गेलं तर हा किस्सा खूपच फेमस आहे. म्हणजे 80 च्या दशकात मिखाईल गोर्बाचेव्ह भारताच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळेस राजीव गांधींनी त्यांची ओळख अमिताभ बच्चन यांच्याशी करून दिली आणि राजीवजींनी त्यांना सांगितलं की, हे भारतातले खूप मोठे सुपरस्टार आहेत. पण गोर्बाचेव्ह म्हणाले की, माझी मुलगी तर मिथुन चक्रवर्तीलाच ओळखते."

अगदी त्याच पद्धतीने एक किस्सा घडला होता. तो असा की, बप्पीदा आणि मिथुन चक्रवर्ती कझाकिस्तानला गेले होते. त्या दिवशी राष्ट्रपतींचं भाषण सुरू होतं. पण तिथल्या राष्ट्रपतींना सोडून या दोघांना बघायला मोठी गर्दी जमली होती.

भले ही किस्से अर्धसत्य असतील पण यातून मिथुन आणि 'डिस्को डान्सर'ची लोकप्रियता लक्षात येते.

बप्पी लाहिरीने 'डिस्को डान्सर' मधून बॉलिवूडला एका नव्या डिस्को ट्यूनची ओळख करून दिली.

पार्वती खान, विजय बेनेडिक्ट, उषा उथुप, नंदू भेंडे हे सगळे आवाज कमी अधिक प्रमाणात ऐकले गेले होते. पण नवं म्युजिक आणि हे आवाज असं कॉम्बिनेशन लोकांसमोर आणून बप्पी लाहिरी यांनी कॉकटेल सादर केलं होतं.

पॉप सिंगिंगमध्ये नाव कमावलेल्या पार्वती खान त्या काळात नवीन होत्या. पार्वती खान यांचे सासरे राही मासूम रझा 'डिस्को डान्सर'चे लेखक होते आणि बी सुभाष यांनी तिला 'जिमी जिमी' हे गाणं गायला लावलं.

बी सुभाष सांगतात, रेकॉर्डिंग सुरू असताना बप्पी लाहिरीला जे पाहिजे ते मिळत नव्हतं. दरम्यान, विजय बेनेडिक्टने 'आय एम ए डिस्को डान्सर' च्या माध्यमातून डेब्यू केला.

समीक्षक गिरीश वानखेडे म्हणतात, "बप्पी लाहिरीच म्युजिक इंटरनॅशनल म्युजिकपासून प्रेरित झालं होतं. हा अंदाज भारतीय लोकांनाही आवडला."

त्याकाळातल्या इतर चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास 'प्रेम रोग', 'शक्ती' 'सत्ता पे सत्ता' 'बाजार', 'निकाह' सारख्या चित्रपटात चांगलं म्युजिक होतं पण पारंपरिक पद्धतीचं. पण बप्पीने जे आणलं होतं ते खूपच वेगळं होतं. त्यात काहीतरी नवं होतं.

मायकल जॅक्सनकडून मिळाली प्रेरणा

या चित्रपटात कलाकारांची अगदी नवी फळी होती. यातली गाणी अंजान यांनी लिहिली होती.

जर अंजानची गाणी जर तुम्ही पाहिली तर अजिबात असं वाटणार नाही की ती गाणी त्यांनी लिहिली आहेत, कारण त्यांची धाटणी खूपच वेगळी आहे.

'छूकर मेरे मन को किया तुने क्या इशारा', 'ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना', 'पिपरा के पतवा सरीखे डोले मनवा' सारखी मन स्पर्शून जाणारी गाणी अंजानने लिहिली आहेत.

दिग्दर्शक बी सुभाष सांगतात, "अंनजानजी यांनी माझ्या दुसऱ्या चित्रपटासाठी गाणी लिहिली होती. मी त्यांना 'डिस्को डान्सर'साठी गाणी लिहायला सांगितली. त्यावर मी हे करू शकणार नाही असं त्यांनी सांगितलं. पण त्यांनीच गाणी लिहावी अशी माझी इच्छा होती."

"मी बाजारात जाऊन मायकल जॅक्सन आणि इतर परदेशी गायकांच्या गाण्यांच्या कॉपीज आणल्या आणि अंजान यांना दिल्या. त्यात एक मायकल जॅक्सनचं गाणं होतं, 'माय मदर सेज आय यूज्ड टू सिंग वेन आय वॉज नॉट एबल टू टॉक, आय यूज्ड टू डांस वेन आय वॉज नॉट एबल टू वॉक'. बसं.. मी अंजान साहेबांना म्हटलो, हाच तुमचा डिस्को डान्सर आहे."

यावर मिथुन दाच्या कॅरेक्टरला शोभेल असे गाण्याचे बोल अंजान साहेबांनी लिहिले.

"ये लोग कहते हैं, मैं तब भी गाता था जब बोल पाता नहीं था. ये पाँव मेरे तो तब भी थिरकते थे जब चलना आता नहीं था."

आफ्रिकेतली क्रेझ

फक्त रशिया युरोपच नाही तर मिथुनची ही क्रेझ आफ्रिकेपर्यंत होती. माझे बीबीसी सहकारी झुबेर अहमद यांनी याबद्दलचा 15 वर्षांपूर्वीचा एक किस्सा सांगितला.

त्यांनी सांगितलं की, "बीबीसी आफ्रिकेसाठी काम करणारे आमचे सहकारी काही काम कामानिमित्त भारतात आले होते. ते सिएरा लिओनचे रहिवासी होते. त्यांनी लहानपणापासून मिथुन चक्रवर्तीना देव म्हणून पूजलं होतं. भारतात आल्यावर त्यांना मिथुनला काहीही करून भेटायचं होतं."

"तेव्हा मिथुन मुंबईत नव्हते. पण बीबीसी आफ्रिकेतील माझ्या सहकाऱ्याला मी मिथुनशी फोनवर बोलणं करून देऊ शकलो. नंतर त्यांनी बीबीसीसाठी एक आर्टिकल लिहिलं. त्यात त्यांनी मिथुनशी झालेलं बोलणं त्यांच्या भारत दौऱ्यातील हार्ट पॉईंट असल्याचं लिहिलं होतं."

भारतात जर तुम्ही सिनेरसिकांशी बोललात तर तुम्हाला एकतर 'डिस्को डान्सर'चे कट्टर फॅन्स सापडतील किंवा काही लोक याच्या मेलोड्रॅमिक स्टोरीची आणि डायलॉगची खिल्ली उडवताना दिसतील. पण याच्या 'लार्जर दॅन लाईफ इमेज' ला कोणीच नाकारत नाही.

अनुपाल पाल यांनी या चित्रपटावर 'डिस्को डान्सर- अ कॉमेडी इन फाइव्ह अॅक्ट्स' नावाचं पुस्तक लिहिलंय. हे पुस्तक चित्रपटाच्या कल्टला आहे तसंच ठेवतं.

उदाहरण म्हणून बघायचं झालं तर, चित्रपटाचा हिरो मिथुन हा डिस्को डान्सर असतो. जो गिटार पण वाजवतोय आणि गाणी सुद्धा गातोय. त्याच्या गिटारमधील करंटमुळे त्याच्या आईचा मृत्यू होतो. यामुळे त्याला गिटार फोबिया होतो आणि त्याला गिटारची भीती वाटू लागते.

पण नंतर त्याचा गुरू (राजेश खन्ना) मिथुनच्या बालपणाशी निगडित गाणं गातो आणि त्याच्याकडे गिटार भिरकवतो, तेव्हा मिथुनचा गिटार फोबिया संपतो. डिस्कोच्या माध्यमातून तो व्हिलनला हरवतो.

चीन असो वा तत्कालीन सोव्हिएत युनियन, डिस्को डान्सर एक सांस्कृतिक प्रतीक म्हणून पुढं येण्याचं कारण समजून घेण्यासाठी आपल्याला चीनचा इतिहास समजून घ्यावा लागेल.

माओच्या मृत्यूपर्यंत चीनचा उर्वरित जगापासूनचा संपर्क तुटला होता. कम्युनिस्ट राजवटीत चिनी लोक पाश्चात्य संस्कृती, पाश्चात्य संगीत यांच्याशी अनभिज्ञ होते, कारण त्यावर बंदी होती.

पण 1976 नंतर चीनमध्ये बरीच सूट मिळायला लागली. जगाला डिस्कोची ओळख खूप आधीपासूनच होती, पण 1983 मध्ये 'डिस्को डान्सर' हा चित्रपट चीनमध्ये पोहोचला आणि तिथल्या लोकांना डिस्कोची ओळख झाली.

हा चित्रपट रातोरात प्रसिद्ध झाला. बी. सुभाष त्यांच्या चीनच्या भेटीचा किस्सा बऱ्याचदा सांगतात. ते चीनमध्ये असताना, 'डिस्को डान्सर' त्यांनी बनवलाय हे जेव्हा लोकांना समजलं तेव्हा लोकांनी त्यांना पाहून 'जिमी जिमी आजा आजा' म्हणायला सुरुवात केली होती.

अमेरिकेत राहणारे मनी ट्विटरवर लिहितात, "माझा एक मित्र युक्रेनला गेला होता. त्यावेळी डिस्को डान्सची थियरी तपासून घेण्यासाठी तो बसमधून उतरला आणि 'जिमी जिमी' ओरडायला लागला. थोड्याच वेळात हॉटेलचे कर्मचारी आले आणि डिस्को डान्सर म्हणू लागले. आजही या देशांमध्ये मिथुनची क्रेझ आहे."

व्हॉट्सअॅपचे फाउंडर जान कॉम सोव्हिएत युनियनमध्ये लहानाचे मोठे झाले. 2014 मध्ये इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते म्हणाले होते, "मी लहान असताना जवळपास 20 वेळा 'डिस्को डान्सर' पाहिलाय. मी रशियामध्ये बॉलिवूडचे चित्रपट बघत लहानाचा मोठा झालोय."

आणि मिथुन दा बद्दल बोलायचं झालंच तर 'डिस्को डान्सर' येण्यापूर्वी त्यांनी 1982 मध्ये 'मृगया' चित्रपटात काम केलं होतं. यासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला आहे. 'हम पांच' आणि 'शौकीन' सारखे चित्रपट येऊन सुद्धा जे नाव मिळायला हवं होतं ते मिथुनला अजून मिळालं नव्हतं.

त्यावेळी ते बी सुभाष यांच्या 'तकदीर का बादशाह' या चित्रपटात काम करत होते.

बी सुभाष सांगतात, "त्या दिवशी मिथुन थोडा नाराज होता, मी त्याला विचारलं काय झालं, तर तो म्हणाला की, मी मेहनत करूनही मला हवं तसं यश मिळत नाहीये. त्याचा मूड बरा व्हावा म्हणून मी त्याला म्हटलं, तू स्टार होशील असा एखादा चित्रपट मी तुझ्यासोबत करीन.

त्यानंतर त्याने एकदम उत्साहात शूटिंग सुरू केलं. माझे पब्लिसिस्ट आले, 'डिस्को डान्सर' नावाच्या चित्रपटाची घोषणा झाली आणि त्यानंतर जे घडलं ते सगळ्यांनाच माहिती आहे."

100 कोटी कमावणारा पहिला हिंदी चित्रपट

असे बरेच किस्से आहेत जे आज आपल्याला अवास्तव वाटतात, पण 'डिस्को डान्सर' ची जी क्रेझ होती, त्यावर खूप काही लिहिलं गेलं.

'ओपन' मॅगझीन मध्ये छापलेल्या एका लेखात असाच एक किस्सा सांगितला होता. लेखक अनुभव पाल लिहितात, "पुस्तकात मिथुनविषयी छापलेल्या गोष्टींचा अनेकांना राग आला होता."

"मिथुनचा मुलगा मिमोहच्या नावाने एक ईमेल आला होता. यात लेखाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यांनी एका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी बोलावणं आलं. मी तिथं गेलो खूप वाट पाहिली पण कोणीच आलं नाही, म्हटल्यावर स्वखर्चाने जेवण करून आलो."

"त्यानंतर पुन्हा मिमोच्या नावाने एक ईमेल आला. त्यात म्हटलं होतं की, तुम्ही डिनरचा आनंद घेतला असेल अशी आशा आहे. तो मिथुनचा फॅन होता."

दिग्दर्शक बी सुभाष यांनी डिस्को डान्सरच्या रुपात पहिल्यांदाच प्रोडक्शन मध्ये पाय ठेवला होता. 42 लाखांत बनलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण मुंबईत झालं. या चित्रपटात नायिका म्हणून किमला कास्ट करण्यात आलं.

त्या काळात डॅनी आणि किम डेट करत होते. डॅनीने बी सुभाष यांना किमविषयी सांगितलं होतं. चित्रपटात ओम पुरी मिथुनच्या मॅनेजरच्या रोलमध्ये आहेत. त्या काळात ते हिंदी सिनेमात नवखे होते आणि बी सुभाष यांच्याकडे काम मागायला गेले होते.

फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये 'आय एम अ डिस्को डान्सर'चं शूटिंग सुरू झालं. खूप साऱ्या ज्युनिअर आर्टिस्टना बोलावलं होतं. बी सुभाष सांगतात, "मी सर्वांचं पेमेंट देण्यासाठी उभा होतो."

"तेवढ्यात मिथुन 30 ते 40 हजार रुपये घेऊन तिथं आला आणि म्हणाला, उद्याच्या शूटमध्ये उपयोगी पडतील. पण गणित असं होतं की, मिथुनला खरं तर त्याच्या शेड्यूलची फी द्यायला हवी होती. ही गोष्ट वेगळी की मी त्याचे पैसे त्याला परत केले, पण ही मदत मी कधीच विसरणार नाही."

असं म्हटलं जातं की, 'डिस्को डान्सर' हा पहिला भारतीय चित्रपट होता ज्याने भारतात आणि परदेशात मिळून 100 कोटी कमावले होते.

क्लायमॅक्स

बऱ्याचदा चित्रपटाच्या म्युजिकल क्लायमॅक्सबद्दल बोललं जातं. हा क्लायमॅक्स तीन वेगवेगळ्या गाण्यांनी बनलाय.

चित्रपटाच्या क्लायमॅक्स मध्ये डान्स कॉम्पिटिशन असतं. यात मिथुनला गाता येत नाहीये, त्याला गिटारचा फोबिया झालाय. तिकडे त्याची प्रेयसी किम 'जिमी जिमी आजा आजा' हे गाणं म्हणत त्याला प्रोत्साहन देते आहे.

त्यानंतर दुसरं गाणं सुरू होतं आणि बरोबर राजेश खन्ना तिथं येतो. तो मिथुनचा गुरू असतो. 'गोरों की ना कालों की ये दुनिया है दिलवालों की' हे त्याच्या लहानपणीचं गाणं गातो.

दरम्यान, व्हिलन तिकडे गोळी चालवतो आणि ती राजेश खन्नाला लागते पण मरण्याआधी तो मिथुनला गिटार देतो. या गिटारमुळे त्याला जो फोबिया झालेला असतो त्यातून तो बाहेर पडतो. मग मिथुन तिसरं गाणं गायला सुरुवात करतो, 'याद आ रहा है तेरा प्यार.'

'डिस्को डान्सर' म्हणजे प्रयोगांची रंगभूमी होती. हा तोच चित्रपट होता ज्याने सुभाष-मिथुन-बप्पी लाहिरी असं त्रिकुट पुढं आलं. त्यानंतर या तिघांनी 'कसम पैदा करने वाले की', 'डांस डांस', 'कमांडो', 'दलाल' असे हिट चित्रपट दिले.

पण 'डिस्को डान्सर' मध्ये जी जादू होती, त्याची सर दुसऱ्या कोणत्याच चित्रपटाला आली नाही. भारत ते चीन, आणि चीनपासून रशिया आणि उझबेकिस्तानपर्यंत या चित्रपटाची जादू आजही कायम आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)