युक्रेन : मृतदेहांनी खचाखच भरलेले शवागार, अंत्यसंस्कारांसाठी वणवण करणारे नातेवाईक आणि थडग्यांचं जंगल...

- Author, सारा रेन्सफोर्ड
- Role, बीबीसी इस्टर्न युरोप प्रतिनिधी
- Reporting from, खारकीव्हमधून
इशारा - या वृत्तातील काही वाक्य तुम्हाला विचलित करू शकतात.
फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि पॅथेलॉजिस्ट ओलेह पोडोरोजनी मंद प्रकाश असणाऱ्या गल्लींमधून शवागृहात घेऊन जातात.
या शवागृहाच्या खिडक्या वाळूच्या पिशव्यांनी बंद करण्यात आल्यात. शवागृहाचे अत्यंत जुनाट आणि भलंमोठं दार उघडलं, त्याच क्षणी मृतदेहांचा दुर्गंध येऊ लागला. तिथं पांढऱ्या रंगांच्या पिशव्यांमध्ये नागरिकांचे मृतदेह ठेवण्यात आले होते.
युक्रेनमधील इजियम शहरावर जेव्हा रशियन सैन्यानं ताबा मिळवला, तेव्हा या नागरिकांचा मृत्यू झाला होता. यातील अनेकांचा तीन-चार महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता.
मृतदेह गुंडाळलेल्या पांढऱ्या पिशव्यांवर क्रमांक लिहिण्यात आले होते. तसंच, मृतांबद्दलची माहितीसुद्धा काळ्या पेनानं लिहिली होती.
इजियम शहर रशियन सैन्याच्या ताब्यातून सोडवल्याच्या काही आठवड्यांनंतर तिथे 146 मृतदेह सापडले. मात्र, ते इतके विच्छिन्न अवस्थेत होते, की त्यांची ओळख पटवणंही अशक्य होऊन बसलं होतं.
रशियाच्या मिसाईल हल्ल्यांचे निशाणा बनलेल्यांच्या मृतदेहांनी इथली शवागृह काठोकाठ भरली आहे.
ओलेह पोडोरोजनी म्हणतात की, “आता आमच्याकडे बरेच मृतदेह साचले आहेत. डीएनए तपासणी होईपर्यंत हे मृतदेह इथेच ठेवले जातील.”
या शवागृहात एक जनरेटरही आहे. मात्र, युक्रेनच्या मुलभूत ऊर्जा केंद्रांवरच रशियानं हल्ला केल्यानं नियमित विजेच्या पुरवठ्यात कपात करण्यात आलीय. परिणामी शवागृहाच्या कंटेनरला थंड ठेवणं कठीण होऊन बसलंय.
मृतदेहांची शोधाशोध
इजियमच्या पूर्वेकडे काही अंतर पार केल्यावर रशियानं केलेल्या आक्रमणानंतरचा विनाश दिसून येतो. आक्रमणामुळे जे नुकसान झाल्या, ते भयंकर आहे.
इमारतीच्या इमारती कोसळल्या आहेत. त्यांचं ढिगाऱ्यात रूपांतर झालंय.
या भागात आगीच्याही घटना घडल्यात. आता इजियम पुन्हा युक्रेनच्या नियंत्रणात आल्यानतंर, तिथं काळ्या पडलेल्या इमारतींना काहीजण रंगवत होते.
या सर्व इमारतींमधील रहिवाशांना त्यांचे नातेवाईक शोधत आहेत. या नातेवाईकांना जवळपास कल्पना आलीय की, या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांचा जीव गेलाय. पण त्यांना कुठलाही मृतदेह सापडत नाहीय, ज्यावर ते किमान अंत्यसंस्कार तरी करू शकतील.
इजियम पोलीस ठाण्याला जवळपास नष्टच करण्यात आलंय. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आर्ट कॉलेजमध्ये एक विभाग स्थापन करून, तिथे डीएनएचे नमुने आणि या भागातल्या अत्याचारांचे पुरावे एकत्र केले जातायेत.
अधिकारी एक एक करून लोकांना बोलवतात आणि गालांच्या आतील भागाचं सॅम्पल घेतात. डीएनए सॅम्पल फॉरेन्सिक लॅबमध्ये या आशेनं पाठवली जातात की, शवागृहातील एखाद्या मृतदेहासोबत आपला डीएनए जुळेल आणि आपल्या नातेवाईकाचा शोध लागेल.
तित्याना तबाकिना जेव्हा डीएनए देण्यासाठी पुढे जात होती, तेव्हा हमसून हमसून रडत होती.
मार्चच्या सुरुवातीला तित्यानाची बहीण इरिना आणि भाचा येवेनी इजियमच्या याच भागातील इमारतीत राहत होते. रशियाच्या हवाई हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. जेव्हा रशियाकडून हवाई हल्ले सुरू होते, तेव्हा इरिना आणि येवेनी सुरक्षेसाठी इमारतीच्या बेसमेंटमध्ये लपले होते.
येवेनीच्या हातावरील टॅटूमुळे तित्यानानं त्याला ओळखलं. मात्र, तित्यानाला अद्याप तिच्या बहिणीचा शोध लागला नाहीय.
तित्याना म्हणते की, “रशियाच्या हल्ल्यात इरिनाचा मृत्यू झाला. तो मृत्यू इतका भयंकर होता की, तिचा एकही तुकडा मला मिळाला नाही. मी माझ्या बहिणीचा एक तरी तुकडा शोधण्याचा प्रयत्न करतेय, जेणेकरून मला दोघांवरही (इरिना आणि येवेनी) एकत्र अंत्यसंस्कार करता येतील आणि एकत्र दफन करता येतील.”

डीएनए तापसणीतही अडचणी
या युद्धानं तित्याना आणि तिच्यासारख्या असंख्यजणांना कधीही भरून न येणाऱ्या जखमा दिल्यात, असंख्य वेदना दिल्यात. मात्र, यानंतरही त्यांची होरपळ संपली नाहीय. कारण नातेवाईकांचे मृतदेह शोधण्यात आणि ओळख पटवण्यातही अनंत अडचणींना सामोरं जावं लागतंय.
खारकीव्ह भागावर आक्रमणादरम्यान फॉरेन्सिक तज्ज्ञांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला.
व्हिक्टोरिया लोनोव्हा म्हणतात की, “आम्ही नवीन लोकांना प्रशिक्षण देत आहोत. मात्र, आतापर्यंत आठ लोकच आमच्या विभागात आहेत आणि कामाचा दबाव जास्त आहे.”
व्हिक्टोरिया प्रयोगशाळेत तज्ज्ञ आहेत. त्या मृतदेहांची अनुवांशिक (जेनेटिक) प्रोफाईल तयार करण्याचा प्रयत्न करतात.
त्या पुढे सांगतात की, “आम्हाला वीज कपातीच्या समस्येलाही तोंड द्यावं लागतंय. इथली विजेवर चालणारी उपकरणं अचानक बंद पडतात. त्यामुळे आम्हाला सर्व काम पुन्हा सुरू करावं लागतं. आमच्याकडे एक जनरेटर आहे, मात्र अनेकदा असं होतं की, वीजच नसल्यानं दिवसभर काम बंद ठेवावं लागतं.”

ज्या पद्धतीने लोकांचे मृत्यू झालेत, त्यामुळे डॉक्टर, शास्त्रज्ज्ञांचं काम आणखी किचकट करून ठेवलंय. अनेकदा गोळीबार आणि हवाई हल्ल्यामुळे लोक पूर्णपणे जळून गेलेत.
ओलेह पोडोरोजनी म्हणतात की, “एखादी व्यक्ती एका प्रमाणापेक्षा जास्त जळल्यास त्याच्या मृतदेहातून डीएनए सॅम्पल मिळवणं सुद्धा कठीण होऊन बसतं. डीएनएसाठी अनेकदा हाडांचे तुकडे पाठवलं जातं, मात्र त्यातून काहीच मिळालं नाही, तर मग दुसरं सॅम्पल पाठवावं लागतं आणि परिणामी ही सर्व प्रक्रिया धीमी होऊन जाते.”
काही मृतांच्या नातेवाईकांनी आतापर्यंत युक्रेनही सोडलंय. त्यामुळे त्यांचं सॅम्पलही मिळू शकत नाही.
परदेशात असणाऱ्या नातेवाईकांनी सॅम्पल कसे पाठवेवा, याबाबत प्रोसेक्युटर ऑफिसने नियमावलीही जारी केलीय. याचा काहीजणांना उपयोग झालाय.
थडग्यांचं जंगल
इजियम शहरातले असंख्य अज्ञात लोक शहराच्या सीमेवरील देवदार जंगलात लाकडी क्रॉसच्या लांबच लांब रांगांखाली पुरले गेलेत. रशियानं जेव्हा इजियमवर ताबा मिळवला, तेव्हा हल्ल्यात मृत्यू झालेल्यांचे मृतदेह याच देवदार जंगलात नेऊन पुरण्यात आले,
युक्रेनच्या सैन्यानं जेव्हा पुन्हा इजियमवर ताबा मिळवला, तेव्हा या मृतदेहांना बाहेर काढून खारकीव्हला पाठवण्यात आलं. पोलिसांच्या माहितीनुसार, काही लोकांचा मृत्यू नैसर्गिक आहे, तर अनेकांचा गोळीबार किंवा स्फोटात मृत्यू झालाय.
17 मृतदेहांच्या शरीरावर तर अत्याचारांचे व्रण दिसून आले. कुणाच्या गळ्याभोवती दोरी बांधलेली, तर कुणाचे हात बांधलेले दिसले.
आतापर्यंत 899 मृतदेह बाहेर काढण्यात आले.

खारकीव्ह भागातील पोलीस तपासप्रमुख सेर्ही बोल्विनोव्ह म्हणतात की, “नक्कीच, हे खूप कठीण आहे. आम्ही एवढे मृतदेह कधीच पाहिली नाहीत. सध्या आम्ही एका दिवसाला सरासरी 10 मृतदेह बाहेर काढतोय आणि हे गेल्या काही दिवसांपसून सलग सुरूच आहे.”
या आठवड्याच्या सुरुवातीला पोलीस अधिकाऱ्यांना क्लस्टर बॉम्बस्फोटात मारलं गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला. त्यांना त्यांच्या पत्नीनं बागेतच दफन केलं होतं.
सेर्ही बोल्विनोव्ह पुढे म्हणतात की, “इथं जे काही झालंय, रशियानं जे गुन्हे केलेत, ते आमच्या आठवणीतून कधीच जाणार नाहीत आणि आम्ही या प्रत्येक गुन्ह्याची चौकशी करू.”
आतापर्यंत इजियममध्ये एकूण 451 मृतदेह सापडले, ज्यात सात मुलांचा समावेश आहे. मृतदेहांना जंगलात दफन करण्यात आलं, यात काहींना तर बॉडी बॅगविनाच दफन करण्यात आलं होतं.
अनेकांच्या थडग्यावर नावंसुद्धा नाहीत. थडग्यावर लाकडाचे क्रॉस होते, ज्यावर केवळ क्रमांक लिहिले होते.
एक नाव लिहिलं होतं – लेनिन अव्हेन्यू, 35/5, वृद्ध व्यक्ती

एका कवीचे अंत्यसंस्कार
मात्र, ज्या मृतदेहाला तिथं दफन करण्यात आलं होतं, त्याचा क्रमांक 319 होता, त्याची ओळख मिटली होती. डीएनए तपासानंतर लक्षात आलं की, तो मृतदेह वलोडिमिर वाकुलेंको यांचा आहे. वाकुलेंको हे लहान मुलांसाठीच्या साहित्याचे लेखक आणि कवी होते.
त्यांचा मृतदेह मृत्यूनंतर नऊ महिन्यांनी सापडला. मग त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलं.
मार्चच्या शेवटी कवी वलोडिमिर यांना अटक करण्यात आली होती आणि रशियाच्या सैन्याद्वारे चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं होतं. मात्र, दुसऱ्या दिवशी रशियन सैन्यानं त्यांना पुन्हा नेलं.
प्रत्यक्षदर्शी सांगतात की, त्येली वलोडिमिर यांनी ‘युक्रेनियन सैन्य, जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर वलोडिमिर यांच्यावर Z चं निशाण लावून बांधून कारमधून नेण्यात आलं.
जेव्हा वलोडिमिर यांचा मृतदेह सापडला, तेव्हा त्यांच्या हाडांच्या सापळ्यात दोन गोळ्याही सापडल्या.

वलोडिमिर यांच्या आई ओलेना इहनाटेंको यांनी निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या युक्रेनियन झेंड्यात लपेटण्यास सांगितलं आणि हत्या करणाऱ्यांचा निषेध व्यक्त केला. तसंच, रशियन सैन्याला उद्देशून, ‘तुम्ही असे कसे असू शकता,’ असा संतप्त सवालही त्यांच्या आईनं विचारला.
वलोडिमिर यांचा फोटो त्यांच्या आईनं छातीशी धरला आणि म्हटलं की, “ईश्वर आपल्याला माफ करायला शिकवतो, पण माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना मी कधीच माफ करणार नाही. मला या आशा आणि विश्वासासोबत जगेन की, माझ्या मुलाचे मारेकऱ्यांची ओळख पटेल आणि त्यांना शिक्षा होईल. मी या स्वप्नासोबतच जगेन.”
आपल्या डायरीत वलोडिमिर यांनी लिहिलंय की, “शत्रूंनी मला घेरणं हे अत्यंत भयंकर आहे.”
अंत्यसंस्कार तरी करायला मिळावं...
इजियममध्ये आतापर्यंत डीएनएच्या माध्यमातून केवळ पाच जणांची ओळख पटली आहे.
फॉरेन्सिक टीमनं हे स्वीकारलंय की, “काही मृतदेह ओळख पटवण्याच्या पलिकडचे आहेत. त्यांची कधीच ओळख पटू शकत नाही.”
तित्याना तबाकिनासारखे नातेवाईक आपल्या नात्यातील व्यक्तीची ओळख पटेल, या आशेवर जगतायेत.
तित्याना सांगतात, “माझ्या एका शेजाऱ्याने नुकतेच त्याच्या कुटुंबातील सात जणांचं दफन केलं. हे सातही जण माझ्या बहीण आणि भाच्याचा मृत्यू झाला, त्याच हल्ल्यात मरण पावले होते.
“ते शेजारी सांगत होते की, अंत्यसंस्कारानंतरची पहिली सकाळ अशी उजाडली की, डोक्यावरचं थोडं ओझं कमी झालंय. किमान आपल्या नात्यातल्या माणसांवर अंत्यसंस्कार तरी करू शकलो, याचं समाधान.”
तित्याना म्हणतात, “मलाही याच भावनेतून जायचंय. किमान माझ्या बहीण आणि भाच्यावर अंत्यसंस्कार तरी मला करता यावेत.”











