युक्रेनमध्ये लढणारी पुतिन यांची प्रायव्हेट आर्मी किती धोकादायक आहे?

फोटो स्रोत, @RSOTM TELEGRAM GROUP
युक्रेनच्या लष्कराने रशियाच्या वागनर गटाच्या एका मुख्यालयावर हल्ला केला आहे. युक्रेनमधल्या लुहान्स्क गव्हर्नरांनी यासंदर्भात माहिती दिली.
लुहान्स्क प्रांतातल्या कडिव्कास्थित एका हॉटेलला लक्ष्य करण्यात आलं. या हॉटेलात वागनर गटाचे सदस्य कथितरित्या भेटत असल्याचं गव्हर्नर सर्हे हैदै यांनी सांगितलं.
या हल्ल्यात रशियाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा हैदै यांनी केला आहे.
वैद्यकीय मदत न मिळाल्याने उर्वरित सैनिकांपैकी 50 टक्के सैनिकांचा मृत्यू झाल्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
या हॉटेलात वागनूर गटाच्या लोक असल्याच्या वृत्ताची बीबीसीने स्वतंत्रपणे पुष्टी करू शकत नाही.

फोटो स्रोत, @RSOTM TELEGRAM GROUP
शनिवारी आणि रविवारी रशियाने ओडेसाला लक्ष्य केलं होतं. युक्रेनने रशियाचं नियंत्रण असलेल्या मेलितोपोल शहरावर सातत्याने बॉम्बहल्ले केले.
पाश्चिमात्य तज्ज्ञांच्या मते वागनर गट हा रशियाच्या सरकारचा पाठिंबा असलेला लढाऊ सैनिकांचा समूह आहे. रशियाच्या हितासाठी ते काम करतात.
या खाजगी लष्कराला एका खाजगी कंपनीचं स्वरुप देण्यात आलं आहे. येवगेनी प्रिगोजन या लष्कराला निधी पुरवठा करतात. प्रिगोजिन हे पुतिन यांचे निकटवर्तीय आहेत.
काही वर्षांपूर्वी रेस्तराँ चालवणाऱ्या प्रिगोजिन यांच्यावर युद्ध गुन्हे आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनाचे आरोप होत असतात. याआधी वागनर समुहातील सैन्य क्रायमिया, सीरिया, लीबिया, माली आणि सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकमध्ये तैनात होतं.
वागनर गट काय आहे?
युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वी या गटाचे सैनिक युक्रेनमध्ये फॉल्स फ्लॅग मोहीम राबवत होते. जेणेकरून रशियाला हल्ले सुरू करण्यासाठी निमित्त मिळेल.
किंग्स कॉलेज लंडनमधील संघर्ष आणि सुरक्षा विभागाचे प्राध्यापक ट्रेसी जर्मन सांगतात, या भागात वागनर समूहाचा प्रवेश 2014मध्येच झाला होता.
या समूहाच्या जवळपास 1000 सैनिकांनी लुहान्स्क आणि डोनेत्स्क भागात रशियाचं समर्थन लाभलेल्या दहशतवाद्यांना साथ दिली होती.
युक्रेनच्या वकिलांनी आरोप केला आहे की या गटाने युक्रेनच्या तीन लोकांशी हातमिळवणी करत युद्ध गुन्हे घडवून आणले आहेत.
जर्मनीच्या गुप्तचर विभागाला अशी शंका आहे की वागनर सैनिकांनी युक्रेनच्या बुका शहरातील सर्वसामान्य लोकांच्या हत्या केल्या आहेत. रॉयल युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूटशी संलग्न डॉ. सॅम्युअल रमानी म्हणाले, वागनर गटाचे सैनिक डॉनबास परिसरात रशियाच्या सैनिकांच्या बरोबरीने युद्धात सहभागी झाले आहेत.
वागनर गटाने लुहान्स्कमध्ये पोपोस्रा आणि सेवेरोडोनेत्स्क या शहरांवर कब्जा करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अलीकडे हा गट रशियाच्या लष्कराचा अनौपचारिक भाग म्हणूनच कार्यरत आहे. या गटाच्या सैनिकांचा मृत्यू झाल्यास त्याची माहिती देण्यात येत नाही.
युक्रेनच्या लष्कराने याआधी जूनमध्ये स्टाखानोव आणि लुहान्स्कमधल्या पोपोस्रा वागनर गटाच्या दुसऱ्या ठिकाणांवर हल्ला केल्याचा दावा केला होता.

फोटो स्रोत, Reuters
वागनर समूहाची स्थापना कोणी केली?
द जेम्सटाईन फाऊंडेशन थिंक टँकचे सीनियर फेलो डॉ. सर्गेई सुखान्किन यांनी सांगितलं की दिमित्री उत्किन या माणसाने वागनर गटाची स्थापना केली.
2013पर्यंत ते रशियाच्या विशेष लष्कराचा भाग होते.
ते पुढे सांगतात, "वागनर गटात त्यांनी अशा लोकांना सहभागी करुन घेतलं ज्यांचं वय 35 ते 50 दरम्यान असेल आणि त्यांच्यावर कर्जाचा बोजाही असेल. बरेचसे जण शहरात राहणारे होते. यापैकी काही चेचेन्या संघर्ष तर काही रशिया-जॉर्जिया युद्धात होते. त्यांच्याकडे युद्धाचा अनुभव होता. पण सर्वसामान्य आयुष्य त्यांच्या पचनी पडत नव्हतं. "
सर्गेई यांनी सांगितलं की रशियन लष्कराच्या गुप्तचर विभागाकडच्या जागेवर तीन महिने प्रशिक्षण झालं. या गटाचं रशियाच्या लष्कराशी कनेक्शन आहे.
जगातल्या अनेक संघर्षमय परिसरात या गटाचं लष्कर पाठवलं जातं.
ते पुढे म्हणाले, "रशिया यासंदर्भात उत्सुक होतं कारण चेचेन्या आणि अफगाणिस्तानमध्ये झालेल्या चुकांची पुनरावृत्ती त्यांना टाळायची होती. पुतिन यांना भीती होती की विदेशी भूमीवर लष्करी मोहिमेत रशियाच्या सैनिकांचा मृत्यू झाला तर देशात नाराज लोकांची संख्या वाढेल."
चेचेन्या आणि अफगाणिस्तानमधल्या लष्करी मोहिमेत रशियाच्या हजारो सैनिकांचा मृत्यू झाला होता. वागनर ग्रुप अधिकृतदृष्ट्या रशियाच्या लष्कराचा भाग नव्हता. त्यामुळे अशा मोहिमांमध्ये ते सहभागी झाले तर सैनिकांच्या मृतांचा आकडा कमी दाखवता येतो.
सर्गेई सांगतात, "एक कारण हे होतं की रशिया या सैनिकांची जबाबदारी घेणं टाळू शकतं. आम्हाला या सैनिकांबद्दल माहिती नाही असं रशिया सांगू शकतं. अन्य कोणत्याही देशात लष्कर किंवा पॅरामिलिटरी तुकडी पाठवणं कठीण असतं. "
वागनर समूहावर कोणाचं नियंत्रण?
किरिल मिखायलोव कीव्हमध्ये कॉन्फ्लिक्ट इंटेलिजन्स टीमचे शोधपत्रकार आहेत. उत्किन यांच्या नेतृत्वात वागनर गटाने 2014 मध्ये युक्रेनमध्ये सक्रिय होता. हा गट रशिया समर्थक फुटीरतावाद्यांना मदत करत होता. जून 2014 मध्ये युक्रेन युक्रेनचं एक विमान अपघातग्रस्त झालं होतं, ते विमान पाडल्याचा आरोप वागनर गटावरच आहे.
मिखायलोव सांगतात, “युक्रेनच्या सुरक्षा यंत्रणेनं पूर्व युक्रेनमधले विद्रोही कमांडर आणि रशियाच्या अधिकाऱ्यांचं बोलणं ऐकलं होतं, त्यानुसार हे काम वागनर गटाचंच होतं. दिमित्री उत्किन यांना फोन करून विमान पाडल्याची माहिती देण्यात आली होती.”
वागनर गटाचं नियंत्रण कोणाकडे आहे याबाबत ठोस माहिती नव्हती. पण हा गट डेबाल्टसवा मोहिमेत सहभागी झाला. डेबाल्टसवा पूर्व युक्रेनमधल्या दोनेस्त्क आणि लुहान्स्क यांना जोडणारं महत्त्वाचं रेल्वे केंद्र आहे. डावपेचात्मकदृष्ट्या हे महत्त्वाच्या ठिकाणी आहे.
किरिल सांगतात, या शहरावर युक्रेनचा कब्जा होता. रशिया लष्कराच्या पाठिंब्याने बंडखोर या भागावर कब्जा करण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी तिथे रशियाच्या टॅंकचा वापर करण्यात आला. अलीकडेच हे समजलं आहे की ते वागनर गटाचे होते.
मिखायलोव सांगतात, शोधपत्रकारांना हे समजलं आहे की दिमित्री उत्किन हे डेबाल्टसवा आणि पूर्व युक्रेनच्या इतर भागांची माहिती जीआरयू या रशियन लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेला देत होते. याचा अर्थ असा आहे की वागनर गटाचं नियंत्रण जीआरयूच्या हाती होतं?
ते सांगतात, त्यांच्यावर थेट जीआरयूचं नियंत्रण होतं. ते कामासाठी त्यांनाच बांधील होते. त्यावेळी तरी असंच होतं.
पण डेबाल्टसवाच्या लढाईवेळी वागनर गट एवढा मोठा नव्हता. सीरियावेळी परिस्थिती बदलली.
वागनर गट कुठे कुठे तैनात असतो?
किरिल सांगतात, युक्रेनप्रमाणे युद्धाच्या मैदानात रशियाचं सैन्य फ्रंटलाईनवर येऊन लढताना आम्हाला दिसलेलं नाही. सीरियामध्ये ही भूमिका वागनर समुहाने निभावली होती. युक्रेनमध्ये छोट्या मोहिमेनंतर वागनर गटाचे अनेक सैनिक होते. त्यांच्याकडे आधुनिक हत्यारं होती आणि प्रत्येक तुकडीत 400 सैनिक होते. हे रशियाच्या सैनिकांची जागा घेत होते.
वागनर गट सीरियाच्या लष्करासह युद्धात होता. गटाच्या काही लोकांनुसार कथित कट्टरतावादी गट इस्लामिक स्टेटच्या कब्ज्यातून सोडवलेल्या भागावर वागनर गटाचे लोक घुसत असत.
याने नुकसानही होत असे कारण मृतांची संख्या वाढत असे.
ते सांगतात शोधपत्रकारांच्या रिपोर्टनुसार त्यावेळचे रशियाचे सुरक्षामंत्री वागनर गटावर नाराज होते. कारण मृतांचे नातेवाईक सोशल मीडियावर त्यांच्याविषयीची माहिती शेअर करत होते.
सीरियात रशियाचे सैनिक लढत आहेत हे एव्हाना उघड झालं होतं. शस्त्रास्त्रांसाठी वागनर गटाची मिळणारी मदत बंद झाली होती.
वॉशिंग्टन पोस्ट आणि असोसिएटेड प्रेसने दिलेल्या माहितीनुसार वागनर गटाने आपले डावपेच बदलले आणि सीरियाच्या सरकारशी वाटाघाटी केल्या. त्यांना पूर्व भागातल्या नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाचे साठे अमेरिकेचं समर्थन असलेल्या कुर्द दलापासून वाचवायचे होते.
यानंतर एक निर्णायक वळण फेब्रवारी 2018मध्ये आलं. सीरिया कोनाको गॅसप्लांट भागात कुर्द दलाबरोबर तैनात असलेल्या अमेरिकेच्या कमांडरना त्यांच्यावर एक फौज चाल करून येत असल्याचं दिसलं. रेडिओ संदेशांमध्ये त्यांनी या लोकांचं रशियन भाषेतलं संभाषण टॅप केलं होतं. हे वागनर गटाचे सैनिक आणि सीरियाचे सैनिक होते.
किरिल सांगतात, तिथे रक्तपाती हिंसाचार झाला. अमेरिकेचे सैनिक रशियाच्या सैनिकांवर हल्ले करत होते. यामुळे अमेरिका आणि रशिया यांच्यात तणाव वाढण्याची परिस्थिती निर्माण झाली.
त्या भागात आमचे सैनिक नव्हते असं रशियाच्या अधिकाऱ्यांनी पेंटागॉनला सांगितलं.
ते सांगतात, फरात नदीच्या पश्चिमेकडे खनिज तेलाच्या विहिरी सीरियाचं सरकार आणि वागनर गटाच्या नियंत्रणात आल्या. हाच भाग अमेरिकेच्या सैन्याचं समर्थन असलेल्या समूहाकडे होता. तेलाच्या असंख्य विहिरी कुर्द दलाच्या कब्जातून सोडवू शकले नाहीत.
याने परिस्थिती आणखीनच बिकट झाली. या मोहिमेची परवानगी कोणी दिली हे अद्यापही समजू शकलेलं नाही. वागनर गट परस्पर मर्जीनेच हे निर्णय घेत होता.
पण यानंतर गटाचे डावपेच पुन्हा एकदा बदलले. आता हा गट लष्करी मोहिमेऐवजी आर्थिक भागात हातपाय फैलावू लागलाय.











