वोलोदिमिर झेलेन्स्की : 'रशियाचा आण्विक धोका रोखण्यासाठी आता जागतिक कारवाईची गरज'

रशियन अधिकाऱ्यांनी त्यांच्या नागरिकांना अण्वस्त्र वापरण्यासाठी सज्ज केल्याचं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदीमिर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.
रशिया त्यांचा वापर करण्यास तयार नाही, असंही आपल्याला वाटत असल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलंय.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत झेलेन्स्की यांनी रशियावर हल्ला करण्याचं आवाहन केल्याचं नाकारलं आहे आणि आपल्या दाव्याचा विपर्यास केल्याचं म्हटलं आहे.
"तुम्ही हल्ल्याऐवजी प्रतिबंधात्मक कारवाई असा शब्दप्रयोग वापरला पाहिजे, असं ते म्हणाले.
गेल्या काही आठवड्यात युक्रेनच्या सैन्याने रशियावर प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर भूभाग पुन्हा ताब्यात घेतला आहे. यामुळे रशियन सैन्याला दीर्घकाळ ताब्यात असलेल्या अनेक भागांचा ताबा सोडावा लागला आहे.
दुसरीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या चार भागांचा ताबा घेतल्याची घोषणा केली आहे.
रशियाच्या ताब्यातील भागांचं रक्षण करण्यासाठी लहान अण्वस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो, असं पुतिन आणि इतर वरिष्ठ रशियन अधिकार्यांनी सुचवलं होतं.
पण रशिया असं करण्यास तयार असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, असं पाश्चात्य अधिकारी म्हणत आहेत.
कीव्हमधील आपल्या कार्यालयात बोलताना राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले: "ते (पुतिन) त्यांच्या नागरिकांना अण्वस्त्रांचा वापर करण्यासाठी तयार करत आहेत आणि हे खूप धोकादायक आहे."
"असं असलं तरी, ते अण्वस्त्र वापरायला तयार नाहीयेत. पण त्यांनी याविषयीचा संवाद साधायला सुरुवात केली आहे. ते अण्वस्त्रांचा वापर करतील की नाही, माहिती नाही. पण याविषयीही बोलणंही मला धोकादायक वाटतं," असं झेलेन्स्की म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "रशियाच्या सत्तेतील लोकांनाही जगायला आवडत असणारच आणि मला वाटतं की, काही तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे अण्वस्त्रं वापरण्याचा धोका सध्या तरी निश्चितच नाही. कारण एकदा का अण्वस्त्रं वापरली तर परत वळण्याचा मार्ग नाही हे रशियाला माहिती आहे."

फोटो स्रोत, EPA/OLER Petrasyuk
दरम्यान, गुरुवारी (6 ऑक्टोबर) एका ऑनलाइन कार्यक्रमादरम्यान रशियावर हल्ला करण्याचं आवाहन केल्याचा दावा झेलेन्स्की यांनी फेटाळून लावला.
सुरुवातीला ही प्रतिक्रिया क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी खोडून काढली. हे युद्ध सुरू करण्यासाठीचं आणखी एक आवाहन आहे असं त्यांचं म्हणणं होतं. तर रशियाचे परराष्ट्र मंत्री सेरगेई लाव्हरोव्ह म्हणाले की, यावरून रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याचा निर्णय कसा योग्य होता ते कळलं.
तर झेलेन्स्की म्हणाले की, "त्यांनी [रशियन लोकांनी] त्यांच्या पद्धतीनं माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. माझं वक्तव्य त्यांच्यासाठी कसं उपयुक्त आहे, यानुसार ते इतर दिशेला वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला."
रशियानं अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले की, यामुळे जग निर्णायकीच्या उंबरठ्यावर आलं आहे.
शीतयुद्धाच्या वेळी क्युबामध्ये जी वेळ आली होती त्यानंतर आत्ता ही वेळ येऊन ठेपली आहे, असंही त्यांनी म्हटलं.
झेलेन्स्की म्हणाले की, आता जागतिक कारवाईची गरज आहे, कारण रशियाच्या धमक्या म्हणजे संपूर्ण जगासाठी धोका आहेत.
"रशियानं आधीच या दिशेनं पाऊल टाकलं आहे. युरोपमधील सर्वांत मोठे अणु केंद्र झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पाला रशिया ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रकल्प रशियाच्या मालमत्तेत समाविष्ट करण्याचा पुतिन यांचा प्रयत्न आहे," असा दावा झेलेन्स्की यांनी केलाय.
जवळपास 500 रशियन सैनिक या प्लांटमध्ये होते, तरीही युक्रेनचे जवानच तो अजूनही चालवत आहेत, असंही ते म्हणाले.
"जग तात्काळ रशियाच्या व्याप्तीची कृती थांबवू शकतं. जग अशा प्रकरणांमध्ये सँक्शन पॅकेजची अंमलबजावणी करू शकतं आणि रशियानं अणुऊर्जा प्रकल्प सोडावा यासाठी सर्वकाही करू शकतं."
अत्याधुनिक पाश्चात्य शस्त्रांद्वारे युक्रेनियन सैन्यानं पूर्व आणि दक्षिणेकडे लक्षणीय प्रगती केली आहे. रशियानं दावा सांगितलेल्या काही भागांमधील शहरंही आणि गावं पुन्हा ताब्यात घेतली आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
झेलेन्स्की म्हणाले की, रशियन सैन्यानं चांगली लढत दिली पण युक्रेनलाही शस्त्रं मिळाली होती.
"मी असं म्हणणार नाही की आमच्याकडे आता पुरेसे शस्त्रं आहेत. पण आमच्या सैनिकांना पुढे जाण्यास प्रवृत्त केलं गेलं आहे."
रशियन सैन्याच्या अपयशामुळे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासाठी एक मोठा पेच निर्माण झाला आहे. देशाच्या लष्करी क्षमतेवर यामुळे टीका झाली आहे.
यादरम्यान पुतिन यांनी हजारो राखीव लोकांची जमवाजमव करण्याची घोषणा केली आहे आणि यामुळे रशियामध्ये दुर्मिळ प्रमाणात युद्धविरोधी निदर्शनं झाली आहेत.
तर झेलेन्स्की यांनी रशियन लोकांना तुमचं शरीर, हक्क आणि आत्म्यासाठी लढा, असं आवाहन केलं आहे.
ते म्हणाले, "आता एकत्रित केलेली ही मुलं लढण्यासाठी येताना काहीच घेऊन येत नाहीयेत. त्यांच्याकडे ना बंदुका आहेत ना चिलखत. त्यांना तोफांच्या तोंडासमोर दिलं जातं आहे."
"पुतिन यांना अण्वस्त्र हल्ल्याची नाही, तर त्यांच्या देशातील जनतेची भीती वाटते. कारण पुतिन यांची जागा घेण्यास तेच लोक सक्षम आहेत. पुतिन यांची ताकद काढून घ्या आणि ती दुसऱ्याला द्या," असंही झेलेन्स्की म्हणाले.
या युद्धात युक्रेनचा शेवटी विजय झाल्यास पुतिन टिकू शकतील का, या प्रश्नावर झेलेन्स्की म्हणाले, "मला त्याची पर्वा नाही."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








