रशियाचा युक्रेनवर हल्ला, किमान 25 लोकांचा मृत्यू; अनेकजण जखमी

फोटो स्रोत, Donetsk Emergency Service
- Author, हेनरी एस्टियर
- Role, बीबीसी न्यूज
रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. काल (8 मार्च) रात्री उशिरा रशियाने युक्रेनच्या दोनेत्स्क आणि खारकीव्ह भागात केलेल्या हल्ल्यात जवळपास 25 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
तर, अनेकजण जखमी असल्याची माहिती युक्रेनियन अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा संघर्ष थांबण्याची कोणतीही चिन्हं दिसत नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.
दोनेत्स्क प्रदेशात झालेल्या हल्ल्यात किमान 11 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. यात सहा लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
तर, खारकीव्ह आणि ओडेसासह इतर ठिकाणी झालेल्या हल्ल्यांमुळे स्थानिकांच्या घराचं मोठं नुकसान झालं असून पायाभूत सुविधांना चांगलाच फटका बसला आहे.
दरम्यान, अमेरिकेनं कीव्हसोबत लष्करी मदत आणि गुप्तचर देवाणघेवाण थांबवल्यानं अलिकडच्या काही काळात रशियन हल्ले तीव्र झाले आहेत.
गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या खडाजंगी झाली होती. या वादाच्या काही दिवसानंतरच ही घटना घडली आहे.


रशियाच्या या हल्ल्यानंतर पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क म्हणाले, "असभ्य आणि हिंस्र लोकांना मोकळीक दिल्याचा हा परिणाम आहे. जेव्हा कोणी अशा लोकांना सूट देतो, तेव्हा असंच घडतं",
"अधिक बॉम्ब, अधिक आक्रमकता, अधिक बळी" अशी प्रतिक्रिया डोनाल्ड टस्क यांनी सोशल मीडियावरून दिली.
शुक्रवारी रात्री उशिरा दोनेत्स्क प्रदेशातील डोब्रोपिल्या या शहरात सर्वांत घातक हल्ले झाले. या हल्ल्यात आठ निवासी इमारती आणि एक शॉपिंग सेंटरला लक्ष्य करण्यात आले, ज्यात किमान 11 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
आपत्कालीन सेवा पोहोचल्यानंतर रशियानं आणखी एक हल्ला करून "थेट बचावकर्त्यांना लक्ष्य केलं", असं झेलेन्स्की यांनी टेलिग्रामवर केलेल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. "अशा हल्ल्यांवरून स्पष्ट होतं की, रशियाची मानसिकता आणि उद्दिष्ट अद्याप तसेच आहेत, ते बदललेले नाहीत." असंही त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केलं.

या भागातील इतर हल्ल्यांमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी 9 लोकांचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले असल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं.
शनिवारी पहाटे खारकीव्ह प्रदेशातील बोहोदुखिव्ह येथे एका कंपनीला लक्ष्य करत ड्रोन हल्ला करण्यात आला. ज्यात तीन जण ठार झाले तर सातजण जखमी झाले, अशी माहिती प्रादेशिक प्रमुख ओलेह सिन्येहुबोव्ह यांनी दिली.
तर, शुक्रवारी ओडेसामध्ये आणखी एका ड्रोन करून येथील नागरी आणि उर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले, असे प्रादेशिक प्रमुखांनी सांगितलं. "गेल्या तीन आठवड्यांत या प्रदेशातील ऊर्जा प्रणालीवरील हा सातवा हल्ला आहे," असं डीटीईके ऊर्जा कंपनीकडून सांगण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, युक्रेननंही रशियावर हल्ले सुरूच ठेवले असून, त्यांच्या सैन्यानं रात्रीतून 31 युक्रेनियन ड्रोन अडवले असल्याचं रशियन संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.
डोनाल्ड ट्रम्प शुक्रवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले की,"दोन्ही राष्ट्रांदरम्यान शांतता प्रस्थापित करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न सुरु असताना, रशियापेक्षा युक्रेनसोबत व्यवहार करणं अधिक अवघड वाटत आहे."
"अमेरिका आणि रशिया यांच्यात चांगला समतोल बनतोय. कदाचित त्यामुळेच कीव्हच्या तुलनेत मॉस्कोसोबतचा सोपा ठरेल", असं ट्रम्प माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
या संभाषणाच्या काही तास आधी ट्रम्प म्हणाले होते की, ते युक्रेनवर युद्धबंदी लागू होईपर्यंत ते रशियावर मोठ्या प्रमाणात निर्बंध आणि शुल्क लादण्याचा विचार करत आहेत.
यासह लष्करी मदत आणि गुप्तचर माहिती थांबवण्यासोबतच, अमेरिका काही उपग्रह चित्रांसाठी युक्रेनचा प्रवेश देखील स्थगित करत आहे, असे अंतराळ तंत्रज्ञान कंपनी मॅक्सारनं शुक्रवारी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
ही कारवाई व्हाइट हाऊसमधील वादाच्या बरोबर आठवडाभरानंतर करण्यात आली आहे, जिथे ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना अमेरिकेचा 'अनादर' केल्याचे म्हणत फटकारले होते.
ट्रम्प प्रशासनाच्या रशियाशी वाढत्या जवळीकीमुळे युरोपमधील अनेक देशांना त्यांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेवर अवलंबून राहता येणार नाही, अशी चिंता वाटत आहे.
गुरुवारी युरोपियन युनियनच्या नेत्यांनी ब्रुसेल्समध्ये बैठक घेतली आणि संरक्षण खर्च वाढवण्याच्या तसेच युक्रेनला पाठिंबा देण्याच्या योजनांना मंजुरी देण्यावर भर दिला.
पुढील आठवड्यात ट्रम्प यांचे विशेष दूत स्टिव्ह विटकॉफ सौदी अरेबियामध्ये युक्रेनच्या वाटाघाटी प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत, जेणेकरून रशियासोबत युद्धबंदीबाबत तोडगा काढता येईल.
दरम्यान, रशियाने फेब्रुवारी 2022 पासून आक्रमण सुरू केलं आणि तेव्हापासून तर आतापर्यंत युक्रेनच्या सुमारे 20 टक्के भूभागावर त्यांनी नियंत्रण मिळवलं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











