ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील तणाव पुतिन यांच्यासाठी कशाप्रकारे फायद्याचा ठरतोय?

फोटो स्रोत, MIKHAIL METZEL/POOL/AFP via Getty Images
- Author, स्टीव्ह रोझेनबर्ग
- Role, बीबीसी रशियन संपादक
शुक्रवारी अमेरिकेच्या ओव्हल ऑफिसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यात झालेल्या वादळी बैठकीवर जगभरातील नेत्यांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
पण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी याकडे विशेष लक्ष दिलं नाही. या प्रकरणावर त्यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
खरं तर, त्यांना आता काही करण्याची किंवा व्यक्त होण्याची गरजच नाही. राष्ट्राध्यक्ष पुतिन आता शांतपणे बसून पुढे काय घडतं याची वाट पाहू शकतात.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भाकीत केलं होतं की युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी त्यांची सार्वजनिकरीत्या चर्चा 'एक ठळक मुद्दा' ठरेल.
झेलेन्स्की यांच्यासोबत नाट्यमयरीत्या झालेली खडाजंगी जगभरातील माध्यमांनी टिपली. व्लादिमीर पुतिन यांना हा वादविवादाचा 'शो' नक्कीच आवडला असेल यात शंका नाही.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि उप-राष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हेन्स यांनी जगभरातील माध्यमांसमोर झेलेन्स्की यांना अपमानित केलं.


झेलेन्स्की हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन वर्षापासून युद्ध सुरू आहे.
वॉशिंग्टनमधील बैठक आणि त्यानंतर झालेल्या वादळी चर्चेवर पुतिन यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु काही रशियन अधिकाऱ्यांनी त्यावर भाष्य केलं आहे.
दिमित्री मेदविदेव हे रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष असून सध्या रशियन सुरक्षा परिषदेचे उपप्रमुख आहेत.
त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये लिहिलं की, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना "ओव्हल ऑफिसमध्ये जोरदार थप्पड बसली."
ते म्हणाले की अमेरिकेने युक्रेनला लष्करी मदत देणं थांबवायला हवं. तर रशियाची यावर काय प्रतिक्रिया असेल.
टेलीग्रामवरील एका पोस्टमध्ये रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झखारोवा यांनी ट्रम्प आणि जे. डी. व्हेन्स यांच्या 'संयमाची' प्रशंसा केली.
झखारोवा यांनी लिहिलं की, युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांवर हल्ला न करून ट्रम्प यांनी आपला 'संयम' दाखवला.
हे एका नव्या युगाचे संकेत आहेत, जिथे एका बाजूला अमेरिका आणि युक्रेनच्या संबंधांमध्ये वितुष्ट येण्याचा धोका आहे, तर त्याउलट अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंधांकडे पाहिल्यास पूर्णत: उलट परिस्थिती दिसून येते.

फोटो स्रोत, Reuters
दरम्यान, गेल्या काही आठवड्यांत ट्रम्प आणि पुतिन यांच्यात फोनवरून चर्चा झाली असून आपण एकमेकांसोबत काम करायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
लवकरच त्यांची भेट होईल अशी देखील चर्चा आहे.
त्याचबरोबर आपसातील संबंध सुधारण्यासाठी आणि संभाव्य आर्थिक सहकार्याबाबत चर्चा करण्यासाठी दोन्ही बाजूंच्या कनिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अमेरिकेला दुर्मिळ खनिजं आणि अॅल्युमिनियम उत्पादनाशी संबंधित आकर्षक संयुक्त प्रकल्पांचं आमिष दाखवलं आहे.
अमेरिका आणि युक्रेनच्या संबंधांमध्ये निर्माण झालेल्या दरीचे परिणाम युक्रेनसाठी गंभीर ठरू शकतात, तर दुसरीकडे रशियासाठी मात्र ही परिस्थिती फायदेशीर ठरू शकते.

फोटो स्रोत, SAUL LOEB/AFP via Getty Images
जर अमेरिकेने युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा थांबवला, तर युक्रेनला रशियन सैन्याच्या हल्ल्यापासून स्वतःचे संरक्षण करणे कठीण होईल, असे ट्रम्प यांनी म्हटले.
युक्रेनला युरोपीय नेत्यांचा भक्कम पाठिंबा आहे. हे नेते त्यांच्यासोबत एकजुटीनं राहण्याचं आश्वासनदेखील देत आहेत. परंतु असे असूनही रशियन सैन्याने युक्रेनच्या अनेक भागांवर ताबा मिळवला आहे.
दरम्यान, गेल्या काही काळापासून युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात रशियाला त्यांचं पारडं जड असल्याचा विश्वास होता.
तर आता ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील वादळी चर्चेमुळे रशियाचा हा विश्वास आणखी दृढ झाला असेल असेच सध्याच्या परिस्थितीवरुन दिसून येतं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.












