अमेरिकेत हेलीन वादळामुळे वाताहत, आतापर्यंत 180 लोकांचा मृत्यू

हरिकेन

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेत हेलीन वादळामुळे आतापर्यंत 180 लोकांना जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेतील आग्नेय भागातील राज्यांना या वादळाचा फटका बसला आहे.

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी वादळामुळे प्रभावित झालेल्या भागांचा दौरा केला.

वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी बायडेन हेलिकॉप्टरने उत्तर आणि दक्षिण कॅरोलिना मध्ये गेले तर हॅरिस बुधवारी (2 ऑक्टोबर) जॉर्जियाला गेल्या.

अजूनही शेकडो लोक बेपत्ता आहेत. दुर्गम भागात लोकांचा शोध घेण्यासाठी बचावपथकांना अनेक अडचणी येत आहेत.

वादळामुळे प्रभावित झालेल्या सहा राज्यात 6000 नॅशनल गार्ड मेंबर्स आणि 4800 फेडरल एड वर्कर्स यांच्या मदतीसाठी 1000 सैनिकांना पाठवण्यात आलं आहे.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

लोकापर्यंत विविध प्रकारचं सामान पाठवण्यात येत आहे.

गेल्या आठवड्यात रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार असलेले डोनाल्ड ट्रम्प सुद्धा वादळानंतर झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी जॉर्जियाला गेले होते.

हरिकेन

फोटो स्रोत, Getty Images

दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांशी सध्या संपर्क होऊ शकत नाही. व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरिन-जीन पियर यांनी सांगितलं की बायडेन गुरुवारी फ्लोरिडा आणि जॉर्जियाला जातील.

अमेरिकेत गेल्या गुरुवारी हेलीन हे वादळ आलं होतं. हे चौथ्या श्रेणीतलं वादळ आहे.

चक्रीवादळांना नाव का दिलं जातं?

सामान्य लोकांना हवामानाची माहिती किंवा इशारा देताना केवळ वादळाची आकडेवारी किंवा तांत्रिक संज्ञांऐवजी नावं वापरणं सोपं जातं, म्हणून वादळांना नावं देण्याचा प्रघात पडला.

तसंच वादळ नेमकं कुठे आहे, यावरून ते हरिकेन आहे की टायफून की सायक्लोन, म्हणजे चक्रीवादळ हे ठरतं.

वादळांना नावं देण्याची पद्धत तशी जुनी आहे, पण भारतात अलीकडेच वादळांना अशी नावं देण्याची पद्धत सुरू झाली.

अगदी सोळाव्या शतकातही प्युर्टो रिकोमध्ये आलेल्या वादळाला सेंट फ्रांसिस यांचं नाव दिल्याचे उल्लेख आहेत.

19व्या शतकातले हवामानतज्ज्ञ क्लेमेंट व्रॅग ऑस्ट्रेलियात राहायला गेले, तेव्हा तिथे येणाऱ्या वादळांना नावं देण्यास सुरुवात केली होती.

अमेरिकेत हेलीन वादळामुळे वाताहत, आतापर्यंत 180 लोकांचा मृत्यू

फोटो स्रोत, Getty Images

1953पासून मायामी नॅशनल हरिकेन सेंटर आणि जागतिक हवामानशास्त्र संघटना म्हणजे वर्ल्ड मेटिरिओलॉजिकल ऑर्गनायजेशन (डब्ल्यूएमओ) या संस्था उष्णकटीबंधीय चक्रीवादळांना नावं देत आले आहेत.

डब्ल्यूएमओ ही जिनिवास्थित संयुक्त राष्ट्राची एक संघटना आहे. त्यांनी जगभरातील वादळांची नावं ठेवण्यासाठी एक पद्धत ठरवली आहे.

त्यानुसार एखाद्या प्रदेशातील विविध देश त्यांच्यातर्फे नावं सुचवतात आणि विशिष्ठ क्रमानं त्याच नावांमधून चक्रीवादळाला नावं दिलं जातं.

हिंदी महासागराच्या दक्षिण भागातील चक्रीवादळांना नावं देण्यास 1960 च्या दशकातच सुरुवात झाली होती. पण उत्तर हिंदी महासागरातील चक्रीवादळांना नावं देण्याची पद्धत 2004 सालापर्यंत सुरू झाली नाही.

कारण या वादळांची नावं ठेवणं एक वादग्रस्त काम होतं.

सामान्य लोकांना

फोटो स्रोत, Getty Images

भारतातले ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. एम महापात्रा सांगतात की धार्मिक, जातीय विविधता असणाऱ्या या प्रदेशात एखाद्या नावामुळे लोकांच्या भावना दुखावू नयेत यासाठी त्यांना नावं देण्यात आली नाहीत.

वर्ष 2004 मध्ये डब्ल्यूएमओच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय पॅनेलऐवजी संबंधित देशांनाच आपापल्या क्षेत्रात येणाऱ्या चक्रीवादळाची नावं ठेवण्याची पद्धत सुरू झाली.

यानंतर भारत, पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, श्रीलंका आणि थायलंड अशा देशांनी मिळून एक बैठक घेतली. या देशांनी 64 नावांची एक यादी सोपवली.

त्यात प्रत्येक देशात येणाऱ्या चक्रीवादळासाठी 8 नावं सूचवण्यात आली. उत्तर हिंदी महासागरातील क्षेत्रात येणाऱ्या वादळांची नावं या सूचीतून ठेवली जातात. प्रत्येक देशाच्या अद्याक्षरानुसार नावांचा क्रम लावण्यात आला आहे.

नावं लहान असावं, ते समजण्यासारखे असावं, ते सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील आणि चिथावणीखोर असू नये ही अट ठेवून सरकार नावं मागवते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)