हरिकेन, टायफून, सायक्लोन - या तिघांमध्ये नेमका फरक काय?

फोटो स्रोत, NASA
- Author, नवीनसिंग खडका
- Role, बीबीसी पर्यावरण प्रतिनिधी
अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येणाऱ्या वादळाचं चक्रीवादळात रुपांतर होऊन ते राज्याच्या काही भागात धडकण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच वादळाची शक्यता असल्याने राज्यावर दुहेरी संकटाचा धोका आहे.
वादळामुळे झाडं पडणं, भूस्खलन, जोरदार पाऊस यांची शक्यता आहे. या चक्रीवादळला निसर्ग असं नाव देण्यात आलं असून, वादळाचा मुकाबला करण्यासाठी NDRFच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांना अम्फन वादळाचा तडाखा बसला होता. चक्रीवादळामुळे या दोन राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं होतं.
चक्रीवादळ नेमकी काय असतात? म्हणजे एकाला हरिकेन म्हटलं तर मग दुसऱ्याला टायफून का म्हणतात?
ही सर्व वादळं उष्णकटिबंधीय म्हणजे ट्रॉपिकल असतात. पण जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं.
उत्तर अटलांटिक आणि पूर्वोत्तर पॅसिफिक महासागरात त्यांना हरिकेन असं संबोधलं जातं.
वायव्य पॅसिफिक महासागरात अशा प्रकारची वादळं टायफून म्हणून ओळखली जातात, तर दक्षिण पॅसिफिक आणि हिंदी महासागरात या वादळांना सायक्लोन म्हटलं जातं.
अशी नावं का?
उष्णकटिबंधीय सायक्लोन ही हवामानशास्त्रज्ञांद्वारे वापरली जाणारी सामान्य संज्ञा आहे.
उष्णकटिबंधीय पाण्यावर उगम पावणारे ढग आणि झंझावात यांचं मिश्रण जेव्हा चक्राप्रमाणे फिरतं, त्याला सायक्लोन म्हणतात, असं USच्या National Oceanic and Atmospheric Administrationचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, EPA
हे सायक्लोन कमीत कमी ताशी 119 किमी वेगानं येऊन धडकत असेल तर त्याच्या उगमानुसार त्याला हरिकेन किंवा टायफून असं संबोधलं जातं.
वाऱ्याच्या गतीनुसार हरिकेनचे वर्गीकरण हरिकन 1 ते हरिकन 5 अशा गटांमध्ये केलं जातं.
ही वादळं केव्हा येतात?
अटलांटिक महासागरात ही वादळं सामान्यतः 1 जून ते 30 नोव्हेंबरदरम्यान येतात. या प्रदेशातील 95 टक्क्यांपेक्षा अधिक वादळं याच कालावधीत येतात.
वायव्य पॅसिफिक महासागरातील टायफून मे ते ऑक्टोबरदरम्यान येतात. असं असलं तरी ही वादळं वर्षात कधीही तयार होऊ शकतात.
तर दक्षिण पॅसिफिक महासागरात सायक्लोन नोव्हेंबर ते एप्रिलदरम्यान येतं.
वादळांना नावं कशी पडली?
संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक हवामान संघटना हे जगभरातल्या वादळांच्या नावाची यादी बनवत असते.
टायफून हैयान किंवा हरिकेन कॅटरिना यांसारख्या अत्यंत धोकादायक वादळांची नावं बदलण्यात आली आहेत.
ज्या देशांमध्ये हरिकेन, टायफून, सायक्लोन वादळं येतात, त्या देशांकडून जागतिक बैठकीदरम्यान वादळांची नावं सुचवली जातात.
"2000च्या दशकात बंगालचा उपसागर आणि अरबी समु्द्र यांत येणाऱ्या आठ देशांनी अशा नावांची शिफारस जागतिक हवामान संघटनेला केलं होतं," असं भारतीय हवामान विभागातल्या एका वरिष्ठ शास्त्रज्ञानं बीबीसीला सांगितलं.
"त्यातली 50 टक्के नावं आधीच वापरली गेली आहेत. देशातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावणार नाही, अशी आशयाचं नाव वादळाला देण्याचा संबंधित देश प्रयत्न करतात," असं त्यांनी पुढे सांगितलं.

चक्रीवादळाचं विज्ञान
उबदार समुद्राच्या पाण्यामुळे हवा वेगात वाहू लागते. जसंजसं उबदारपणा कमी होत जाते, तसतशी हवेतील उष्णता कमी होते.
यामुळे एक चक्र तयार होतं. उष्णकटिबंधीय वादळांचा वेग ताशी 119 किलोमीटर असतो.
वादळादरम्यान प्रचंड लाटा तयार होतात. ज्यावेळेस या लाटा किनाऱ्यावर पोहोचतात तेव्हा त्यांच्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते.
वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे हानी होऊ शकते. यामुळे घरं पडू शकतात, झाडं पडू शकतात.

फोटो स्रोत, EPA
समुद्रातील पाण्याचं तापमान वाढत असल्यानं त्यामुळे भविष्यात हरिकेनची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
उष्ण वातावरणामुळे अधिक पाणी थांबवलं जातं आणि यामुळे हरिकेनची व्याप्ती वाढण्याची शक्यता असते.
पण हवामान बदल आणि हरिकेन यांच्यातील संबंध अनेक घटकांवर अवलंबून असतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








