केरळ पूर : भिंत खचली, चूल विझली, होतं नव्हतं सगळं गेलं...

फोटो स्रोत, HH Mohmmad Sheikh
God's Own Country नावाने प्रसिद्ध केरळला पावसाचा तडाखा बसला आहे. या भीषण आपत्तीत 300 पेक्षा जास्त लोकांनी जीव गमावला आहे तर मालमत्तेचं अतोनात नुकसान झालं आहे.
अनुपम निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध अशा या राज्याची पाऊस आणि महापुराने पुरती रयाच गेली. बीबीसीच्या प्रतिनिधींनी बाधित परिसरात वृत्तांकन करताना आलेले अनुभव शब्दबद्ध केले.
प्रमिला कृष्णन, बीबीसी तामिळ प्रतिनिधी
माझे बाबा मला काल जे म्हणाले ते मला स्पर्शून गेलं. ते म्हणाले की, "तू देवाची भेट आहेस म्हणून अशा कठीणप्रसंगी केरळची व्यथा तू जगासमोर मांडू शकलीस."
मी गेल्या आठ दिवसांत बचाव छावण्यांत आणि पुराने वेढलेल्या भागात फिरत होते. माझा सहकारी व्हीडिओ जर्नलिस्ट प्रवीण अन्नामलाई हा सुद्धा माझ्याबरोबर होता.
आम्ही गेल्या आठवड्यात कोचीमध्ये तीन दिवस अडकलो होतो. सुरक्षेच्या कारणास्तव मला आतच थांबण्याचा सल्ला देण्यात आला होता. माझ्याबरोबर आजूबाजूच्या भागातून आलेले 120 लोकही होते. त्यांचं घर पाण्यात बुडालं होतं आणि त्यांनी हॉटेलमध्ये आसरा घेतला होता.

मात्र जसंजसं पाऊस आणि पाणी कमी व्हायला सुरुवात झाली तसतसं मला कळलं की केरळमधल्या प्रत्येक व्यक्तीला या पुराचा फटका बसला आहे.
तिरुवनंथपुरमला जाण्यासाठी मी कोचीहून निघाले. वाटेत पूरग्रस्तांसाठीच्या छावणीला भेट दिली. इथं आलेल्या अनेकांची घरं पुरात वाहून गेली आहेत. आपल्या घरांचं नक्की काय झालं आहे, हे बघण्यासाठी काही जण आपापल्या गावी गेले होते. तिथली दृश्यं भीषण होती. निसर्गाने सगळंच गिळंकृत केलं होतं. पूरस्थिती ओसरल्यानंतर परत जाणाऱ्या लोकांना घरात साप दिसत आहेत. जलसंकटातून सावरणाऱ्यांना अशा नव्या संकटांना तोंड द्यावं लागत आहे.
अशीच परिस्थिती 40 वर्षांच्या जोसेफ यांच्या घराची होती. "आमच्या घरात मोठमोठे साप आढळले. त्या घरात मी मुलांना घेऊन जाऊ शकेन की नाही, माहीत नाही. आमचं घर आमच्यासाठी हळवा कोपरा आहे. पण आता तिथे जायला भीती वाटते."
पाऊस चांगला असतो, समृद्धी आणतो, अशी केरळच्या लोकांची भावना होती. मात्र आता ही भावना बदलली आहे, असं मला जाणवलं.

फोटो स्रोत, HH Mohmmad Sheikh
आम्ही एका बचाव छावणीत गेलो जिथे एकाच गावातले 3,000 जण होते. इथे आम्हाला 70 वर्षीय अप्पूकुट्टम भेटले. त्यांनी या महाप्रलयात दोन जिगरी दोस्त गमावले. ते म्हणाले, "करुवट्टा गावातले आम्ही सगळेजण या छावणीत आहोत. आमच्याकडे काहीच उरलेलं नाही. आमचं जगणं पूर्ववत होऊ शकेल का, हा प्रश्नच आहे. पुराने झालेल्या नुकसानीचा बोजा आमच्या डोक्यावर आहे."
आमच्याशी बोलताना त्यांचे अश्रू अनावर झाले. आम्ही त्यांना चहासाठी विचारलं. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि आभारी आहोत, इतकीच प्रतिक्रिया दिली.
रत्नमल याही अशाच एका छावणीत भेटल्या. त्यांच्या सात गाई आहेत, सुदैवाने त्या सगळ्या जिवंत आहेत. मात्र त्यांना खायला-प्यायला देण्यासाठी रत्नमलकडे काहीही नाही.
"गाई उपाशी आहेत. अनेक दिवसांत त्यांनी काहीही खाल्लेलं नाही. या संकटातून त्या बचावल्या मात्र आता रोजचं जगणं अवघड झालं आहे. आता फक्त त्यांना एखादा आजार व्हायला नको," असं रत्नमल सांगतात.

फोटो स्रोत, HH Mohmmad Sheikh
त्रिवेंद्रमला जाताना पडझड झालेली घरं सर्वत्र दिसतात. यापैकी एका घराचं चित्र कायमस्वरूपी स्मरणात राहणारं.
पाण्याचा मारा सहन करत एक भिंत कशीबशी उभी होती. तिला एक तुटलेल्या दारही होतं. मात्र घरातलं बाकी काहीही शिल्लक नव्हतं.
अन्न, पाणी तसंच कपडे यासह रोजच्या जगण्यासाठी आवश्यक वस्तूंसाठी मदत केंद्रासमोरच्या रांगेत उभी राहिलेली शेकडो माणसं दिसत होती.
हवा तसेच दूषित पाण्याच्या माध्यमातून साथीचे आजार पसरू नयेत यासाठी अनेक गावं तसंच शहरांमध्ये वैद्यकीय शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत. अनेक गावांमध्ये उत्तर भारतीय कामगारांकडे कामच उरलेलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
"पगार मिळण्यासाठी आम्हाला एक ते दोन महिने वाट पाहावी लागणार आहे. सगळी दुकानं उद्धस्त झाली आहेत. बंगालला रिकाम्या हाताने परत जाऊ शकत नाही. बंगालमध्येही पूर येतो. पण केरळात आम्ही जे अनुभवलं ते भयानक होतं," असं नित्यानंद परामन यांनी सांगितलं. गेले दोन वर्षं ते केरळमध्ये काम करत आहेत.
हे लिहीत असतानाच मला मोबाइलवर एक ट्वीटर अलर्ट आला आहे. स्थलांतरितांनाही मदत मिळायला हवी, असं केरळच्या मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सांगितलं आहे.
पाण्याची पातळी ओसरू लागल्याने मदत आता गावांमध्ये पोहोचू लागली आहे. हळूहळू बस आणि रेल्वेसेवा पूर्वपदावर येऊ लागली आहे.
सलमान रावी, बीबीसी हिंदी प्रतिनिधी, एर्नाकुलम
एर्नाकुलममधल्या मुट्टकुन्नम परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे. स्थानिकांनी पुरात अडकलेल्या लोकांना मदत करायला सुरुवात केली आहे.
तुफान पावसामुळे या गावातल्या लोकांसाठी सहा दिवस अत्यंत कठीण कालखंड होता. तब्बल 15 फूट पाणी चढलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
अलुवा, इद्दुकी, अलपुळा या ठिकाणी पाण्याची पातळी कमी होत असतानाही परिस्थिती वाईटच आहे. संपर्क तुटलेल्या गावांपर्यंत पोहोचण्यासाठी NDRF आणि लष्कराचे जवान प्रयत्नांची शर्थ करत आहेत.
अजूनही 5000 माणसं अडकल्याची भीती स्थानिक व्यक्त करतात. मुट्टकुलम परिसरातल्या मच्छिमारांनी बोटी आणि पिंपांच्या साह्याने अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं.
स्थानिक मच्छिमार, मदत यंत्रणांच्या बरोबरीने मी आणि कॅमेरामन दीपक जसरोटिया, दोघे मिळून मुट्टकन्नममधल्या संपर्क तुटलेल्या ठिकाणी पोहोचलो. अनेकांनी कमर्शिअल काँप्लेक्समध्ये आश्रय घेतला आहे. इथली अनेक गावं पुराने बाधित आहेत.
अन्नाची आणि पाण्याची पाकिटं मिळाल्यानंतर त्यांच्या डोळ्यातला आनंद आम्ही पाहिला. संपर्क तुटलेल्या भागांमधून सुटका झालेल्या काही जणांना पिकअप व्हॅनच्या माध्यमातून छावण्यांमध्ये आणण्यात आलं.

मदत यंत्रणा दररोज अनेक संपर्क तुटलेल्या गावांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे शिबिरार्थींची संख्या वाढतच चालली आहे. त्रिसूर आणि एर्नाकुलम परिसरातली माणसं मध्य पूर्वेतून येणाऱ्या मदतीवर अवलंबून आहेत.
सवाब अली दुबईहून आपल्या गावी सुटीसाठी आले आहेत. कामानिमित्ताने ते दुबईत असतात. त्यांच्या मते वाहनं, मालमत्ता आणि गाईगुरांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे.
पुरात अनेक गाईगुरं वाहून गेली आहेत. जी वाचलं आहेत त्यांना NDRF आणि बचाव पथकाने वाचवलं आहे.
पुरात जीव गमावलेल्या जनावरांचे अवशेष पडून राहिल्याने रोगराईची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासंदर्भात काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
योगिता लिमये, बीबीसी प्रतिनिधी, कुळीपुरम
कुळीपुरम हे उत्तर केरळमधलं एक शहर. शहराच्या बाजूने वाहणाऱ्या नदीनं गेल्या आठवड्यात पात्र बदललं. या नदीवर असलेल्या पुलावर चालत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी किमान एक किलोमीटर अंतरावर घरं पाण्याखाली बुडाल्याचं दिसतं. केळीच्या झाडांचा फक्त वरचा भाग आणि घरांची छतंच फक्त दिसतात. ज्या नारळाच्या झाडांवरून केरळचं नाव देशभर झालं आहे ती झाडं पाण्यावर उभी दिसतात.

फोटो स्रोत, Getty Images
या शहरातील लोकांनी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. पण आपल्या घरांचं आणि मालमत्तेची स्थिती काय आहे, हे पाहण्यासाठी काही लोक शहरात परत आले होते. जे शक्य आहे ते वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. एक माणूस घराच्या छतावर बसून सीलिगं फॅन काढत होता.
राज्यात पूर हे बळींचं मुख्य कारण असलं तरी प्रचंड पावसामुळे इतरही आपत्तींना आमंत्रण मिळालं. मलाप्पुरम या ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळं एकाच घरातील 9 लोकांचा बळी गेला. केरळ राज्याचा मोठा भाग डोंगराळ असल्याने मदतकार्य कठीण बनलं आहे.

गेल्या 100 वर्षांतील सर्वांत भीषण आपत्ती ठरलेल्या या महापुरात हजारो लोक पुरात अडकून पडले आहेत. भारतीय वायूसेना, नौदल आणि NDRFचे जवान, तटरक्षक दल, स्थानिक लोक आणि मच्छिमार मदत कार्य राबवत आहेत आणि शक्य तितक्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न झाले आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








