चीनला सळो की पळो करून सोडणारी भटकी जमात, ज्यांच्या राण्या होत्या उत्तम शासक

फोटो स्रोत, DAIRYCULTURES PROJECT
- Author, दाहिला वेंचुरा
- Role, बीबीसी न्यूज वर्ल्ड
चीनमधील हान राज्यकर्ते आणि उत्तरेकडील भटक्या जमातींमध्ये कित्येक वर्ष युद्ध सुरू होतं. इसवी सन 33 मध्ये या युद्धाचा अंत करण्यासाठी शांतता करार करण्यास या दोन्ही जमाती तयार झाल्या.
हा शांतता करार करण्यासाठी चिनी राजकन्येचा विवाह भटकी जमात असलेल्या शिओन्युच्या प्रमुखाबरोबर लावून द्यावा लागणार होता.
मात्र चिनी सम्राटाला आपली कोणतीही मुलगी गमावायची नव्हती. म्हणून त्याने आपल्या दासींपैकी एकीची निवड करण्याचे आदेश दिले.
वांग झाओजुन ही एकमेव स्त्री विवाह करण्यास तयार झाली. ती खूप सुंदर आणि अतिशय हुशार होती. तिला या विवाहात संधी दिसली. विवाहानंतर तिला महत्त्वाची भूमिका मिळणार होती, शिवाय तिला चिनी राजवाडा सोडून बाहेर पडता येणार होतं.
राजकन्या म्हणून तिला मान मिळाला होता. या प्रसंगी तिने लाल रंगाचा पोशाख परिधान केला. तिच्या दिमतीला एक पांढरा घोडा देऊन तिला या दूरवरच्या प्रवासासाठी पाठवण्यात आलं.
तिने आपलं उर्वरित आयुष्य मैदानी प्रदेशात व्यतीत केलं. हान साम्राज्य आणि शिओन्यु या जुन्या शत्रूंमध्ये दीर्घकाळ शांतता राखण्यात तिला आता यश मिळालं होतं.
हार्वर्ड विद्यापीठाच्या मानववंशशास्त्र विभागातील क्रिस्टीना वॉर्नर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "इतर शिओनिस्ट लोकांपेक्षा तिचं आयुष्य खूप वेगळं होतं. एक स्त्री असूनही तिच्याकडे मोठं सामर्थ्य होतं."
बायोमोलेक्युलर पुरातत्वशास्त्रातील तज्ज्ञ असलेल्या क्रिस्टीना यांनी इतिहासातील पहिल्या खानाबदोश साम्राज्याचा अभ्यास केला आहे.
त्या सांगतात की, "वांग झाओजुनचा इतिहास संपूर्ण दंतकथांनी भरलेला आहे. शिओनिस्ट आणि हान राजघराण्यांनी शांतता राखण्याचे अनेक प्रयत्न केले होते. या विवाहामुळे हे करार प्रत्यक्षात उतरण्यास मदत झाली. या दोन्ही जमातींची जीवनशैली इतकी भिन्न होती की त्यांच्यासाठी चिरस्थायी शांतता प्राप्त करणं कठीण झालं होतं."
यात गंमत म्हणजे आपल्या शत्रूच्या इतिहासाची कथा चिनी इतिहासकारांनी स्वतः त्यांच्या वंशजांना सांगितली होती.
पण वस्तुस्थिती अशी आहे की शिओन्यु जमातीने कधीच आपली लेखन शैली विकसित केली नाही. भटके लोक असल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनाविषयी जास्त माहिती मिळत नाही.
क्रिस्टीना वॉर्नर यांनी अलीकडेच दोन कबरींच्या तपासणीत सहभाग घेतला होता. या लोकांनी घोड्याच्या पाठीवर बसून एक शक्तिशाली साम्राज्य उभं केलं होतं.
अनुभवी मेंढपाळ
वॉर्नर सांगतात की, "शिओन्यु जमातीची स्थापना अतिशय नाट्यमय पद्धतीने झाली असं म्हणता येईल. ही जमात मंगोलियन पर्वतांच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे राहत होती, मात्र त्यांनी हजारो वर्षांपासून एकमेकांशी संवाद साधला नव्हता."
"इसवी सन पूर्व 200 मध्ये याठिकाणी युद्ध व्हायला सुरुवात झाली. या दोन भटक्या जमातींनी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि साम्राज्याची निर्मिती करण्यासाठी हातमिळवणी केली."
प्राचीन रोमन आणि इजिप्शियन साम्राज्यांना समकालीन असलेली ही जमात चीनी साम्राज्याचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी म्हणून उदयास आली. चिनी इतिहासकारांनी या जमातींच्या क्रूर युद्धांच्या कथा लिहून ठेवल्या आहेत. यातल्या 3,00,000 क्रूर शिओन्यु धनुर्धाऱ्यांनी उत्तर चीनवर आक्रमण केलं.
चीनच्या उत्तरेकडे जी भिंत आहे, ज्याला ग्रेट वॉल ऑफ चायना असंही म्हटलं जातं, ती भिंत या आक्रमणकर्त्यांना अडथळा म्हणून बांधण्यात आली होती. मात्र ही भिंत देखील त्यांचं आक्रमण रोखू शकली नाही.

फोटो स्रोत, DAIRYCULTURES PROJECT
हे घडलं त्यांच्या घोड्यावर बसून लढण्याच्या असामान्य क्षमतेमुळे.
ते भटके लोक होते. इसवी सन पूर्व 145 ते 60 दरम्यानचे इतिहासकार सिमा कियान यांनी त्यांचं वर्णन लिहून ठेवलं आहे. त्यांच्या संस्कृती मध्येच त्यांची पहिली झलक पाहायला मिळाली. ते त्यांच्या घोडे, गुरेढोरे आणि मेंढ्यांच्या कळपांना चरण्यासाठी जमिनीच्या शोधात होते.
वॉर्नर सांगतात, हे भटके लोक प्रत्येक हंगामानुसार आपलं वास्तव्याचं ठिकाण बदलायचे. कधीकधी त्याच ठिकाणी पुन्हा परतायचे.
तर कधी ज्या ठिकाणी गवताची कुरणं जास्त असतील त्याठिकाणी जायचे. त्यांनी दूरच्या प्रदेशातील गटांशी, पूर्वीच्या शत्रूंशी मैत्री करून त्यांचा प्रदेश वाढवला.
हळूहळू त्यांनी ग्रेट युरेशियन प्रदेशावर ताबा मिळवत पुढची तीन शतकं तिथे आपलं वर्चस्व कायम ठेवलं.
अशाप्रकारे त्यांनी केवळ सुरक्षितताच मिळवली नाही, तर त्यांना स्थैर्य मिळालं, सर्वांत मौल्यवान उत्पादनं मिळाली.
ते बाह्य गोष्टींकडे आकर्षित झाले. म्हणून त्यांनी धोरणात्मक व्यापारी जाळं तयार करण्याचा आणि त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून दूरच्या प्रदेशातील वस्तू आणि तंत्रज्ञान त्यांना आपल्या प्रदेशात आणणं शक्य होईल.
पण या भटक्या मेंढपाळांच्या जमातीने रोम किंवा इजिप्तसारख्या शहरांची निर्मिती का केली नाही?
ते त्यांच्यासोबत ठराविक प्रमाणात परदेशी वस्तू घेऊन जाऊ शकत होते. या गोष्टी त्यांच्यासाठी खूप मौल्यवान होत्या आणि त्यामुळे त्यांच्या वस्तू गोळा करण्यावर मर्यादा येत होत्या.
पण यात महत्त्वाची भूमिका बजावली ती राजकुमारीने. मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर इव्होल्युशनरी एन्थ्रोपोलॉजी अँड जिओएनथ्रोपोलॉजी आणि सेऊल, मिशिगन आणि हार्वर्ड विद्यापीठातील संशोधकांच्या आंतरराष्ट्रीय गटाने या संबंधी अभ्यास केला असता त्यांना बऱ्याच गोष्टी आढळून आल्या.
पुरातत्वशास्त्र आणि अनुवांशिकतेची सांगड घालून अनेक मनोरंजक गोष्टी प्रकाशात येतात. जसं की या पुरुषप्रधान समाजात महिलांनी त्यांच्या साम्राज्याचा विकास केला होता.
शहाण्या राजकन्या
वॉर्नर सांगतात, "त्यांनी त्या भागात सापडलेल्या दोन मानवी अवशेषांच्या जिनोमची चाचणी केली. हे अनुवांशिकदृष्ट्या खूप वैविध्यपूर्ण आहेत. हे साम्राज्य अनेक वांशिक गटांचं असल्याने यात विविधता आढळली असावी."
शिओन्यु समुदायांची अंतर्गत रचना समजून घेण्यासाठी संशोधकांनी दोन कबरींमध्ये काम केलं. त्यापैकी एक मानवी अवशेष स्थानिक उच्चभ्रू वर्गातील होता. उपलब्ध पुराव्यांवरून असं दिसून येतं की त्यांनी त्यांच्या शेजाऱ्यांशी संबंध जोडण्यासाठी लग्नसंस्थेचा धोरणात्मक उपयोग केला.
तिथे आणखी एक स्मशानभूमी होती. मोठ्या, चौकोनी थडग्यांच्या आजूबाजूला लहान थडगेही होते. ज्या लोकांना साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी पाठवले होते त्यांची ही थडगी होती."
आजूबाजूची थडगी कदाचित नोकरांची असावीत. विशेष म्हणजे ते सर्व पुरुष होते आणि खालच्या दर्जाचे लोक होते.
'विशेष थडग्यांवर महिलांचं वर्चस्व दिसून येतं'
या स्त्रियांमध्ये अनुवांशिक विविधता खालच्या वर्गांपेक्षा खूपच कमी आढळली. त्यामुळे त्या विशिष्ट एका वंशाच्या होत्या याचा अंदाज येतो.
त्यांच्या थडग्यांमध्ये ग्रीक, चिनी, रोमन आणि पर्शियन वस्तू सापडल्या. याशिवाय या जमातीत त्यांचं वर्चस्व असावा असाही अंदाज या थडग्यांवरून येतो.
त्यात पारंपारिकपणे पुरुष योद्ध्यांशी संबंधित वस्तू आढळल्या. जसं की चिनी लाखेचे मद्यपात्र, सोन्याचे लोखंडी पट्टे, घोडे आणि रथांसाठी लागणाऱ्या लोखंडी पट्ट्या.

फोटो स्रोत, MICHEL NEYROUD
"त्या स्त्रिया अधिराज्य गाजवणाऱ्या होत्या. त्या सर्वच श्रीमंत होत्या असं नाही मात्र त्या शक्तिशाली होत्या हे नक्की."
त्या राजकीयदृष्ट्या हुशार अशा राजकन्या होत्या, ज्यांनी त्यांचं साम्राज्य वाढवलं.
शिओन्यु योद्ध्यांनी साम्राज्याचा विस्तार केला, तर महिलांनी त्यावर राज्य केलं. शिओन्यु जमातीत राज्याचं प्रशासन महिलांकडे सोपविण्याची परंपरा असल्याचं वॉर्नर सांगतात.
"शिओन्युच्या पतनानंतर 1,000 वर्षं सरली. पुढे मंगोल साम्राज्य सत्तेवर आलं. आणि विशेष म्हणजे या साम्राज्यातील राण्या सर्वोत्तम शासक होत्या. मंगोल साम्राज्य हे सर्वात मोठं साम्राज्य होतं आणि यातही भटक्या जमातींचा समावेश होता."
शिओन्युचा कोणताही लिखित इतिहास अस्तित्वात नाही मात्र त्यांनी इतिहासावर आपली छाप खोलवर सोडली आहे.
"शिओन्यु साम्राज्याच्या पतनानंतरही त्यांच्या आठवणी कायम राहिल्या. पुढे अनेक नव-नवीन गट निर्माण होत राहिले. यातल्या प्रत्येकाने 'आम्ही शिओन्युचे वंशज' असल्याचा दावा केला. पण येणाऱ्या साम्राज्यांवर त्यांचा प्रभाव दीर्घकाळ राहिला हे मात्र नक्की."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








