इतिहासातील सर्वांत शक्तिशाली साम्राज्य, ज्यांना संपूर्ण जग जिंकायचं होतं

फोटो स्रोत, Getty Images
- Author, स्पेंसर मिजन
- Role, बीबीसी हिस्ट्री एक्स्ट्रा
अलेक्झांडर द-ग्रेट किंवा सिंकदरला सर्व जगावर राज्य करण्याची इच्छा होती. त्याची महत्त्वाकांक्षा इतकी जबर होती की तो आपल्या सैन्याबरोबर जगातल्या कुठल्याही प्रदेशात जायला तयार होता. पण त्याच्यासाठी हे म्हणावं तितकं सोपं नव्हतं कारण त्याच काळात जगावर राज्य करण्याची इच्छा बाळगणारी आणखी एक राजवट होती.
त्या ठिकाणी कुणी एक राजा नव्हता पण संपूर्ण जगावर आपल्या कुटुंबाचे राज्य असावे अशी त्यांची इच्छा होती आणि ते होते पर्शियन साम्राज्य.
हा प्रश्न तुम्हाला नेहमी पडला असेल की लोकसंख्येनी अत्यंत कमी असलेल्या युरोपने सर्व जगावर कसं राज्य केलं. केवळ युरोपियनच देशांच्या वसाहती कशा आहेत. अफ्रिकन किंवा पूर्वेकडील देशांनी पश्चिमेत वसाहती का स्थापन नाहीत केल्या. त्या सर्वांचं मूळ हे ग्रीक आणि पर्शियन लोकांच्या युद्धात आहे असं मानलं जातं.
ग्रीक आणि पर्शियामधील संघर्ष इतका टोकाचा होता की युद्ध संपल्यानंतरही ग्रीकांनी पर्शियावर चिखलफेक करण्याचे थांबवले नाही. पर्शियन लोकांना आपण कसं हरवलं याच्या सुरस दंतकथा त्यांनी मुलांना इतिहासातून शिकवल्या. हा प्रचार इतका टोकाला गेला की हे सत्यच आहे असंही अनेकांना वाटू लागलं आणि त्यातून त्यांची महत्त्वकांक्षा बळावली.
पण पर्शियावर चिखलफेक करण्याची ग्रीकांची दोन हजार वर्षांची मोहीम देखील त्यांचं काही बिघडवू शकली नाही. इतिहासात पर्शिया ही एक महान राजवट होती हे वास्तव कुणीही नाकारू शकणार नाही आणि त्यांनी जे यश संपादित केलं त्याची दखल ही इतिहासाला घ्यावीच लागेल.
बीबीसी हिस्ट्री एक्स्ट्राने पर्शिया आणि ग्रीक यांच्या संघर्षाची कहाणी सांगितली आहे. इतिहासकार लॉयड जोन्स यांनी पर्शियाच्या राजेशाही कुटुंबाची गोष्ट सांगितली आहे ज्या कुटुंबाने जगातील सर्वांत मोठ्या राजवटीला जन्म दिला.

फोटो स्रोत, Getty Images
जोन्स आपल्या गोष्टीची सुरुवात रॉबर्ट ग्रीव्हजच्या कवितेपासून करतात, ते सांगतात की "1934 च्या सुमारास ब्रिटिश कवी आणि कादंबरीकार रॉबर्ट ग्रीव्ह्जने एक कविता लिहिली होती. त्या कवितेचं शीर्षक होतं की 'पर्शियाचा दृष्टिकोन.'
"ही कविता कशाबद्दल होती असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो, तर त्याचं उत्तर असं आहे की मॅरेथॉन या ठिकाणी इ. स. पूर्व 449 मध्ये ग्रीक आणि पर्शिया यांंच्यात एक युद्ध झालं होतं. हे युद्ध ग्रीकांनी जिंकलं होतं त्यामुळे पर्शियाच्या महत्त्वाकांक्षांवर अंकुश बसला होता."
"ग्रीकांच्या या विजयानंतर ग्रीकांनी त्यावर काव्य रचलं. हा किती महान विजय होता आणि मुक्तिसाठी केलेला एक संघर्ष होता, हे युद्ध होतं असं चित्र ग्रीकांनी रंगवलं. पुढे असंही म्हटलं गेलं की युरोपच्या निर्मितीची बीजं ही मॅरेथॉनच्याच युद्धात आहे."
"हे सर्व ग्रीक लोक किंवा युरोपियन मानत असताना पर्शियाच्या राजवटीला किंवा पर्शियन लोकांना या युद्धाबद्दल काय वाटतं हा विचार आपण केला आहे का असा प्रश्न रॉबर्ट ग्रीव्हज उपस्थित करतो. आणि त्याचं उत्तर मजेशीर आहे. तो म्हणतो ज्याला ग्रीक युद्ध म्हणतात किंवा स्वातंत्र्य संग्राम म्हणत आहेत ते पर्शियन लोकांच्या दृष्टिकोनातून केवळ एक चकमक आहे. त्या लोकांसाठी मॅरेथॉनची लढाई एखाद्या झटापटीपेक्षा मोठी नाही."
"रॉबर्ट ग्रीव्ह्ज पुढे म्हणतो युरोपातल्या शाळांमधून हा प्रचार केला जातो की ग्रीक लोकांवर राज्य करण्यासाठी पर्शियन आले होते आणि त्यांनी मॅरेथॉनची लढाई जिंकली. पण हे केवळ एक चित्र रंगवलं गेलं आहे. पर्शियन लोकांसाठी हे युद्ध नव्हतं तर केवळ झटापट होती."
जोन्स यांनी जे सांगितलं त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ग्रीक आणि पर्शियनांचा संघर्ष हा अनेक स्तरावर पाहायला मिळत होता. आणि या संघर्षाचे दाखले युरोपात अनेक शतकं देण्यात आले.
पर्शियन राजवट जगातील सर्वांत मोठी राजवट कशी बनली?
सायरस किंवा झुल्कारनैनचा उदय आणि दोन शतकांनंतर डेरियस प्रथमच्या मृत्यूदरम्यान पर्शियन राजवट ही जगातील सर्वात मोठी ताकद होती.
ही एक अशी राजवट होती, जिची उभारणी आधुनिक पायाभूत सुविधा, विकसित संस्कृती आणि उदारमतवादी धर्म, तसंच आवश्यकता भासल्यास शक्तीच्या वापरावर आधारित होती.

फोटो स्रोत, Getty Images
दोनशे वर्षांपर्यंतची त्यांची शक्ती पाहिल्यानंतर रॉबर्ट ग्रीव्ह्जचं म्हणणं होतं की, पर्शियासाठी ग्रीकशी झटापट इतकी महत्त्वाची नव्हती, जितकी ग्रीकांनी तिला बनवलं.
ग्रीक संस्कृती
दोनशे वर्षांपूर्वी काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला की, पाश्चिमात्य देशांनी उर्वरित जगावर आपले वर्चस्व कसे प्रस्थापित केले.
यासोबत एक समज असाही आहे की, युरोपियन वर्चस्वाचे कारण ख्रिस्ती धर्म किंवा धर्म नसून प्राचीन ग्रीकमध्ये उद्भवलेल्या सांस्कृतिक परंपरेमध्ये आहे.
त्यांचा असा विश्वास होता की, ग्रीकने स्वातंत्र्य आणि बौद्धिकतेचा शोध घेतला आणि नंतर रोमने संपूर्ण युरोपमध्ये विजय मिळवून त्यांचा प्रसार केला.

फोटो स्रोत, Getty Images
या तर्कानुसार, ग्रीक आणि रोम वगळता सर्व प्रदेशांमध्ये जंगली लोकांची वस्ती होती आणि त्यापैकी सर्वात वाईट आणि सर्वात धोकादायक पर्शियाचे लोक होते, ज्यांना संपूर्ण जग ताब्यात घ्यायचे होते.
ग्रीक आणि पर्शियामधील युद्धादरम्यान पर्शियनांविरुद्ध एक अशी मोहीम चालवली गेली, जिचा उद्देश त्यांना मुक्त जगाचा क्रूर शत्रू असल्याचं दाखवणं हा होता.
हे प्रकरण यासाठी गुंतागुंतीचं झालं, कारण पर्शियात इतिहास लिहिण्याची पद्धत ग्रीकपेक्षा वेगळी होती. ते कविता आणि गाण्यांच्या माध्यमातून ते एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे आपला इतिहास पोहोचवत असत.
तर मग प्रश्न असा पडतो की, पर्शियाचा खरा इतिहास काय आहे? याचं उत्तर प्राचीन पर्शियन भाषेत उपलब्ध तथ्यांमधून मिळतं. यात त्या राजवटीबाबत माहिती उपलब्ध आहे, जिची अर्थव्यवस्था नागरी समाजापासून कलेबाबत सांगते.
यामुळे इराणकडे आता असं एक व्यासपीठ उपलब्ध आहे, जिथून ते आपला भूतकाळ सांगू शकतात.
बादशाहपासून सुपर पॉवरपर्यंतचा प्रवास
ही कथा सहाव्या शतकात सुरू होते. जेव्हा प्राचीन जगातील एका उल्लेखनीय शासकाचा उदय झाला, ज्याला आपण सायरस द्वितीय म्हणून ओळखतो.
त्या वेळी पर्शिया हे सध्याच्या इराणच्या आग्नेय दिशेला असलेले एक छोटेसे राज्य होते आणि अनेक जमातींपैकी एकावर आधारित होते. मात्र, आपल्या मृत्युपूर्वी सायरस यांनी आपल्या या छोट्याशा राज्याला जगातील सुपर पॉवर बनवलं होतं.
इसवी सन पूर्व 550 मध्ये सायरसने दक्षिण इराणमधील आदिवासी गटांच्या मदतीने मीडीजची राजधानी ताब्यात घेतली, जी त्यावेळची सर्वात मोठी राजवट होती. त्याचे पुढचे मोठे यश अनातोलियामधील लिडियाच्या शक्तिशाली आणि श्रीमंत राजवटीविरुद्ध होते, ज्यांच्या राजधानीवर कब्जा केल्याने त्याच्या भविष्यातील विजयाचा मार्ग मोकळा झाला.

इसवी सन पूर्व 540 मध्ये सायरसने बाबुलच्या महान शहरात प्रवेश केला होता. त्या शहराच्या विजयाची बरीचशी माहिती आपल्याला सायरसच्या काळातील सॅलंडर्सकडून मिळते.
त्या विजयानंतर सायरस खरोखरच एका मोठ्या साम्राज्याचा राजा बनला होता. सायरसने इराणमधील पासारगादच्या ठिकाणी एका मकबरा आणि महाल बांधला. यांना लागून एक मोठी बागही उभारली.
शाही हुकुमानुसार, सर्व पराभूत गटांना सायरसने केलेल्या कायद्यांचे पालन करणे बंधनकारक होते. सायरसबद्दल हे प्रसिद्ध झाले होते की त्याला दैवी आशीर्वाद आहे, ज्याने सायरसला जगात संतुलन राखण्याची देणगी दिली आहे.
हेरोडोटसच्या मते, सायरस मध्य आशियात मासागेटाई जमातीशी लढताना मारला गेला. हा मोठा धक्का होता, पण राजवटीचा विस्तार थांबवणे आता अवघड झाले होते.
इजिप्तवर विजय
त्यांच्यानंतर कॅम्बेसिस द्वितीयने लवकरच इजिप्तवर विजय मिळवला.
ग्रीकमधले संदर्भ कॅम्बेसिस द्वितीयचे वर्णन 'वेडा हुकूमशहा' असा करतात. आपल्या प्रजेवर अत्याचार करणारा आणि पराभूत गटांच्या धार्मिक परंपरांचा अपमान करणारा अशी त्याची ओळख ग्रीक संदर्भात सापडतात. पण इजिप्तमधील पुरातत्त्वीय पुरावे वेगळे चित्र मांडतात.
त्यातून लक्षात येतं की, राजानं धार्मिक उदारमतवादाचे धोरण अवलंबल्याचे कळते. मेम्पफिसमधून सापडलेल्या इमारतींवरूनही यास दुजोरा मिळतो. धार्मिक आणि सांस्कृतिक वृत्तींबद्दल सहिष्णुतेची वृत्ती हे पर्शियाचे वैशिष्ट्य आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पण गरज पडल्यास प्राचीन पर्शियाची राजवट सत्तेचा क्रूर वापरही करू शकते. याचा पुरावा डेरियसच्या रूपात सापडला, ज्याला सायरस द्वितीयनंतर सर्वात यशस्वी सम्राट म्हणून पाहिले गेले आणि पर्शियाच्या त्या राजवटीच्या उत्कर्ष काळात राज्य केले.
निर्दयी आणि शक्तिशाली
इसवी सन पूर्व 522 मध्ये डेरियसने सायरसचा मुलगा बर्डिया याच्याकडून रक्तरंजित लढाईन सत्ता हस्तगत केली आणि त्याच्या राजवटीमध्ये बंडांची मालिका सुरू झाली, तेव्हा तर त्याने अत्यंत निर्दयी भूमिका अंगिकारली.
अवघ्या वर्षभराच्या कालावधीत त्यांनी बंडखोर नेत्यांना पराभूत करण्यात, ताब्यात घेण्यात किंवा ठार मारण्यात यश मिळवले. त्यानंतर पुढील 36 वर्षांच्या सत्तेत त्याला कधीही इतर कोणत्याही बंडाचा सामना करावा लागला नाही.
डेरियसच्या अमर्याद ताकदीबद्दल आणि सामर्थ्यशील संरक्षणाला दुजोरा देणारे संदर्भ प्राचीन पर्शियन पुस्तकांमध्ये उपलब्ध आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
अशाच एका संदर्भानुसार, झरथ्रुष्टांच्या आहूरा माझदाने डेरियसला त्या राजवटीचं राजेपण प्रदान केलं होतं, ज्यात पर्शिया, मीदिया आणि विविध भाषा बोलणाऱ्या लोकांसह अनेक समुदायांची वस्ती होती. समुद्राच्या एका बाजूला डोंगर आणि निर्जन ठिकाणं, तर दुसऱ्या बाजूला वाळवंटं अशी सत्ताही प्रदान केली.
मात्र, डेरियसचा प्रभाव केवळ त्याच्या लष्करी पराक्रमामुळे नव्हता. संपूर्ण राजवटीमध्ये अभियांत्रिकी आणि बांधकाम योजना पूर्ण झाल्याचंही त्यानं पाहिलं.
इजिप्तमध्ये त्याने नाईल नदी आणि लाल समुद्राच्या मधमोध एक कालवाही बनवला. इराणच्या मध्यभागी त्याने पर्सेपोलिसमध्ये दीर्घकालीन बांधकामाचं काम सुरू केलं.
शोश (पश्चिम इराण) या एलामाइट शहराला नवीन प्रशासकीय राजधानीचा दर्जा मिळाल्यावर, त्या शहराला एकप्रकारे नवीन जीवनच लाभलं.
तीस लाख चौरस किलोमीटरवर पसरलेली राजवट चालवणं दारासारख्या सक्षम शासकासाठीही मोठे आव्हान होते.

फोटो स्रोत, Getty Images
यावर उपाय म्हणून त्याने राजवटीची प्रशासकीय राज्यांमध्ये विभागणी केली आणि पर्शियन सज्जनांच्या छोट्या गटाला सर्वोच्च पदे दिली. ते या महान राजवटीवर मोठा कालावधी सत्ता गाजवू शकण्याचं एक कराण हे राज्यव्यवस्था हे होतं.
पर्शियन राजवटीच्या पायाभूत सुविधाही यासाठी खूप फायदेशीर ठरल्या. राज्यं केंद्राशी रस्त्यांद्वारे जोडली गेली.
दाराच्या राजवटीचा विस्तारही त्या काळातील कलाकृतींवरून दिसून येतो, ज्यामध्ये राजवटीच्या विविध भागांचे मिश्रण आढळते. त्याच वेळी त्यांचे विशेष पैलू पर्शियासोबत एकजुटीचा संदेशदेखील देतात.
योद्धा आणि प्रशाकीय दृष्टीने त्यांच्या सत्तेला पश्चिम जगतात कठोर भूमिकेसाठीच ओळखलं जातं.
ग्रीकचा आपल्या राजवटीमध्ये समावेश करणं हे डेरियसचे स्वप्न होतं. मात्र, ग्रीक आणि पर्शिया यांच्यातील तणावावरील ग्रीक इतिहासकार हेरोडोटस यांच्या लिखाणात ग्रीकचा विरोध आणि पर्शियाची प्रतिक्रिया अतिशयोक्तीपूर्ण वाटते.
दाराचा मृत्यू इसवी सन पूर्वी 486 मध्ये झाला आणि त्यानंतर राजवटीचा विस्तार करण्याची जबाबदारी मुलगा खशयार शाहवर आली. आपल्या वडिलांप्रमाणे त्याच्यासाठी ग्रीकांशी लढणं आव्हानात्मक होतं.
त्यांनी इसवी सन पूर्वी 480 मध्ये अथेन्सवर कब्जा केला. मात्र, त्यांना जमिनीवर (प्लॅटी आणि मॅकाली) आणि समुद्रात (सॅलेम्स) ग्रीकांकडून मोठा पराभव झाला.

फोटो स्रोत, Getty Images
ग्रीस कधीच आपल्या राजवटीत सामील होऊ शकणार नाही, हे त्यांना भेडसावत होते आणि त्यामुळे ते हे स्वप्न अपूर्ण सोडून मायदेशी परतले.
जवळपास दीड शतकात अंतर्गत उठाव झाले, इजिप्तचे अपयश आणि वारंवार आक्रमणे झाली आणि सैदा (सध्याचे लेबनॉन) येथील उठाव चिरडला गेला.
या सर्व संकटांनंतरही इसवी सन पूर्व 330 पर्यंत पर्शियाच्या प्रभावाला आणि वर्चस्वाला आव्हान दिले जाऊ शकले नाही. मग असे व्यक्तिमत्व ग्रीकमध्ये उदयास आले, ज्याने काही वर्षांत पर्शियाची संपूर्ण राजवट उलथून टाकली आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे अलेक्झांडर द ग्रेट. त्यांना रोखण्याची जबाबदारी दारा तृतीय याची होती. त्यात अपयश आल्याने त्याच्या कारकीर्दीवर एक काळा डाग लागून राहिला.
मात्र, दारा तृतीय शूर आणि सक्षम शासक होता, जो अलेक्झांडर द ग्रेटच्या आक्रमणातील मोठा अडथळा बनला. मात्र, इसवी सन पूर्व 333 आणि 331 मध्ये गोमागलच्या लढाईत तो पराभव रोखू शकला नाही.
दुसर्या पराभवानंतर दारा तृतीय पश्चिम इराणमधील हग्मातानातून पळून गेलेल्या सैन्याला गोळा करण्यात यशस्वी झाला. तिथून तो बचतर येथे गेला आणि तेथे त्याच्या नात्यातील भाऊ अर्दशीर पंचमने खून केला.
इसवी सन पूर्वी 330 मध्ये कापा तृतीयच्या मृत्यूनंतर पर्शियाची राजवट संपुष्टात आली आणि जगाच्या इतिहासात एक नवीन अध्याय सुरू झाला. या नव्या अध्यायात अलेक्झांडर द ग्रेटने अशी राजवट स्थापन केली, ज्यापुढे पर्शिया देखील लहान वाटला.
ताकद कुटुंबापर्यंतच मर्यादित
बंड, सीमावाद, वारसाहक्काच्या लढाया आणि सम्राटांच्या हत्येनंतरही पर्शियाच्या राजवटीने मोठ्या लोकसंख्येसह दोन दशकांहून अधिक काळ विस्तीर्ण प्रदेशावर राज्य केलं.
पर्शियाची राजवट का संपुष्टात आली हा प्रश्न नाही, तर इतका प्रदीर्घ काळ टिकली कसा? हा आश्चर्याचा प्रश्न उरतो. या प्रश्नाचं उत्तर म्हणजे राजघराण्याने राजेशाहीवर आपले नियंत्रण कायम ठेवले. बखामनशी घराण्याने ही राजवट कौटुंबिक व्यवसाय म्हणून चालवली.
अंतर्गत बंडखोरी झाली, पण त्यामुळे कोणतेही राज्य मोडता आले नाही. त्याऐवजी कुटुंबाचा प्रमुख कोण होणार आणि सिंहासनावर कोण बसणार हा प्रश्न होता.
आज पर्शियन राजवटीवरील संशोधनातून अतिशय महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. पर्शियन राजवटीचं वर्णन बदलावं लागलं, असे नवे संदर्भ पुरातत्वतज्ज्ञांना सतत सापडत गेले.
जसं रॉबर्ट ग्रीव्हजनं म्हणतात की, पर्शियाच्या पार्श्वभूमीवर इराणचा इतिहास समजून घेणे आता शक्य आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








