You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मला अजिबात कल्पना नव्हती की 4 आठवड्यांनंतर मी बाळाला जन्म देणार आहे'
- Author, बॉनी मॅकलारन
- Role, बीबीसी न्यूजबीट
तवानाला अजिबात कल्पना नव्हती की तिच्या पोटात एक बाळ वाढतंय. रिवर आज एक वर्षाची आहे.
तवानाने कधीच ठरवलं नव्हतं की तिला वयाच्या 21 व्या वर्षी एका बाळाला जन्म द्यावा लागेल.
तिच्या मते, आयुष्य म्हणजे मौजमजा करणं, मित्रांसोबत पार्टी करणं.
एके दिवशी चक्कर येऊन पडेपर्यंत हेच तिचं आयुष्य होतं. असं का झालं याची तिला पुसटशी देखील कल्पना नव्हती. त्यानंतर तिला सांगण्यात आलं की ती 4 आठवड्यात एका बाळाला जन्म देणार आहे.
तवानाने बीबीसीच्या 'रिलायबल सॉस पॉडकास्टट'वर सांगितलं की, तिला पॅनिक अटॅक येऊ लागले होते.
या बातमीनंतर तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला.
"कारण कोणीतरी तुम्हाला तसं सांगत आहे की तुमच्याकडे केवळ चार आठवडे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला कोणाची तरी काळजी घ्यावी लागणार आहे," तवाना सांगते.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तवानाला एमआरआय स्कॅन करण्यापूर्वी प्रेग्नेंसी टेस्ट करण्यास सांगितलं होतं.
तिच्या शरीरात गर्भनिरोधक साधन होतं आणि त्यामुळेच गरोदरपणाचं कोणतंही लक्षण दिसत नव्हतं. त्यामुळेच तिने हा सल्ला हसण्यावारी नेला. आणि जेव्हा टेस्ट निगेटिव्ह आली तेव्हा तवानाचा विश्वास आणखी दृढ झाला की ती बरोबर होती.
पण एका नर्सने डॉक्टरांना सांगितलं की तवाना गरोदर असू शकते, तिला अल्ट्रासाऊंड करायला लावूया.
रिवरचे वडील इमॅन्युएल सांगतात की, जेव्हा तवानाने त्यांना सांगितलं की ती गरोदर आहे तेव्हा त्यांचा यावर विश्वासच बसला नाही.
इमॅन्युएल सांगतात, "ती काय सांगते हे मला समजलंच नाही. ते सगळं अद्भुत होतं."
बीबीसीच्या 'रिलायबल सॉस पॉडकास्ट'शी संवाद साधताना तवाना आणि इमॅन्युएल यांनी त्यांच्या मुलीसोबत या गोष्टी शेअर केल्या.
कोणतीही लक्षणं नसलेली गर्भधारणा म्हणजे 'क्रिप्टिक प्रेग्नेंसी'. यात पोट फुगणं, उलटी किंवा इतर कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत.
हे दुर्मिळ आहे, परंतु तवाना सांगते की डॉक्टरांनी तिला सांगितलं की, "कृष्णवर्णीय समुदायात हे खूप सामान्य आहे."
ती सांगते की, "त्यांच्यात असलेल्या कंबर आणि हाडांच्या संरचनेमुळे बाळ बाहेरून वाढत नाही तर आतील बाजूने वाढते. त्यामुळे आमचा मागचा भाग वाढण्याची शक्यता जास्त असते."
"म्हणूनच जेव्हा मी तिला जन्म देत होते तेव्हा मला चिंता लागून होती की बाळ उलटं जन्माला येईल."
क्रिप्टिक प्रेग्नेंसीची माहिती शोधायला गेलं तर ती कमी आहे, पण लंडन साउथ बँक युनिव्हर्सिटीच्या आरोग्यसेवेचे प्राध्यापक एलिसन लॅयरी सांगतात की, जातीय अल्पसंख्याक महिलांना प्रसूती सेवा मिळण्याची शक्यता कमी असते. शिवाय त्यांना यात असमानतेचा सामना करावा लागतो.
एलिसन यांनी बीबीसी न्यूजबीटशी बोलताना सांगितलं की, "कृष्णवर्णीय स्त्रियांना गर्भधारणा आणि बाळंतपणाच्या बाबतीत वाईट परिणामांना सामोरं जावं लागलं आहे. आणि यावर अभ्यास देखील झाले आहेत."
आणि त्यांना असं वाटतं की क्रिप्टिक प्रेग्नेंसीवर अधिक संशोधनाची गरज आहे आणि त्यात बरंच काही समजून घेण्यासारखं आहे.
"जरी याचा परिणाम कमी लोकांवर होत असेल तरी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुम्हाला प्रसूतीपूर्वी चांगली सेवा मिळाली नाही, तर अशा परिस्थितीत वाईट परिणामांना सामोरं जावं लागण्याची शक्यता असते."
चार महिने आणि चार आठवड्यांनंतर तवानाला समजलं की ती गरोदर आहे. त्यानंतर तिने रिवरला जन्म दिला.
तवाना सांगते की, बाळंतपणानंतर तिला नैराश्यातून (पोस्ट-नेटल डिप्रेशन) जावं लागलं. लहान वयात आई होण्याचा सल्ला देणारे अनेक व्हिडिओ तिने टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहिले.
पण ती म्हणते की तिला अशा परिस्थितीतून गेलेल्या अमेरिकन महिलेशिवाय कोणीही सापडलं नाही.
"मी खरोखर उदास झाले कारण मला सल्ला देण्यासाठी कोणीही नव्हतं. याबद्दल कोणीही बोलत नाही. म्हणजे हे काय आहे कोणाला माहीतच नसावं. मग नंतर मी एक व्हिडिओ पाहिला जो एका अमेरिकन मुलीने बनवला होता, त्याला 100 लाईक्स मिळाले होते."
तवानाने नंतर तिचा अनुभव एका व्हिडिओ माध्यमातून ऑनलाइन शेअर करण्याचा निर्णय घेतला, ज्याला जवळपास 4 लाख लाईक्स आहेत.
तवानाने एक पॉडकास्ट देखील सुरू केला आहे ज्यावर ती इतर मातांशी बोलते.
तवाना सांगते की, तिने तिची गोष्ट सांगितली. आता यातून अशा इतर तरुण मातांना आधार मिळेल ज्यांना शेवटच्या क्षणी आपण गर्भवती असल्याचं समजतं.
ती स्वतःला भाग्यवान समजते कारण तिला तिच्या आईकडून आर्थिक मदत मिळाली होती. पण तिला माहिती आहे की सगळेच इतके भाग्यवान नसतात.
उदाहरणार्थ, तिला वाटतं की यासाठी धर्मादाय संस्था सुरू व्हायला हवी.
क्रिप्टिक प्रेग्नेंसी म्हणजे काय?
क्रिप्टिक प्रेग्नेंसी म्हणजे जेव्हा एखादी मुलगी किंवा स्त्रीला ती गरोदर असल्याची कल्पना नसते. काही स्त्रियांना तर प्रसूतीच्या वेळेपर्यंत माहिती नसतं की त्या गरोदर आहेत.
प्रत्येक 2,500 गर्भधारणेमध्ये 1 क्रिप्टिक प्रेग्नेंसी असते.
यूकेमध्ये जन्मलेल्या एकूण मुलांपैकी अशा मुलांची संख्या 300 आहे.
काही प्रकरणांमध्ये तणाव असल्याकारणाने स्त्रियांना गरोदर असल्याची लक्षणं ओळखताच आली नाहीत किंवा ही लक्षणं अनुभवता आली नाहीत.
काही स्त्रियांना मासिक पाळी वेळेवर येत नाही किंवा मासिक पाळी अजिबात येत नाही त्यांना देखील गर्भधारणेची लक्षणे जाणवतात.
स्रोत: हेलन चेन, स्टर्लिंग विद्यापीठातील मिडवाइफरीचे प्राध्यापक