गरोदर महिला, स्तनदा मातांनी दारू प्यायल्यास बाळाच्या वाढीवर काय परिणाम होतो?

    • Author, डॉ. शैलजा चंदू
    • Role, बीबीसीसाठी

सुभद्रा आजच्या जमान्यातल्या सासूबाई आहेत. आपल्या सुनेचं एक स्वतंत्र अस्तित्व असल्याचं त्या जाणतात. घरात सून आल्यानंतर त्या दोघांमध्ये पडायचं नाही, त्यांच्या आनंदातला अडथळा बनायचं नाही ते त्यांनी मुलाचं लग्न होण्याआधीच मनाशी ठरवलं होतं.

आपण आई होणार असल्याचं त्यांच्या सुनेने महिनाभरापूर्वी जाहीर केल्यापासून सुभद्रा उत्साहात होत्या. त्यांनी खूप स्वप्न पहायला सुरुवात केली. "पुढच्या वर्षी यावेळेपर्यंत या घरात एक लहान मूल पायात पैंजण घालून दुडदुडत असेल...ती माझ्या मांडीवर बसेल...मुलगा असो वा मुलगी...मी बाळाच्या कमरेत सोन्याचा करगोटा बांधीन..."

बाळकृष्णाचं वर्णन करणारी गाणीही त्या स्वतःशीच गुणगुणायला लागल्या.

रविवारचा दिवस होता. सहसा सुटीच्या दिवशी त्यांचा मुलगा आणि सून आरामात दुपारच्या सुमारास उठायचे. नाश्त्याला पुरी खायचे आणि ब्रंच म्हणून आमटी-भात खात.

घराचे जिने चढताना सुभद्रांच्या मनात आलं, "आता पूर्वीसारखं वागून कसं चालेल? आता ती प्रेग्नंट आहे. तिने लवकर उठून नीट खाल्लं नाही तर बाळाची वाढ नीट कशी होणार"

"प्रवीणा, ऊठ! बारा वाजत आलेयत. तू काहीतरी खायला हवंस." सासूने खांद्याला हात लावून हलवल्यावर प्रवीणाला जाग आली.

"चल, खाली ये पटकन," असं म्हणता म्हणता सुभद्रांना बेडजवळच काही बाटल्या दिसल्या.

त्यांचे पायच लटपटले. त्यांनी पूर्वी या बाटल्या पाहिल्या नसल्या तरी या दारूच्या बाटल्या असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्या गंभीर झाल्या.

अशा बाटल्या त्यांना वारंवार दिसल्यानंतर त्यांनी त्या दोघांनाही त्याबद्दल विचारलं.

गर्भवती बाईने दारू पिणं चांगलं नसल्याचं त्यांनी सुनेला खडसावून सांगितलं.

सासू कधीकधी मर्यादा ओलांडून आपल्या खासगी बाबींमध्ये लक्ष घालत असल्याचा प्रवीणाला राग आला. "हे बघा, मला माझ्या वैयक्तिक बाबींमध्ये कोणीही नाक घातलेलं आवडत नाही, अगदी रामनेही,"

"हे काय बोलणं झालं? जन्माला येणाऱ्या या बाळाचे आम्ही कोणीच नाही का? राम, तू का बोलत नाहीस?" सुभद्रांनी चिडून उत्तर दिलं.

"आई, तू शांत हो. मी बोलतो तिच्याशी," रामने आईला शांत करण्याचा प्रयत्न केला.

"राम, हे माझं आय़ुष्य आहे. मी फक्त विकेंडला एक ड्रिंक घेते. तेही सुरक्षित ब्रँडचं. त्यावरून इतका हंगामा कशाला?"

"थोडीशी दारूही जन्माला येणाऱ्या बाळावर विपरीत परिणाम करू शकते. मी वाचलंय हे कॉम्प्युटरवर," सुभद्रा म्हणाल्या.

"ओह, तुम्ही गुगल केलं वाटतं...आम्ही तुम्हाला कॉम्प्युटर दिला तुम्ही फेसबुक वापरावं यासाठी. माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी नाही."

मद्यपान करणाऱ्या महिलांची वाढती संख्या

गेल्या काही वर्षांमध्ये महिलांनी मद्यपान करण्याचं प्रमाण अधिक वाढलंय.

2010 ते 2017 या कालावधीत करण्यात आलेल्या पाहणीनुसार मद्यपान करणाऱ्या महिलांचं प्रमाण 38 टक्क्यांनी वाढलेलं आहे. आणि येत्या पाच वर्षांमध्ये हे प्रमाण आणखी 25 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.

'अधिकाधिक महिला मद्यसेवन करत असल्याचा' निष्कर्ष या पाहणीअंती काढण्यात आला.

गरोदर महिलेने मद्यपान केलं तर त्याचा पोटातल्या बाळावर काय परिणाम होतो?

गरोदर महिलेनेसाठी अल्कोहोल धोकादायक आहे. या महिलेने मद्यपान केल्यावर ते मद्य लगेच रक्तात मिसळतं आणि गर्भाशयातल्या बाळापर्यंत पोहोचतं.

  • दारूच्या बाबतीत कोणत्याही ब्रँडला 'Safe' वा सुरक्षित असल्याचं म्हणता येणार नाही.
  • आपण थोडंसंच मद्यपान कधीकधीच करतो, असा विचार करणं चुकीचं आहे. या कमी प्रमाणातल्या मद्याचा कालांतराने परिणाम होणार नाही, असा विचार करणं धोक्याचं आहे.
  • आईने ती गर्भार असताना दारू प्यायली तर बाळाच्या शरीरात व्यंग निर्माण होण्याची, मतीमंदत्वाची वा आक्रमक वृत्ती येण्याच शक्यता असते.
  • जितकं जास्त मद्य सेवन, तितकं बाळाचं नुकसान जास्त. अगदी लहान प्रमाणात मद्यपान केलं तरी त्याचा गर्भायशातल्या बाळावर परिणाम होतोच.
  • अशा महिलांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते.
  • बाळाचा वेळेपूर्वी - Premature जन्म होण्याचा धोका असतो.
  • मदयसेवन करणाऱ्या महिलेचं बाळ कमी वजनाचं असण्याची शक्यता असते.

फीटल अल्कोहोल सिंड्रोम (Fetal Alcohol Syndrome)

गरोदर असणाऱ्या महिलेने मोठ्या प्रमाणात मद्यसेवन केलं तर त्यामुळे 'फीटल अल्कोहोल सिंड्रोम' नावाची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.

फीटल अल्कोहोल सिंड्रोमची लक्षणं

  • बाळाच्या डोक्याचा आकार नेहमीपेक्षा लहान असणं.
  • बाळाची नॉर्मल वाढ न होणं. निरोगी बाळांच्या तुलनेत ही बाळ लहान असतात. मोठं झाल्यावरही इतरांच्या तुलनेत ही बाळं कमी उंच पण वयाने मोठी दिसतात.
  • त्यांच्या चेहऱ्यात इतरांपेक्षा वेगळेपण असतं. डोळे लहान असतात, वरचा ओठ पातळ असतो. नाक आणि वरच्या ओठातली त्वचा अतिशय सपाट असते. नाकांखाली सहसा असणाऱ्या दोन रेषा नसतात. या बाळांना तोल सांभाळणं कठीण जातं.
  • त्यांच्या यकृत, किडनी, हृदयाच्या कामात अडथळे निर्माण होऊ शकतात.
  • या बाळांची ऐकण्याची आणि दृष्टी क्षमता कमी असते.
  • मद्याचा परिणाम या बाळांच्या शरीरावरच नाही तर मतीवरही होतो. या मुलांची बुद्धीमत्ता कमी असते. अभ्यासात वा नवीन गोष्टी शिकण्यात त्यांना फारसा रस नसतो. त्यांची विचार करण्याची क्षमता कमी असते. गणित, स्मरणशक्ती यामध्येही ही मुलं मागे राहतात.
  • या मुलांना कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं शक्य होत नाही.

या मुलांची वागणूकही योग्य नसते. ही मुलं आपला राग आणि आक्रमकता आवरू शकत नाही आणि पटकन एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देतात. त्यांना इतरांमध्ये मिसळणं कठीण जातं.

यावर उपाय वा उपचार काय?

यावर कोणतीही विशिष्ट ट्रीटमेंट उपलब्ध नाही. गर्भाशयातल्या बाळाच्या अवयवांवर आणि मेंदूवर अल्कोहोलचे झालेले दुष्परिणाम कायमस्वरूपी असतात. उपचारांनी परिस्थिती 'नॉर्मल' करता येत नाही.

पण किती शारीरिक आणि मानसिक नुकसान झालंय याचा वैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने आढावा घेतला जाऊ शकतो आणि त्यांच्या वागण्याचं निरीक्षण करून त्यांना उपचार दिले जाऊ शकतात.

बाळाच्या जन्मानंतर दारू पिणं सुरक्षित आहे का?

नाही, डिलीव्हरी नंतरही मद्यपान सुरक्षित नाही. काही महिला डिलीव्हरी नंतर मद्यपान करत असल्याचं काही विविध पाहण्यांमध्ये आढळलंय. या पाहण्यांनुसार प्रेग्नन्सीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मद्यपान करणाऱ्या महिलांची संख्या 6.2% असेल तर डिलीव्हरी झाल्यानंतर मद्यसेवन करणाऱ्यांची संख्या 31% आहे.

आई जे खाते वा पिते त्याचे अंश तिच्या दुधामध्ये येतात. जर आईने मद्यपान केलं तर ते तिच्या दुधापर्यंत पोहोचतं.

मद्यपान केल्यानंतरच्या 30 ते 90 मिनिटांमध्ये आईच्या दुधामध्ये अल्कोहोलचं प्रमाण सर्वाधिक असतं. मद्यपान केल्यानंतर पुढच्या 2 ते 3 तासांसाठी त्याचा प्रभाव आईच्या दुधात राहतो.

मद्याच्य अंमलामुळे आईला बाळाच्या गरजा समजणं कठीण जातं. बाळाला वाढवण्यासाठीच्या तिच्या क्षमतेवर याचा परिणाम होतो.

आईने मद्यपान केलं असल्यास तिने बाळासोबत एकाच पलंगावर झोपणं योग्य नाही. मद्याच्या अंमलात आईला झोप लागल्यास बाळ आईच्या अंगाखाली येण्याची शक्यता असते.

जर आईवर 'सोशल ड्रिंकिंग'ची पाळी आली तर?

सोशल ड्रिंकिंग म्हणजे समारंभात वा कार्यक्रमात सर्वांनी आग्रह वा बळजबरी केल्याने केलेलं मद्यपान.

अशी वेळ स्तनदा मातेवर आली तर तिने आआधीच शक्य असल्यास ब्रेस्ट पंपच्या मदतीने दूध काढून फ्रिजमध्ये ठेवून द्यावं. बाळाला स्तनपान दिल्यानंतरच मग पेयपान करावं.

अल्कोहोल सेवनानंतरच्या 2-3 तासांमध्ये बाळाला स्तनपान देऊ नये. स्तनपान देत असताना मद्यपान केल्याने बाळाची वाढ योग्य होत नाही. बाळाच्या मेंदूच्या विकासावरही परिणाम होतो. अशा माता आपल्या मुलांना वरचेवर शिक्षा देतात आणि अशा मुलांना मारहाण होण्याची शक्यता जास्त असल्याचंही आढळलंय.

म्हणूनच स्तनदा मातेने मद्यपान न करणंच योग्य.

(या लेखात वैद्यकीय बाबी समजवून सांगण्यात आलेल्या आहेत. यातली सगळी पात्रं आणि प्रसंग काल्पनिक आहे. याचं एखाद्या जिवंत वा मृत व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास तो एक योगायोग असेल आणि हे हेतुपुरस्सर करण्यात आलेलं नाही. या लेखाच्या लेखिका एक वैद्यकीय डॉक्टर आहेत.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)