You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महिला आरोग्य : 'ही' कोणती समस्या आहे ज्यामुळे महिलांना मोकळेपणानं हसण्याचीही धास्ती वाटते?
- Author, डॉ. शैलजा चंदू
- Role, बीबीसी तेलुगूसाठी
खळखळून हसता येऊ नये, खोकता येऊ नये असा हा कोणता आजार आहे?
त्या पार्टीत पद्मिनी एका कोपऱ्यात बसून होती. पद्मिनी अकाऊंटंट मूर्ती यांची पत्नी. जेव्हा कंपनीचे अधिकारी त्यांच्या पत्नीसोबत पार्टीत आले, तेव्हा सर्वजण उठून त्यांच्याजवळ गेले. त्यांचं स्वागत केलं.
मूर्तीनेही आपल्या बायकोला सोबत यायला सांगितलं. पण पद्मिनी जागेवरून उठली नाही.
ती दुर्मुखून बसली होती. "सुंदर आहे ना...म्हणून शिष्टपणा करतीये," पार्टीमधल्या इतर बायकांची आपापसांत कुजबूज सुरू होती.
ते अधिकारी खूपच आनंदी आणि हसतमुख व्यक्तिमत्त्वाचे होते. ते पद्मिनीजवळ गेले आणि त्यांनी तिला अभिवादन केलं.
"जर तुम्ही अशा उदास बसलात, तर आम्हाला आवडणार नाही," त्यांनी म्हटलं.
आपण दोन मिनिटांत तिला हसवू, अशी पैज त्यांनी लावली होती. पण पद्मिनी अस्वस्थ होती.
त्या अधिकाऱ्याच्या विनोदावर सगळेजण जोरजोरात हसत होते. पण पद्मिनी हसत नव्हती, तिच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. तिच्या अशा वागण्यामुळे मूर्तीही उदास झाला होता.
त्यानं काहीतरी निमित्त सांगितलं आणि पद्मिनीला घेऊन पार्टीतून बाहेर पडला.
असं काय झालं होतं की, पद्मिनीला हसण्याची धास्ती वाटत होती?
गेल्या काही वर्षांपासून पद्मिनीला एक समस्या सुरू झाली होती. ती हसली किंवा जोरात खोकली की मूत्रविसर्जन व्हायचं.
तिनं बाहेर जाणंही थांबवलं होतं.
खोकल्यावर, शिंकल्यावर किंवा अगदी जोरात हसल्यावरही मूत्रविसर्जन होणं ही एक आरोग्यविषयक समस्या आहे. त्याला Stress Urinary Incontinence म्हणतात. अगदी शब्दशः बोलायचं झालं तर तणावामुळे झालेला 'मूत्र असंयम' असं या समस्येला म्हणता येईल.
ओटीपोटाच्या आसपासचे स्नायू कमकुवत झाल्यामुळे ही समस्या निर्माण होते.
सुनंदा आणि रुक्मिणी या समोरासमोरच्या फ्लॅटमध्ये राहतात. त्या दोघींचे पतीही एकाच ऑफिसमध्ये काम करतात. रुक्मिणीला दिवाळीनिमित्त तिच्या मैत्रिणींना घरी बोलवायचं होतं.
सुनंदा आणि रुक्मिणी खरेदीसाठी म्हणून मॉलमध्ये गेल्या. सगळीकडे फिरून त्यांनी सामान तसंच क्रोकरी खरेदी केली. नंतर फूड कोर्टमध्ये जाऊन त्यांनी आईस्क्रीम, सॉफ्ट ड्रिंक्स घेतलं.
सुनंदाला मॉलमध्ये वॉशरुमला जायचं होतं. पण तिथं गर्दी होती, त्यामुळे त्या रिक्षा करून घरी आल्या. रुक्मिणी आणि ती आपापल्या घराचं दार उघडत होत्या. पण सुनंदाला बाथरुमला जाण्याची अतिशय घाई झाली होती, तिला नियंत्रण ठेवणं कठीण जात होतं आणि पर्समधली चावी पटकन हाताशी येत नव्हती.
रुक्मिणी, मला खूप घाई आहे वॉशरुमला जायची, असं म्हणतच ती रुक्मिणीनं उघडलेल्या दारातून आत शिरली. पण बाथरूममध्ये जाईपर्यंत लघवीचे काही थेंब सोफ्याच्या इथं पडले होते. सुनंदाला अतिशय शरमल्यासारखं झालं. ती रुक्मिणीसोबत पुन्हा पहिल्यासारखी मैत्री ठेवू शकली नाही.
अगदी थोड्या काळासाठीसुद्धा लघवी रोखून धरता न येणं याला Urge Incontinence or Latchkey Incontinence म्हणतात. म्हणजेच अतिशय घाईगडबडीत नियंत्रण सुटतं.
महिलांमध्ये अशी परिस्थिती केव्हा निर्माण होते?
ताणामुळे होणारा मूत्र असंयम (Stress Urinary Incontinence)
शिंकल्यावर, खोकल्यावर, जोरात हसल्यानंतर किंवा जड वस्तू उचलून व्यायाम करताना ताण आल्यामुळे युरिन लीक होते. अशावेळी हसायचीही धास्ती वाटते.
गडबडीच्यावेळी सुटणारं नियंत्रण
जेव्हा लघवी खूप वेळ साठवून ठेवली जाते आणि मूत्राशयाचे स्नायू हळूहळू प्रसरण पावण्याऐवजी एकदम आकुंचन पावतात, त्यावेळी तातडीनं बाथरुमला जाण्याची गरज निर्माण होते. त्यानंतर अगदी मिनिटभराचाही उशीर झाला तर नियंत्रण सुटतं आणि मूत्रविसर्जन होतं.
मिश्र अनियंत्रण
वर उल्लेख केलेल्या दोन्ही प्रकारच्या समस्या यात पहायला मिळतात.
"इकडे ये... तू नीट लक्ष देऊन काम करत नाहीयेस," बॉसनं कॉम्प्युटर स्क्रीनकडे पाहत म्हटलं.
पण सुभद्रानं काहीच प्रतिसाद दिला नाही. नजर वर करून पाहण्याचंही धाडस तिला होत नव्हतं.
ती खोली अतिशय थंडगार होती. कोपऱ्यात एक रोप होतं. चंदनाचा सुगंध दरवळत होता.
माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव बॉसला न पटणारे होते. त्यात ही समस्या. खाली ओलसर झाल्याची जाणीव होतीये... लघवीचे थेंब असतील.
"या काय चुका आहेत? तू काही बोलत का नाहीयेस?" त्यानं सुभद्रासमोर काही कागद भिरकावले.
तिनं त्याच्याकडे पाहिलं. तो कसलातरी वास घेत असल्यासारखं तिला वाटलं. माझा वास तर येत नाहीये ना?
"मी जेव्हा तुला पहायला येतो, तेव्हा तू जागेवर नसतेस. कुठे जातेस काय माहीत?" त्याच्या आवाजात तुच्छता होती.
हो...ही समस्या निर्माण झाल्यापासून सारखं टॉयलेटला जाऊन कपडे ओले तर झाले नाहीत ना हे पाहावं लागतं. कोणाजवळ बोलावं हे पण कळत नाहीये.
"कामात लक्ष नसतं...जॉबला सुरूवात करतात तेव्हा नीट काम करतात. पण हळूहळू ढिसाळपणा सुरू होतो."
बॉस तिला ऐकू जाईल अशा आवाजात पुटपुटत होता.
तिलाही काम करणं कठीण होत होतं. नोकरी सोडावी असा विचार मनात यायचा.
मूत्र विसर्जन की मूत्र अनियंत्रण?
या समस्येमुळे महिलांमधला आत्मविश्वास कमी होतो. त्यांची कार्यक्षमता कमी होते.
जवळपास 25 ते 50 टक्के महिलांना त्यांच्या जोडीदाराच्या जवळ जाण्याचाही संकोच वाटतो. आपल्या जवळ आल्यावर लघवीचा वास येईल, अशी धास्ती त्यांना वाटत असते. याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावरही होतो. त्यांना नैराश्यही येऊ शकतं.
जवळपास 50 टक्के महिलांना आयुष्यात एकदा तरी ही समस्या भेडसावते. त्या हे गप्प राहून सहन करू शकतात किंवा इतरांजवळ आपलं मन मोकळं करू शकतात.
अनेक जणींना असं वाटतं की, ही वयानुसार निर्माण होणारी समस्या आहे आणि त्यावर कोणताही उपचार नाहीये, आपल्याला यासोबतच जगायचं आहे. त्या स्वतःचं स्वतः ठरवून टाकतात.
पण असं नाहीये. अशा 'नाजूक' प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपचारपद्धती आहेत, ज्याची महिलांना मदत होऊ शकते. अनेकदा अगदी किरकोळ उपचारांनीही फरक पडू शकतो.
या समस्येचं मूळ नेमकं कशात आहे, हे शोधून काढण्यासाठी तसंच आपल्या जीवनशैली आणि व्यावसायिक आयुष्याचं मूल्यमापन करण्यासाठी तीन दिवस आपली 'ब्लॅडर डायरी' लिहावी.
या डायरीमध्ये सर्व लक्षणांची नोंद होते. तुम्ही दिवसाला किती पाणी पिता, दिवसातून कितीवेळ बाथरुमला जाता, तुम्हाला खूप घाईनं बाथरुमला जावं लागतं, कितीवेळा युरीन लीक होते, त्यासाठी वापरत असलेले पॅड्स दिवसातून कितीवेळा बदलावे लागतात अशा सगळ्या गोष्टी त्यात लिहिल्या जातात.
गरजेपेक्षा जास्त पाणी पिणं, मधुमेहासारखे आजार, मूत्र विसर्जनाच्या मार्गातील संसर्ग यांसारख्या गोष्टीही मूत्रविसर्जनाच्या अनियंत्रणाला कारणीभूत ठरू शकतात.
तुमची तपासणी करून डॉक्टर तुमच्या या 'ब्लॅडर डायरी'साठी अधिक तपशील देऊ शकतात.
त्यानंतर युरोडायनॅमिक टेस्टिंगद्वारे डॉक्टर ब्लॅडर तसंच पोटावर किती ताण येतो हे तपासतात. त्यातून समस्येचं मूळ शोधण्यात मदत होते.
लघवीवर अनियंत्रण असलेल्या महिलांनी आपल्या जीवनशैलीत खालील बदल करणं हे महत्त्वाचं आहे.
- ज्या महिलांचं बॉडी मास इंडेक्स (BMI) 30 पेक्षा जास्त असतो, त्यांनी वजन कमी करणं अतिशय गरजेचं असतं. त्यामुळे या लीकेजच्या समस्येची तीव्रता कमी व्हायला मदत होते.
- काही महिलांना आहारात खूप जास्त प्रमाणात द्रव पदार्थ घेण्याची सवय असते. त्या पाणीही गरजेपेक्षा जास्त घेतात. अशा महिलांच्या खाण्यापिण्याच्या सवयीत काही बदल करणं आवश्यक असतं. कॉफी, शीतपेयं, अल्कोहोल यांचं आहारातलं प्रमाण कमी केलं जातं.
- ओटीपोटाजवळचे स्नायू मजबूत करण्यासाठी काही व्यायाम नियमित करायला हवेत. हे व्यायाम तज्ज्ञांकडूनच शिकून घ्यावेत.
- मूत्राशयाचं प्रशिक्षण : हा काय प्रकार आहे असं तुम्हाला वाटेल. ही आपल्या शरीराला लावायची एक सवय आहे. जेव्हा तुम्हाला लघवी लागते, तुम्ही टॉयलेटमध्ये जाता आणि मग मूत्राशयावरचं नियंत्रण सोडलं जातं. महिला लघवीसाठी बाहेर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ठराविक वेळांनाच लघवीला जाण्याची सवय लावून घेणं चांगलं. या सवयीमुळे मूत्राशयालाही 'शिस्त' लागते.
जीवनशैलीतील बदलांसोबतच लघवीवरील अनियंत्रणाच्या समस्येवर उपचार करण्यासाठी काही औषधंही उपलब्ध आहेत. अर्थात, ही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यायला हवीत.
आहार-विहारातील बदल आणि औषधांनी ही समस्या नाही सुटली, तर सर्जरीचा पर्याय असतो.
जर शिंकताना किंवा खोकताना युरीन लीकेजची समस्या असेल तर कृत्रिम स्फिंक्टरसारख्या गोष्टींचा वापर केला जातो.
मूत्राशयाच्या मुखाशी बल्किंग एजंट्स इंजेक्ट केले तर जवळपासच्या स्नायूंना आधार मिळतो आणि मूत्रविसर्जनावर नियंत्रण मिळवायला मदत होते.
ही समस्या असलेल्या महिला सतत धास्तावून जगत असतात. आपल्याजवळ आल्यावर एखाद्याला लघवीचा वास येईल अशी चिंता त्यांना सतावत असते. त्यामुळे त्या समाजापासून दूर जायला लागतात.
मूत्रविसर्जनावर नियंत्रण नसणं हा काही अपराध नाहीये, एक वैद्यकीय समस्या आहे हे त्यांनी समजून घ्यायला हवं. हे एकदा लक्षात घेतलं तर त्यावर उपचार करून बरं होता येईल आणि आनंदानं तणावमुक्त जगता येईल. समाजानं आणि कुटुंबानंही त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)