प्रियकर-प्रेयसी आणि मृतदेहाखाली अडकलेला साप; हत्येचं हे प्रकरण कसं उघडकीस आलं?

फोटो स्रोत, SHAHBAZANWAR
- Author, शहबाज अन्वर
- Role, बीबीसी हिंदीसाठी, मेरठहून
उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये अमित कश्यप नावाच्या व्यक्तीचा मृत्यू सध्या चर्चेचं कारण ठरला आहे.
सुरुवातीला या व्यक्तीचा मृत्यू हा साप चावल्यामुळे झाला असल्याचं सांगितलं गेलं. मात्र, पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून या व्यक्तीचा मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झाला असल्याचं निष्पन्न झालं.
इथूनच या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं आणि ते आणखी चर्चेत आलं.
अमितची 25 वर्षीय पत्नी रविता आणि तिचा 20 वर्षांचा कथित प्रियकर अमरदीप हे दोघे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत.
अमित आणि रविता या दाम्पत्याला तीन मुले आहेत.
या आरोपींनी आपला गुन्हा मान्य कबूल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
मृत्यू साप चावल्यामुळे झाला असल्याचं दाखवण्यासाठी अमितच्या मृतदेहाखाली जिवंत सापाला ठेवण्यात आलं, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
मेरठचे एसएसपी रमेश कुमार मिश्र यांनी गुरुवारी (17 एप्रिल) माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, "ही घटना मेरठमधील बहसूमामधील अकबरपूर सादात गावात 12 एप्रिल रोजी घडली. 13 एप्रिल रोजी मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं.
"या प्रकरणात पोलिसांनी मृत अमितचा मोठा भाऊ मोनू कश्यपच्या तक्रारीनंतर रविता आणि तिच्या प्रियकराविरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक करुन तुरुंगात पाठवण्यात आलं आहे."
त्यांनी म्हटलं की, "साप चावल्यामुळे अमित कश्यपचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांना देण्यात आली होती. मात्र, पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून असं उघड झालं की, अमितचा मृत्यू हा श्वास गुदमरल्यामुळे झाला आहे. या आरोपींची कडक चौकशी केली असता, रविता आणि अमरदीप यांनी प्रथम अमितची हत्या केल्याचे आणि नंतर अपघात झाल्याचे भासवण्यासाठी त्याच्या शरीराजवळ साप सोडल्याचे कबूल केले. घटनास्थळी सापदेखील आढळला आहे, जो मृतदेहाखाली अर्धा दाबला गेला होता. आरोपी अमरदीपचं घर हे त्याच गावात अमितच्या घरापासून थोड्या अंतरावर आहे."

फोटो स्रोत, ShahbazAnwar
विशेष म्हणजे, आरोपी अमरदीप आणि मृत अमित हे दोघेही मोठ्या काळापासून एकमेकांसोबत काम करायचे. ते दोघेही टाइल्स लावण्याचं काम करायचे. रविता अमरदीपच्या संपर्कात एका वर्षापूर्वी आली होती.
मृत अमितची पत्नी आरोपी रवितासोबत माध्यमांनी संवाद साधला. रविताने म्हटलं की, "माझा पती माझ्यासोबत सतत भांडणं करायचा. घाणेरड्या शिव्या द्यायचा. अमरदीप माझ्या संपर्कात जवळपास एका वर्षापूर्वी आले. 10 एप्रिल रोजी मी अमित यांच्यासोबत शाकुंभरीला प्रसाद वाढवण्यासाठी गेले होते. तेव्हाच मी अमरदीपसोबत मिळून अमितला मारण्याचा कट रचला होता."
बहसुमा पोलीस स्टेशनच्या प्रमुख इंदू कुमारी यांनी बीबीसीला सांगितले की, "चौकशी करताना रविताने सांगितलं की, तिने 12 एप्रिल रोजी रात्री आपल्या प्रियकरासोबत मिळून अमितची हत्या केली. अमरदीपने त्याचा गळा घोटला तर रविताने त्याचे हात आणि तोंड दाबले. प्रवास केल्याकारणाने अमितला थकवा आला होता त्यामुळे तो फारसा विरोध करु शकला नाही. या झटापटीत त्याने जेवढा विरोध केला त्यामधून अमितच्या शरीरावर जखमांचे व्रण उमटले होते."
अमितला सापानेही चावलं होतं का?
अमितच्या मृतदेहाखाली जवळपास दीड मीटर लांबीचा साप सापडला होता.
अमितच्या नातेवाईकांचा असा दावा आहे की, अमितला सापाने चावलेलं नव्हतं. मात्र, बहसुमा पोलीस स्टेशनच्या प्रमुख इंदू कुमारी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "अमितला सापाने अनेकदा चावलेलं होतं. त्याबाबत आम्ही डॉक्टरांशीही चर्चा केली. डॉक्टरांनी सांगितलं की अमितच्या मृत्यूमुळे त्याच्या शरीरातील रक्तप्रवाह थांबला होता, त्यामुळे सापाचं विष अमितच्या शरीरात पसरू शकलं नाही. अमरदीपने सापाची व्यवस्था केली होती. हा साप त्याला कुणाकडून मिळाला, याचा तपास सुरू आहे."

फोटो स्रोत, ShahbazAnwar
दुसऱ्या बाजूला, पीटीआय या वृत्तसंस्थेने एका व्यक्तीसोबत संवाद साधतानाचा व्हीडिओ शेअर केला आहे, ज्याने अमरदीपला साप दिला होता.
कृष्ण असं या व्यक्तीचं नाव असून त्या व्हीडिओमध्ये तो म्हणतो की, "आम्ही साप पकडतो आणि जंगलात सोडतो. आमचं हेच काम आहे. राजकुमार नावाचा एक मुलगा होता, त्याने आमच्याकडून साप घेऊन गेला. त्याने म्हटलं की, जागरण कार्यक्रमासाठी हा साप हवा आहे. काम झाल्यानंतर तो परत करेन. त्याने आपल्या मर्जीने एक हजार रुपये दिले होते."
मृत अमितच्या आईने काय म्हटलं?
मेरठच्या बहसूमा परिसरातील अकबरपूर सादात हे जवळपास सहा हजार लोकवस्तीचं गाव आहे. अमित कश्यपचं कुटुंब गरीब होतं.
अमितची आई मुनेश यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, "जवळपास आठ वर्षांपूर्वी अमितचा रवितासोबत प्रेमविवाह झाला होता. अमित आपल्या पत्नीवर खूप प्रेम करायचा. मात्र, रविताने त्याला मारलं."
पुढे त्यांनी म्हटलं की, "13 एप्रिलच्या सकाळी मी बाहेर बसले होते. तेव्हा अमितला सापाने चावलं असल्याचं त्याच्या लहान मुलाने मला येऊन सांगितलं. मी आत जाऊन पाहिलं तर माझा मुलगा निपचित पडला होता. त्याच्या खाली एक सापही दाबला गेला होता ज्याचं तोंड अमितच्या हाताजवळ होतं. तो साप जिवंत होता. मी रविताला विचारलं की माझ्या मुलाला काय झालं. तेव्हा ती म्हणाली की साप चावल्यामुळे त्याचा मृत्यू झाला."

फोटो स्रोत, ShahbazAnwar
अमितच्या कुटुंबामध्ये चार भावंडं आहेत. या चार भावंडांमध्ये अमित दुसऱ्या क्रमांकाचा भाऊ आहे. अमितचे नातेवाईक असलेल्या सोनू यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, अमित जमिनीच्या एका छोट्या तुकड्यावर शेवटच्या खोलीत राहत होता. अमितची आई मुनेश आणि वडील विजयपाल कश्यप त्याच्या खोलीसमोर बांधलेल्या खोलीत राहत होते.
अमितच्या आई मुनेश देवी यांनी म्हटलं की, "12 एप्रिलच्या रात्री नऊ वाजता मला टॉयलेटला जायचं होतं तेव्हा मी अमितच्या खोलीच्या दिशेने गेले. मात्र, त्याच्या खोलीचा दरवाजा बंद होता. पडदेदेखील झाकलेले होते. मी परत येऊन झोपले. परत रात्री दहा वाजता बाथरुमला गेले तेव्हा अमित पांघरुन घेऊन खाटेवर झोपलेला दिसला. कदाचित त्यावेळी त्याची हत्या झाली असावी."
बहुसुमा पोलीस स्टेशनच्या प्रभारी इंदू कुमारी यांनीही आरोपींची चौकशी केल्यानंतर या गोष्टीला दुजोरा दिला, की अमितची हत्या त्याच वेळी रात्री झाली होती.
अमितचे वडील विजयपाल कश्यप यांनी म्हटलं की, "माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना मृत्युदंडापेक्षा कमी शिक्षा मिळू नये. सुरुवातीपासूनच, रविता अमितच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करू इच्छित नव्हती. संपूर्ण गावात याबद्दल चर्चा आहे."
गावकऱ्यांमध्ये आरोपींबद्दल नाराजी
अमितच्या मृत्यूने गावातील लोकांना धक्का बसला आहे.

फोटो स्रोत, Shiv Prakash
गावाचे सरपंच दीपक कुमार यांनी बीबीसीला सांगितलं की, "अमित एक चांगला मुलगा होता. त्याच्या मृत्यूबद्दल कळाल्यावर मला धक्का बसला. आमच्या गावात अशी घटना कधीच घडली नव्हती."
आणखी एक शेजारी असलेल्या साजिद यांनी म्हटलं की, "सकाळी अमितच्या मृत्यूची बातमी पसरली तेव्हा आम्हाला दिसलं की अमितसोबत बेडवर एक साप पडलेला होता. आरोपीला फाशी दिली पाहिजे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











