बीडमध्ये महिला वकिलाला रिंगण करून बेशुद्ध होईपर्यंत मारहाण, सरपंचासह 10 जणांवर आरोप

फोटो स्रोत, mustan mirza
- Author, मुस्तान मिर्झा
- Role, बीबीसी मराठीसाठी
बीड जिल्ह्यात एका वकील महिलेला गावातीलच 10 जणांनी बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. तक्रार का केली? असं म्हणत महिलेला मारहाण करण्यात आली आहे.
पीडित महिलेच्या जबाबावरून युसूफ वडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. 10 पैकी मुख्य आरोपी हा गावातील सरपंच असल्याने खळबळ उडाली आहे. सध्या सर्व आरोपी फरार आहेत.
या महिला वकील अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करतात. सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपने जबर मारहाण केली आहे.
महिला बेशुद्ध पडल्यानंतर त्यांच्यावर दवाखान्यात उपचार करून रात्रीतून त्यांना घरीही पाठवण्यात आलं.
"सरपंच आणि इतर दहा पुरुषांनी मिळून एका वकील महिलेला मारहाण करणं कितपत योग्य आहे? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल, कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे?", असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत विचारला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित महिलेने घराशेजारी असणाऱ्या पिठाच्या गिरणीचा आणि लाऊडस्पीकरच्या आवाजाने त्रास होत आहे, अशी तक्रार केली होती.
गेल्या अडीच वर्षांपासून या आवाजांमुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याची तक्रार तिनं केली होती. त्यामुळं रागातून तक्रार का केली? असं म्हणून मार्च महिन्यात गावातील सरपंच आणि इतर लोकांनी तिला घरी येऊन धमकावलं होतं.
या महिलेनं 20 मार्च रोजी घडलेल्या प्रकाराची तक्रारही केली होती. त्यानंतर काही दिवसांनी 13 एप्रिल रोजी परत आवाजाचा त्रास होत असल्यानं तिने सरपंचांना सांगितलं.
त्यांनी महिलेला पोलिसांना सांगा, असं म्हटलं. त्याप्रमाणे पीडित महिलेनं पोलिसांना फोनवरून या प्रकाराची माहिती दिली.
दुसऱ्या दिवशी महिला शेतात कैऱ्या काढायल्या गेल्या होत्या. त्यावेळी सरपंच अनंत अंजान, सुधाकर अंजान, राजकुमार मुंडे, कृष्णा मुंडे, ज्ञानोबा सपकाळ, नवनाथ जाधव, मृत्युंजय अंजान, अंकुश अंजान, सुधीर मुंडे आणि नवनाथ मोरे तिथं पोहोचले.
त्या सर्वांनी महिलेला तू तक्रार का केली? तुझ्या आईची खुनाच्या प्रयत्नाची केस काढून का घेत नाही? असं म्हणत वाद घातला. हा वाद घालत असताना शिविगाळ करत तिला मारहाण करायला सुरुवात केली.
त्या 8 ते 10 जणांनी पीडित महिलेला रबरी पाईप आणि काठीने बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली आणि त्यानंतर पळून गेले.
घटनास्थळी पीडितेचे काका आणि काकू आले. पण घाबरले असल्यानं त्यांनी तिथंचं लपून पोलिसांना फोन केला.
पोलिसांनी महिलेला अंबाजोगाई रुग्णालयात दाखल केलं. तिथेच तिच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, लगेचच रात्रीतून महिलेला घरी पाठवण्यात आलं.
योग्य उपचार झाला नसल्यानं चांगल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणार असल्याचं पीडित महिलेच्या बहिणीनं सांगितलं आहे.
महिलेला एवढी जास्त मारहाण झाली होती की, तिच्या शरीरावरच्या जखमा आणि व्रण अस्वस्थ करतात.
अनेकांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो पाहून संताप व्यक्त केला. आरोपींवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.
महिलेच्या जबाबवरून युसूफ वडगाव पोलिसांनी बीएनएस 2024 नुसार 118 (2), 118 (1), 115 (2), 74, 189 (2), 191 (2), 190, 352, 351 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

फोटो स्रोत, JITENDRA AWHAD/X
पीडित महिलेशी बीबीसी न्यूज मराठीने संपर्क केला. त्यावेळी महिलेनं तिला झालेल्या मारहाणीची आपबिती सांगितली. तसंच पुन्हा तक्रार करू नये म्हणून धमकी दिल्याचं सांगितलं.
"एवढंच नाही तर त्यांनी वाईट हेतूनं माझ्या हाताला धरून अंगाला स्पर्श करून विनयभंग करत अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली," असंही पीडितीनं तक्रारीत म्हटलं आहे.
" झालेल्या प्रकाराने मी आणि माझें कुटुंब दहशतीत आहेत. आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, पोलिसांनी सर्वांना अटक करून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्यांना जामीन होऊ नये, अशी कडक कारवाई करावी," अशी महिलेची मागणी आहे.
पोलिसांनी या घटनेबाबत बोलताना म्हटलं की, घटनेच्या दुसऱ्या दिवशी आम्ही पीडितेच्या जवाबावरून गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचंही युसूफ वडगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी सांगितलं.
दरम्यान, यासंदर्भात महिलेनं ज्यांच्यावर आरोप केले आहेत, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्याशी संपर्क झाल्यास त्यांची बाजू इथे मांडण्यात येईल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











