लोकांना विद्वेष नको शांती हवी; राजापूर प्रकरणातून आपण काय शिकलो? - ब्लॉग

फोटो स्रोत, Getty Images
- Author, राजन इंदुलकर
- Role, बीबीसी मराठीसाठी
12 मार्च रोजी राजापूर शहरामध्ये होळी सणादरम्यान घडलेला प्रसंग हा राजापूरसाठी आणि कोकणासाठीही मानहानीकारक ठरला. होळीच्या माडाचे टोक मशिदीच्या पायरीवर शिवविण्याचे निमित्त झाले आणि भडका उडाला, दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली.
एक बरे झाले की, तणाव फार वाढला नाही. इतर ठिकाणी फारसे पडसाद उमटले नाहीत. पोलीस यंत्रणेने योग्य ती काळजी घेतली आणि शिमगा व्यवस्थित पार पडला. रमजान देखील तशाच पद्धतीने सुरळीत सुरू आहे.
लगोलग नागपूर प्रकरण घडले आणि तिकडे सर्वांचे लक्ष वेधले हे त्याचे आणखी एक कारण असेल. तरीही राजापूरचे नाव आणखी एक तणावग्रस्त ठिकाण म्हणून राज्यभर पोचले हे खरेच. वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे.
राजापूर अशांत, तणावग्रस्त असे कधीच नव्हते. हे समजून घेण्यासाठी एकूणच पार्श्वभूमी आपण पाहू.
कोकणातील शिमगा हा सण वैशिष्ट्यपूर्ण आहे. वर्षभर मनात साचलेला राग व्यक्त करण्यापासून घराघरात पुरण-पोळ्या, वडे-मटणावर ताव मारून संपूर्ण गावाने गुलाल उधळीत एकत्र येऊन मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा करावयाचा हा सण आहे.
कोकणातील प्रत्येक गावाचे असे एक दैवत असते. बव्हंशी ते स्त्री-रूपात असते. सर्वश्री जानाई, सुकाई, केलमाई, महालक्ष्मी, झोलाई, जुगाई, वाघजाई, सोळजाई, करजाई अशा नावांच्या या ग्रामदेवता असतात.
काही गावात केदार, भैरी असे पुरुष देवही असतात. गावाच्या एका बाजूला घनदाट जंगलात ही ग्रामदैवतांची मंदिरे असतात. अलीकडे जीर्णोद्धार करण्याच्या निमित्ताने मंदिराभोवतीची जंगले म्हणजेच देवराया तोडून टाकण्याची स्पर्धा गावागावात सुरू आहे ही वेगळी गोष्ट, त्यावर वेगळी चर्चा होऊ शकते.
मंदिरांमध्ये ग्राम दैवतांच्या काळ्या दगडी मूर्ती असतात. काही गावात मुख्य ग्राम दैवतांच्या जोडीला इतरही काही देव-देवता असतात. या देव-देवता जागृत मानल्या जातात. आपलं, कुटुंबाचं भलं होण्याचे नवस मनोभावे बोलले जातात.

एखाद्याचे वाईट व्हावे असे साकडे घालण्यासाठीही काही ठिकाणी तासनतास 'कळे लावणे' असे प्रकार चालतात, पण वर्षभरात इतरवेळी होळीत मात्र भले होण्याचीच मागणी असते.
फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला किंवा अलीकडे पलीकडे होळी असते. या दिवशी ग्रामदेवतांना गावाच्या मध्यभागी असलेल्या सहाणेवर वाजत गाजत आणले जाते. या सहाणेसमोर होम लागतो. दोन-तीन दिवस यात्रेच्या स्वरूपात कार्यक्रम चालू असतात.
खेळे, तमाशा, नमन असे सांस्कृतिक कार्यक्रम चालतात. पुढल्या दिवसापासून देवांची पालखी घरोघरी फिरते. हे सारे वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या चालत आले आहे.
मुंबई-पुण्यातीलच नव्हे, तर जगभरातील चाकरमानी मंडळी होमात नारळ टाकण्यासाठी, वर्षभर बंद असणाऱ्या घरात देवाचे स्वागत करण्यासाठी गावात येतात. गावांतील लोकसंख्या आता घटत चालल्या आहेत. मात्र शिमगा, गणपती इ. सणांच्या निमित्ताने का होईना गाव गजबजतो हे खरे आहे!
उत्सव आणि वाद
अर्थात हे सारे काही आलबेलच असते असे नाही. गावागावात मानपानावरून वाद असतात. वर्षानुवर्षे त्याचे दावे कोर्टात सुरू असतात. भांडणे, मारामाऱ्या होतात, डोकी फुटतात. कायदा व सुव्यवस्थेमुळे अलीकडे डोकी फुटण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
पूर्वी म्हणजे 30-40 वर्षांपूर्वी बऱ्याच गावात पालखी फिरवणे वगैरे कामे कुणबी या कष्टकरी, शेतकरी समाजाने करावी अशी प्रथा होती. जी अर्थात सरंजामी व्यवस्थेची दर्शक होती. कुणबी आणि इतर बहुजन जातींना खोत म्हणजे जमीनदार मंडळी गावकामगार म्हणत आणि स्वतःला मालक म्हणवून घेत.
अलीकडे कुणबी तसेच एकूणच बहुजन समाजात झालेल्या जागृतीमुळे त्यांनी ही अशी हलकी मानली जाणारी कामे करण्याचे नाकारले. त्यामुळे खोत मंडळीना नमते घेऊन आपापल्या वाडीत, घरी स्वतः पालखी घेऊन जावे लागते.
याशिवाय ग्रामदैवतांना घरी नेण्याचा पहिला मान कुणाचा? यावरूनही वाद सुरू असतात. वेगवेगळ्या समाजात, कुटुंबात असे वाद असतात. या अशा वादांमुळे गंभीर तणाव निर्माण होतात हे लक्षात आल्याने शासकीय यंत्रणेने ते वाद मिटावेत, शिमगा व्यवस्थित पार पाडला जावा म्हणून हस्तक्षेप सुरू केले.
शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गाव बैठका होऊन त्यात सर्व सहमती झाली या अटीवरच तणावग्रस्त गावात शिमग्याला परवानगी दिली जाऊ लागली. या अशा वादांमुळे बऱ्याच गावात आजही शिमग्यावर बंदी आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सर्वसाधारणपणे होळीच्या आधी 10 दिवस दररोज संध्याकाळी छोट्या छोट्या होळ्या पेटविल्या जातात. या कामात सहसा तरुणांचा पुढाकार असतो. ज्यात लाकडे, पेंढे पेटविले जातात. बोंबा मारल्या जातात.
30-40 वर्षांपूर्वीपर्यंत संध्याकाळी अंधार पडला की, लोकांच्या कुंपणात शिरून हाताला लागेल ते घ्यायचे आणि होमात पेटवायचे असले प्रकार चालत. मुख्यतः तरुण मंडळींचा ज्या व्यक्तीवर, कुटुंबावर या ना त्या कारणाने वर्षभर राग साचलेला असतो त्याचे उट्टे काढण्यासाठी असे केले जाई.
शिवाय अशा व्यक्तीच्या घरासमोर समूहाने जायचे आणि त्याचे नाव घेऊन मोठमोठ्याने ओरडायचे असे प्रकार चालत. अशा प्रकाराबद्दल दुसऱ्या दिवशी गावात, आळीत थोडीफार नाराजी व्यक्त व्हायची देखील, मात्र प्रकरणे फारशी ताणली जात नसत.
अलीकडे कोकणातील गावातून तरुण मंडळीच शिल्लक नसल्याने या प्रकाराना आता ओहोटी लागली आहे.


कोकणातील बहुधार्मिक उत्सव परंपरा
आजही या प्रथा नियमितपणे चालू आहेत, त्यात खंड नाही, त्याला कुणी आक्षेप घेत नाही. गावचे ग्रामदैवत हे गावातील सर्वांचे आहे अशी त्यामागील धारणा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ग्रामदैवत गावात प्रथम आले, त्यांनी गाव वसविला.
नंतर माणसे, त्यांचे धर्म, जाती, पक्ष, पंथ इत्यादी इत्यादी आले, याची जाणीव गावसमाजात खोलवर रुजलेली आहे.
राजापूर शहराचे ग्रामदैवत श्री निनादेवी, श्री देव चव्हाटा, श्री देव रवळनाथ हे आहेत. मात्र त्याबरोबरच दर पाच वर्षांनी सलग दोन वर्षे शेजारच्या श्री धूतपापेश्वराची होळीदेखील राजापूर शहरात आणली जाते.
12 मार्च रोजी अशाच पद्धतीने धूतपापेश्वराच्या होळीचा माड घेऊन लोक ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीने चालले होते. शहराच्या मध्यावर असलेल्या जवाहर चौकात मुस्लीम समाजाची जामा मशीद आहे.
त्या मशिदीच्या पायरीवर होळीच्या माडाचे टोक शिवण्याची प्रथा असताना, जाणीवपूर्वक मशिदीचे फाटकच बंद करण्यात आल्याने मिरवणुकीतील काही लोकानी ते फाटक तोडले, हंगामा झाला, दोन्ही बाजूंनी घोषणा देण्यात आल्या आणि दंगलसदृश वातावरण निर्माण झाले असे वृत्त सर्वत्र पसरले.

फोटो स्रोत, Getty Images
मुळात पायरीला माडाचे टोक शिववावे अशी प्रथाच नाही, असे मत काही ज्येष्ठ, जाणकार राजापूरकरांनी माझ्याजवळ व्यक्त केले. अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या होळीच्या माडाचे टोक पायरीला कसे काय टेकविले जाईल? असा प्रश्न त्यांनी मला विचारला, जो अत्यंत रास्त आहे.
कोकण हा सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत संपन्न मानला जाणारा प्रदेश आहे. वैविध्यपूर्ण अशा नैसर्गिक समृद्धीने नटलेला असल्याने हे वैविध्य सामाजिक, सांस्कृतिक पातळीवर देखील जोपासण्याची कला येथील माणसा-माणसात रुजलेली आहे.
कोकणात आदिलशाही, मराठेशाही, पोर्तुगीज अशा विविध राजवटी होऊन गेल्या. हिंदूंच्या विविध जाती, जमाती, मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध इत्यादी विविध समाजसमूह वर्षानुवर्षे एकत्र नांदले. कोंकणी म्हणून एक सांस्कृतिक रूप आकाराला आले.
महाराष्ट्रच नव्हे तर देशाला देखील लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, न्या. रानडे, गोपाळ गणेश आगरकर, हमीद दलवाई, एस. एम. जोशी, महर्षी कर्वे असे अत्यंत प्रगल्भ विचारांचे नेते कोकणाने दिले.
साहित्य, कला, क्रीडा इ. सर्वच क्षेत्रात कोकणाचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. येथील शिमगा, गणपती, दिवाळी, गावागावातील जत्रा, उर्स असे अनेकानेक सण अत्यंत उत्साहात आणि एकोप्याने साजरे केले जातात. हिंदू-मुस्लीम इथे एकत्र नांदतात. वाद-विवाद निर्माण झाले, तर मिटविले जातात.
चिपळूणमधील लोटनशाह दर्गा आणि सर्व जाती-धर्माच्या माणसांचा सहभाग
चिपळूण शहराच्या मध्यातील एका टेकडीवर लोटनशाह नावाचा दर्गा आहे. त्याच्या उर्सला सर्व जाती जमाती, धर्मांची माणसे हजेरी लावतात. हात जोडून मन्नत मागतात.
पूर्वी परीक्षेला जाताना मुले गावातील मारुती, गणपती, भैरी यांच्यासोबत लोटनशाहचे देखील दर्शन घेत. तेथील दगडी कडे हाताच्या मनगटावर उचलताना हलके गेले, तर पेपर सोपा जातो असा समज सर्व समाजातील मुलांमध्ये असे. हे एक उदाहरण झाले. अशी उदाहरणे गावागावात आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
शिमग्याला '..च्या नावाला ढोल' अशी बोंब मारून राग व्यक्त करत पुढे जाण्याचे दिवस आता सरले आहेत. आता धार्मिक, जातीय उन्मादाने अतिशय उग्र रूप धारण केले आहे.
सण-समारंभातील आनंद आटून जातीय, धार्मिक उन्माद माजला आहे. तो ताजा ठेवण्यासाठी खास गुंड पोसले जातात. अल्पसंख्य समाजात असुरक्षिततेची भावना वाढीला लागली आहे. याला मुख्य कारण अर्थातच धार्मिक, सांस्कृतिक जीवनातील वाढता राजकीय हस्तक्षेप आणि गावाचे गावपण संपणे हे होय.
समाजवादी विचारांचा बालेकिल्ला राजापूरमध्ये शिवसेनेचा उदय
राजापूरमधीलच उदाहरण देता येईल. राजापूर आणि कोकण हा एकेकाळी समन्वयवादी, समाजवादी विचाराचा बालेकिल्ला होता. राजापूर लोकसभा मतदार संघातून बॅ. नाथ पै तीनदा तर त्यांच्या अकाली मृत्यूपश्चात प्रा. मधु दंडवते पाच वेळा, असे हे अत्यंत जाणते, अभ्यासू आणि लोकप्रिय उमेदवार खासदार म्हणून निवडून गेले.
कालांतराने मुंबईत शिवसेनेचा उदय झाला आणि तिने कोकणातही पाय रोवले. 1995 च्या निवडणुकीत राजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विजयराव साळवी आमदार म्हणून निवडून गेले. या निवडणुकीत पूर्वाश्रमीचे समाजवादी आणि त्या निवडणुकीत काँग्रेसकडून उभे राहिलेले उमेदवार अॅड. लक्ष्मणराव हातणकर, जनता दलाकडून उभे राहिलेले समाजवादी रमाकांत मालपेकर यांचा त्यांनी पराभव केला.
तो कसा? तर, गावागावात मुंबईकरांमार्फत निरोप फिरले की, मुंबईत झालेल्या 1993 च्या हिंदू-मुस्लीम दंगलीत शिवसेनेने मुंबई वाचविली, तीच आपली तारणहार आहे.
त्याआधी एक घटना घडवून आणली गेली होती. शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कुणी तरी माथेफिरुने, चपलांचा हार घातला अशी आवई उठविण्यात आली. प्रत्यक्षात पुतळ्याच्या चौथऱ्याशी दोन बाजूला दोन चपला पडलेल्या होत्या, पुतळ्याला हार घातला ही अफवा होती.
पण या निमित्ताने धार्मिक विद्वेषाचे वातावरण निर्माण करण्यात आले. पुढे दुधाचा अभिषेक वगैरेचे उपचार पार पडले. हा प्रकार अर्थात घडवून आणलेला होता.
परिणामी हिंदू-मुस्लीम विद्वेषाचे वातावरण निर्माण होऊन शिवसेनेचा उदय होण्यास हातभार मिळाला. अर्थात, कोकणातील वाढती बेरोजगारी आणि मुंबईचा प्रभाव ही देखील त्याची कारणे होती. शिवसेनेकडे लोक मोठ्या आशेने बघत होते.

फोटो स्रोत, Getty Images
राजापूर ही एके काळी मोठी व्यापारी पेठ होती. पोर्तुगीजांनी येथे मोठी वखार बांधली होती. येथील मुस्लीम लोकसंख्या 20 टक्के आहे. त्यांचा व्यापार, राजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रात इतर जाती जमातींच्या बरोबरीचा वाटा आहे.
होळी, रमजान, ईद, दिवाळी या सणासुदीत, शादी, लग्न-समारंभात हिंदू-मुस्लिमांच्या गळाभेटी होणे, एकमेकांकडे जाऊन शीरकुर्मा, बिर्याणीचा आस्वाद घेणे, दुःखात पाठीवरून हात फिरविणे हा एकोपा पारंपरिक आहे.
लग्न, शादीप्रसंगी एकमेकांच्या घरी जाऊन पंगतीत जेवण वाढणे हे सुद्धा चालू असते. मात्र अलीकडील काळात, हे संबंध दोन्ही बाजूंनी बिघडत चालले आहेत. मुस्लीम स्त्रिया आता घराबाहेर पडताना सर्रास बुरखा घेतात.
पूर्वी म्हणजे 30-35 वर्षांपूर्वी कोकणात बुरखा पद्धत नव्हती. बुरखा पाहायला मुंबईत, भेंडी बाजारात जावे लागायचे. घराघरातील मुस्लीम तरुण आखातात नोकरी धंद्यास जाण्याचे प्रमाण वाढले आणि तेथील बुरखा घालण्याची पद्धत येथेही रुढ झाली. परस्पर प्रेम, विश्वासाचे संबंध कमी कमी होत जाऊन ते केवळ व्यवहारापूरते राहिले.
धार्मिक विद्वेष आणि राजकारण
अलीकडील काळात धार्मिक विद्वेष वाढवून बहुसंख्याकांची एकगठ्ठा मते मिळवून सत्तेवर यायचे एवढ्यापुरते राजकारण राहिलेले नाही. आलेली सत्ता टिकवण्यासाठीही असे विद्वेषाचे राजकारण केले जात आहे.
वाढती बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, लाडकी बहीण योजनेत करावी लागणारी काटछाट अशा महत्त्वाच्या मुद्यांकडून लोकांचे लक्ष वळविण्यासाठी असा उन्माद माजविला जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लीमच नव्हते, सर्व मुसलमान, पुरोगामी हे औरंगजेबाचे वंशज आहेत भाषणे मंत्रिपदावर असलेले नेते ठिकठिकाणी जाऊन देत आहेत. कबरीतील औरंगजेबाला पुन्हा जिवंत करीत आहेत.
'छावा'सारखे चित्रपट अशा विद्वेषाचा प्रपोगंडा करण्याच्या हेतूने समारंभात, शाळा-शाळांतून दाखविले जात आहेत.
समाजा-समाजात सतत ताण-तणाव निर्माण व्हावेत, कायम राहावेत ही आताच्या यशस्वी राजकारणाची रीत बनली आहे. दुसरीकडे मात्र, समाजाला एकोपा हवा असतो, स्थैर्य हवे असते, किरकोळ वाद होळीत जाळून पुढे जायचे असते.
धर्माधारीत विद्वेषाच्या राजकारणाला हे असे सामाजिक स्थैर्य नको असते. आज राजापूर मूळपदावर आले आहे. शिमगा पार पडला आहे. रमजान सुरळीत सुरू आहे.
मात्र अशा ठिणग्या टाकण्याचे प्रयत्न पुढेही होत राहतील. त्यावर मात करून लोकांत मुळची एकजीवतेची प्रवृत्ती टिकावी, अधिक वृद्धिंगत व्हावी यासाठी आता लोकानाच अधिक सक्रिय व्हावे लागेल.
(राजन इंदूलकर हे गांधीवादी कार्यकर्ते आहेत. कोकणात आदिवासी समुदायांसाठी शिक्षण आणि विविध उपक्रम राबवणाऱ्या प्रयोगभूमी या संस्थेचे ते संचालक आहेत. या लेखात त्यांनी व्यक्त केलेली मतं ही वैयक्तिक आहेत.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)












