'कोकणात जे चाललंय ते अस्वस्थ करणारं', राजापुरात होळीला मशिदीबाहेर नेमकं काय घडलं?

- Author, मुश्ताक खान, प्रियंका जगताप
- Role, बीबीसी मराठीसाठी
रत्नागिरीतील राजापूर शहरामध्ये 12 मार्चला होळी आणताना होळीचा माड जामा मशिदीच्या गेटच्या आत ढकलला जात असल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला.
यामुळे परिस्थिती गंभीर होऊन, काही काळासाठी परिसरात तणाव निर्माण झाला होता.
त्या दिवशी होळीची ही मिरवणूक नेहमीच्या मार्गानं राजापूरच्या जवाहर चौकात आलेली. या जवाहर चौकातच राजापूर शहरातील मुख्य जामा मशीद आहे.
पारंपरिक रितीरिवाजानुसार, होळीचा माड या मशिदीच्या रस्त्याजवळच्या पहिल्या पायरीवर टेकवली जातो आणि त्यानंतर होळीची ही मिरवणूक पुढं मार्गस्थ होते. त्याचवेळी ही घटना घडली.
हे संपूर्ण प्रकरण काय आहे, हे जाणून घेऊयात.
नेमकं काय घडलं?
राजापूरमध्ये, पारंपरिक रिवाजानुसार होळीचा माड मशिदीसमोर आणून रस्त्यावर ठेवण्यात आला. त्यानंतर तो उचलून जामा मशीदच्या पहिल्या पायरीला टेकवण्याच्या रिवाजाला सुरुवात झाली.
मात्र, होळीचा माड पहिल्या पायरीला टेकवण्याऐवजी तो मशिदीच्या गेटला जाऊन धडकवण्याचा प्रयत्न झाला. या वेळेला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते.
परंतु, त्यांची संख्या खूपच कमी होती. या घटनेनंतर काहींनी पालखी मागे घेण्याची सूचना केली. परंतु जमावाची मानसिकता वेगळी बनल्याचं दिसत होतं.


त्यावेळी या ठिकाणी 'जय श्रीराम' अशा घोषणा देण्यात आल्याचंही व्हायरल व्हीडिओमध्ये दिसत आहे.
मशिदीच्या गेटजवळच उपस्थित पोलीसांनी तातडीने होळीची पालखी मागे घेण्यासंदर्भातल्या सूचना केल्या. परंतु प्रचंड जमाव असल्यानं त्या ठिकाणी होळीचा माड पुन्हा एकदा गेटमधून आत ढकलण्यात आला.
ज्येष्ठ मंडळींनी या ठिकाणी हस्तक्षेप केल्यानंतर लोक पुढे सरकले.

या सर्व प्रकारामुळे तणाव निर्माण झाला. शिवाय, या घटनेचा व्हीडिओदेखील व्हायरल झाला. त्यामुळे, राज्य आणि देश पातळीवरुन विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाचे विधीज्ञ ॲड.ओवेस पेचकर यांनी या घटनेसंदर्भात रत्नागिरी पोलीस अधीक्षक आणि राजापूर पोलीस निरीक्षकांना तक्रार पत्र पाठवलंय.
या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर तातडीनं कारवाई करण्यात यावी अशी मागणीसुद्धा त्यांनी आपल्या पत्रामध्ये केली आहे.
या पार्श्वभूमीवर राजापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 324 (1), 329 (3), 189 (2), 190 व 135 या कलमा अन्वये 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक काय म्हणाले?
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या घटनेबद्दल बीबीसी मराठीला माहिती दिली आहे.
ते म्हणाले, "रत्नागिरीमध्ये शिमगा उत्सव जोरात साजरा केला जातो. राजापूरमध्ये एक प्रथा आहे की होळीचा माड जो असतो त्याची गावभर मिरवणूक काढतात. त्यावेळी ती गावातील प्रार्थनास्थळांच्या पायऱ्यांवर टेकवली जाते आणि पुढे जाते.
तर त्या अनुषंगानं समाज माध्यमांवर काही ठिकाणी प्रार्थनास्थळांवर हल्ला असा उल्लेख केलेला आहे. मात्र अशा प्रकारचा कोणताही हल्ला राजापूरमध्ये झाला नाही."
तसंच काही तरुणांनी तिथं गोंधळ निर्माण करायचा प्रयत्न केलेला, त्यांच्यावर कारवाई केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले,"काही तरुणांनी तिथं नक्कीच हुल्लडबाजी केली, काही मुलांनी तिथं घोषणा दिल्या. त्यामुळे पोलिसांनी स्वतःहून फिर्यादी होऊन, त्यांच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. ज्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग त्यांनी केला आहे त्या संदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे."
शिवाय,अजून पुढचे काही दिवस तिथं होळीचा उत्सव साजरा केला जाणार आहे तर पोलिसांनी त्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला असल्याचंही त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे.
तसंच या घटनेसंदर्भात,पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी काही लोकांशी बैठका देखील घेतल्या असून त्यांची समजूत काढायचं काम देखील केलं आहे.
कोकणाची बदनामी नको- निलेश राणे
दरम्यान राजापूरमधील या घटनेवर आमदार निलेश राणे यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी राजापूर तसेच कोकण शांत असल्याचं सांगत, अशा प्रकारची कोणतीही गंभीर घटना घडली नसल्याचं व्हीडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे.
ते म्हणालेत, "राजापूरमध्ये जी घटना घडली आणि ती ज्या पद्धतीनं काही नेत्यांच्या आणि पत्रकारांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात आली तर तसं काही राजापूरमध्ये घडलेलं नाही.
धोपेश्वरची ही आमची पारंपारिक होळी सर्वात मोठी मानली जाते. धोपेश्वराची पालखी दर पाच वर्षांनी निघते. ती जिथून निघते तो तिचा दरवेळेचा ठरलेला मार्ग असतो, तो काही आत्तापासून सुरू झालेला नाही. तो वर्षानुवर्ष चालत आलेला आहे.

फोटो स्रोत, twitter/nileshrane
या वर्षी त्या मार्गावरून जात असताना एका विशिष्ट ठिकाणी जिथं होळी नेहमी थांबते, तिथं ती थांबली तेव्हा गेट बंद होतं. तर गेट का बंद होतं? त्यावरून इकडूनही घोषणा दिल्या गेल्या आणि तिकडूनही घोषणा दिल्या गेल्या.
त्यावेळी इकडूनही बाचाबाची झाली आणि तिकडूनही बाचाबाची झाली. मग पोलीस आले आणि त्यांनी ती परिस्थिती सांभाळली. आता ते प्रकरण पोलीस स्टेशन मध्ये गेलं," असं ते म्हणालेत.
तसंच काही लोक जाणीवपूर्वक राजापूर आणि कोकण पेटलं असल्याचं समाज माध्यमांवर पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
ते म्हणाले, "माझी विनंती आहे काही पत्रकारांना आणि त्या सगळ्यांना जे समाज माध्यमांवरून कोकण पेटलं असं पसरवत आहेत. तर असं काही झालेलं नाही. नको त्या गोष्टी पेटवायचा प्रयत्न करू नका. राजापूर शांत आहे, कोकण शांत आहे.
इकडे कोकणामध्ये सगळे सण हे आनंदानं साजरे होतात आणि आनंदानेच साजरे होतील. आम्ही असेपर्यंत कधी कोणती घटना घडून सणांमध्ये व्यत्यय येईल असं होणार नाही."

तसंच दोन्हीही बाजूचे काही लोक वातावरण खराब करायचा प्रयत्न करत होते असा आरोपही त्यांनी केला आहे.
ते म्हणाले, "गरमागरमी करणारे काही लोक दोन्ही बाजूला होते, त्यांना काहीतरी घडवायचंच होतं. पण ते सगळं पोलिसांनी आटोक्यात आणलं.
शांतता राखण्यासाठी पोलीस स्पीकर्स वगैरे घेऊन निघतात, तर काही लोकांनी तेवढेच व्हीडिओ घेतले आणि राजापूर पेटलं, रत्नागिरी पेटलं, कोकण पेटलं असं समाज माध्यमांवर चालवलं. पण असं काहीच झालं नाही."
पुढं ते म्हणाले, "दुसऱ्या दिवशी परत सगळे लोक एकत्र बसले. कारण कोकणात आणि खास करून रत्नागिरीमध्ये आम्ही शिमगा हा सण खूप मोठा साजरा करतो. इतके वर्ष काही झालं नाही, पुढेही काही होणार नाही आणि आम्ही होऊ देणार नाही. त्यामुळे उगाच कोकणाची बदनामी करायचा जे कोणी प्रयत्न करत आहेत तर त्यांनी ते थांबवावं."
काही स्वयंघोषित पत्रकार वातावरण चिघळवायचा प्रयत्न करत आहेत असंही त्यावेळी म्हणाले. पुढं ते म्हणाले, "मी सगळ्यांशी बोललो आहे. त्यांना हे सांगितलंय की पत्रकारांना आणि नेत्यांना काही होत नसतं.
मात्र, यात आपली गरीब पोरं यात हकनाक अडकली जाणार, त्यांच्यावर केसेस होणार, त्यांचे आईवडील रडणार त्यांच्या बहीणींची लग्नं होणार नाहीत. या केसेसमध्ये दहा-दहा वर्ष आपली पोरं अडकणार, हे जर नको असेल आताच या गोष्टी दोन्ही बाजूंनी समजून घ्याव्यात."
कोकणात जे चाललंय ते अस्वस्थ करणारं- प्रवीण बांदेकर
सिंधुदुर्गमध्ये राहणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण बांदेकर यांनी बीबीसी मराठीशी या घटनेसंदर्भात चर्चा केली आहे.
ते म्हणाले, "या घटनेत नेमका कुणाचा दोष आहे, हे आताच सांगता येणार नाही. मात्र अलीकडच्या काही दिवसांपासून कोकणात जे काही चाललं आहे ते कुणालाही अस्वस्थ करणारंच आहे.
आमचं कोकण विशेषतः दक्षिण कोकण अतिशय शांत आहे. कित्येक पिढ्यांपासून आम्ही वेगवेगळ्या धर्मांचे लोक एकमेकांना सहकार्य करून गुण्यागोविंदाने राहतोय."

फोटो स्रोत, Getty Images
"आमच्यात कधी वितुष्ट येऊन धार्मिक दंगली झाल्याचं मला आठवत नाही. मात्र, आता जे चाललंय त्यामुळे सगळेच लोक विशेषतः मुस्लीम समाजाचे लोक जास्त अस्वस्थ आहेत.
कोकणात निवडणुकीच्या तोंडावर कधी कधी काही वाद व्हायचे, पण त्याला धार्मिक रंग कधीच आले नव्हते. आमच्या कोकणात तर सगळ्याच धर्माचे सण हे एकमेकांशी संबंधितच आहेत, सगळ्या सणांमध्ये दोन्ही धर्माच्या लोकांचा काही ना काही सहभाग असतोच." असंही पुढं ते म्हणाले.
राजापूरच्या घटनेवेळीही याच परंपरेचं पालन केलं जात होतं. होळीला पालख्या मशीदीसमोर टेकवायची प्रथा आहेच, असं बांदेकर सांगत होते.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले, "मात्र, केवळ राजकीय हेतूनं दोन्ही धर्मातील लोकांना एकमेकांच्या विरोधात उभं करणार असू तर समाज म्हणून आपण अतिशय धोकादायक वळणावर आलेलो आहेत असं माझं स्पष्ट मत आहे.
कोकणात मागच्या काही महिन्यांपासून छोट्या छोट्या गोष्टींवरून एका विशिष्ट समाजाला वेठीस धरलं जातंय ते चुकीचं आहे. कारण त्यामुळे दोन्ही समाजातील लोक आता एकमेकांकडे संशयानं बघायला लागले आहेत.
शिवाय कोकणातले छोटे छोटे जे व्यवसाय आहेत ते एकमेकांवर अवलंबून आहेत. दोन्ही धर्मातील लोकांनी एकमेकांची गरज पडते. मात्र अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करून दोन्ही धर्मातील लोकांचा आर्थिक तोटाच होणार आहे."
तुम्ही मुस्लीम धर्मातील लोकांची आर्थिक कोंडी करायला गेलात तर तुम्हाला त्याला पर्याय द्यावा लागणार आहे कारण काही व्यवसाय फक्त मुस्लीम समाजाचेच लोक करतात", असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
अशा काळात बुद्धिजिवी लोक, लेखक, कलावंत यांनी एकत्र येऊन या आगीत तेल न ओतता हे थांबवण्याचा प्रयत्न करायला हवा, असं देखील बांदेकरांना वाटतं.
ते म्हणाले, "मागे आम्ही काही बुद्धिजिवी लोक जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो होतो, निवेदन दिलेलं की अशा प्रकराच्या ज्या घटना घडत आहेत त्यावर कुठेतरी प्रशासन म्हणून तुमचंही नियंत्रण यायला पाहिजे.
राजापूरमध्ये जे घडलं ते काही एकाएकी घडलेलं नाही - सरफराज अहमद
इतिहास अभ्यासक सरफराज अहमद यांनी बीबीसी मराठीशी या घटनेवर चर्चा केली. 'गायपट्ट्यात जे काही होतं अगदी त्या पद्धतीनं कोकणात घडवलं जातंय', असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
ते म्हणाले, "मागच्या अनेक वर्षांपासून सनातन संस्थेचा प्रभाव त्या पट्ट्यात आहे. राजापूरमध्ये जे घडलं ते काही एकाएकी घडलेलं नाही. मागच्या काही वर्षांपासून अशी मानसिकता घडवली जात होती.

फोटो स्रोत, Getty Images
हे सगळं होत असताना अशा प्रकरांकडे धर्मनिरपेक्ष संघटना, संस्था, पक्ष यांनी दुर्लक्ष केलंय. आज त्याचे परिणाम दिसत असताना त्या बाबत काळजी किंवा चिंता व्यक्त केली जात आहे.
मात्र, मागच्या काही वर्षात ही मानसिकता घडत असतानाच जर तिला रोखलं असतं तर आज परिणाम वेगळे दिसले असते."
"अगदी आताही नितेश राणेंसारखे लोक जे जे उद्योग करतात, तर त्याच्याविरोधात धर्मनिरपेक्ष किंवा लोकशाहीवादी लोकांचा कृतीशील काही कार्यक्रम आहे का, मला तर तो कुठेच दिसत नाही."

दोन्ही बाजूनं जर घोषणाबाजी झाली असल्याचा दावा नितेश राणेंनी केला आहे. यावरही त्यांनी भाष्य केलं आहे.
ते म्हणाले, "सध्या जो व्हीडिओ समाजमाध्यमांवर फिरत आहे, त्यात फक्त मुसलमानच हताशपणे उभे असलेले दिसत आहेत. मात्र तरीही प्रत्येक घटनेत चूक जर मुसलमानांचीच असेल तर मुस्लीम समाजावर अन्याय होतो, ही जी मांडणी आहे तीच चुकीची ठरते.
त्यामुळे दोन्ही बाजूनं जर घोषणाबाजी झाली असेल तर पोलिसांनी आणि नितेश राणेंनी तसा व्हीडिओ समोर आणावा. कारण त्यानं काहीतरी मदतच होणार आहे. हिंदूंची तरी बदनामी का व्हावी?"
"याक्षणी ज्या समाजावर अन्याय होतोय, त्या समाजाच्या चुका शोधत बसण्यापेक्षा त्यांच्यावरचा अन्याय आधी कसा दूर होईल यासाठी प्रयत्न व्हायला हवेत", असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)












