छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहून बादशाह अकबरांविषयी काय म्हटलं होतं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नितिन श्रीवास्तव
- Role, संपादक, बीबीसी हिंदी
अलीगढ, हे आज तसं गजबजलेलं शहर आहे. शिक्षणाच्या माध्यमातून या शहरानं गेल्या दीडशे वर्षात फक्त भारतच नाही तर जगभरात ठसा उमवटला आहे.
अलीगढमधील मोहमेडन अँग्लो-ओरिएंटल कॉलेज आजही त्याची ओळख टिकवून आहे. हेच कॉलेज नंतर अलीगढ मुस्लीम विद्यापीठ (AMU)या नावानं ओळखलं जाऊ लागलं.
अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचा परिसर अतिशय सुंदर आहे. या कॅम्पसपासून फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर या शहराचा जुना परिसर आहे. त्याचं नाव आहे बदरबाग.
या परिसरातील गल्ल्या, रस्ते आज अरुंद वाटतात. कारण तिथले बहुतांश जुने, मोठे बंगले विकले गेले आहेत. तिथे आता प्लॉटिंग झाली आहे. त्या प्लॉट्सवर तीन-चार मजली इमारती आणि फ्लॅट बांधले गेले आहेत.
मात्र आजही या भागात जुन्या काळाच्या पाऊलखुणा दिसतात. 1931 मध्ये जवळपास 12 एकरमध्ये बांधण्यात आलेल्या ब्रिटिश शैलीतील एका बंगल्याचं प्रवेशद्वार आजही उघडं असतं. प्रसिद्ध इतिहासकार आणि प्राध्यापक इरफान हबीब याच बंगल्यात राहतात.
"तुम्हाला माहीत आहे, अलीगढचं खरं नाव काय होतं?", असं इरफान हबीब यांनी मला विचारलं. तेव्हा आम्ही दोघं, गुलाब, गुलदाउदी आणि बोगनवेलियाच्या फुलझाडांनी भरलेल्या सुंदर बागेत उभे होते.
प्राध्यापक इरफान हबीब आता 94 वर्षांचे झाले आहेत. अनेक वर्षे ते अलीगढ मुस्लीम विद्यापीठात इतिहास विभाग प्रमुख होते. आता ते 'प्रोफेसर इमेरिटस' आहेत.
भारताच्या जडणघडणीकडे आणि सद्यपरिस्थितीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन अतिशय स्पष्ट आणि परखड आहे.

बीबीसीला दिलेल्या विशेष मुलाखतीत विविध मुद्द्यांबाबत त्यांनी मतं मांडली. भारताची वैशिष्ट्ये, इतिहास काळातील सहिष्णू भारत, विविध काळातील भारतीय राज्यकर्त्यांचं धर्माबाबतचं धोरण, छत्रपती शिवाजी महाराज, बादशाह अकबर आणि सम्राट अशोक यांचा सर्वसमावेशक राज्यकारभार यावर इरफान हबीब बोलले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहून बादशाह अकबरानं अंमलात आणलेल्या सहिष्णू आणि सर्वधर्मसमभावाच्या धोरणाची आठवण करून दिली होती, याचाही उल्लेख करत त्याचं महत्त्व इरफान हबीब यांनी स्पष्ट केलं.
याशिवाय इतिहासाकडे पाहण्याचा आणि त्याचा अभ्यास करताना आवश्यक असलेला दृष्टीकोन, भारताचं मोठेपण आणि या सर्व मुद्द्यांचा सध्याच्या काळातील संदर्भ, अलीकडे होत असलेले वाद, यावर प्राध्यापक इरफान हबीब सविस्तर बोलले. बीबीसी हिंदीचे संपादक नितिन श्रीवास्तव यांनी घेतलेल्या या विशेष मुलाखतीबद्दल...


'अलीगढ हे नाव मराठ्यांनी दिलं होतं'
अलीगढबाबतच्या प्रश्नात मी माझा मुद्दादेखील जोडला, "फैजाबाद जिल्ह्याचं नाव आता अयोध्या झालं आहे. इलाहाबादचं नाव प्रयागराज झालं आहे. सेंट्रल दिल्लीतील औरंगजेब रोड आता फक्त पुस्तकातच राहिला आहे. याची खरोखरंच आवश्यकता होती का? की इतिहासात असे बदल नेहमीच होत आले आहेत?"
त्यावर इरफान हबीब म्हणाले, "अलीगढचं जुनं नाव कोल होतं, रामगढ नव्हतं. पुढच्या काळात कोल हे नाव राहिलं नाही, कारण ते कोणत्यातरी देवतेचं नाव होतं, ज्याला कृष्णानं मारलं होतं."

ते पुढे म्हणाले, "मुघलांच्या काळात या शहराचं नाव कोल होतं. मात्र 1780-81 च्या जवळपास दिल्लीत मराठ्यांचं वर्चस्व वाढलं. तेव्हा त्यांनी या शहराला अलीगढ हे नाव दिलं. शिंद्यांनी इथे छावणी बनवली होती."
"ती कायमस्वरुपी छावणी होती, ज्यात फ्रान्सचे सैन्याधिकारी देखील होते. त्यांनी या परिसराला आणि किल्ल्याला अलीगढ हे नाव दिलं होतं."

इरफान हबीब सांगतात, "काही जणांचं म्हणणं आहे की अलीगढ हे नाव शिंद्यांचे सेनापती, नजफ अली खान यांच्या नावावरून देण्यात आलं होतं. मात्र त्याचा कोणताही ठोस ऐतिहासिक पुरावा नाही."
गेल्या दशकभरापासून भारतातील शहर-रस्त्यांची नाव बदलली जात आहेत. त्यावर प्राध्यापक इरफान हबीब यांना आक्षेप या गोष्टीविषयी वाटतो की, "यामागे एक कम्युनल किंवा सांप्रदायिक हेतू दिसतो, तो चुकीचा आहे."
हिवाळा संपत आला आहे आणि प्राध्यापक हबीब यांच्या बागेतील चिमण्यांच्या चिवचिवाटात, एका वडाच्या झाडाजवळून दोन मोर आमच्याकडे टक लावून पाहत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचं औरंगजेबाला पत्र
गेल्या जवळपास दशकभरापासून भारतातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'अभ्यासक्रमातून मुघलांबद्दल' शिकवण्यात यावं की नाही, याबद्दल चांगलाच वाद सुरू आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं (NCERT)मुघल इतिहासाशी निगडित अनेक गोष्टी शालेय पाठ्यपुस्तकातून वगळण्याचे निर्णय घेतले आहेत.
जवळपास 300 वर्षे भारतावर राज्य करणारे मुघल भारतीय इतिहासाचा महत्त्वपूर्ण भाग आहेत.
टीकाकारांना वाटतं की भारताच्या इतिहासाचा इतका प्रदीर्घ काळ कमी करण्याचे किंवा नष्ट करण्याचे प्रयत्न एखाद्या 'राजकीय हेतूनं प्रेरित आहेत'.
मात्र याच्या समर्थकांचा दावा आहे की ही पावलं अभ्यासक्रम "तर्कसंगत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांवरील ओझं कमी करण्यासाठी आवश्यक आहेत."
उदाहरणार्थ, 2017 ते 2022 दरम्यान महाराष्ट्रासह भारताच्या अनेक राज्यांमधील काही शाळांमध्ये मुघलांच्या इतिहासाचा अभ्यासक्रम पूर्णपणे काढून टाकण्यात आला होता.

फोटो स्रोत, ANI
महाराष्ट्राचा विचार करता, बहुतांश ठिकाणी अभ्यासक्रम छत्रपती शिवाजी महाराजांवर केंद्रित आहे.
17 व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांचा पराभव करून मराठा साम्राज्याचा पाया घातला होता. त्यांनी महाराष्ट्रासह भारताच्या इतर भागावर राज्य केलं होतं.
मुघलांचा अभ्यासक्रम हटवण्याचं समर्थन करणारे आरोप करतात की प्राध्यापक इरफान हबीबसारख्या मार्क्सवादी इतिहासकारांनी त्यांच्या दृष्टीकोनातून इतिहास लिहिला आहे.
त्याला उत्तर देताना इरफान हबीब म्हणाले, "तसं तर आता जग बदललं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिलेलं एक पत्र अतिशय प्रसिद्ध आहे. या पत्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला सांगितलं आहे की तुम्ही अकबराचं धोरण अंमलात आणलं पाहिजे."
"हे खोटं आहे की खरं आहे हे मला माहित नाही. मात्र ते औरंगजेबाच्या काळापासून प्रचलित आहे."

ते म्हणाले, "दुसरा मुद्दा, छत्रपती शिवाजी महाराज स्वत: सर्व धर्मांचं रक्षण करायचे. एका बाजूला त्यांचं औरंगजेबाशी युद्ध सुरू होतं. तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचे प्रमुख इब्राहिम अली होते. महाराजांच्या गुप्तहेर विभागाच्या प्रमुखाचं नाव हैदर अली होतं."
ते पुढे म्हणाले, "अकबराच्या दरबारात मान सिंह होते. ते राजपूत होते. बादशाह अकबरनं त्यांना काबूलचा पहिला सुभेदार बनवलं होतं. अर्थात त्याकाळचा हिंदुस्तान वेगळा होता आणि अफगाणिस्तानदेखील वेगळा होता."
ते म्हणाले, "तुम्ही अकबर आणि मान सिंह यांचा उल्लेख केल्याशिवाय महाराणा प्रताप यांचं चरित्र कसं लिहणार? इतकंच नाही, तर मध्ययुगात, औरंगजेबाच्या काळात जेव्हा युरोपियन प्रवासी भारतात आले, तेव्हा त्यांना अजिबात वाटलं नाही की हिंदूंवर अत्याचार होत आहेत."
"उलट त्यांना या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की हा तर वेगळाच देश आहे. इथे हिंदू आहेत, मुस्लीम आहेत, ख्रिश्चन आहेत आणि सर्वकाही चांगल्या प्रकारे सुरू आहे."
सम्राट अशोक आणि बादशाह अकबर
रफान हबीब यांच्या वडिलांनीच त्यांना सम्राट अशोकचे शिलालेख किंवा इनस्क्रिप्शन वाचवण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं. त्यामुळेच इरफान हबीब यांनी लहानपणीच फारसी भाषेव्यतिरिक्त ब्राह्मी लिपी (धम्म लिपी) आणि संस्कृत भाषेवर चांगली पकड मिळवली होती.
सध्याच्या काळात भारतात भाषांवरून चांगलेच वादविवाद होत आहेत.
काही राज्यांमध्ये उर्दू भाषा, 'मुघलांची आणि परदेशी आक्रमकांची भाषा' असल्याचं सांगितलं जातं आहे.
तर दुसरीकडे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी सिंधू संस्कृतीच्या काळातील प्राचीन लिपी वाचून, तामिळनाडूत मिळालेल्या प्राचीन लिपीशी त्याचा संबंध असल्याचे पुरावे सादर करणाऱ्याला 10 लाख अमेरिकन डॉलरचं बक्षीस जाहीर केलं आहे.
इरफान हबीब यावर म्हणाले, "याबाबतीत आपला देश युरोप किंवा मध्यपूर्व (आखात) पेक्षा कितीतरी चांगला आहे. इथे शेकडो भाषा-बोलींनी जन्म घेतला. एकमेकांशी जुळवून घेतलं आणि राज्यकर्त्यांनी, मग ते हिंदू असो मुस्लीम असो ब्रिटिश असो, त्यांनी या भाषांचा वापर राज्यकारभारापासून व्यापारापर्यंत सर्व गोष्टींसाठी केला."
ते म्हणतात, "आज तुम्ही भाषेला एखाद्याची मक्तेदारी कसं काय ठरवू शकता. हे सर्व माझ्या आकलनापलीकडचं आहे. इतिहासकार इतिहासाकडे राजकीय विचारांनी नाही तर त्या काळातील दृष्टीकोनातून पाहतात."

ते पुढे म्हणाले, "लिहिण्याची कला, आपल्याला सम्राट अशोकानं दिली आहे आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. आता मी पाहतो आहे की यूजीसीच्या अभ्यासक्रमात, ते ही गोष्ट विसरले आहेत."
"अशोकचा थोडाफार उल्लेख करण्यात आला आहे. मात्र तुम्ही लिहिण्याची कला, जी हिंदूस्थानात आली, ज्याला लिपी म्हणतात, त्याबद्दल तुम्ही संपूर्ण अभ्यासक्रमात बोलता आणि याचाच उल्लेख कुठे करत नाही."
मौर्य साम्राज्याचा राजा अशोक, प्राध्यापक हबीब यांचा आवडता राज्यकर्ता आहे. त्याबद्दल मी विचारलं की, "तुम्ही तर आधी हिंसक असलेल्या आणि नंतर शांततेचे दूत बनलेल्या सम्राट अशोकापासून ते अकबर आणि आतापर्यंत संशोधन केलं आहे. मग त्यात किती आणि काय फरक आहे?"
"कारण जर तुम्ही जर इतर गोष्टी पाहिल्या, मनुस्मृती पाहिली, गुप्त काळाचं उदाहरण पाहिलं, तर त्यात ही गोष्ट दिसत नाही. मनुस्मृतीमध्ये तर शिक्षा देखील जातीच्या आधारे देण्यात येण्याच्या तरतुदी सापडतात."
'सेक्युलॅरिझमची सुरुवात आधी इथेच झाली'
इरफान हबीब यांनी मुघलांच्या इतिहासावर ऑक्सफर्ड विद्यापीठात संशोधन केलं आहे. त्यांनी त्या काळातील कृषी व्यवस्था, जातीव्यवस्था आणि परदेशी प्रवाशांवर अनेक पुस्तकं देखील लिहिली आहेत.
हे देखील खरं आहे की मधल्या काळात इरफान हबीब भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते.
त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचं मत आहे की 'स्वत: इरफान हबीब आणि इतर अनेक इतिहासकारांनी स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतातील मोठ्या विद्यापीठांमध्ये आपल्या दृष्टीकोनातून संशोधन करवलं. त्यात मुघल आणि मुस्लीम राज्यकर्त्यांचं गरजेपेक्षा जास्त कौतुक केलं गेलं.'
इरफान हबीब यांना आणखी एका मुद्द्याबद्दल प्रश्न विचारणं आवश्यक होतं. ते म्हणजे इतिहासकारांनुसार ज्या अकबराच्या दरबाराच्या दरबारात दीन-ए-इलाही सारख्या धर्मावर चर्चा होत असे, जिथे सर्व धर्मांचं संरक्षण करण्याचा आदेश दिला जात होता, त्यावर सध्याच्या काळातील काही इतिहासकार प्रश्न का उपस्थित करत आहेत?
यावर प्राध्यापक हबीब यांनी उत्तर दिलं की, "एक काळ असा होता की काँग्रेसचे मोठे नेते असलेले सुरेंद्र नाथ बॅनर्जी साहेब ब्रिटिश शासक, लॉर्ड कर्झनला भेटायला गेले होते."
"त्यावर कर्झननं स्वत: लिहिलं आहे की एका मुद्द्याबद्दल बोलताना बॅनर्जी त्यांना म्हणाले की, "आमच्या देशात अशोक आणि अकबरासारखे राज्यकर्ते झाले आहेत. आता ब्रिटिश सरकारनं देखील तसा राज्यकर्ता द्यावा. लॉर्ड कर्झननं ती बाब नोंदवून घेतली. ही 1903 किंवा 1904 ची गोष्ट आहे."

प्राध्यापक हबीब यांच्या या उत्तरावर मी लगेचच विचारलं की, "जे लोक अभ्यासक्रम तयार करत आहेत, त्यांचं म्हणणं आहे की मुघलांच्या इतिहासाला खूपच भव्यदिव्य पद्धतीनं दाखवलं गेलं."
"अकबर किंवा मध्ययुगीन काळाला किंवा मुघलांना ज्या पद्धतीनं दाखवण्यात आलं, ती एक लिबरल मार्क्सिस्ट मांडणी होती. ती ब्रिटनपासून प्रेरित होती. ब्रिटिश इतिहासकारांकडून प्रेरित होती किंवा पाश्चिमात्य विचारसरणीच्या प्रभावाखाली होती. या दृष्टीकोनामुळे खरा इतिहास दडवण्यात आला?"
यावर इरफान हबीब यांनी उत्तर दिलं की, "असं म्हणणारे लोक जर बॅनर्जींपेक्षा जास्त राष्ट्रवादी असतील तर त्यांचं मत त्यांनाच लखलाभ. मात्र बॅनर्जी तर इंग्रजांबरोर नव्हते. टिळकदेखील इंग्रजांच्या बाजूचे नव्हते. त्या सर्वांसाठी देश, सहिष्णुता आणि त्याचे यश महत्त्वाचे होते."
"जगात जेव्हा कोणीही हिंदुस्तानचं कौतुक करतो, तेव्हा अशोक आणि अकबराचा उल्लेख नक्की होतो."
ते पुढे म्हणाले, "अबुल फजल अकबराचे मंत्री होते. त्याचं तर असं म्हणणं होतं की धर्मामध्ये लोकांनी हस्तक्षेपच करू नये. त्यावेळस सेक्युलॅरिझम होता. इतंकच काय त्यांनी पैंगबर आणि खलिफांवर देखील टीका केली होती."
"आपल्या देशात या गोष्टी घडल्या होत्या. जेव्हा जगात इतर कोणीही धर्माबद्दल बोलत नव्हता, तेव्हा आपल्या देशात याची सुरुवात झाली, याचा कोणत्याही देशाला अभिमान वाटेल."
अनेक प्रसिद्ध व्यक्तींचं हबीब यांच्या घरी येणजाणं
भारतात ब्रिटिश राजवटीच्या काळात इरफान हबीब यांच्या घराच्या आवारातील बागेला अनेक मोठ्या लोकांनी भेट दिली आहे.
इरफान हबीब यांचे वडील, मोहम्मद हबीब, हे देखील अलीगढ मुस्लीम विद्यापाठीत मध्युयगीन इतिहासाचे प्राध्यापक होते. ते काँग्रेस पक्षाचे सदस्यदेखील होते.
प्राध्यापक इरफान हबीब यांची स्मरणशक्ती या वयातदेखील अतिशय उत्तम आहे.
ते स्मित हास्य करत म्हणाले, "लहानपणी, एकदा मी आणि माझा मोठा भाऊ या इथे, लॉनमध्येच बॅडमिंटन खेळत होतो. त्याचवेळी जवाहरलाल नेहरू यांना घेऊन आलेला एक टांगा तिथे थांबला. ते एकटेच आत गेले आणि माझ्या वडिलांना म्हणाले, हबीब माझ्यासाठी एक ऑमलेट बनवा."
यानंतर कित्येक वर्षांनी याच घरातील ग्रंथालयाबद्दलचा एक किस्सा आठवत इरफान हबीब म्हणाले, "पंडित नेहरू तिथे बसले होते. तेव्हा माझे वडील म्हणाले, जर आपण क्रिप्स मिशन मान्य केलं असतं तर दुसऱ्या महायुद्धानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं असतं."

इरफान हबीब म्हणाले, "नेहरूजी यावर खूपच नाराज झाले आणि म्हणाले, 'यू आर अ प्रोफेसर हबीब, अँड यू विल ऑलवेज बी ए फूल.' आम्ही तर त्यावेळेस खूपच लहान होतो, मात्र ही गोष्ट आम्हाला खूपच विचित्र वाटली की आमच्या वडिलांना कोणी मूर्ख कसं म्हणू शकतो!"
1947 मध्ये देशाची फाळणी होण्याच्या काळातील दिवसदेखील इरफान हबीब यांना चांगलेच आठवतात. कारण, "अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची संख्या 3,000 वरून कमी होत फक्त 800 राहिली होती. बहुतांश विद्यार्थी पाकिस्तानात निघून गेले होते. मात्र विद्यापीठातील शिक्षण सुरू होतं."
हबीब म्हणाले, "पश्चिम उत्तर प्रदेश आणि विशेषकरून अलीगढमध्ये जातीयवादी हिंसाचार झाला नव्हता, ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे. सरदार पटेल यांनी खबरदारीचा उपाय म्हणून तिथे कुमाऊ रेजिमेंट देखील तैनात केली होती."
देशभक्तीचा अर्थ काय आहे?
इरफान हबीब यांच्याशी सध्याच्या काळातील राजकीय आणि शैक्षणिक मुद्द्यावर चर्चा सुरू असल्यामुळे, राष्ट्रवाद विरुद्ध देशभक्तीचा मुद्दा त्या निघणं स्वाभाविकच होतं.
हिंदी चित्रपटांपासून रेडिओ प्रसारणांपर्यंत, शाळेतील वादविवाद स्पर्धांपासून मासिकांच्या कव्हर स्टोरीपर्यंत सर्वत्र या मुद्द्यावर जोरदार चर्चा सुरू आहे.
एका गटाचं मत आहे की भारतात या दोन्ही गोष्टींना 'मुद्दामहून' एकमेकांमध्ये मिसळण्यात आलं.
त्यांना वाटतं की त्यामुळेच आतापर्यंत बहुसंख्यांक समुदायाला त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी कमी व्यासपीठ, संधी मिळाली.
तर दुसरीकडे, टीकाकारांना वाटतं की सध्याच्या काळात 'लोक देशभक्ती आणि राष्ट्रवादाच्या नावावर इतर अल्पसंख्यांक समुदायांवर कुरघोडी करण्याचा किंवा त्यांचं दमन करण्याचा' प्रयत्न करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
इरफान हबीब यांचं मत आहे की, "देशभक्तीचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही फक्त तुमच्या देशाचं कौतुकच करत जावं. माझा देश चूक की बरोबर कसाही असो, मी त्याच्यासोबत आहे, ही काही देशभक्ती नाही. माझा देश अधिकाधिक चांगला झाला पाहिजे, ही खरी देशभक्ती आहे."
ते पुढे म्हणाले, "भारतीय इतिहासात राज्यकर्ते हिंदू असोत की मुस्लीम असोत, जवळपास सर्वांमध्ये सहिष्णुता होती. ही जगातील सर्वात अद्भूत गोष्ट होती."
त्यांनी सांगितलं, "जगातील सर्व धर्मांवर जे पुस्तक लिहिलं गेलं, ते हिंदुस्तानात लिहिलं गेलं होतं. शहाजहानच्या राजवटीत ते लिहिलं गेलं होतं. त्यात पारशी, ख्रिश्चन,इस्लाम, हिंदू, जैन सर्वच धर्मांचा उल्लेख होता."
"जर तुम्ही ही गोष्ट विसरलात किंवा बाजूला सारली तर त्यात आपल्याच देशाचं कौतुक, महत्त्व कमी होतं. आपल्या देशाच्या महान गोष्टी आपणच विसरत चाललो आहोत," असं इरफान हबीब म्हणाले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











