सोंडेघर : दंगल होऊ नये म्हणून हिंदू-मुस्लिमांमध्ये 100 वर्षांचा करार

- Author, मुश्ताक खान
- Role, बीबीसी मराठीसाठी, सोंडेघरहून
रत्नागिरी जिल्ह्यातील मुक्काम पोस्ट सोंडेघर गावची लोकसंख्या केवळ हजाराच्या आसपास आहे. गावात सर्व जाती धर्माची लोकं एकोप्यानं राहतात.
भविष्यातही गावामध्ये धर्मिक किंवा जातीय तंटे होऊ नयेत यासाठी गावानं एकत्र येत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गावातील सर्व धर्मिय ग्रामस्थांनी जातीय सलोखा न बिघडवण्याचा 100 वर्षांचा लेखी करार केला आहे. त्यांचा हा निर्णय संपूर्ण देशासाठी आदर्शवत असा आहे.
"साने गुरूजी दापोलीतील ए. जी. हायस्कूलमध्ये शिकायला जा-ये करत असताना या गावातील नदी पार करून पुढे पालगडला जात. पुढे जाऊन साने गुरूजींनी, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा संदेश दिला. ही प्रेरणा घेत आम्ही पुढे जात आहोत." गावातील शिक्षक अब्दुल्ला नांदगावकर सांगत होते.
आपल्या गावामधील शांतता भंग होऊ नये, बंधुभाव एकोपा अबाधित रहावा यासाठी आम्ही हा एकोप्याचा करार केला आहे. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध समाजातील लोकांनी एकमतानं हा ठराव मंजूर केल्याचं ते सांगतात.

सोंडेघर गाव अतिशय निसर्गरम्य वातावरण असलेलं गाव. गावामध्ये तीन नद्या एकत्र येतात. पालगड नदी, वणैशी येथील नदी आणि गावातील नदी. सोंडेघर गावात प्रवेश केल्यावरच ग्रामपंयाचतीनं कमानी जवळच एकोप्याच्या ठरावाचा बोर्ड लावल्याचं दिसत आहे. मुख्य रस्त्यावरच हा बोर्ड असल्यानं परिसरात याची चर्चा आहे.
"देशामध्ये धार्मिक कलुषितपणा जो वाढत आहे. वातावरण गढूळ करण्याचा जो काही प्रयत्न चाललेला आहे. त्याची झळ आमच्या गावाला बसू नये यासाठी आम्ही ग्रामस्थांनी एकत्र येऊन शांततेचा करार केला. पालगड दूरक्षेत्राचे पोलीस निरिक्षक विकास पवार यांच्या प्रोत्साहनानं हे सकारात्मक पाऊल आम्ही टाकलं आहे. आम्हा सर्वांसाठी हा एक सुरक्षिततेचा हा ठराव आहे." सोंडेघर गावचे तंटामुक्ती अध्यक्ष संजय खानविलकर बीबीसीशी बोलताना सांगत होते.
सोंडेघर गावामध्ये 400 मुस्लीम, 400 हिंदू आणि 200 बौद्धधर्मीय आहेत. समाजाची आहे. ग्रामपंचायतीत हा विषय आला आणि सर्व समाजाचे लोक एकत्र आले आणि त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय एका फटक्यात घेऊन टाकला.

"या गावामध्ये यापूर्वीही कधी जातीय किंवा धार्मिक वादविवाद झालेला नाहीये. याच्यापुढे पण होऊ नये यासाठी आम्ही हा 100 वर्षांचा लिखित करार केला आहे. या निर्णयामुळे आमच्या भावी पिढीलाही कोणत्याही त्रासाला सामोरं जावं लागणार नाहीये." गावचे उपसरपंच जितेंद्र पवार पोटतिडकीनं बोलत होते.
"आमचं गाव शाहू फुले आंबेडकर यांच्या समतावादी विचारावर चालणारं गाव आहे. गेल्या 50 वर्षांत आमच्या गावात कोणत्याही प्रकारच वाद झालेला नाही ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे. याच्या पुढे 100 वर्षंच काय तर तहहयात वाद, तंटा, दंगा होणार नाही याची मी गावचा एक ग्रामस्थ म्हणून आपल्याला ग्वाही देतो." या शब्दात अनिल मारूती मर्चंडे आपल्या भावना व्यक्त करत होते.

सोंडेघर गावातील तरूणही या निर्णयाला पाठिंबा देतात.
"आमच्यासाठी रोजगाराचा विषय जास्त महत्त्वाचा आहे. वाद करून पोट भर नाही. इथं रोजच्या कमाईसाठी आम्हाला झटावं लागतंय. सध्याच्या घडीला वाद घालणे किंवा दंगल करणे कुणालाही परवडणारं नाही. गावानं केलेला 100 वर्षांचा हा करारा भविष्याच्या दृष्टीनं अतिशय उत्तम निर्णय आहे," असं तरूण अल्ताफ पठाण सांगत होता.

गावातील महिलांनीही 100 वर्षांच्या या कराराचं स्वागत केलं आहे. पुरूषांच्या सोबत आम्ही या प्रक्रियेमध्ये आहोत असं गावातील महिलांचं म्हणणं आहे.
उषा मर्चंडे सांगतात की, "गावातील महिलाही छोटे मोठे वाद मिटवण्यासाठी पुढे असतात. गाव पातळीवर सामंजस्यानं आम्ही निर्णय घेतो. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही गाव शांत ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो. आमच्या गावात कोणताही वाद होणार नाही याची खात्री आहे. त्यादृष्टीनं आम्हाला आता कोणतीच चिंता वाटत नाही."
"हा निर्णय आम्ही घेतलाय कारण केवळ आमच्या तालुक्यातीलच नाही तर जिह्यातील लोकांनीही या विषयाची दखल घ्यावी. देशानं आमच्या या निर्णयाकडून बोध घ्यावा. वाद करून काही साध्य होत नाही. हा विषय आम्हाला कळला आहे तो तुम्हालाही कळावा हा आमचा हेतू आहे. आमच्या गावानं घेतलेल्या या निर्णयाचा मला अभिमान आहे." हे सगळं सांगताना गावचे सरपंच इलियास नांदगावकर यांचा उर भरून येत होता.
आम्ही हा निर्णय घेतला आहे. तुम्ही ही हा निर्णय घेऊ शकता. गावामध्ये शांतता प्रस्थापित झाली तर गावची भरभराट होते, असंही सरपंच म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









