राज ठाकरे : महाराष्ट्रातील 'या' गावानं 4 वर्षांपूर्वीच भोंगेबंदी का केली?

- Author, योगेश लाटकर, अमोल लंगर
- Role, बीबीसी मराठीसाठी
महाराष्ट्रात मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसा यावरून राजकारण तापलंय. त्या निमित्ताने प्रार्थनास्थळांवरील भोंगे आणि लाऊडस्पीकरचा मुद्दा जोरदार चर्चा सुरू आहे. अशी चर्चा आपल्या गावात होऊ नये म्हणून नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड तालुक्यातील बारड गावाने चार वर्षांपूर्वी सर्वानुमते एक ठराव पास केला. आणि विशेष म्हणजे गेली चार वर्षं या ठरावाचं काटेकोर पालन केलं जातंय.
जिल्हा परिषद शाळेत आठवी इयत्तेत शिकणाऱ्या पल्लवी निलेवारला बारड गावाचा अभिमान वाटतो. ती सांगते- 'गावात इतर गावांसारखं ध्वनी प्रदूषण नसतं. गावात काही महत्त्वाच्या सूचना द्यायच्या असतील तर गल्ल्यांमध्ये छोटे स्पीकर लावलेले आहेत त्याचा वापर होतो.
गाव अगदी नीट-नेटकं स्वच्छ वाटतं. रस्ते, वृक्ष लागवड झालेली आहे. इतकंच नाही तर आमची शाळा डिजिटल झाली आहे. आणि इथे रुग्णालय, व्यायामशाळा, ग्रंथालाय या सुविधाही चांगल्या आहेत.'
गावात कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य दिलं जातंय याचं जिवंत उदाहरण गावातल्या मोठ्या मंडळींनी लहान मुलांसमोर घालून दिलंय. पल्लवीसारखंच समिक्षा खंदारेलाही गावातल्या विकासाचा अभिमान वाटतो.
गावात काही ना काही निमित्ताने सतत आवाज असायचा. या आवाजाचा विद्यार्थ्यांना अभ्यास करताना त्रास व्हायचा. गावात भोंगाबंदी झाली आणि विद्यार्थी खूश झाले असं समिक्षा सांगते.
ग्रामसभेत कसा मांडला ठराव?
बारड गावात 30 जानेवारी 2018 या दिवशी ग्रामपंचायतीने ग्रामसभा बोलावली होती. गावकऱ्यांसाठी ही सभा खूप महत्त्वाची होती. ग्रामसभेला गावातील हिंदू, मुस्लीम, बौद्ध, जैन अशा सर्व समाजातील महिला, पुरूष आणि तरुण मंडळी जमली होती.
त्यावेळी धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्याचा ठराव मांडला गेला. त्यावेळी सर्वांनी मतं मांडली पण हा ठराव मंजूर केला. त्यानंतर लागलीच धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले.
बारड गावाची लोकसंख्या 17 हजारच्या आसपास आहे. हे गाव सधन शेतीसाठीही ओळखलं जातं. त्यात बागायती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. गावात रस्ते, पाण्याची व्यवस्था आणि वीज पुरवठा यामुळे गावकरी समाधान व्यक्त करतात.

बारडमध्ये 8 हिंदू मंदिरं, 2 बुद्ध विहार आणि 1 मशीद आहे. या सर्व धार्मिक स्थळांवर पूर्वी भोंगे होते. तिथून जवळच हाकेच्या अंतरावर प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे. त्यामुळे या धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा विद्यार्थ्यांना त्रास व्हायचा. याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर व्हायचा.
"वर्गात तर शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवताना ऐकूच यायचं नाही. पण या भोंगाबंदीचा निर्णय झाला आणि विद्यार्थी. शिक्षक असे आम्ही सारेच सुखावलो," असं बारड जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक बालाजी बोण्डलावार सांगत होते. रुग्ण, वृद्ध मंडळींचीही कर्कश आवाजापासून सुटका झाली.
डीजेचा आवाज वाढणार नाही
आता ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावाची अमलबजावणी होऊन चार वर्षं उलटली आहेत. त्यामुळे लग्न समारंभ असो वा कोणताही कार्यक्रम भोंगा लावलाच जात नाही. भोंगा ऐवजी या गावात साउंड बॉक्स वापरण्याची मुभा आहे अर्थात मर्यादित आवाजात.

या भोंगा बंदीचा या भागात इतका दरारा आहे की साउंड सिस्टीमचा दुकानदार देखील या गावातील कार्यक्रमांना भोंगे भाड्याने देत नाही, असं इथले गावकरी सांगतात.
धार्मिक उत्सव तसंच शिवजयंती, भीमजयंती, रामनवमी. अण्णाभाऊ साठे जयंती, ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त निघणाऱ्या शोभायात्रा, मिरवणुकांमध्ये लाऊडस्पीकर आणि डिजेची परवानगी नाही. साऊंड बॉक्सचा मर्यादीत वापर करायला परवानगी आहे. हाच नियम लग्नसोहळे, वाढदिवस, भजन, सत्कार सोहळे यासाठीही आहे. निवडणुकीच्या काळातही लाऊडस्पीकरच्या वापरावर इथे बंधनं आहेत.

भोंगाबंदीचा निर्णय होण्याआधी म्हणजे 2018 पूर्वी गावात स्पर्धा लागल्याप्रमाणे भोंग्यावर आवाज ऐकू यायचा, असं बारडचे उपसरपंच बाळासाहेब देशमुख सांगतात.
"आवाजाला वैतागून अनेकजण तक्रारी घेऊन ग्रामपंचातीत यायचे. विनवणी करायचे. सतत छोट्या-मोठ्या कुरबुरी सुरू असायच्या. एकाला समजावून सांगितलं की दुसरा नाराज व्हायचा अशी परिस्थिती असायची. जातीय तेढ निर्माण व्हायचा. मग पुढे यातून तंटे वाढू नयेत आणि गावात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून आम्ही धार्मिक स्थळ असो की राजकीय सभा, किंवा कोणताही कार्यक्रम, भोंगाबंदीचा निर्णयच घेऊन टाकला."
गावात विकासाला आणि गरजूंसाठीच्या मदतीला प्राधान्य असल्याचं देशमुख सांगतात.
"वैयक्तिक लाभाच्या विमा योजना उतरवून घेतल्या आहेत. अपंगत्व आलेल्या व्यक्तींना आत्मसन्मानासाठी अनुदान दिलं जातं."

सध्या मुस्लिम समाजासाठी पवित्र असणारा रमजान महिना सुरू आहे आणि रमजान ईद काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. बारड गावातले अनेक रहिवासी या सणात सहभागी होतायत.
शिवजयंतीतून सर्वधर्मसमभाव
गावात जातीय सलोखा जपण्यासाठी या शिवजयंती पासून ध्वजारोहण सुरू केल्याची माहिती देशमुख यांनी दिली. हे ध्वजारोहण गावातल्या प्रत्येक जाती-धर्मासाठी महत्त्वाचं आहे. शिवाजी महाराजांचे मावळे बारा बलुतेदारांपैकी होते. त्याच जाती-धर्माच्या लोकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची परंपरा आम्ही सुरू केली आहे. सर्वधर्मसमभावाचं आदर्श उदाहरण आम्हाला समाजाला दाखवून द्यायचंय. या गावात सर्व जाती-धर्माचे लोक ऐकमेकांच्या सण-समारंभामध्ये सहभागी होत असतात."

बारड गावचे रहिवासी आणि कंम्प्युटर इंजीनिअर असणारे किरण आठवले यांना ग्रामपंचायतीच्या कामाचं कौतुक वाटतं. ते म्हणतात, "सार्वजनिक कार्यक्रमांवर होणारा अनावश्यक खर्च चांगल्या कामासाठी बारडमध्ये वापरला जातो.
या भोंगेबंदीच्या निर्णयामुळे गावात तंट्यांचं प्रमाण लक्षणीय कमी झाल्याचं गावकरी सांगतायत. आज ग्रामसभेचा हा निर्णय म्हणजे मोठा भडका उडण्यासाठी आवश्यक असणारी ठिंणगी विझवण्यासाठी उपयोगी ठरल्याची भावना बारडच्या रहिवाशांची आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








