कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्याप्रकरणातील आरोपीची आत्महत्या, पोलीस प्रशासनाची माहिती

- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
कल्याण परिसरात 22 डिसेंबर 2024 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी विशाल गवळीनं तळोजा कारागृहात आत्महत्या केली आहे.
विशाल गवळीने पहाटे आत्महत्या केल्याचे तळोजा मध्यवर्ती कारागृह, नवी मुंबईचे उपअधीक्षक महादेव पवार यांनी बीबीसी मराठीला सांगितले.
आत्महत्येनंतर याबाबत आम्ही मृतदेह खारघर पोलिसांना सुपूर्त केला आहे. पुढील सर्व सविस्तर माहिती खारघर पोलीस प्रशासनाकडून दिली जाईल असं पवार म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच बदलापूरच्या चिमुरडीच्या बलात्कारप्रकरणाच्या आरोपीचा इनकाउंटर झाला होता. त्या प्रकरणात संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करावा असा आदेश न्यायालयाने दिला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता आरोपीने तुरुंगात आत्महत्या केली आहे.
आरोपीचे वकील संजय धनके यांनी सांगितले की या आत्महत्येबाबतची माहिती मला सकाळी मिळाली. तुरुंगात आपल्या जीवाला धोका असल्याचे विशालने म्हटले होते. याबाबत आम्ही न्यायालयात पत्र दिले होते असे धनके यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 'गवळीविरोधात फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून लवकरात लवकर निकाल यावा हाच आमचा प्रयत्न होता. पण आता ही घटना घडली आहे. पोस्ट-मार्टम रिपोर्टनंतरच सर्वकाही समोर येईल,' असं ते म्हणाले.
डिसेंबरमध्ये जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी आनंद व्यक्त केला आहे. आरोपीला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली आणि आम्हाला न्याय मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि डीसीपी अतुल झेंडे यांचे त्यांनी आभार मानले आहेत.
विशालचे दोन भाऊ तडीपार आहेत ते दहशतवादी आहेत त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडितेचे वकील नीरज कुमार यांनी केली आहेत.
काय होती घटना?
कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका इथे 22 डिसेंबर 2024 ला सोमवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी आईकडून 20 रुपये घेऊन खाऊ आणण्यासाठी घरातून बाहेर पडली.
पण सायंकाळी उशीर झाला तरी मुलगी घरी आली नाही, त्यानंतर मुलीच्या आईने शोध सुरू केला. मात्र, शोधाशोध करूनही मुलगी सापडली नाही. यानंतर मुलीचे वडील घरी आले, दोघांनीही मुलीला शोधलं. पण मुलगी कुठेच सापडली नाही. यानंतर दाम्पत्यानं कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन मुलगी बेपत्ता झाल्याचं सांगितलं.
मंगळवारी कल्याण-पडघा रस्त्यावरील निर्जनस्थळी एका झुडपामध्ये मुलीचा मृतदेह आढळला. त्यामुळं सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मुलीच्या आई-वडिलांना बोलावण्यात आलं वडिलांनी आपलीच मुलगी असल्याचं सांगितलं.

मृतदेह सापडल्याचं ठिकाण मुलीच्या घरापासून 13 किलोमीटर दूर होतं. मुलीवर लैंगिक अत्याचार करून मग तिची हत्या केल्याची माहिती शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर समोर आली.
या प्रकरणी दोन जणांनी आपल्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा संशय मुलीच्या वडिलांनी व्यक्त केला होता. त्यामुळे या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास करण्यासाठी पोलिसांनी 5 पथकं तयार केली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत लोकांची चौकशी सुरू केली.
त्यात विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीवर पोलिसांना संशय आला आणि त्या दृष्टीने पोलिसांनी तपास करत आरोपींना बेड्या ठोकल्या.
आरोपीची तिसरी पत्नीही सहभागी
कल्याण पोलिसांनी विशाल गवळीच्या पत्नीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. विशालने
मुलीवर अत्याचार करून विशालने मुलीची हत्या केली. सोमवारी कामावरून घरी येताच तिने रक्ताचा थारोळं पहिलं होतं.
यानंतर पतीला जाब विचारण्याऐवजी स्वतःलाही विशाल मारून टाकेल म्हणून तिने घरातील रक्ताचे डाग पुसून काढले. तेवढ्या वेळात विशाल मित्राची रिक्षा घेऊन आला.
पती-पत्नीने रात्री 10 वाजताच्या सुमारास मृतदेह भरलेली बॅग घेऊन बापगावजवळील कब्रस्थान गाठले. या निर्जनस्थळी त्यांनी पीडित मुलीचा मृतदेह फेकला. यानंतर विशाल फरार झाला, तर ती घरी परतली अशी माहिती पोलिसांना आरोपी साक्षी गवळी हिने दिली होती.
शेगावमधून आवळल्या आरोपीच्या मुसक्या
या घटनेनंतर विशाल शेगावला जाण्यापूर्वी पत्नीला सोडून एका बारमध्ये मद्यपान करण्यासाठी गेला. यानंतर तो ठाण्याला आला आणि पुढे दादरला येऊन त्याने शेगावला जाणारी गाडी पकडली.
पोलिसांच्या चौकशी दरम्यान अनेक सीसीटीव्हींमध्ये तो दिसला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाहणीत आलेल्या रिक्षा चालकाला पोलिसांनी देखील ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली.
यात विशालची पत्नीदेखील या गुन्ह्यात सहभागी असल्याचं पोलिसांना चौकशीत निष्पन्न झालं. सुरुवातीला विशालची पत्नी चौकशीदरम्यान काहीही माहिती देत नव्हती.

पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली देत तिने विशाल शेगावला आपल्या माहेरी गेल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांचे पथक तातडीने शेगावमध्ये दाखल झाले आणि विशालला अटक केली.
याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर सीसीटीव्हीच्या माध्यमातून अनेक आरोपींची ओळख पटली. यात मुख्य आरोपी आणि त्याची पत्नी तसेच एका रिक्षावाल्याला देखील ताब्यात घेण्यात आले होते.
सलूनमध्ये दाढी करताना पकडला
दाढी राखणारा विशाल ओळख मिटवण्यासाठी, सलूनमध्ये दाढी करून बाहेर पडत असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
कल्याण पूर्व भागात राहणारा विशाल हा विकृत मनोवृत्तीचा आहे. त्याने तीन लग्नं केली असून, साक्षी त्याची तिसरी पत्नी आहे.
त्याच्यावर विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराचे पाच गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत दोन गुन्ह्यात तडीपार आणि नुकतंच जामिनावर एका गुन्ह्याप्रकरणी बाहेर विशाल आला होता, असं चौकशीत समोर आलं.

कल्याण येथील या घटनेनंतर राज्यभर याचे पडसाद उमटू लागले. सर्वत्र या घटनेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. विरोधकांनी देखील महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला.
यातच या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले होते.
पण तपास किंवा खटला पूर्ण होण्याआधीच विशाल गवळीच्या आत्महत्येची बातमी समोर येताच, या प्रकरणी चर्चा सुरू झाली आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











