'रेड लाईट एरियात जातोस हे तुझ्या बायकोला सांगेन', आरोपीनं घेतला कर्ज नाकारणाऱ्या बँक अधिकाऱ्याचा 'बदला'

धमक्या देत कर्ज न देणाऱ्या बँक कर्मचाऱ्याचं सोनं लुटलं

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

आपल्याला न मिळालेल्या गोष्टींचा बदला घेण्यासाठी कोण काय करेल सांगता येत नाही.

अशीच एक घटना नागपुरात घडली असून बँकेत कर्ज दिलं नाही म्हणून कर्ज नाकारणाऱ्या बँक कर्मचाऱ्यालाच ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आलाय.

नेमकं काय घडलंय? आरोपीनं कशावरून ब्लॅकमेल केलंय? जाणून घेऊ.

'तुझ्याकडचं सोनं दे नाहीतर तुझ्या बायकोला सांगेन'

नागपुरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

आदेश प्रदीप समुद्रे (वय 22) असं आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात 55 वर्षीय बँक कर्मचाऱ्यानं तक्रार दिली होती.

लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समुद्रे 6 महिन्यांपूर्वी नागपुरातल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कर्ज काढण्यासाठी गेला होता. कर्जासाठी त्यानं सगळे कागदपत्रं बँकेत सादर केले.

पण, काही कारणास्तव त्याला कर्ज नाकारण्यात आलं. त्यामुळे कर्ज नाकारल्याचा बदला कसा घ्यायचा? याच विचारात आरोपी समुद्रे होता.

धमक्या देत कर्ज न देणाऱ्या बँक कर्मचाऱ्याचं सोनं लुटलं

फोटो स्रोत, Getty Images

काही दिवस गेल्यानंतर ज्या बँक कर्मचाऱ्यानं कर्ज नाकारलं तोच बँक कर्मचारी नागपुरातील रेड लाईट एरियात गंगा जमुनामध्ये जाताना दिसला. नागपुरात इतवारी भागात गंगा-जमुना नावाची ही वस्ती आहे. बँक कर्मचारी या वस्तीत जाताना दिसल्यानंतर आरोपीनं आपल्याला कर्ज नाकारल्याचा बदला घ्यायचा ठरवलं. आरोपी समुद्रे याने त्याचे काही व्हिडीओ रेकॉर्ड केले.

त्यानंतर आरोपीनं बँक कर्मचाऱ्यावर नजर ठेवायला सुरुवात केली. तो वारंवार गंगा जमुनामध्ये जात असल्याचं आरोपीला समजल्यानंतर त्यानं पुरावे गोळा केले. त्यानंतर 15 मार्चला आरोपी समुद्रेनं बँक कर्मचाऱ्याचा पाठलाग करत मारवाडी चौकात त्याला गाठलं.

15 मार्चला आरोपी समुद्रेनं बँक कर्मचाऱ्याचा पाठलाग करत मारवाडी चौकात त्याला गाठलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 15 मार्चला आरोपी समुद्रेनं बँक कर्मचाऱ्याचा पाठलाग करत मारवाडी चौकात त्याला गाठलं.

"तू गंगा जमुनामध्ये जातोस हे मी तुझ्या घरी सांगेन, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. तुझ्या बायकोला सांगेन की तू गंगा जमुना या रेड लाईट एरियात जातोस," अशा धमक्या देत आरोपीनं बँक कर्मचाऱ्याला ब्लॅकमेल केलं.

तुझ्याकडे असलेलं सगळं सोनं तू मला दे, नाहीतर तुझ्या घरी येऊन तुझ्या बायकोला सांगेल, अशी धमकी दिली. त्यानंतर बँक कर्मचाऱ्यानं त्याच्याकडे असलेली सोन्याची चेन आणि एक ब्रेसलेट असं 2 लाख 35 हजार रुपयांचं सोनं त्याला दिलं आणि हे प्रकरण तिथेच मिटविण्याची विनंती केली. पण, आपल्याला यामधून आणखी पैसे मिळू शकतात, असं आरोपीच्या लक्षात आल्यानं त्यानं बँक कर्मचाऱ्याला ब्लॅकमेल करणं सुरूच ठेवलं.

सोनं लुटल्यानंतरही बँक कर्मचाऱ्याच्या घरी गेला आणि...

आरोपीनं बँक कर्मचाऱ्याचा मोबाईल नंबरही घेतला होता. त्यामुळे तो फोनवरून बँक कर्मचाऱ्याला धमक्या द्यायचा. तू गंगा-जमुनामध्ये जातोस हे मी तुझ्या बायकोला सांगेन अशा धमक्या देत आरोपी पैशांसाठी तगादा लावत होता. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यानं त्याला टाळायला सुरुवात केली.

पण, गेल्या 6 एप्रिलला आरोपी समुद्रे बँक कर्मचाऱ्याच्या नारी रोड परिसरातल्या घरी पोहोचला. त्याठिकाणी त्यानं बँक कर्मचाऱ्याच्या पत्नीला तुमचा नवरा गंगा-जमुना इथं जातो असं सांगितलं. त्यावरून बँक कर्मचाऱ्याचं पत्नीसोबत भांडणही झालं.

पण, बायकोला माहिती होऊ नये यासाठी बँक कर्मचाऱ्यानं आपलं जवळपास अडीच लाख रुपयांचं सोनं आरोपीला दिलं होतं तीच घटना घरी समजली होती. त्यामुळे आता आरोपीला का सोडायचं? असा विचार बँक कर्मचाऱ्यानं केला.

बायकोला माहिती होऊ नये यासाठी बँक कर्मचाऱ्यानं आपलं जवळपास अडीच लाख रुपयांचं सोनं आरोपीला दिलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बायकोला माहिती होऊ नये यासाठी बँक कर्मचाऱ्यानं आपलं जवळपास अडीच लाख रुपयांचं सोनं आरोपीला दिलं होतं.

जवळच्या लोकांनीही बँक कर्मचाऱ्याला सल्ला दिला की, आता जे माहिती व्हायचं होतं ते घरी माहिती झालं आहे. त्यामुळे सोन्यावर डल्ला मारणाऱ्या आरोपीला सोडू नकोस. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांनी आपल्याकडचं सोनं लुटल्याची तक्रार कपिल नगर पोलीस ठाण्यात दिली.

पण, आरोपीनं मारवाडी चौकात सोनं लुटलं होतं. त्यामुळे हे प्रकरण लकडगंज पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून आरोपी आदेश समुद्रेला अटक केली आहे.

आपण कर्ज न मिळाल्याचा बदला घेण्यासाठी हा गुन्हा केल्याची कबुलीही आरोपीनं दिली आहे. तसेच त्यानं बँक कर्मचाऱ्याचं जे सोनं लुटलं होतं ते सुद्धा पोलिसांनी हस्तगत केलं आहे, अशी माहिती लकडगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार यांनी दिली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)