80 वर्षांच्या जयंती आजी म्हणतात, 'स्विमिंगमुळेच या वयातही मी ठणठणीत आहे'

- Author, राहुल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Reporting from, नाशिक
"माझं वय 80 आहे. मी स्विमिंगमुळे एकदम ठणठणीत आहे. मला खोकला येत नाही. मला शुगर नाही. कुठलाही पदार्थ खायला दिला तर मी तो पचवू शकते. माझे दात व्यवस्थित आहेत. मला एकही गोळी सुरू नाहीये. मी कधी आजारी पडत नाही," हे शब्द आहेत नाशिकच्या 80 वर्षीय जयंती काळे यांचे.
या आजी नाशिकमधील वीर सावरकर जलतरण तलावात दररोज सकाळी पोहण्यासाठी येतात. अंगावर साडी, डोक्यावर पदर ही त्यांची ओळख. त्यांना तिथली प्रत्येक व्यक्ती अगदी नावाने ओळखते.
मी जेव्हा जयंती आजींना भेटलो तेव्हा वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा भेटतोय. आजींनी अगदी आपलेपणाने माझी विचारपूस केली आणि मग गप्पांना सुरुवात झाली.
'पोहायला जायला तू काय मुलगा आहेस का?'
पोहण्याची आवड कशी लागली असं विचारल्यावर आजींनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या.
जयंती आजी सांगतात, "माझे वडील अहमदनगरला एक्साईजमध्ये इन्स्पेक्टर होते. मी तेव्हा पाच-सहा वर्षांची असताना मला तिथेच शाळेत टाकलं होतं. माझं तिसरीपर्यंतच शिक्षण तिथेच झालं. आमच्या शाळेजवळच नदी होती. तिथे सर्व मुलं पोहायला जायची."
"त्यांचं पाहून मीही त्यांच्यासोबत पोहायला जाऊ लागले. आम्ही मधल्या सुटीपर्यंत शाळेत बसायचो आणि नंतर पोहायला जायचो. मी मधल्या सुटीत गायब झालेली पाहून मास्तरीणबाईंनी वडिलांकडे तक्रार केली."
"माझ्या वडिलांनी त्यांच्याच खात्यातील कॉन्स्टेबलला सांगितलं की, माझी मुलगी मधल्या सुट्टीत कुठे जाते हे शोधा?"
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
त्या पुढे सांगतात, "मी मैत्रिणींसोबत पोहायला जाते हे त्यांनी शोधून काढलं आणि वडिलांना सांगितलं. तेव्हा माझ्या वडिलांनी मला घरी आल्यावर भरपूर मारलं."
त्यानंतर जयंती यांच्या वडिलांची मालेगावला बदली झाली. परंतु त्यांची पोहायची आवड काही कमी झाली नाही. त्यांना पाणी दिसलं की त्यांच्यातील पोहण्याची इच्छा पुन्हा जागी व्हायची.
त्या सांगतात, आई म्हणायची, "तू का सारखं पोहायला जाते. तू काय मुलगा आहेस का?"
तेव्हा मी म्हणायचे की, "फक्त मुलांनीच पोहायला जायचं असतं का? मुलीसुद्धा पोहतात."
"वडील जेव्हा कामासाठी बाहेर गावी जायचे तेव्हा मी आईला शिकवणीला जाते असं सांगून पोहायला जायचे. पाट, हौद, लोकांच्या शेतातल्या विहीर अशा सर्वच ठिकाणी पोहायचे.
"मला खूप आवड होती आणि ती वाढतच गेली. नंतर वडिलांची बदली वसईला झाली. तर तिथे मी खाडीत पोहायला लागले. तेव्हा मी सतरा-अठरा वर्षांची असेल," असं जयंती सांगतात.

फोटो स्रोत, RAHUL RANSUBHE
मग तिथेही वडिलांकडे माझ्या तक्रारी यायला लागल्या. वडील म्हणायचे तू का जाते पोहायला? लोकं मला नावं ठेवत आहेत. तेव्हा आई म्हणाली की... हिचं लग्न लावून टाका. ही काही आपलं ऐकत नाही."
'मी विहिरीत उडी मारली आणि सासूबाई रडू लागल्या'
त्यानंतर जयंती यांना नाशिकमधल्या शेतकरी कुटुंबात लग्न झालं. लग्नानतंरही माझ्यात काही फरक पडला नाही असं त्या सांगतात.
या दरम्यानचा सासूबाईंसोबतचा एक मजेदार किस्सा काळे आजी आवर्जून सांगतात, "लग्नाला तीनच दिवस झाले होते. तेव्हा माझी सासू म्हणाली चल मी तुला शेतात नेते. तू शेतात काम करशील ना, तेव्हा मी म्हटलं करेल. चौथ्या दिवशी मला शेतात नेलं. मला म्हणाल्या हे बघ हे शेत आहे. तू तिथली बादली घे, विहिरीतून पाणी काढ आणि बैलांना पाणी दे. एवढं सांगून त्या निघून गेल्या."
"जेव्हा मी बादली घेऊन पाणी आणायला विहिरीजवळ गेले तेव्हा मी पाणी पाहिलं. मी बादली फेकून दिली आणि विहिरीत उडी मारली आणि तिथं पोहायला लागले. बराच वेळ झाल्यानंतर माझी सासू शोधायला लागली अजून कशी सूनबाई येत नाही. त्या तिथे आल्या तर मी पोहत होते विहिरीत. लगेच मग त्या रडायला लागल्या. अगं इथे लोकं मला बोलतील की सासूने सुनेला ढकललं. तर मी त्यांना समजावलं की मला पोहता येतं."

फोटो स्रोत, RAHUL RANSUBHE
अनेक स्पर्धांमध्ये सुवर्णपदकं
जयंती आजी यांचं पोहायचं वेड काही केल्या कमी होत नाही हे पाहून आता घरच्यांनीही त्यांना विरोध करायचं सोडून दिलं होतं. त्यांची पोहण्याची सुरुवात जरी हौशेतून सुरू झाली पण नंतर
मात्र आता त्यांनी स्पर्धेतही भाग घेणं सुरू केलं. जयंती यांना लहानपणापासूनच त्यांचं कौतुक केलेलं आवडायचं.
त्यांचा शिक्षणात जास्त रस नव्हता. आम्ही त्यांना शिक्षणाबद्दल विचारलं तर त्यांनी सांगितलं, "अभ्यासात माझं लक्ष लागत नव्हतं. परीक्षेला पास होण्यापुरतेच मार्क मी मिळवायचे. माझं सर्व लक्ष खेळण्यात होतं."

फोटो स्रोत, RAHUL RANSUBHE
आजी आता या वयातही दररोज स्विमिंगपूलवर येतात. स्विमिंग सूट घालतात आणि 18 फूट तलावात बिनधास्तपणे उडी मारतात. त्यांना स्विमिंगचे सर्व स्ट्रोक्स येतात.
त्यांनी अनेक स्थानिक, राज्य तसेच राष्ट्रीय जलतरण स्पर्धांमध्ये विविध मेडल्स मिळवले आहेत. तर या स्पर्धांच्या निमित्ताने त्यांनी संपूर्ण भारत भ्रमंती केली आहे. यामध्ये कर्नाटकातील, उत्तरप्रदेश, नांदेड, मुंबई, पंजाब गोवा अशा अनेक ठिकाणच्या स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवून त्यात अनेक पदकं पटकावली आहेत.
"जेव्हा पंजाबच्या स्पर्धेत मला गोल्ड मेडल मिळालं. ते पाहून ऑस्ट्रेलियातून मला स्पर्धेसाठी बोलावण्यात आलं होतं. परंतु घरच्यांनी मला एकटीला पाठवायला नकार दिला त्यामुळे मी तिथे जाऊ शकले नाही," हे सांगताना आजीच्या चेहऱ्यावरील खंत जाणवत होती.
इतर महिलांसाठी आदर्श
आजींना पाहून अनेक जेष्ठ महिलांचीही पावलं आता स्विमिंगपूलकडे वळाल्याचं दिसलं. आजींचा मोठा चाहता वर्ग आहे. त्या सकाळी स्विमिंगला आल्यावर आजींसोबत मस्त गप्पा करत करत स्विमिंग करतात.
आजींची मैत्रीण असलेल्या 72 वर्षीय रजनी चव्हाण यासुद्धा आता नियमित स्विमिंगला येतात.
'काळेताईंकडे पाहूनच मी पोहणे सुरू केले. त्या जसं विविध स्पर्धात भाग घेतात तसं मी देखील घेते. मलाही अनेक मेडल्स मिळाले आहेत,' असं रजनी चव्हाण सांगतात.

फोटो स्रोत, RAHUL RANSUBHE
कुटुंबालाही स्विमिंग शिकवलं...
आजींची सर्व पदकं जेव्हा आम्ही पाहात होतो, तेव्हा त्यांचा मुलगा आणि सुनही घरातच होते. ते ही आम्हाला या सर्व गोष्टी दाखवत होते.
तेव्हा त्यांचा मुलगा बॉबी म्हणाला, "माझ्या आईने एवढी मेडल्स मिळवली आहेत हे मला आज कळतंय. कारण ती ज्या स्पर्धेला जाते तिथून ती 3-4 मेडल्स घेऊनच येते हे आम्हाला माहीत होतं. त्यामुळे आम्हाला त्याचं काही विशेष वाटतं नव्हतं. परंतु आज ही सर्व मेडल्स आणि सर्टीफिकेट पाहिल्यावर ती माझी आई असल्याचा मला खूप अभिमान वाटतोय."
स्विमिंग हे केवळ स्वतःपुरतंच न ठेवता आजींनी त्यांच्या घरातील प्रत्येकाला स्विमिंग शिकवलंय. कुटुंबाबद्दल सांगताना त्यांना होणारा आनंद त्यांच्या डोळ्यात स्पष्टपणे जावणतो.
त्या सांगतात, "चार सुना आणि नातवंडं या सर्वांना मी स्विमिंग शिकवलं आहे. माझे नातू अभिमानाने सांगितात की आम्हाला आमच्या आजीने पोहायला शिकवलंय. तसंच टँकवर मी इतर लोकांनाही स्विमिंग शिकवते. किंवा लोकंही मला विचारतात आजी मी हे कसं करू ते कसं करू. आणि मी त्यांनाही शिकवते."
"या वयातही मी एकदम फीट आहे आणि याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त स्विमिंग. आता मी जोपर्यंत आहे तोपर्यंत स्विमिंग करणार मी…" असं हसत हसत त्या सांगतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











