'आम्ही पुढे चाललो की मागे हेच कळेना'; खुलताबादचे लोक असं का म्हणत आहेत?

फोटो स्रोत, kiran sakale
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"आम्ही दहा वर्षापूर्वी साडेसात हजारानं कापूस विकला आणि आज 6 हजारात विकावा लागू राहिला. म्हणजे आम्ही पुढे चाललो की मागे चाललो, हेच कळाना आम्हाला."
"पाण्याची परिस्थिती म्हणजे दर तीन दिवसाला पाणी येतं खुलताबादला. पाणी कमी पडतं. नळाला एक पाऊण तास पाणी चालतं फक्त."
"मागच्या वर्षी 11 हजार रुपये क्विंटलनं घेतलेलं अद्रकीचं बेणं आहे. तर आज अशी परस्थिती आहे की, जे बेणं 11 हजार रुपयानं घेतलं त्याचे 11 रुपयेसुद्धा बनून नाही राहिले."
खुलताबाद परिसरातील नागरिकांच्या या काही प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं खुलताबाद हे शहर सध्या चर्चेत आहे. कारण याच शहरात औरंगेजाबाची कबर आहे आणि ही कबर उखडून टाकावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे.
औरंगजेबाची कबर हा इथं चर्चेचा मुद्दा तर आहेच, पण त्याशिवाय खुलताबाद शहरातील आणि खुलताबाद तालुक्यातील लोकांचे नेमके ज्वलंत प्रश्न काय आहेत? ते आपण जाणून घेणार आहोत.
खुलताबादपासून जवळपास 14 किलोमीटर अंतरावर घोडेगाव नावाचं गाव आहे. छत्रपती संभाजीनगरहून खुलताबादकडे प्रवास करताना आम्हाला इथं एक रसवंती दिसली.
रसवंती चालकासाठी कोणता मुद्दा महत्त्वाचा आहे ते जाणून घेतलं पाहिजे, असं वाटलं आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा सुरू केली.


'शेतमालाला भाव नाही म्हणून रसवंतीचा पर्याय'
रमेश कारभारी ठेंगडे असं या रसवंती चालकाचं नाव. ते उसाचे कांडे पुसत होते. रसवंती सुरू करण्याची त्यांची लबबग सुरू होती.
रसवंतीविषयी विचारल्यावर ते म्हणाले, "रसवंती 3 वर्षांपासून चालू केली मी. पण सीजनवाईज चालू करतो. व्यवसाय म्हणजे, आता शेतीला पाणी नाही. मालाला भाव नाही. त्याच्यामुळे मुलांचं शिक्षण करण्यासाठी रसवंतीचा पर्यायी धंदा निवडला."

फोटो स्रोत, kiran sakale
तुम्ही ग्रामीण भागातून येता, तुमच्यासाठी सगळ्यात ज्वलंत, महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे? या प्रश्नावर रमेश म्हणाले, "आमच्यासाठी रोजगार आणि शेतमालाला भाव मिळणे, हे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत. आता, अद्रकीचं पाहा. मागच्या वर्षी 11 हजार रुपये क्विंटल बेणं घेतलं. तर आज अशी परस्थिती आहे की, जे बेणं 11 हजार रुपयानं घेतलं त्याचे 11 रुपयेसुद्धा बनून नाही राहिले. भावच नाही राहिलं त्याला. सरकारनं शेतीमालाच्या भावावर लक्ष द्यायला पाहिजे."
'शेतकरी पुढे चालला की मागे, काही कळेना'
इथून पुढे आम्ही खुलताबादकडे निघालो. दुपारचं ऊन इतकं होतं की, रस्त्यांवर फार कुणी दिसत नव्हतं. पाण्याचे टँकर मात्र जागोजागी दिसत होते.
खुलताबादपासून 5 किलोमीटर अंतरावर एका झाडाखाली काही शेतकरी चर्चा करताना दिसले. त्यापैकी एक होते शामराव मसकर. शामराव शेती करतात.
मराठवाड्यातील इतर बहुसंख्य शेतकऱ्यांप्रमाणे ते सोयाबीन कापूस, मका, तूर, बाजरी अशी पिकं घेतात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
शामराव बोलू लागले, "कापूस एक एकरवर होता, अडीच क्लिंटल कापूस झाला. सोयाबीन अडीच एकरवर होती, सोयाबीन 4 क्विंटल झाली. कापसाला 6 हजार रुपये भाव मिळाला. 10 वर्षांपूर्वी आम्ही कापूस साडेसात हजारानं विकला आणि आज 6 हजारानं विकाव लागू राहिला. तर आम्ही शेतकरी पुढे चाललो की मागे चाललो हेच कळाना आम्हाला.
"सोयाबीन 7 हजारानं बेण्यासाठी विकली उन्हाळ्यात. आज सोयाबीनला 2900 रुपये भाव आहे. मग शेतकऱ्यानं जायचं कुठं, पुढे जायचं की मागचं जायचं?" असं शामराव विचारतात.

फोटो स्रोत, kiran sakale
पण, सरकारचं म्हणणं आहे की कापसाला 7 हजार 500 आणि सोयाबीनला 4 हजार 892 रुपये हमीभाव आहे.
असं म्हणताच शामरावांनी लगेच प्रत्युत्तर दिलं, "कुठंय तो भाव? ते आम्हाला बी कळायला पाहिजे ना कुठंय तो भाव? त्यासाठी नोंद केली तर एकरी 2 क्विंटल माल ते (हमीभाव केंद्र) घेतात. आपल्याला 10 क्विंटल माल निघला तर राहिलेला 8 क्विंटल विकता कुणाला?"
ग्रामीण भागात तुम्हाला कोणता मुद्दा आजघडीला सगळ्यात ज्वलंत वाटतो? महत्त्वाचा वाटतो? या प्रश्नावर शामराव म्हणाले, "आम्हाला वाटतं दूधाला कमीतकमी 40 रुपये भाव पाहिजे. माझ्याकडं सध्या 50 ढोरं आहेत. त्यात 30 ढोरं रिकामे आहेत आणि 20 ढोरं दूधाचे आहेत.
"पण आम्हाला भाव भेटू राहिला 27-28 रुपये. मग जे पैसे दूधाचे येऊ राहिले त्यात ढोरायला जिवंत ठेवायचं कसं? ते (सरकार) वरुन म्हणते दूधाला 5 रुपये देऊ राहिलो, 7 रुपये देऊ राहिलो. आता ते बी तर बंद केलं शासनानं."
'पाणी कमी पडतं'
दुपारच्या सुमारास आम्ही खुलताबादला पोहचलो. भद्रा मारुती देवस्थानासमोर एक पाण्याचा टँकर दिसला. टँकरवाल्या भाऊंशी चर्चा सुरू केली.
ते म्हणाले, "पाण्याची परिस्थिती म्हणजे दर तीन दिवसाला पाणी येतं खुलताबादला. पाणी कमी पडतं. नळाला एक पाऊण तास पाणी चालतं फक्त. जास्ती वेळ नाही येत, पाणी बंद करुन टाकतात."
पण मग किती पाणी लोकांना लागतं, खुलताबादमध्ये कधीपासून टँकर सुरू होतात?
ते म्हणाले, "या गावात जवळपास 15-16 वर्षांपासून टँकर चालू आहेत. 7-8 वर्षांपासून आम्ही या धंद्यात आलो. पूर्ण गावाला आम्ही पाणी पुरवतो."

फोटो स्रोत, kiran sakale
हे टँक किती लीटरचं आहे आणि दररोज तुम्ही किती टँक पाणी पुरवता? यावर ते म्हणाले, "साडेपाच हजार लीटरचं टँक आहे. 500 रुपयात पूर्ण टँकर देतो. लोकलमध्ये 200 रुपयाचा ड्रम 50 रुपयात देतो. दिवसातून 4-5 टँकर देतो."
तुमच्या भागात धरण वगैरे असेल ना आसपास, त्याच्यातून पाणी येत नाही का? असं विचारल्यावर ते म्हणाले, "पाणी पुरत नाही साहेब. या दिवसांमध्ये (उन्हाळ्यात) घाटावर पाणी राहत नाही. शेवट शेवट महिना, दीड महिना आम्हाला प्रॉब्लेम येतो पाण्याचा."
व्यवसायाला फटका
यानंतर इथेच असलेल्या भद्रा मारुती देवस्थानाकडे आम्ही निघालो. मंदिर परिसरातील काही दुकानं बंद असल्याचं दिसलं. काही भाविक दर्शनासाठी येत होते.
काही वेळात आम्ही भद्रा मारुती देवस्थानात पोहचलो. इथं येताना बाहेर असलेल्या काही दुकानदारांशी आम्ही बोलत होतो. पण ऑन कॅमेरा कुणीही बोलायला तयार नव्हतं.
त्यांचं असं म्हणणं होतं की, गर्दी काही प्रमाणात कमी होत आहे आणि त्याचा धंद्यावर परिणाम होत आहे. पण औरंगजेबाच्या विषयावर बोललं तर त्यातला काही भाग काढून दाखवला जातो आणि मग खुलताबादची जी हिंदू-मुस्लीम ऐक्याची संस्कृती आहे, तिला कुठेतरी गालबोट लागल्यासारखं होतं.
हिंदूंच्या सणात मुस्लीम दुकानदार आणि मुस्लिमांच्या सणात हिंदू दुकानदार असतात. त्याचा व्यवसायावर परिणाम होतो, त्यामुळे बोलण्याचं टाळत असल्याचं ते म्हणाले.

फोटो स्रोत, shrikant bangale
खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबरीचा वाद सुरू झाल्यामुळे देवस्थानातील गर्दी कमी होऊन त्याचा व्यवसायावरही परिणाम होतोय, असं काहींचं म्हणणं आहे. तर एकंदरीत काय परिस्थिती आहे सध्या?
या प्रश्नावर भद्रा मारुती देवस्थानचे विश्वस्त कचरु बारगळ म्हणाले, "कबरीचा आणि आमच्या देवस्थानाचा काही संबंध नाही. भाविक बरोबर दर्शनाला येतात. सर्व काही गर्दी चालू आहे. काही परिणाम झालेला नाही, काही नाही. आमचं आणि इथल्या मुस्लिमांचं सौख्य आहे. आम्ही एकमेकाला सारखे मानतो. आम्हाला कोणताही धर्म आणि त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये."
बाहेर आल्यावर मात्र काही तरुण दुकानदारांनी पर्यटक कमी होऊन त्याचा धंद्यावर परिणाम होत असल्याचं पुन्हा अधोरेखित केलं.
शिक्षण भरपूर, पण नोकरी नाही
यानंतर मी औरंगजेबाची कबर असलेल्या परिसराकडे निघालो. जागोजागी पोलिसांचे बॅरिकेड्स लागलेले दिसले. कबरीच्या ठिकाणीही पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.
पर्यटकांची कसून तपासणी केली जात होती. कबरीऐवजी राजकारण्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलायला हवं, अशी भावना इथल्या मुस्लिमांनी व्यक्त केली. नागपुरात झालेल्या हिंसाचारानंतर मात्र इथं कुणी ऑन कॅमेरा बोलण्यास तयार नव्हतं.
संध्याकाळी मी परतीचा प्रवास सुरू केला, तेव्हा खुलताबादपासून 7 किलोमीटर अतंरावरच्या भडजी गावात आमची भेट शेख सलमान सुभान या तरुणाशी झाली. तो गायी-म्हशींना चारा देत होता.
सलमान म्हणाला, "माझं बीएस्सी अॅग्रीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. नोकरीचा विषय असा आहे की, नोकरी करायचं म्हटल्यावर सरकार जागा बी व्यवस्थित काढत नाही. जागा काढतात 5 हजार आणि फॉर्म पडतात 50 हजार. त्यामुळे नोकरी लागायची शक्यता कमी आहे. मग आम्ही शेतकऱ्याच्या मुलांनी काय करायचं? दुसरा पर्याय काय आहे? मग शेतीच करावी लागते."

फोटो स्रोत, kiran sakale
पण शेती करायची म्हटल्यावर सोयाबीन-कापसाला किती भाव मिळतोय, ते आपण पाहत आहोत. मग योग्य पर्याय निवडला असं वाटतं का की इकडं पण कुचंबनाच होते?
यावर सलमान म्हणाला, "शेवटचा पर्याय आहे ना साहेब. ज्यावेळेस नोकरी नाही लागली तर हा पर्याय निवडावाच लागला ना आम्हाला."
गावातील तरुणांची काय परिस्थिती आहे? या प्रश्नावर सलमान म्हणाला, "पोरांचं भरपूर शिक्षण झालेलं आहे, पण नोकरी नाही भेटत. बरेचसे पोरं आर्मी, पोलीस भरतीची तयारी करतात. पण यश मिळत नाही. तुरळक ठिकाणी 1-2 पोरांना यश मिळतं, नाहीतर मिळत नाही."
सरकारच्या अजेंड्यावर तरुण म्हणून सगळ्यात महत्त्वाचा विषय काय असला पाहिजे? यावर सलमान म्हणतो, "सरकार नोकरीच्या ज्या काही जागा काढणार आहे, त्या वाढवल्या पाहिजे. जेणेकरून शेतकऱ्यांची मुलं, इतर कास्टची मुलं यांना त्याचा फायदा होईल."
यानंतर सलमान बैलगाडी घेऊन कापसाच्या शेताकडे निघून गेला.
दरम्यान, औरंगजेबासंदर्भातला वाद पुढे काय वळण घेतो, ते आपल्याला येणाऱ्या काही दिवसांत कळेलच. पण, पाणीप्रश्न, बेरोजगारी, शेतमालाचे भाव या खुलताबादमधील नागरिकांच्या ज्वलंत समस्या असल्याचं दिसतंय. आता या समस्यांवर काय तोडगा निघतो? निघतो की नाही? ते पाहणंही महत्त्वाचं ठरेल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











