'मारून-झोडून सगळी कामं करून घेत होते', म्यानमारमधून 'सायबर गुलामगिरी'तून सुटलेल्या 60 भारतीयांची आपबिती

विमानतळावर बसलेले काही लोक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

म्यानमारमध्ये सायबर गुलामगिरीमध्ये अडकविण्यात आलेल्या 60 भारतीयांची महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर शाखेने सुटका केली आहे. या प्रकरणी एका परदेशी नागरिकासह पाच दलालांना भारतातून अटक करण्यात आली आहे.

म्यानमारमधून सुटका करण्यात आलेल्या 60 भारतीयांना वेगवेगळ्या पद्धतीने प्रलोभन देऊन फसवण्यात आले व त्यांना तिकडे धाक दाखवत, छळ करून जबरदस्तीने सायबर गुन्हेगारी करून घेण्यात आली.

दरवर्षी भारतातून लाखो इंजिनियर, डॉक्टर, परिचारिका आणि आयटी तज्ञ, हॉटेलीयर आणि इतर व्यवसायातील लोक परदेशात कामासाठी स्थलांतर करत असतात. याचाच फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी आता परदेशात नोकरी शोधणाऱ्यांना लक्ष्य केले आहे.

'सायबर गुलामगिरी' या एका नवीन सायबर गुन्हेगारी प्रकारामुळे परदेशात नोकरीसाठी विविध प्रलोभन देऊन परदेशात नेले आणि त्यांच्या मनाविरुद्ध काम घेऊन शोषण केल्याबाबतचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्र सायबर पोलिसांनी समोर आणला.

विदेशात चांगल्या पगाराच्या नोकरीच्या मोहात थायलंड गाठले

भारतातील विविध राज्यातील 60 जणांची सुटका या प्रकरणात म्यानमारमधून महाराष्ट्र सायबर पोलिस आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे.

यामध्ये वसई-विरारचे राहणारे 39 वर्षीय सतीश यांचा देखील समावेश होता.

सतीश घडलेल्या या प्रकरणासंदर्भात बोलताना म्हणाले की, "मुंबईत काही वर्ष हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून नोकरी करत होतो. चांगला पगार होता. सगळे सुरळीत सुरू होते. एका टोळीच्या जाळ्यात अडकून विदेशात चांगल्या पगाराच्या नोकरीच्या मोहात थायलंड गाठले. मात्र, तेथून आलिशान कार्यालयात न पोहोचता, म्यानमारच्या निर्जन कंपाउंडमध्ये पोहोचलो."

"तेथे माझा पाच हजार डॉलरमध्ये सौदा झाला. एका जंगलाच्या कोपऱ्यात जिथे आजूबाजूला फक्त शस्त्र घेऊन असलेली पहारेकरी. मारून झोडून सगळी कामे करून घेत होते", असे म्यानमारमधून सुटका झालेला सतीश सांगतो.

म्यानमारमधून सोडवलेले भारतीय आणि मुंबई पोलीस कर्मचारी
फोटो कॅप्शन, म्यानमारमधून सुटका करण्यात आलेल्या 60 भारतीयांना वेगवेगळ्या पद्धतीने प्रलोभन देऊन फसवण्यात आले होते

'टुरिस्ट व्हिसावर थायलंडला पाठवले जात होते'

म्यानमारमधून भारतात परतलेल्या 60 भारतीयांमधल्या एका 41 वर्षीय हरीश (नाव बदललेले आहे) यांनी सांगितले की, "फेसबूक, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडिया ॲपवर विदेशातील नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना एजंट आपल्या जाळ्यात ओढत आहेत. माझं ही तसंच झालं. जाळ्यात येईपर्यंत चांगले संभाषण करून पासपोर्ट तयार करत व्हिसा, विमान तिकिटांची व्यवस्था करुन टुरिस्ट व्हिसावर थायलंडला पाठवले गेले."

पुढे हरीश म्हणाले की, "तिथे गेल्यावर पासपोर्ट मोबाईल सर्व काढून घेतले. सशस्त्र बंडखोरांच्या ताब्यात दिले. एका कंपाउंडमध्ये कोंडले. त्यानंतर सायबर फसवणूक, शेअर्स ट्रेडिंग, गुंतवणूक, टास्क, डिजिटल अटक अशी कामे करण्यासाठी छळ होत होता. त्यास विरोध करताच शरीराचे भाग काढून त्यांची विक्री करण्याची धमकी दिली जात होती. तिथे असलेल्या अनेकांना तर एका टोळीकडून दुसऱ्या टोळीकडे विकले जाते. सर्वत्र सशस्त्र बंडखोर तैनात असल्याने येथे जीवाच्या भीतीने काम करावे लागत होते."

या प्रकरणाबाबत माहिती कशी मिळाली?

म्यानमारमध्ये नेलेल्या काही तरुणांनी मोठ्या मेहनतीने भारतात आपल्या कुटुंबीयांशी वेगवेळ्या माध्यमातून संपर्क साधत येथून सुटका करण्याची विनंती केली.

यासंदर्भात नातेवाईकांनी पुन्हा आप्तेजणांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता काही संपर्क झाला नाही त्यामुळे म्यानमारमध्ये अडकलेल्या पीडिताच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्र पोलिसांकडे मदतीची मागणी केली.

अशाप्रकारे देशभरात विविध राज्यातील लोक तिथे अडकले असल्याच्या तक्रारी कुटुंबीयांनी केल्या होत्या.

मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद
फोटो कॅप्शन, मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन सदरील प्रकरणाची माहिती दिली आहे

महाराष्ट्र सायबर पोलिसांना महाराष्ट्रातील एका अशाच व्यक्तीबद्दल माहिती मिळाल्यानंतर याबद्दल दखल घेत. याप्रकरणी तपास सुरू केला.

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी काही महिने केंद्र सरकारच्या मदतीने विविध टीम्सच्या माध्यमातून ऑपरेशन राबवत एकूण 60जणांची सुखरूप सुटका केली आहे.

याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे.

थायलंडमध्ये रोजगाराच्या संधी मिळवून देण्याच्या नावाखाली व्यक्तींची भरती करणे, त्यांची म्यानमारमध्ये तस्करी करणे हे तेथील काही सायबर गुन्हेगार आणि भारतीय गुन्हेगार यांचे मिळून रॅकेट आहे असे पोलिसांच्या चौकशीत आतापर्यंत निष्पन्न झाले आहे.

म्यानमार, थायलंड, मलेशिया आणि भारतासह अनेक ठिकाणांहून सक्रियपणे असे रॅकेट कार्यरत असल्याचे ही सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

सायबर गुलामगिरी म्हणजे काय?

सायबर गुलामगिरी ही मानवी तस्करीचा एक आधुनिक प्रकार आहे. कंबोडिया, म्यानमार, लाओस आणि हाँगकाँग सारख्या देशांमध्ये हा गुन्हा एक गंभीर समस्या म्हणून उदयास आला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय नागरिक देखील अशा या सायबर गुलामगिरी अडकले आहेत. ज्यामध्ये नोकरीच्या प्रलोभनाने परदेशात नेलं जातं आणि तिथे सायबर गुन्हेगारी करण्यासाठी त्या व्यक्तीचा छळ केला जातो. त्यालाच म्हणतात सायबर गुलामगिरी.

रोजगाराच्या संधींच्या आडून हे प्रकार घडत आहेत. एका व्यक्तीला अधिक पगाराचे आमिष दाखवून डेटा एंट्री पदासाठी नोकरीवर पाठवतो असं सांगितले जाते मग आशियाई देशांमध्ये नेले जाते आणि नंतर त्यांना सायबर फसवणूक करण्यास भाग पाडले जाते.

या टोळ्या कशा काम करतात?

सायबर गुलामगिरीची सुरुवात सहसा कॉल सेंटर, ऑनलाइन मार्केटिंग किंवा ग्राहक सेवांमधून देणाऱ्या फसव्या नोकरीच्या जाहिरातींपासून होते.

बेरोजगार आणि नवीन नोकरीच्या संधीत असलेल्या व्यक्तींचा डेटा हा फसवणूक करणाऱ्या लोकांकडे जमा असतो. तो डेटा वापरून अनेकदा समोरून फोन आणि मेसेजेस हे संबंधित व्यक्तींना केले जातात.

ज्यामध्ये परदेशात चांगल्या नोकरीचे आणि अधिक पगाराचे प्रलोभन दाखवण्यात येते. एखाद्या व्यक्तीला विश्वास बसावा यासाठी संपूर्ण संवाद हा चांगल्या प्रकारे केला जातो. त्यानंतर जलदगतीने ठरलेल्या देशात जाण्यासाठी तिकीट , व्हिजा आणि अपॉइंटमेंट लेटर समोरून दिले जाते.

सायबर फसवणूक

फोटो स्रोत, Getty Images

संबंधित व्यक्ती सर्व प्रक्रिया करून समोरून सांगितल्याप्रमाणे संबंधित स्थळावर पोहोचल्यानंतर त्या देशामध्ये त्यांचे पासपोर्ट, मोबाईल आणि सर्व कागदपत्रे जप्त केली जातात. पुढे त्यांना एका अज्ञात स्थळी नेलं जातं. जिथे अमानुष छळ आणि इच्छेविरुद्ध अनेक काम करावे लागतात.

ज्यामध्ये दुसऱ्या देशातून आणलेल्या व्यक्तीला सोशल मीडियावर बनावट सोशल मीडिया प्रोफाइल तयार करण्यास भाग पाडले जाते.

जेणेकरून व्यक्तींना क्रिप्टोकरन्सी अँपस किंवा फसव्या गुंतवणूक योजनांमध्ये लोकांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले जाते किंवा इतर सायबर फ्रॉड घडवून आणले जातात. तर दुसरीकडे फोन कॉल्सवरून फसवणूक करण्यासाठी सांगितले जाते. समजा हे न केल्यास त्या व्यक्तीचा छळ केला जातो.

भारतातली ही सगळ्यात मोठी कारवाई आहे

या सायबर गुलामगिरी संदर्भात महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी माहिती देताना म्हटल आहे की, "सायबर गुलामगिरीत म्यानमार आणि थायलंड येथे अडकलेल्या 60 भारतीयांना परत आणण्यात आम्हाला यश आलेले आहे. अधिक मानधन देणार या आमिषाने त्यांना तिथे नेण्यात आलं आणि तिथे त्यांच्या माध्यमातून सायबर फ्रॉड घडवून आणत, त्यांचा छळ केला गेला. यासंदर्भात तीन गुन्हे आम्ही नोंदवले आणि पाच लोकांना अटक केली आहे. भारतातली ही सगळ्यात मोठी कारवाई आहे."

देशभरात सायबर फ्रॉडसचे अनेक प्रकार समोर येत आहेत. महाराष्ट्रात देखील अशाप्रकारे नवे नवे गुन्हे घडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई पोलीस
फोटो कॅप्शन, भारतातली ही सगळ्यात मोठी कारवाई आहे

सायबर गुलामगिरीसाठी म्यानमारमध्ये माणसे पाठविण्याप्रकरणी अटक केलेल्यांमध्ये मनीष ग्रे ऊर्फ मॅडी, तैसन ऊर्फ आदित्य रवी चंद्रन, रूपनारायण रामधर गुप्ता, जेन्सी राणी डी आणि चिनी-कझाकस्तानचा नागरिक असलेला तलानिती नुलाक्सी यांचा समावेश आहे. मनीष ग्रे ऊर्फ मॅडी हा वेब सिरिजमध्ये अभिनेता म्हणून काम करीत होता. तर दलाल तलानिती नुलाक्सी याला महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

सायबर गुन्ह्यांचं प्रमाण जसजसं वाढत आहे तसतशी हे गुन्हे घडवून आणण्यासाठी 'मनुष्यबळा'चीही गरज वाढते आहे. आणि, ती गरज भरून काढण्यासाठी बेरोजगार आणि अधिक मोबदला देण्याच्या उद्देशाने तरुणाईला फसवून सायबर गुन्ह्यांच्या रॅकेट्समध्ये खेचले जात आहे अशी माहिती सायबर तज्ञांनी दिली.

काय खबरदारी घ्यायला हवी?

सायबर गुलामगिरीचे प्रकरण वाढत आहेत त्यामुळे या प्रकारापासून खबरदारी घेण्यासाठी सायबर एक्सपोर्ट प्रशांत माळी यांनी याबाबत बोलताना म्हटलं की,

1) फसव्या जॉब ऑफर्सपासून सावध रहा. ज्यामध्ये "अत्यल्प पात्रता, अधिक पगार, झटपट व्हिसा" अशा ऑफर्सकडे शंका घेऊन पाहा.

2) नोकरी देणारी कंपनी वैध आहे का, ती MEA-कडून रजिस्टर्ड आहे का, हे तपासा.

3) दूतावास/प्रवासी सेवा यांच्याशी संपर्क ठेवा: परदेशात जाण्यापूर्वी तेथील भारतीय दूतावासाची माहिती ठेवा. e-Migrate Portal वापरा, आणि अधिकृत मार्गानेच स्थलांतर करा.

4) कोणत्याही फसव्या जाहिरातींना आणि संवादाला बळी पडू नका.

मोबाईल स्क्रीन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गुन्हेगार सोशल मीडियाच्या माध्यमातून फ्रॉड करण्याची संधी शोधत असतात

जगभर सायबर क्राईमचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रोज वेगवेगळ्या पद्धतीने सायबर क्राईम घडत आहेत. त्यामुळे यासंदर्भात लोकांपर्यंत जनजागृती होणं फार गरजेचं आहे.

यासंदर्भात सायबरतज्ज्ञ प्रशांत माळी यांच्याशी बीबीसी मराठीने संवाद साधला असता ते म्हणाले की, "या प्रकरणाची अधिकाधिक माहिती सायबर पोलिसांनी मिळवावी आणि इतरांनाही याबाबत जागरूक करावी."

सायबर क्राईम्सच्या घटनांची माहिती राज्यभर विविध पोलीस ठाण्यात मार्फत लोकांपर्यंत पोहोचवावी.

शहर,गावपातळीवर सायबर गुलामगिरी विरोधी माहिती मोहीम राबवावी,सोशल मीडिया सावध वापराविषयी आवाहन करावे आणि अनोळखी लोकांकडून आलेल्या ऑफर्स/मॅसेजेसना प्रतिसाद देताना खबरदारी पोलिसांनी आणि सर्वांनीच घ्यायला हवी, सायबरतज्ज्ञ माळी यांनी सांगितले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)