'क्योंकि सास...'चं 25 वर्षांनंतर पुनरागमन, 'सास बहू'ची मालिका पुन्हा एकदा चर्चेत

स्मृती इराणी

फोटो स्रोत, starplus

फोटो कॅप्शन, साधारण 2000 च्या मध्यात 'क्योंकि सास भी कभी बहू थी' ही मालिका पहिल्यांदा छोट्या पडद्यावर आली होती, आता तब्बल 25 वर्षांनी ही मालिका परत येत आहे.
    • Author, वंदना
    • Role, वरिष्ठ वृत्त संपादक, एशिया डिजिटल

साधारण 2000 सालच्या मध्यात 'क्योंकि सास भी कभी बहू थी' ही मालिका पहिल्यांदा छोट्या पडद्यावर आली होती. तेव्हा ती घराघरांत पोहोचली होती. आता तब्बल 25 वर्षांनी ही मालिका परतली आहे .

परंतु, आजचा काळ थोडासा वेगळा आहे. ओटीटी, सोशल मीडिया आहे आणि प्रेक्षकही थोडा अधिक जागरूक झाला आहे.

त्यामुळं तुलसीची कथा पुन्हा एकदा नव्यानं सुरू होत आहे. पण, या जुन्या गोष्टी नव्या पिढीला भावतील का? असे अनेक प्रश्नही सोबत ती सोबत घेऊन येत आहे.

'घर घर की रानी, तुलसी विरानी'

अभिनेत्री स्मृती इराणी यांनी 2004 मध्ये जेव्हा भाजपकडून निवडणूक लढवायचं ठरवलं, तेव्हा त्यांच्या प्रचारसभा या राजकीय घोषणा कमी आणि 'तुलसी विरानी' या लोकप्रिय पात्राच्या ओळखीमुळेच अधिक गाजत होत्या.

लोक त्यांना त्यांच्या खऱ्या नावाने नव्हे, तर टीव्हीवरच्या भूमिकेमुळे म्हणजे 'तुलसी' म्हणूनच ओळखायचे.

'तुलसी विरानी' म्हणजेच स्मृती इराणी या 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या टीव्ही मालिकेतील सर्वात प्रसिद्ध सून होत्या. या भूमिकेमुळं त्या केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातील अनेक घराघरांत ओळखल्या जायच्या.

एक भाजप नेत्या, खासदार आणि माजी मंत्री म्हणून आजची पिढी स्मृती इराणी यांना ओळखते. लोकांनी त्यांना राजकीय चर्चांमध्ये ठामपणे बोलताना पाहिलं आहे आणि राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर देतानाही पाहिलं आहे.

जुलै 2000 मध्ये 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित झाला होता.

तो असा काळ होता, जेव्हा भारतातील गावा-गावांमध्ये आणि शहरांमध्ये लोक आपापली कामं आटोपून रात्री साडेदहा वाजता 'क्योंकि सास भी कभी बहू थी' ही मालिका पाहण्यासाठी टीव्हीसमोर बसायचे.

ही मालिका पाहणं म्हणजे संपूर्ण परिवारासोबत एकत्र बसून पाहण्याचा एक कौटुंबिक कार्यक्रमच असायचा.

मंगळवारी रात्री (29 जुलै), 25 वर्षांनंतर प्रेक्षकांनी पुन्हा एकदा 'क्योंकि सास भी कभी बहू थी सिझन 2' टीव्हीवर पाहिला. या वेळी स्मृती इराणींसारखे काही जुने चेहरे तर होतेच त्याचबरोबर बरेच नवीन चेहरेही या एपिसोडमध्ये दिसले.

'तुलसी सारखी सून हवी, जी मोठ्यांची प्रत्येक गोष्ट ऐकेल'

एकीकडे या मालिकेनं मोठं यश मिळवलं, तर दुसरीकडे प्रचंड टीकाही झाली. महिलांबाबत ही मालिका मागासलेले विचार दाखवू लागली आणि त्याचा एक प्रकारे ट्रेंडच त्यांनी सुरू केला, असं म्हटलं जाऊ लागलं.

महत्त्वाचं म्हणजे ही मालिका भारताबाहेरही खूप प्रसिद्ध झाली होती आणि तेही सोशल मीडियाशिवाय, आहे की नाही आश्चर्य.

'सॉफ्ट पावर ऑफ इंडियन टेलीव्हिजन शोज इन नेपाल' या संशोधनात डंबर राज भट्टा लिहितात, "या मालिकेचा असा प्रभाव होता की, नेपाळमधल्या शहरी महिलाही म्हणायच्या की, त्यांना तुलसीसारखी सून हवी.

माझ्या एका नातेवाइकानं तर स्पष्टपणे म्हटलं होतं, तुलसीसारखी सून हवी जी नेहमी मोठ्यांचं म्हणजेच वडिलधाऱ्यांचं ऐकते."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, starplus

फोटो कॅप्शन, 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेचे नवे पर्व

अफगाणिस्तानमध्ये दरी भाषेत डब होऊन दाखवण्यात आलेली ही पहिली भारतीय मालिका होती. तिथंही ती 'तुलसी' या नावानेच खूप प्रसिद्ध होती.

तिथे असं म्हटलं जायचं की, ही मालिका सुरू असताना चोर चोरी करायचे. कारण त्यांना माहीत असायचं की, घरातील सगळे लोक त्यावेळी टीव्हीसमोर खिळून बसलेले असतील.

अर्थातच, अफगाण संस्कृतीनुसार काही दृश्यं बदलण्यात आली होती जसं की, महिलांचे कपडे, नाच-गाण्यांची दृश्यं किंवा धार्मिक चिन्हं हे सगळं थोडंसं धुसर करून दाखवलं जात असत.

भूतान, श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ यांसारख्या देशांमधील लोकांना तर या मालिकेचं वेडच लागलं होतं.

'क्योंकि... पुरोगामी असल्याचे दावे चुकीचे'

आत्तापर्यंत नव्या सीझनच्या सुरुवातीच्या एपिसोडमध्ये यात जेन झी पिढी दाखवली आहे. ते सोशल मीडियावर हॅशटॅग वापरतात, सेल्फी अपलोड करतात. पण तरीही यातील गोष्टी थोड्या जुन्याच वाटल्या.

जसं की, तुलसी सुनेला सांगते की, "घरात आई, सून, मुलगी स्वयंपाक करत असेल आणि त्या सुंगधानं सगळं घर भरून जाईल, तेव्हाच घर खऱ्या घरासारखं वाटतं."

तसंच तुलसी मुलांना म्हणते की, "मी काम नाही केलं तर मग कोण करणार? हे घर अशाच पद्धतीनं चालतं."

मालिकेचा जुना सिझन खूप यशस्वी ठरला, परंतु तरीही हा प्रश्न आजही कायम आहे की, या मालिकेनं खरंच महिलांचे मुद्दे प्रगतीशील किंवा पुरोगामी पद्धतीनं दाखवले होते का?

 एकता कपूर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, या मालिकेनं भारतीय घरांमधील महिलांना एक नवीन आवाज दिला असल्याचं, काही दिवसांपूर्वी एकता कपूर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिलं होतं.

काही दिवसांपूर्वी एकता कपूर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिलं होतं की, "एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, या मालिकेनं भारतीय घरांमधील महिलांना एक नवीन आवाज दिला आहे.

2000 ते 2005 या काळात पहिल्यांदाच महिला कौटुंबिक चर्चांचा भाग होऊ लागल्या. हा बदल भारतीय टीव्हीमुळे झाला होता, विशेषतः 'क्योंकि सास भी कभी बहू थी' आणि 'कहानी घर घर की' यामुळे."

पेमराज शारदा कॉलेजमध्ये प्राध्यापिका असलेल्या माधुरी या टीव्ही आणि चित्रपटसृष्टीवर समिक्षात्मक लेखही लिहितात.

त्या म्हणतात, "या मालिकांमध्ये महिलांचे मुद्दे खूपच सजवून आणि वरवरच्या पातळीवर दाखवले गेले होते. तुम्ही पाहा ना, टीव्ही मालिकांमध्ये महिलांना किती तडजोडी कराव्या लागतात.

शेवटी मालिका कशीही संपो, पण घरातील पुरुषप्रधान सिस्टिम तशीच राहते. म्हणून अशा मालिकांनी महिलांचे प्रश्न मांडले, असं म्हणणं योग्य ठरणार नाही."

'रजनी', 'शांती', 'उडान' मधून दिसला महिलांचा संघर्ष

आपण एकता कपूर यांच्या वक्तव्याकडं परत येऊयात की, "या मालिकेनं भारतीय घरांतील महिलांना एक नवीन आवाज दिला."

जर आपण 2000 पूर्वीच्या हिंदी टीव्ही मालिकांकडे पाहिलं, तर 1985 मध्ये दूरदर्शनवर 'रजनी' नावाची मालिका आली होती.

या मालिकेत प्रिया तेंडुलकर यांनी एका सामान्य महिलेची भूमिका साकारली होती, जी सरकारी विभागातील हलगर्जीपणा आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणारी जागरूक नागरिक बनते.

साडी नेसलेली आणि मोठी टिकली लावणारी रजनी एका एपिसोडमध्ये एलपीजी सिलिंडरच्या दरात बेकायदा वाढ झाल्याच्या विरोधात आवाज उठवते आणि डिलिव्हरी एजंटांच्या वागणुकीविरोधात उभी राहते.

मंदिरा बेदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 90च्या दशकात 'शांती' या मालिकेत मंदिरा बेदी यांना लोकांनी एक धाडसी, स्वतंत्र विचारांची महिला पत्रकार म्हणून पाहिलं. जी काम करते, आणि आपल्या हक्कांसाठी कसं लढायचं ते जाणते.

या एपिसोडचा इतका परिणाम झाला की, ऑल इंडिया एलपीजी डिस्ट्रिब्यूटर्स संघटना मालिकेच्या विरोधात आंदोलन करायला उतरले होते.

1989 मध्ये दूरदर्शनवर 'उडान' नावाची मालिका सुरू झाली होती. ही मालिका भारताच्या पहिल्या महिला डीजीपींच्या जीवनावर आधारित होती.

90च्या दशकात 'शांती' या मालिकेत मंदिरा बेदी यांना लोकांनी एक धाडसी, स्वतंत्र विचारांची महिला पत्रकार म्हणून पाहिलं. जी काम करते, आणि आपल्या हक्कांसाठी कसं लढायचं ते जाणते.

म्हणूनच 'क्योंकि सास भी कभी बहू थी' सारख्या मालिकांनीच पहिल्यांदा महिलांना आवाज दिला, असं म्हणणं हे पूर्णपणे योग्य किंवा समर्थनीय वाटत नाही.

'क्योंकि सास...' मध्ये मांडले वैवाहिक अत्याचारासारखे मुद्दे

अनेक समीक्षक आणि या क्षेत्रातील लोक या मालिकेच्या आणि एकता कपूर यांच्या बाजूने बोलताना दिसतात.

रोहिणी निनावे या टीव्ही इंडस्ट्रीत काम करतात आणि गेल्या 28 वर्षांपासून त्यांनी अनेक टीव्ही मालिकांसाठी लिखाण केलं आहे.

याबाबत त्यांचं मत आहे की, "मी असं म्हणणार नाही की, ही मालिका मागास विचारांची किंवा प्रतिगामी होती. मालिकेत प्रयत्न केला गेला होता की, महिलांना त्यांचे हक्क आणि अस्तित्वाची जाणीव करून द्यावी. त्या काळाच्या तुलनेत महिलांना चांगल्या पद्धतीने दाखवलं होतं म्हणजे 'बा पासून ते बहू पर्यंत".

कार्ड

हा असा काळ होता, जेव्हा महिलांमध्ये आपले अधिकार जाणून घेण्याची जागरूकता वाढत होती. पण खेड्यापाड्यातील आणि लहान शहरांमधील महिलांची परिस्थिती थोडी वेगळी होती आणि अजूनही आहे.

त्यांना हेच शिकवलं जातं की, मोठ्यांचा आदर करावा, घरकाम करावं आणि नात्यांमध्येच अडकून राहावं. त्यामुळे मालिकेतही हेच वास्तव दाखवण्यात आलं."

लेखिका लक्ष्मी यादव म्हणतात की, ज्या स्त्रिया आपल्या ओळखीसाठी घराचा उंबरठा ओलांडू पाहत होत्या, त्यांना परत त्या चौकटीत आणण्याचं काम या मालिकेनं अप्रत्यक्षपणे केलं.

त्यांच्या मते, "ही मालिका पाहून घरांमध्येही लोकांनी आपल्या महिलांकडून तसंच परंपरागत आणि निस्वार्थपणे वागण्याची अपेक्षा ठेवायला सुरुवात केली. या मालिकेनं भारतीय महिलांना केवळ दोन प्रकारांमध्ये विभागलं, 'देवी' तुलसी आणि 'डायन' मंदिरा."

स्मृती इराणी यांनी मालिकेवरील टीका नाकारल्या

स्मृती इराणी यांनी या मालिकेवर होणाऱ्या टीका नाकारल्या आहेत.

'क्योंकि सास भी कभी बहू थी' च्या पुनरागमनावर स्मृती इराणी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर लिहिलं की, "या मालिकेनं भारतीय घरांमधील अनेक कठीण मुद्द्यांवर आवाज उठवला. जेव्हा मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये ही हिंमत नव्हती, तेव्हा या मालिकेनं समाजातील गुंतागुंतीच्या वास्तवांशी लोकांना जाणीव करून दिली."

'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेत एक कथानक वैवाहिक बलात्कारावर आधारित होतं, जिथे तुलसी सासू झाल्यावर सुनेसाठी लढते, कारण ती सून वैवाहिक अत्याचाराची शिकार झालेली असते.

या मालिकेत बा म्हणजेच आजीला फॅशन डिझाईन स्कूलमध्ये जाताना दाखवलं होतं. तसेच प्रौढ साक्षरतेसारखा महत्त्वाचा मुद्दाही दाखवण्यात आला होता.

स्मृती इराणी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्मृती इराणी यांनी या मालिकेवर होणाऱ्या टीका नाकारल्या आहेत.

स्मृती इराणी यांनी करण जोहरसोबतच्या एका शोमध्ये आणखी एक मुद्दा उपस्थित केला.

त्यांनी सांगितलं की, या मालिकेनं दुसऱ्या अर्थानंही एक नवा मापदंड आणला. कारण एका महिला पात्र म्हणून त्यांना पुरुष मुख्य कलाकारांपेक्षा जास्त मानधन मिळू लागलं होतं आणि ती त्या काळातील सामान्य गोष्ट नव्हती.

सोशल मीडियावर नजर टाकली तर तिथंही याबद्दल मतं विभागलेली पाहायला मिळतात.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर कुंदर राय लिहितात, "सभ्यता, संस्कृती आणि संस्कार घेऊन माझ्या आईची आवडती तुलसी सून परत येत आहे, आमच्या घरात तिचं कुटुंब घेऊन. आई आता या जगात नाही, परंतु संपूर्ण जग तिची वाट पाहत आहे."

जेन झीच्या अपेक्षांवर उतरतील का स्मृती इराणी?

जेव्हा 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मालिका 2000 मध्ये छोट्या पडद्यावर आली होती, तेव्हा थिएटरशिवाय टीव्हीच मनोरंजनाचं सगळ्यात मोठं माध्यम होतं. ओटीटी आणि सोशल मीडियासारख्या गोष्टी त्या वेळी नव्हत्या.

त्या काळात लोकांनी परदेशी कंटेंट फारसा पाहिलेला नव्हता. ही मालिका कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी एक माध्यमही होती.

परंतु, आज प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार आपल्या खोलीत बसून मोबाइलवर काहीही पाहू शकतो. नातेसंबंध आणि लग्नाबाबत जेन झीचे विचारविश्वही वेगळं आहे.

तुलसी 'बहू'चा प्रत्येक पैलू, त्याग आणि परंपरांना आदर्श मानणाऱ्या जुन्या पिढीनंतर, आता 25 वर्षांनी स्मृती इराणी जेन झीच्या अपेक्षांवर खऱ्या उतरू शकतील का?

जेव्हा 2000 मध्ये एकता कपूर 'क्योंकि सास भी कभी बहू थी' ही मालिका घेऊन आल्या, तेव्हा उदारीकरणानंतरच्या भारतात अनेक लोकांनी या मालिकेकडे एक नवीन प्रयोग म्हणून पाहिलं.

काहींना तो प्रयोग योग्य आणि प्रगतिशील वाटला, तर काहींना तो जुनाट आणि मागास विचारांचा म्हणजे पुराणमतवादी वाटला.

कार्ड

परंतु, जेव्हा काहीतरी नवीन आणि वेगळं दाखवण्याऐवजी 25 वर्षांपूर्वीची हिट मालिका थोडा बदल करून परत आणली जाते, तेव्हा असा प्रश्नही उपस्थित होतो की टीव्ही आणि मनोरंजन उद्योग आता बचावात्मक मोडमध्ये गेला आहे का? जिथे काहीतरी नवीन करायचं किंवा बोलायचं तर ते धोक्याचं ठरू शकतं?

परंपरा आणि कौटुंबिक मूल्यांची जुनी साखरपेरणी सुरक्षित वाटते का?

लेखिका रोहिणी निनावे यांचं मत आहे, "ही मालिका म्हणजे एक व्यवसाय आहे आणि अशा प्रकारचे प्रयोग करावेच लागतात.

हो, जर 'क्योंकि सास भी कभी बहू थी' पुन्हा सुरू होत असेल, तर त्यात काहीतरी नवीन दृष्टीकोन असायलाच हवा.

महिलांना जाणीव करून द्या की, नाती जपताना स्वतःचं अस्तित्व विसरू नका. जर असं दाखवलं जात असेल, तर ही मालिका पुन्हा आणण्यात काहीच चुकीचं नाही."

प्रश्न खूप आहेत, आणि कदाचित त्यांची उत्तरं 'क्योंकि सास भी कभी बहू थी'च्या येणाऱ्या भागातूनच मिळतील.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.