यूट्यूबनं टीव्ही चॅनेल्सना मागे टाकलं आहे का? वाचा

फोटो स्रोत, Getty Images
युट्यूबवर व्हीडिओ पाहणं तुमच्या सवयीचं असेल, पण हे युट्यूब आता टीव्हीलाही मागे टाकतंय. अमेरिकेत तर 2024 च्या जुलै महिन्यात पहिल्यांदाच प्रेक्षकांनी टीव्ही आणि सिनेमापेक्षा जास्त वेळ युट्यूबवर घालवला आहे.
नेटफ्लिक्स, अमेझॉन, डिझनीसारख्या ओटीटी प्लेयर्सनाही युट्यूबनं मागे टाकलं. अर्थात पुढच्या काही महिन्यांत युट्यूबची प्रेक्षकसंख्या डिझनी आणि डीसीच्या थोडी खाली गेली. पण जगभरात युट्यूबची लोकप्रियता वाढते आहे.
युट्यूबचे सर्वाधिक प्रेक्षक भारतात आहेत. भारतात 40 कोटी लोक युट्यूब पाहतात. यूकेमध्ये 16 ते 24 या वयोगटातले 50 टक्केजण टीव्हीऐवजी युट्यूबवर कार्यक्रम पाहतात.
थोडक्यात, युट्यूबनं टीव्ही चॅनेल्सना मागे टाकलं आहे का? या प्रश्नाचं उत्तर या लेखातून जाणून घेऊयात.
मौजमजा की धोक्याची घंटा
युट्यूबवर लोकांना सगळ्या प्रकारचा कंटेंट उपलब्ध आहे, असं ‘लाईक, कमेंट अँड सबस्क्राइब: युट्यूब्स केऑटिक राइझ टू वर्ल्ड डॉमिनेशन’ पुस्तकाचे लेखक मार्क बर्गेन सांगतात. ते ब्लूमबर्ग टेक्नॉलॉजीसाठी पत्रकार म्हणून काम करतात.
मार्क सांगतात की जगभरात दरमहा सुमारे तीन अब्ज लोक युट्यूब पाहतात. त्यात 25 ते 35 या वयोगटातील लोकांची संख्या जास्त आहे. युट्यूब आता केवळ वेबसाईटच नाही तर ऍप, स्मार्ट टीव्ही आणि गेम्स कॉन्सोलवरही उपलब्ध आहे.
मार्क म्हणतात, “हा आता सर्वात लोकप्रिय ऑनलाईन प्लॅटफॉर्म बनला आहे. जाहिरातदारांना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचं हे एक मोठं माध्यम बनलं आहे. हा व्हिडिओंचा सर्वात मोठा कॅटलॉग आहे. लोक अनेक गोष्टी युट्यूबवर सर्च करूनही पाहू शकतात.”
युट्यूबची सुरुवात 2005 साली झाली होती. त्यावर अपलोड केलेली पहिली व्हीडिओ क्लिप 19 सेकंदांची होती. युट्यूबचे सहसंस्थापक जावेद करीम यांनी कॅलिफोर्नियाच्या सॅन डिएगोमधल्या प्राणीसंग्रहालयात तो व्हीडिओ रेकॉर्ड केला होता.
वर्षभरातच गूगलनं युट्यूब 1 अब्ज 65 कोटी डॉलर्सना खरेदी केलं. आता शंभरहून अधिक देशांत युट्यूब पाहिलं जातं.
याबाबत बोलताना मार्क बर्गेन म्हणतात, “ब्राझील, इंडोनेशियासह अनेक विकसनशील बाजारपेठांमध्ये युट्यूबनं टीव्ही चॅनेल्सची जागा घेतली आहे. इतकंच नाही, तर तिथे युट्यूब हेच मनोरंजन आणि बातम्यांचं मुख्य साधनही बनलं आहे.”


युट्यूबचा इथवरचा प्रवास तीन टप्प्यांमध्ये झाला, असं मार्क बर्गेन सांगतात.
मार्क म्हणाले, “युट्यूबच्या एका माजी अधिकाऱ्यांनी मला एक मंत्र सांगितला, तो म्हणजे थट्टामस्करी, आव्हान आणि वास्तव. सुरुवातीला मनोरंजन उद्योग किंवा जाहिरातविश्व युट्यूबकडे गांभीर्यानं पाहात नव्हतं. मग दुसरा टप्पा सुरू झाला, ज्यात युट्यूब हॉलिवूड, नेटफ्लिक्स आणि अमेझॉनसमोर आव्हान उभं करू लागलं. युट्यूबनं स्वतःचे शोज काढले आणि नेटफ्लिक्सप्रमाणे प्रेक्षकांकडून पैसे आकारायला सुरूवात केली.”
2016 साली युट्यूबनं ओरिजीनल आणि महागडा कंटेंट बनवायला सुरुवात केली.
पण गुंतवणुकीच्या बाबतीत त्यांना नेटफ्लिक्ससारख्या कंपन्यांशी स्पर्धा करता आली नाही. त्यामुळे 2022 साली युट्यूबचा हा विभाग बंद झाला.
आता तिसऱ्या नव्या पर्वात युट्यूबनं आपली जागा आणखी पक्की केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मार्क बर्गेन सांगतात की आता लोक युट्यूबला कामासाठी वापरला जाणारा प्लॅटफॉर्म म्हणून वापरू लागले आहेत.
उदाहरणार्थ, एखादा खाद्यपदार्थ बनवण्यापासून एखादी गोष्ट दुरुस्त करण्यापर्यंत अनेक गोष्टींचे व्हीडिओ लोक युट्यूबवर पाहतात. लोकांच्या गरजेचे व्हीडिओ इथे अगदी सहजपणे सापडतातही.
युट्यूबवरचे कंटेंट क्रिएटर्सही स्टार होत आहेत आणि त्यातल्या काहींची लोकप्रियता फिल्मस्टार्सपेक्षा काही कमी नाही.
अलीकडेच मिस्टर बीस्ट नावाच्या एक 26 वर्षीय कंटेंट क्रिएटरच्या युट्यूब चॅनेलनं जूनमध्ये भारतीय म्युझिक लेबल टी सीरीजला मागे टाकलं. त्याचे 32 कोटी सबस्क्रायबर्स आहेत.
युट्यूबवरच्या अशा कंटेंट क्रिएटर्सना जाहिरातींमधूनही पैसा मिळतो. त्यांच्या चॅनेलवर जाहिरात येते, तेव्हा त्याचे पैसे त्यांना मिळतात.

फोटो स्रोत, Getty Images
मार्क म्हणतात, “जे पैसे जाहिरात कंपन्या जाहिरातींच्या प्रसारणासाठी देतात त्यातला 45 टक्के वाटा युट्यूब कंपनी स्वतःकडे ठेवते आणि बाकीचे पैसे त्या चॅनेलला किंवा त्यांच्या कंटेंट क्रिएटरला मिळतात. असा व्यवहार करायला युट्यूबनं 2007 सालापासून सुरुवात केली. तेव्हा हा एक जोखीमभरा नवा विचार होता. पण आज तेच त्यांच्या यशाचं सर्वात मोठं कारण ठरलं आहे."
काही सेवा वगळता युट्यूबवर बहुतांश गोष्टी मोफत असतात. कोणीही स्टार बनू शकतं, हे युट्यूबनं सिद्ध केलं आहे.
मार्क बर्गेन सांगतात की आक्षेपार्ह व्हीडिओही तयार होतात ज्यावर नियंत्रण ठेवणं ही एक समस्या ठरते आहे. तसंच एखाद्या देशातील सरकारला वाटलं की युट्यूब नियंत्रणाबाहेर चललं आहे तर तेही युट्यूबसाठी धोकादायक ठरू शकतं.
कायद्याचं सुरक्षाकवच
ख्रिस स्टोकेल वॉकर हे पत्रकार आणि ‘हाउ युट्यूब शुक अप टीव्ही अँड क्रिएटेड ए न्यू जनरेशंस ऑफ स्टार्स’ या पुस्तकाचे लेखक आहेत.
ते सांगतात की बहुतांश देशांमध्ये टीव्ही वाहिन्यांना अनेक नियम आणि कायद्यांअंतर्गत काम करावं लागतं. पण युट्यूब मात्र या कायद्यांच्या अखत्यारित नाही
म्हणजेच टीव्ही वाहिन्यांवर जसे संपादकीय नियम लागू होतात, तसे युट्यूबच्या कंटेंटवर लागू होत नाहीत.
हे समजून घेण्यासाठी थोडं इतिहासात डोकावून पाहूयात. युट्यूब अस्तित्वात येण्याआधी 1996 साली अमेरिकेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही कायदेशीर बदल झाले.
त्यावेळी डिसेंसी ऍक्ट म्हणजे सभ्य वर्तणुकीसंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करण्यात आली आणि त्यात सेक्शन 230 जोडण्यात आलं.
कारण तंत्रज्ञान कंपन्यांकडे एवढा पैसा किंवा पुरेसे लोक नव्हते, जे त्यांच्या प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या कंटेंटवर सतत नजर ठेवू शकतील.
त्यामुळे, या कंपन्यांना मोठ्या कायदेशीर लढायांपासून वाचवण्यासाठी कायद्यात बदल करण्यात आले.
पत्रकार क्रिस स्टोकेल वॉकर यांनी, “हाउ यूट्यूब शुक अप टीव्ही अँड क्रिएटेड ए न्यू जनरेशंस ऑफ स्टार्स” हे पुस्तक लिहिलंय. ते म्हणतात, “या नव्या कायद्याचा अर्थ असा होता की कंपन्या यूझर्सनी तयार केलेला कंटेंट फक्त प्रसारीत करतात, पण ते काय दाखवतात यासाठी त्या जबाबदार नाहीत आणि या कंटेंटची तपासणी करणं ही त्यांची जबाबदारी नाही.”

फोटो स्रोत, Getty Images
अर्थात, युट्यूबवर आक्षेपार्ह कंटेट अपलोड करणारे लोक किंवा आक्षेपार्ह कमेंट्स करणारे लोक यांच्यावर खटला दाखल केला जाऊ शकतो.
दरम्यान, आता टेक कंपन्या अब्जावधी डॉलर्स कमावू लागल्या आहेत पण कायद्यानं त्यांना दिलेलं संरक्षण कायम आहे.
ख्रिस स्टोकेल वॉकर सांगतात की, या कंपन्यांना वीस वर्षांपासून ही सवलत मिळते आहे आणि आता कुठे आपण त्याच्या परिणामांचा विचार करू लागलो आहोत.
आता कॉपी राइट आणि अन्य काही बाबतींत युट्यूब सारख्या कंपन्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी कायदे तयार करण्यात आले आहेत.
2019 साली 13 वर्षांपेक्षा लहान वयाच्या मुलांचा डेटा त्यांच्या आईवडिलांच्या परवानगीशिवाय जमा केल्याप्रकरणी गूगल आणि युट्यूबवर खटला दाखल झाला. त्यानंतर समेट करताना या कंपन्यांनी 17 कोटी डॉलर्स मोजले.
ख्रिस स्टोकेल सांगतात की या कंपन्या जगभर पसरल्या आहेत आणि आता त्या कुठल्या एका देशाच्या कायद्याच्या अखत्यारित येत नाहीत.
या गोष्टीचा या कंपन्या फायदा उठवतात.
अर्थात अनेक देशांमध्ये तिथल्या सरकारनं या कंपन्यांवर कारवाईही केली आहे.
ख्रिस म्हणाले, “पश्चिम आशियातल्या अनेक देशांमध्ये एकतर युट्यूबवर बंदी आहे किंवा लोक त्यापासून दूर गेले आहेत. कारण युट्यूबवर सेक्स, लैंगिक हिंसा आणि ड्रग्स सेवनाविषयी असे व्हिडिओज आहेत ज्यावर पाश्चिमात्य जगात आक्षेप घेतला जात नाही पण मध्यपूर्वेतल्या अनेक देशांमध्ये या गोष्टी संस्कृतीच्या विरोधातल्या मानल्या जातात.”
“युट्यूबवर दर मिनिटाला पाचशे तासांचा कंटेंट अपलोड होतो. त्यावर लक्ष ठेवायचं तर अनेक अडचणी आहेत. एकतर अशी टेहळणी करणारे लोक अनेकदा माध्यम कर्मचारी नसतात. त्यामुळे सेक्स आणि हिंसाचार असलेले अनेक व्हिडओ मुलांपर्यंत पोहोचतात. कोणत्या प्रकारचे व्हिडियो युट्यूबवर अपलोड करायला हवेत आणि कोणते नाही, याविषयी कंपनीचे स्वतःचे नियम आणि सूचना आहेत. उदाहरणार्थ द्वेष पसरवणारे व्हिडिओ पोस्ट आणि टिप्पणी करण्यास मनाई आहे. जे या नियमांचं पालन करत नाहीत, त्यांना इशारा दिला जातो किंवा त्यांच्यावर निर्बंध घातले जातात. अशा कंटेंटवर जाहिराती देणं बंद केलं जातं, म्हणजे क्रिकेटर्सना त्यातून पैसा मिळत नाही”, ख्रिस म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
युट्यूबसारख्या टेक कंपन्यांवर नियंत्रण ठेवणं सरकारला शक्य झालेलं नाही. याचं एक कारण म्हणजे तसा प्रभावी कायदा तयार करण्यात वेळ लागतो आहे, असं ख्रिस स्टोकेल वॉकर सांगतात.
अद्वितीय राहुल तेलंग अमेरिकेतल्या कार्नेगी मेलन विद्यापिठात इन्फॉर्मेशन सिस्टिम्सचे प्राध्यापक आहेत.
ते सांगतात की युट्यूबमुळे आपल्याला काही धोका निर्माण होऊ शकतो, असं याआधी टीव्ही उद्योगाला कधी वाटलं नव्हतं.
पण आता सिनेमापासून ते नेटफ्लिक्स आणि डिझनेसारख्या अनेक प्लॅटफॉर्म्सना युट्यूब तगडं आव्हान देत आहे.
राहुल सांगतात, “युट्यूबसाठी फायद्याची गोष्ट म्हणजे या प्लॅटफॉर्मवर यूझर्सनी स्वतः बनवलेला कंटेंट दाखवला जातो. त्यामुळे काय ट्रेंड होतंय, काय लोकप्रिय आहे, याचा युट्यूबला विचार करावा लागत नाही. दुसरीकडे टीव्ही वाहिन्या आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सना यावर बराच विचार करावा लागतो कारण त्यांना कंटेंट निर्मितीसाठी पैसाही बराच ओतावा लागतो. यात वेळ जातो आणि अनेकदा लोकांना तो कंटेंट पसंतही पडत नाही. पण युट्यूबचं तसं नाही. त्यामुळे युट्यूबला कुठली जोखीम उचलावी लागत नाही.”
राहुल पुढे सांगतात, “नेटफ्लिक्स किंवा अन्य पारंपरिक टीव्ही चॅनल्स फक्त कंटेंट तयार करून सादर करतात.
पण युट्यूबला माहिती असतं की मागच्या काही दिवसांत आपण काय काय पाहिलं आहे आणि आपल्याला काय आवडलं आहे.
या माहितीच्या आधारावरच ते जाहिराती देतात आणि नवे व्हिडिओ सुचवतात.
थोडक्यात, अन्य स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स आणि टीव्हीच्या तुलनेत युट्यूब प्रेक्षकांशी जोडलं गेलं आहे.
पण दुसरीकडे, अन्य वाहिन्यांसारखं युट्यूबला महागातला कंटेंट तयार करता येत नाही आणि मोठ्या खेळांच्या स्पर्धांचं प्रसारण करता येत नाही.
टीव्ही आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स मात्र युट्यूबच्या लोकप्रियेचा फायदा उठवण्याचे प्रयत्न करू लागले आहेत.”
टीव्ही आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर नवे शोज येतात तेव्हा त्यांना प्रमोट करण्यासाठी ते युट्यूबचा वापर करताना दिसतात.
पारंपरिक टीव्हीच्या तुलनेत युट्यूबवर पाहिल्या जाणाऱ्या व्हिडिओ आणि कार्यक्रमांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
युट्यूबला पारंपरिक टीव्हीपासून धोका वाटत नाही पण ते यूझर जनरेटेड कंटेंट तयार करणाऱ्या टिकटॉकसारख्या व्हिडिओ शेअरिंग ऍपच्या लोकप्रियतेवर मात्र नजर ठेवून आहेत.
राहुल यांच्यामते, “लोकांचं मनोरंजन कसं करायचं, याचा अंदाज टिकटॉकला आलाय. मला संशोधन करत असताना असं लक्षात आलं की काही यूझर्स टिकटॉकवर रील पाहण्यात सहा-सात तास घालवतात. आता सगळे यूझर्सचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतायत. असे ऍप्स युट्यूबला आव्हान देऊ शकतात. पण युट्यूबवर एवढं वैविध्य आणि रंजक कंटेंट उपलब्ध आहे की सध्या ते बाजारात सर्वात पुढे आहे आणि या जागेवरून युट्यूबला हटवणं कठीण जाईल.”

फोटो स्रोत, Getty Images
आपल्या आजच्या चौथ्या एक्सपर्ट डॉक्टर मार्लिन कोमोरोवस्की ब्रसल्सच्या व्रिए विद्यापीठात युरोपियन मीडिया मार्केटविषयी शिकवतात.
त्यांना वाटतं की युट्यूब पुन्हा एकदा जाहिराती आणि कंटेंट क्रिएटर्सवर आणखी लक्ष केंद्रीत करतंय, जो सुरुवातीला त्यांचा मूलमंत्र होता.
युट्यूब चॅनल्सवर जाहिरातींचं प्रमाणही वाढलंय.
गेल्यावर्षी युट्यूबनं जाहिरातींमधून 31.5 अब्ज डॉलर्स कमावले म्हणजे जाहिरातींतून युट्यूबनं केलेली कमाई ही त्याची पालक कंपनी असलेल्या गुगलपेक्षा दहा पट जास्त होती.
व्रिए विद्यापीठ, ब्रसल्समध्ये युरोपियन मीडिया मार्केटच्या प्राध्यापक असलेल्या डॉक्टर मार्लिन कोमोरोवस्की म्हणतात, “युट्यूबनं मोठं यश मिळवलंय आणि जगभरातल्या अनेक बाजारपेठांमध्ये पाय रोवले आहेत. डिझने चॅनेल कंटेट तयार करण्यावर बराच पैसा लावतो पण युट्यूब कंपनीही कंटेंट निर्मितीसाठी मोठी गुंतवणूक करत आहे. युट्यूबनं जगभरात कंटेंट निर्मितीसाठी 20 अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत, जी एक मोठी रक्कम आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गुगलच्या मदतीनं ते कंटेंट बनवणाऱ्यांना मदत होईल असे फिचर्स आणत आहेत. ते त्यांच्या पूर्ण व्हिडिओचा ऑटोमॅटिक अनुवाद करतात आणि व्हीडिओला सबटायटल्स जोडतात. तसंच कंटेंट तयार करणाऱ्यांना मदत करण्यासाठी ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स विकसित करण्यासाठीही पावलं उचलत आहेत.”
डॉक्टर मार्लिन कोमोरोवस्की पुढे म्हणाल्या, “छोट्या व्हिडियोंचा हा फॉरमॅट टिकटॉकनं आणला. आता ते फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही आलंय आणि युट्यूबनंही शॉर्टचा समावेश केला आहे. हा फॉरमॅट फारच यशस्वी ठरला आहे. आपले प्रतिस्पर्धी काय करतायत, यावर युट्यूबला सतत लक्ष ठेवावं लागतं. डिजीटल मीडियामध्ये अशी स्पर्धा एक प्रकारे चांगलीच आहे.
एक काळ होता जेव्हा फेसबुक खूपच ताकदवान झाल्यासारखं वाटत होतं. पण तेव्हा टिकटॉक बाजारात आलं. आता फेसबुक वापरणाऱ्यांमध्ये तरुणांपेक्षा वृद्धांची संख्या जास्त आहे. युट्यूबच्या बाबतीतही हे होऊ शकतं.”
युट्यूबनं टीव्ही चॅनेल्सना मागे टाकलं आहे का?
युट्यूबने आपला ओरिजीनल कंटेंट तयार करणारा विभाग बंद केला आहे, पण म्हणजे त्यांच्यापासून टीव्ही चॅनेल्सना मिळणारं आव्हान कमी झालेलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
युट्यूबनं यूझरनिर्मित कंटेंटवर जास्त लक्ष देऊन टीव्ही चॅनेल्ससमोरचं आव्हान उलट वाढवलं आहे. दररोज युट्यूब पाहण्याची सवय कोट्यवधी लोकांना लागली आहे.
जाहिरातींतून युट्यूब आपला नफा वाढवत आहे आणि कंटेंट तयार करण्यासाठी ते गुंतवणूकही करत आहेत. त्यांचे कंटेंट कायम इंटरनेटवर उपलब्ध असतो, त्यामुळे लोकही टीव्हीऐवजी युट्यूब पाहू लागले आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











