तुम्हाला टीव्हीसमोर बसून खायची सवय आहे का? मग आरोग्याच्या दृष्टीने 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा

टीव्हीसमोर बसून खाणारी महिला

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जेसिका ब्राऊन

कधीकाळी मनोरंजनासाठी घरात आलेला टीव्ही आता आपल्या दीनचर्येचा एक अविभाज्य भाग झाला आहे. जेवताना टीव्ही पाहणं हे तर जवळपास प्रत्येक घरात दिसणारं चित्र असतं.

एरवी सहजपणे घडणारी ही गोष्ट प्रत्यक्षात तितकी सोपी नसते. जेवताना टीव्ही पाहण्याचे आपल्यावर नेमके काय परिणाम होत असतात, त्याचा आपल्या खाण्याचा सवयींवर काय प्रभाव पडतो, यासंदर्भात विविध संशोधनं झाली आहेत. त्यातील महत्त्वाच्या निष्कर्षांची माहिती देणारा हा लेख.

सध्याच्या काळात टीव्हीवर पाहण्यासाठी असंख्य चांगले कार्यक्रम आणि चित्रपट असताना, टीव्ही पाहत खाण्याची इच्छा होणं स्वाभाविक आहे. मात्र, टीव्हीसमोर बसून रात्रीचं जेवण करणं ही खरोखरंच चांगली बाब आहे का?

आरोग्याच्या दृष्टीनं विचार करता "टीव्हीसमोर बसून रात्रीचं जेवण करणं" ही काही चांगली बाब मानली जात नाही. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत ही संकल्पना जन्माला आली.

टीव्ही पाहत प्रक्रिया केलेलं मीठ आणि इतर सहाय्यक घटक असलेलं अन्नं म्हणजेच फास्ट फूड किंवा प्रोसेस्ड फूड मांडीवर घेऊन सोफ्यावर बसणं, असं ते सर्रास दिसणारं चित्र होतं.

मात्र, प्रक्रिया केलेल्या अन्नाऐवजी तुम्ही जर इतर अन्न घेऊन टीव्हीवर तुमचा आवडता कार्यक्रम किंवा चित्रपट पाहत बसला तर? तुम्हाला कदाचित वाटेल की भाज्या आणि धान्यानं भरलेली रंगीत प्लेट घेऊन टीव्हीसमोर बसणं ही एक आरोग्यदायी, चांगली सवय आहे.

मात्र, टीव्हीसमोर बसून जेवण्याची ती सहजसोपी क्रिया तुमच्या चांगल्या सवयींवर मात करते का?

ते तसं असू शकतं, अशी काही चिन्हं आहेत. अभ्यासातून असं आढळलं आहे की टीव्हीसमोर बसून जेवण्याची सवय आपल्या आरोग्यासाठी चांगली नसते. मग तुम्ही काय खाता आहात ते फारसं महत्त्वाचं राहत नाही. त्यामागची कारणं अशी आहेत.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

1) लक्ष विचलित होणं आणि स्मरणशक्ती

आपल्या अवतीभोवतीचं वातावरण आपल्या आहारात महत्त्वाची भूमिका बजावतं, हे वैज्ञानिकांना बऱ्याच काळापासून माहित आहे. टीव्ही पाहणं आणि लठ्ठपणा यातील परस्परसंबंध दाखवून देणारे असंख्य अभ्यास आणि संशोधन उपलब्ध आहेत.

लठ्ठपणा प्रामुख्यानं अशा प्रकारे बैठ्या सवयींमुळे आणि त्यातून व्यायामाचा अभाव निर्माण झाल्यामुळे येतो.

मात्र, टीव्ही पाहण्याचा तुम्ही नेमकं किती खाता यावरदेखील परिणाम होऊ शकतो. जेवताना किंवा खाताना टीव्ही पाहिल्यास आपण कदाचित जास्त खातो यामागे आपलं लक्ष विचलित होणं हा एक प्रमुख सिद्धांत आहे, असं मॉनिक अलब्लास म्हणतात. त्या ॲमस्टरडॅम विद्यापीठात कम्युनिकेशन सायन्सच्या सहाय्यक प्राध्यापक आहेत.

यामागचं कारण असं असू शकतं की, आपण एका रंजक, गुंतवून ठेवणाऱ्या कथानकात गुंतलेलो असतो. आपलं खाण्यावर कमी लक्ष असतं.

त्यामुळे आपलं शरीर आपल्याला पोट भरल्याचे जे संकेत देत असतं त्याकडे आपलं लक्ष नसतं किंवा आपल्याला त्याची जाणीव होत नाही. परिणामी आपण अधिक अन्न खाण्याची शक्यता असते.

आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणाची आपल्या आहारात अत्यंत महत्त्वाची भूमिका असते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणाची आपल्या आहारात अत्यंत महत्त्वाची भूमिका असते.

एका संशोधनातून असंही समोर आलं आहे की, टीव्हीसमोर बसून जेवल्यास आपण काय खाल्लं आहे, हे आपल्याला आठवत नाही. तसंच, आपण नेमकं किती खाल्लं आहे याचा अंदाज बांधणं देखील कठीण होतं. त्यामुळे आपण जास्त खातो.

अलब्लास यांना आढळलं की टीव्ही पाहत खात असल्यास लोक अधिक वेळ खातात.

नेदरलॅंड्स इन्स्टिट्यूट फॉर सोशल रिसर्चनं आधीच गोळा केलेल्या माहितीचा अलब्लास यांनी वापर केला.

यात त्यांनी लोकांना आठवडभरात खाणं, टीव्ही पाहणं यासह काय काय केलं त्याची नोंद एका डायरीत ठेवण्यास सांगण्यात आलं होतं. अगदी ते टीव्हीवर कोणते कार्यक्रम पाहत होते त्याची नोंद ठेवण्यात त्यांना सांगितलं होतं.

टीव्ही पाहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात लक्ष विचलित होऊ शकतं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टीव्ही पाहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात लक्ष विचलित होऊ शकतं

अलब्लास यांनी जेव्हा या माहितीचं विश्लेषण केलं तेव्हा आढळलं की जेवताना टीव्ही पाहत असल्यास लोकांचा खाण्याचा वेळ वाढतो किंवा ते अधिक वेळ खातात.

त्यांना असंही आढळलं की टीव्ही पाहत जेवण केलं असल्यास त्यांनी खाण्यासाठी घालवलेला एकूण वेळ जास्त होता. त्या तुलनेत जर जेवताना किंवा खाताना त्यांनी टीव्ही पाहिला नसल्यास खाण्यासाठी लागलेला एकूण वेळ कमी होता.

यावरून अलब्लास म्हणतात की, त्या लोकांना ते किती खात होते हे लक्षात येत नव्हतं कारण टीव्ही पाहत असल्यामुळे त्यांचं लक्ष विचलित झालेलं होतं.

यातील निष्कर्ष असं दाखवत नाहीत की लोकांनी जास्त अन्न खाल्लं किंवा त्यांनी नेमकं काय खाल्लं. कारण यात त्यांनी फक्त खाण्यासाठी एकूण किती वेळ दिला हेच नोंदवलं होतं.

अर्थात, ही माहिती स्वत:च नोंदवलेली असल्यामुळे जर ते लोक एखादा चांगला कार्यक्रम किंवा चित्रपट पाहण्यात गुंग झाले असतील तर ते नेमका किती वेळ खात होते हे देखील त्यांना नीट आठवलं नसेल.

अभ्यासातून असं दिसतं की टीव्हीवरील कार्यक्रम पाहताना लक्ष विचलित झालेलं असताना जेवण केल्यामुळे आपण जितकं खाल्लं पाहिजे त्यापेक्षा कदाचित अधिक खाण्याची शक्यता असते.

फोटो स्रोत, Alamy

मात्र, अलब्लास म्हणतात की, उपलब्ध संशोधनातून असं दिसतं की खाण्यासाठी लागलेला वेळ आणि अधिक कॅलरीज खाणं यांचा एकमेकांशी संबंध आहे.

"प्रयोगशाळेतील संशोधनातून दिसतं की खाताना लक्ष विचलित असल्यास त्यामुळे अधिक अन्न खाल्लं जातं. त्यामुळे सर्व पुराव्यांचा एकत्रित विचार करता असं दिसतं की टीव्ही पाहत खात असताना लक्ष विचलित होणं, ही बाब मोठी भूमिका बजावते," असं अलब्लास म्हणतात.

2) टीव्ही पाहण्याचा अन्नाच्या चवीशी असलेला संबंध

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

फ्लूर वॅन मीर नेदरलँड्समधील वॅगेनिंजेन फूड सेफ्टी रिसर्चमध्ये डेटा सायन्स संशोधक आहेत.

त्या म्हणतात की, टीव्ही पाहताना आपण जास्त खातो यामागे आणखी एक आहे. ते म्हणजे आपण एरवी टीव्ही पाहत नसताना शांतपणे अन्नाकडे लक्ष देत जेव्हा खातो तेव्हा अन्नाची जी चव लागते, तशीच चव आपण टीव्ही पाहत खात असताना लागत नाही. कारण आपलं लक्ष विचलित झालेलं असताना जेव्हा आपण खातो तेव्हा अन्नातून आपल्याला तितकंच समाधान मिळत नाही.

नेदरलँड्समधील लिडेन विद्यापीठात सामाजिक, संघटनात्मक आणि आर्थिक मानसशास्त्र विभागात काम करत असताना त्यांनी लक्ष विचलित असताना जेवण केल्यावर होणाऱ्या परिणामासंदर्भात अभ्यास केला होता.

एक न्युरोसायंटिस्ट म्हणून वॅन मीर यांनी लक्ष विचलित असताना जेवताना मानवी मेंदूत होणाऱ्या विविध क्रियांवर अनेक अभ्यास केले आहेत.

एका अभ्यासात, त्यात सहभागी झालेल्यांना जेवताना एक मोठी किंवा छोटी संख्या लक्षात ठेवण्यास सांगण्यात आलं होतं. ज्या लोकांनी मोठी संख्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी नोंदवलं की त्यांनी खाल्लेलं अन्न कमी गोड होतं.

या लोकांच्या मेंदूतील चवीचं आकलन करणाऱ्या भागात कमी क्रिया झाल्याचं देखील वॅन मीर यांना दिसून आलं होतं.

"जर तुम्हाला अन्नाची चव सारखीच किंवा नेहमीसारखीच लागली नाही, तर कदाचित ते अन्न खाल्ल्यामुळे तुम्हाला तितका आनंद, समाधान मिळणार नाही. परिणामी त्यानंतर लवकरच तुम्ही काहीतरी खाण्याची शक्यता वाढेल," असं त्या म्हणतात.

(या मुद्दयाला दुसरी बाजू देखील आहे. ती अशी की अनेकदा मुलं भाज्या खात नाहीत. कारण त्यांना अनेक भाज्यांची चव आवडत नाही. त्यामुळे मुलांना नावडत्या किंवा फारशा आवडत नसलेल्या भाज्या जर खाऊ घालायच्या असतील तर त्यांना टीव्हीपुढे बसवून त्या खाऊ घालणं हा एक चांगला पर्याय असू शकतो. कारण त्यामुळे चवीपासून त्यांचं लक्ष विचलित होईल आणि ते भाज्या खातील, असं वॅन मीर सांगतात.)

ग्राफिक्स

माणूस नेहमीच "तत्काळ सुखद, सकारात्मक अनुभुती किंवा आनंदासाठी काहीतरी कृती करण्याचा" (hedonic goal)नेहमीच प्रयत्न करत असतो, असा एक सिद्धांत आहे, असं वॅन मीर म्हणतात.

याचाच अर्थ कोणत्याही दिवशी किंवा कोणतीही कृती करत असताना आपण एक विशिष्ट आनंद मिळण्याची अपेक्षा बाळगत असतो. जर आपल्याला त्यातून तो आनंद, समाधान मिळालं नाही तर आपण ते इतरत्र शोधतो.

जर टीव्हीवरील एखादा कार्यक्रम किंवा शो आपल्याला अपेक्षेनुरुप आनंद देत नसेल तर त्याची भरपाई करण्यासाठी, तो अपेक्षित आनंद, समाधान मिळवण्यासाठी आपण अधिक अन्न खाण्याची शक्यता असते.

आपल्या खाण्याशी निगडीत वर्तनात आपल्या भावनिक स्थितीची देखील मोठी भूमिका असते.

काही संशोधनातून असं समोर आलं आहे की जर आपण टीव्ही पाहताना आपल्याला दु:खी करणाऱ्या गोष्टींपेक्षा आपल्याला आनंदी करणारं काही पाहत असू तर अशा स्थितीत आपण चॉकलेट किंवा बटर लावलेले पॉपकॉर्न यासारखे तुलनेनं कमी "आनंद देणारे" पदार्थ निवडू शकतो.

3) टीव्ही पाहताना आपण काय खात असतो?

संशोधनातून असं आढळलं आहे की अन्नपदार्थांच्या जाहिरातींचा प्रभाव पडून लोक अधिक अन्न खाऊ शकतात.

मात्र संशोधकांना या गोष्टीची सर्वात अधिक चिंता वाटते की अन्नपदार्थांच्या जाहिराती आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स (UFPs) म्हणजे अती प्रक्रिया केलेलं अन्न खाणं यांचा संबंध लठ्ठपणा आणि ह्रदयविकाराच्या आजारांसह इतर आजारांशी जोडला गेला आहे.

फर्नांडा रौबर ब्राझीलमधील साओ पावलो विद्यापीठात सेंटर फॉर एपिडेमिओलॉजिकल रिसर्च इन न्युट्रिशन अँड हेल्थमध्ये संशोधक आहेत.

रौबर म्हणतात, "पुराव्यांमधून असं दिसून येतं की अन्नपदार्थांच्या जाहिराती थोडा वेळ पाहिल्यानं देखील त्यात ज्या पदार्थांची जाहिरात करण्यात आली आहे, मुलं तेच पदार्थ निवडण्याची शक्यता वाढू शकते. वारंवार जाहिराती पाहिल्यानं त्या पदार्थांना असलेली पसंती वाढली आहे."

त्यांना आढळलं आहे की टीव्ही पाहताना कमीत कमी प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांऐवजी मुलं अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स (UFPs) म्हणजे अती प्रक्रिया केलेलं अन्न खाण्याची शक्यता अधिक असते.

टीव्ही पाहताना मुलं अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न अधिक खाण्याची शक्यता असते कारण ते अधिक सोयीचं असतं, असं अभ्यासातून आढळलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टीव्ही पाहताना मुलं अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न अधिक खाण्याची शक्यता असते कारण ते अधिक सोयीचं असतं, असं अभ्यासातून आढळलं आहे.

यामागचं एक कारण असंही आहे की टीव्ही पाहताना अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड खाणं हे बहुतेकवेळा सोयीचं मानलं जातं, असं त्या म्हणतात. मात्र अशा अन्नपदार्थांच्या जाहिराती पाहण्याचं प्रमाण वाढल्यामुळे देखील हे पदार्थ खाण्याचं प्रमाण वाढलं आहे.

जर मुलं आधीच स्थूल किंवा लठ्ठ असतील तर टीव्ही पाहत अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाल्ल्यामुळे होणारे परिणाम अधिकच वाढलेले दिसतात. कारण या पदार्थांच्या जाहिरातींबद्दलची त्यांची संवेदनशीलता वाढल्यामुळे ते होत असावं.

सहसा घरच्या जेवणात फळं आणि भाजीपाल्याचा वापर अधिक असतो. मात्र रौबर यांना असंही आढळलं आहे की जर कुटुंबातील सदस्यांबरोबर टीव्ही पाहत मुलं खात असतील तर ते अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड अधिक खातात.

रौबर म्हणतात, "या परिस्थितीत, इतर संशोधनामध्ये आढळल्याप्रमाणे घरच्या जेवणाच्या कोणत्याही फायद्यापेक्षा टीव्ही पाहत जेवण्याच्या नकारात्मक परिणामांचा प्रभाव अधिक होता."

"यातून आहाराच्या सवयी आणि आजूबाजूच्या पर्यावरणाचा प्रभाव यातील गुंतागुंतीचा परस्परसंवाद अधोरेखित होतो. तसंच यातील परस्परसंबंध अधिक खोलात जाऊन समजण्यासाठी आणखी संशोधन होण्याची आवश्यकता यातून अधोरेखित होते."

4) लक्ष विचलित होण्यासंदर्भातील इतर पैलू

अगदी निव्वळ लक्ष विचलित झाल्यामुळे होणाऱ्या परिणामांचा जरी विचार केला तरी टीव्ही पाहणं आणि खाणं यातील संबंध खूप गुंतागुंतीचा आहे. संशोधनातून असं दिसून येतं की जेवताना लक्ष विचलित झाल्यास आपण कमी अन्न खातो किंवा अजिबातच खात नाही, असं वॅन मीर म्हणतात.

उदाहरणार्थ, वॅन मीर म्हणतात की नेदरलँड्समधील काही प्राथमिक शाळांनी, शाळेचे तास कमी करण्याचा आणि शिक्षक शिकवत असताना विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण जेवू देण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थी दुपारचा जेवणाचा डबा खात असताना त्यांना शिकवणं अधिक अप्रत्यक्ष किंवा निष्क्रिय स्वरुपाचं असतं. त्यामुळेच शिक्षक विद्यार्थ्यांना वाचून दाखवतात किंवा त्यांना शैक्षणिक व्हिडिओ दाखवतात, असं वॅन मीर म्हणतात.

त्या पुढे म्हणतात, अनेक पालकांच्या असं लक्षात आलं की त्यांची मुलं संध्याकाळी शाळेतून घरी जाताना जेवणाचा डबा तसाच परत घेऊन जात आहेत. त्यातून ही मुलं खाण्यापासून किती विचलित झाली आहेत ते दिसून येतं.

प्रौढांवर केलेल्या संशोधनातून देखील असाच परिणाम दिसून आला. एका अभ्यासात, त्या सहभागी झालेल्या लोकांनी अमेरिकन सिटकॉम 'फ्रेंड्स'चे दोन भाग पाहिले.

त्यातील एका गटानं एकच भाग दोनदा पाहिला. तर दुसऱ्या गटानं दोन वेगवेगळे भाग पाहिले. दुसरा भाग पाहत असताना, दोन्ही गटांना वेगवेगळे पदार्थ खाण्यास देण्यास आले.

संशोधकांना असं आढळलं की ज्या गटातील लोकांनी दोन वेगवेगळे भाग पाहिले त्यांच्या तुलनेत ज्या गटातील लोकांनी एकच भाग दोनदा पाहिला त्यांनी 211 कॅलरी जास्त खाल्ल्या.

त्यांचं लक्ष कमी प्रमाणात विचलित झाल्यामुळे असं झालं असेल, असं डिक स्टीव्हनसन म्हणतात. ते ऑस्ट्रेलियातील सिडनी मधील मॅक्वेरी विद्यापीठात मानसशास्त्रीय विज्ञानाचे प्राध्यापक आहेत.

टीव्ही पाहताना मुलं अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न अधिक खाण्याची शक्यता असते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टीव्ही पाहताना मुलं अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न अधिक खाण्याची शक्यता असते.

दुसऱ्या शब्दात सांगायचं तर, समजा आपण टीव्हीवर पाहत असलेला कार्यक्रम किंवा शो खूपच लक्ष वेधून घेणारा असेल तर आपल्यासमोर असलेल्या पदार्थाकडे आपलं दुर्लक्ष होऊ शकतं किंवा आपण खाणं विसरू शकतो. कारण आपलं लक्ष त्या कार्यक्रमावर असतं.

मात्र जर टीव्हीवरील कार्यक्रम कंटाळवाणा असेल तर मात्र अधिक अन्न खाण्याची शक्यता असते.

आणखी एका छोट्या अभ्यासात, त्यात सहभागी झालेल्या लोकांनी टीव्हीवर कलेसंदर्भातील एक "कंटाळवाणं" व्याख्यान पाहिलं किंवा चांगली मनोरंजक टीव्ही मालिका पाहिली - किंवा काहीच पाहिलं नाही. त्यांना कमी कॅलरी असणारे पदार्थ (द्राक्षे) आणि जास्त कॅलरी असणारे पदार्थ (चॉकलेट) देण्यात आले.

संशोधकांना असं आढळलं की ज्या लोकांनी अजिबात टीव्ही पाहिला नाही त्यांच्या तुलने जे लोक टीव्हीवर कंटाळवाणं व्याख्यान पाहत होते, त्यांनी एकंदरीत अधिक अन्न खाल्लं. तर जे लोक टीव्ही मनोरंजक कार्यक्रम पाहत होते त्यांनी कमी प्रमाणात अन्न खाल्लं.

दुसऱ्या शब्दात सांगायचं तर लोक जितके जास्त कंटाळले तितकं अधिक प्रमाणात त्यांनी अन्न खाल्लं.

विशेष लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, खाण्यातील मुख्य बदल किंवा फरक त्यांनी खाल्लेल्या द्राक्षांची संख्येत होता, तर त्यांनी खाल्लेल्या चॉकलेटचं प्रमाण प्रामुख्यानं सारखंच होतं.

5) आपण जेवताना टीव्ही पाहणं टाळलं पाहिजे का?

आपण जेवताना टीव्ही पाहत असू तर आपण अधिक प्रमाणात अन्न का खाण्याची शक्यता असते, यासंदर्भातील अनेक सिद्धांत आहेत. मात्र याबाबतच्या विश्वसनीय संशोधनासमोर असंख्य आव्हानं आहेत.

बऱ्याच वेळा संशोधक लोकांच्या खाण्यासंदर्भातील नोंदी ठेवणाऱ्या डायरींवर आणि टीव्ही पाहत असताना त्यांना स्वत:च्या वर्तनाबद्दल काय जाणवलं याच्या नोंदीवर अवलंबून असतात. मात्र अनेकदा लोक आरोग्यासाठी अपायकारक किंवा अयोग्य पदार्थ ते किती प्रमाणात खातात त्याबाबत कमी नोंद ठेवतात, असं रौबर म्हणतात.

अलब्लास यांच्या अभ्यासात किमान त्यांनी ज्या लोकांकडून माहिती घेतली ते त्यांच्या दीनचर्येतील सर्व गोष्टींची नोंद ठेवत होते. त्यामुळे खाण्यासंदर्भात किंवा टीव्ही पाहण्यासंदर्भात ते कोणतीही नोंद जाणीवपूर्वक करत नव्हते किंवा त्याबाबतीत विशेष सतर्क नव्हते.

जे लोक प्रयोगशाळेत जेवतात आणि टीव्ही पाहतात अशा लोकांचा देखील संशोधक अभ्यास करतात. मात्र टीव्ही पाहण्याचा संबंध आरामाशी असतो. कारण आपण घरी असताना जेव्हा आराम करत असतो, तेव्हा टीव्ही पाहिला जातो. त्यामुळे प्रयोगशाळेत तसं वातावरण निर्माण करणं खूपच आव्हानात्मक ठरू शकतं.

"संशोधकांनी सहभागी झालेल्या लोकांचं प्रत्यक्ष निरीक्षण करण्याच्या पद्धतीमुळे वर्तनातील बदलाबाबत पक्षपातीपणा होऊ शकतो किंवा सहभागी लोकांच्या खऱ्या सवयी समोर न येण्याची शक्यता असते.

कारण तिथे संशोधनात सहभागी झालेल्या लोकांना त्यांचं निरीक्षण केलं जातं आहे हे माहित असतं त्यामुळे ते त्यांच्या खाण्याच्या सवयींमध्ये बदल करतात," असं रौबर म्हणतात.

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिकात्मक छायाचित्र

वास्तविक जीवनातील परिस्थितीबाबत अधिक संशोधन होण्याची आवश्यकता आहे, असं अलब्लास यांचं म्हणणं आहे. कारण आपल्या खाण्याच्या सवयी आणि त्यावर कशाचा परिणाम होतो, या गोष्टी खूपच गुंतागुंतीच्या आहेत.

"आपण जेव्हा खाताना टीव्ही पाहतो, त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो याबद्दल आपल्याला काही गोष्टी माहित आहेत. मात्र याबद्दल अनेक गोष्टी आणि मार्ग आहेत ज्याबद्दल आपण अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची आवश्यकता आहे," असं त्या म्हणतात.

टीव्हीचा आपल्या खाण्यावर किती प्रभाव पडतो, ही गोष्ट अनेक घटकांवर अवलंबून असते. यात आपण टीव्हीवर काय पाहत आहोत याचाही परिणाम होत असतो, असं स्टीव्हनसन म्हणतात.

त्यामुळे आपला मूड बदलू शकतो, त्याचबरोबर त्याचा आपल्या मन:स्थितीवर, विचारांवर नकळतपणे देखील परिणाम होऊ शकतो.

उदाहरणार्थ, जर टीव्हीवरील कार्यक्रम किंवा चित्रपटातील एखादं पात्र जर काही खात असेल तर त्यांच्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला देखील भाग पाडलं जाऊ शकतं किंवा आपल्याला तशी इच्छा तीव्रतेनं होऊ शकते.

याचबरोबर टीव्हीवरील कार्यक्रमाच्या गतीचा देखील आपल्यावर परिणाम होऊ शकतो. एखाद्या मुलाखतीच्या कार्यक्रमापेक्षा अॅक्शन चित्रपट आपल्याला अधिक खाण्यास प्रवृत्त करू शकतात, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

आणि अर्थातच, आपण कोणतं अन्न खातो आहोत, ते किती स्वादिष्ट आहे, हे देखील महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर आपण खाण्याबाबत किती आवेगी आहोत, आपल्याला खायला किती आवडतं, हे सुद्धा महत्त्वाचं असतं.

शिवाय, खाताना लक्ष विचलित होणं ही बाब देखील गुंतागुंतीची आहे. आपण जेवताना ज्या इतर गोष्टी करतो त्यापेक्षा टीव्ही पाहणं अधिक लक्ष विचलित करणारं कदाचित ठरणार नाही. त्यामुळेच टीव्ही पाहताना जेवत असल्यास त्यामुळे आपण अधिक अन्न खाण्याची शक्यता नाही.

टीव्हीवरील चांगल्या मनोरंजक कार्यक्रमाच्या तुलनेत कंटाळवाणा कार्यक्रम पाहताना आपण अधिक अन्न खाण्याची शक्यता असते

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, टीव्हीवरील चांगल्या मनोरंजक कार्यक्रमाच्या तुलनेत कंटाळवाणा कार्यक्रम पाहताना आपण अधिक अन्न खाण्याची शक्यता असते

उदाहरणार्थ, अभ्यासांच्या एका विश्लेषणातून असं दिसून आलं आहे की जेवताना वाचन करणं, व्हिडिओ गेम खेळणं किंवा मित्रांबरोबर जेवणं यासारख्या गोष्टींच्या तुलनेत आपण जेवताना टीव्ही पाहत असल्यास अधिक खातो, हे दाखवणारे फारच थोडे पुरावे आहेत.

संशोधनातून असं आढळून आलं आहे की आपल्या खाण्याच्या सवयी गुंतागुंतीच्या असतात आणि त्यातील गुंता सोडवणं हे जवळपास अशक्य आहे.

निश्चितच टीव्हीसमोर बसून रात्रीचं जेवण करण्यासंदर्भात फक्त प्रक्रिया केलेलं अन्न, अधिक कॅलरी, अधिक मीठ असलेलं सोयीचे पदार्थ यापेक्षाही आणखी बरंच काही आहे.

त्यामुळे जर तुम्ही निरोगी पर्यायाचा विचार करत असाल तर टीव्ही त्या रिमोट कंट्रोलचा वापर करायचा आहे की नाही या गोष्टीचा विचार करणं खरोखरच योग्य ठरेल.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.