मुंबईपेक्षा 6 पट मोठ्या हिमनगाचा असा होणार अंत

हिमनग

फोटो स्रोत, Rob Suisted/Reuters

जगातला सर्वात महाकाय, मुंबईपेक्षा आकाराने 6 पट मोठा हिमनग सरकतोय. अंटार्क्टिकामधल्या एका भागात काही काळ अडकून पडल्यानंतर आता हा हिमनग पुन्हा एकदा पुढे सरकू लागलाय.

या हिमनगाला (Iceberg) A23a म्हणून ओळखलं जातं. अंटार्क्टिकाच्या किनारपट्टीपासून हा हिमनग 1986मध्येच वेगळा झाला. पण काही आता गेल्या काही दिवसांत या हिमनगाचा प्रवास सुरू झालाय.

गेल्या 30 वर्षांपेक्षा अधिक काळ हा हिमनग वेडेल समुद्राच्या तळाच्या चिखलात बर्फाचं एखादं बेट असल्यासारखा रुतून बसला होता.

2020 पर्यंत हळुहळू विरघळल्यानंतर हा हिमनग पुन्हा तरंगू लागला आणि सरकायला लागला. सुरुवातीला सरकण्याचा हा वेग कमी होता. पण नंतर आता पाण्याचा प्रवाह आणि वाऱ्यांमुळे तो गरम हवा आणि पाण्याच्या दिशेने वाहतोय.

अंटार्क्टिकातला तरंगणारा बर्फ ज्या मार्गावरून वाहून येतो त्याला वैज्ञानिक - iceberg alley म्हणजेच हिमनगांची गल्ली म्हणून ओळखतात. A23a हिमनगही याच मार्गाने वाहत चालला आहे.

हिमनग

पण हा विनाशाकडे नेणारा मार्ग आहे. या रस्त्यावरून जाताना जगातला हा सर्वात महाकाय हिमनग फुटेल आणि अगदी काही महिन्यांच्या काळात विरघळून नामशेष होईल.

सध्या हा हिमनग साऊथ ऑर्कने बेटांच्या जवळ, अंटार्क्टिक द्वीपकल्पाच्या ईशान्येकडील टोकापासून 700 किलोमीटर्सच्या अंतरावर आहे.

हिमनग

या हिमनगाची झालेली झीज उपग्रहांद्वारे काढण्यात आलेल्या आणि बोटींनी जवळून काढलेल्या फोटोंमध्ये स्पष्ट दिसतेय.

दररोज या हिमनगाचे मोठे भाग निखळून समुद्रात कोसळतात.

A76a हिमनग

फोटो स्रोत, Rob Suisted / Reuters

या A23a हिमनगाच्या भोवती लहान मोठे हिमनग तरंगतायत. यामध्ये अगदी फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराच्या नगांपासून एखाद्या ट्रकच्या आकाराएवढे हिमनग आहेत.

वाऱ्यांचा वेग आणि दिशा, समुद्राची स्थिती आणि पाण्यातले भोवरे यावर या A23a चा पुढचा प्रवास कसा असेल हे येत्या काही आठवड्यांत स्पष्ट होईल.

पण यासारखे मोठे आईसबर्ग, मग ते वरून सपाट असो किंवा उभे असोत, हे बहुतेकदा दक्षिण जॉर्जियाच्या जवळून जातात. हा जागा A23aच्या आताच्या ठिकाणापासून 650 किलोमीटर ईशान्येला आहे.

या भागामध्ये बहुतेक हिमनगांचा अंत होतो.

या A23a हिमनगाचं नेमकं आकारमान किती आहे हे ठरवणं कठीण आहे.

युरोपियन स्पेस एजन्सीच्या क्रायोसॅट -2 मिशनने त्यांच्या स्पेसक्राफ्टवरील रडारचा अल्टीमीटर वापरून या हिमनगाच्या घेराची जाडी मोजण्याचा प्रयत्न केला. याची सरासरी जाडी 280 मीटर म्हणजेच 920 फूट असल्याचं त्यांना आढळलं.

हिमनग
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तुलना करायची झाली तर जगातला सर्वात उंच पुतळा असणाऱ्या भारतातल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीची बेस आणि पुतळा अशी मिळून एकूण उंची आहे 790 फूट. म्हणजे हा हिमनग त्यापेक्षाही मोठा आहे.

आता दिवसागणिक या हिमनगाचं आकारमान कमी होत असलं तरीही तो सध्या 3,800 चौरस किलोमीटर (1,500 चौ. मैल) चा आहे.

तुलना करायची झाली तर भारतातलं गोवा राज्य 3,702 चौ. किलोमीटरचं आहे.

जागतिक तुलना करायची झाली तर हा A23a हिमनग जगातल्या तब्बल 29 देशांपेक्षा मोठा आहे. यात लक्झेंबर्ग, बहारिन आणि सिंगापूरचाही समावेश आहे.

या हिमनगावर आदळणाऱ्या लाटांमुळे हिमनगाच्या बाजूंना मोठ्या कमानी आणि गुहा तयार होतायत. त्या कोसळल्या की त्याखाली तयार झालेले पाण्याखालचे बर्फातले सपाट भाग दिसायला लागतात.

प्लावक बल या भागाला खालून वर ढकलत असतं. त्यामुळे हिमनगाच्या कडांना तडे जाऊ लागतात.

उष्ण हवेचा परिणामही नंतर यावर होऊ लागतो.

हिमनगाच्या वरच्या पृष्ठभागावर वितळलेलं पाणी साठून तळी तयार होतात. हे पाणी तड्यांमधून खाली झिरपतं आणि भेगा मोठ्या आणि खोल होत अखेरीस तळापर्यंत पोहोचतात.

यावर्षात पुढे कधीतरी एक क्षण असाही येऊ शकतो की A23aच्या उरलेला भाग एका मोठ्या घटनेमध्ये कोसळून पडेल आणि विरघळेल.

हिमनग

पण A23a जाताना काही गोष्टी मागे सोडून जाईल. इतर मोठ्या हिमनगांप्रमाणेच याही हिमनगामधील बर्फात अडकलेले क्षार - मिनरल डस्ट सगळीकडे पसरेल. खुल्या समुद्रात असणाऱ्या अनेक जीवांसाठी हे क्षार पोषक असतील. हेच जीव समुद्रातल्या अन्नसाखळीचा पाया असतात. समुद्रात तरंगणाऱ्या प्लवंगांसारख्या लहानग्या जीवांपासून ते अगदी अवाढव्य शार्कपर्यंत सर्वांनाच या हिमनगातल्या पोषक मूल्यांचा फायदा होईल.

अशा प्रकारच्या एखाद्या महाकाय हिमनगाच्या विनाशामागे हवामान बदल हे नेहमीचं कारण असावं असं वाटणं साहजिक आहे. पण यामागे अनेक गुंतागुंतीची कारणं आहेत.

A23a हिमनग अंटार्क्टिकाच्या अशा भागातून आला, जिथे अजूनही प्रचंड थंड आहे.

हिमनग

या मूळ जागेचं नाव - द फिल्चनर आईस शेल्फ . हा आहे तरंगणारा प्रचंड मोठा बर्फ - हिमाच्छादन. वेडेल समुद्रातून वाहत या खंडात आलेल्या हिमनद्यांमुळे हा तयार झाला. पाण्यामध्ये शिरल्यानंतर प्लावक बलामुळे (खालून वर येणारा दाब) हिमनद्यांची पुढची बाजू वर उचलली जाते आणि एकत्र चिकटून एक टोक बाहेर येतं.

या टोकावरील बर्फाचे मोठे भाग गळून पडणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. वैज्ञानिक याला - Calving म्हणजे गायीने वासराला जन्म दिल्यासारखं म्हणतात.

हिमनग निखळल्याने बर्फाचं प्रमाण कायम राहतं आणि Shelf म्हणजेच तरंगणारं हिमाच्छादन समतोल राहतं.

ASHLEY BENNISON/BAS

फोटो स्रोत, ASHLEY BENNISON/BAS

पण या हिमाच्छादनाच्या पुढच्या बाजूला तुलनेने उष्ण पाण्याचा आघात झाला तर हा तोल ढळू शकतो. सध्यातरी फिल्चनरमध्ये असं काही घडत असल्याचे पुरावे नाहीत.

पण हे मात्र खरं आहे की अंटार्क्टिकाच्या इतर भागांमध्ये तापमान वाढल्याने अनेक कडे कोसळून पडले आहेत.

हिमनग

महाकाय हिमखंड किंवा हिमनग कसे फुटतात यावर वैज्ञानिकांचं बारीक लक्ष आहे. कसे बदल होतात ज्यामुळे तोल ढासळतो हे समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे.

शिवाय आपल्याला माहित नसलेला इतिहास जाणून घ्यायचाही हा प्रयत्न आहे.

आपल्याकडे फक्त गेल्या 50 वर्षांमध्ये उपग्रहांद्वारे करण्यात आलेली निरीक्षणं आहेत. हा अपुरा इतिहास आहे.

त्याही आधीच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी संशोधकांनी अलिकडेच Iceberg Alley म्हणजे हिमनग ज्या चिंचोळ्या वाटेने प्रवास करतात, तिथल्या समुद्रतळाशी ड्रिलींग केलं.

महाकाय हिमखंड किंवा हिमनग

फोटो स्रोत, CHRIS WALTON/BAS

इथला चिखल किती जुना आहे, याचा अंदाज त्यांना बांधता आला. यात काही खडकाळ अवशेष आहेत का याचाही शोध त्यांनी घेतला. हे अवशेष अंटार्क्टिका खंडातून वाहून आलेल्या हिमनगांनी सोबत आणले आणि हिमनग वितळले तेव्हा हे अवशेष समुद्रतळाशी जाऊन बसले.

यापूर्वी काय घडलं असावं याचाही अंदाज लावण्याचा प्रयत्न संशोधकांनी केला. त्यानुसार सुमारे 12 लाख वर्षांपूर्वी या चिंचोळ्या भागातून मोठ्या प्रमाणावर हिमनग वाहत गेले.

आपल्याला माहिती नसलेल्या फार पूर्वीच्या या कालखंडात तापमान वाढलं आणि त्यामुळे पश्चिम अंटार्क्टिाका भागातलं मोठं बर्फाच्छादन निखळलं याचा हा पुरावा असल्याचं संशोधकांचं मत आहे.

हिमनगाच्या खुणा

फोटो स्रोत, Marie Busfield

फोटो कॅप्शन, बर्फाच्या शिळा घासत गेल्याच्या दक्षिण आफ्रिकेतल्या खुणा

जगात अशाही काही जागा आहेत, जिथे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन हिमनगाच्या भूतकाळाला स्पर्श करून पाहू शकता. उदाहरणार्थ, 30 कोटी वर्षांपूर्वी ज्यावेळी दक्षिण आफ्रिका हा भाग पाण्याखाली होता आणि दक्षिण ध्रुवाच्या आतापेक्षा जवळ होता, त्यावेळी बर्फाच्या शिळा समुद्रतळाशी घासत ओढल्या गेल्या. यामुळे तयार झालेल्या खुणांवर आज तुम्ही चालू शकता.

वेडेल समुद्राच्या तळाशी A23a हिमनगानेही अशाच खुणा आणि पट्टे निर्माण केले आहेत. आणि या खुणादेखील पुढची हजारो, कदाचित लाखो वर्ष टिकून राहतील.

हे सांगण्यासाठी - इथे A23a हिमनग होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)