You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुनीता विल्यम्स 9 महिने ज्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर होत्या, ते का बंद होणार आहे?
अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स नऊ महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर होत्या आणि आता त्या पृथ्वीवर परतल्या आहेत. मात्र त्यानंतर देखील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (आयएसएस) चर्चेत आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा कालावधी 2031 मध्ये संपेल. 1998 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचं अंतराळात प्रक्षेपण करण्यात आलं होतं आणि तेव्हापासूनच ते अंतराळ क्षेत्रातील प्रगतीचं प्रतीक राहिलं आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आहे तरी कसं?
पृथ्वीपासून जवळपास 400-415 किमी अंतरावर अंतराळात हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक स्थिरावलेलं आहे. त्याचा आकार एखाद्या फुटबॉल मैदानाएवढा आहे.
ते 109 मीटर लांबीचं असून, त्याचं वजन 400 टन म्हणजे चार लाख किलोहून अधिक आहे. म्हणजेच साधारण 80 आफ्रिकन हत्तींएवढं त्याचं वजन आहे.
चाळीसहून अधिक अंतराळ मोहिमांद्वारे पृथ्वीवरून विविध वस्तू किंवा सामुग्री अंतराळात नेण्यात आली आहे. अशा परिस्थितीत हे विशाल आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक निष्क्रिय झालं किंवा बंद पडलं तर काय होईल?
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक बंद का केलं जात आहे?
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक ताशी 17,500 मैलाच्या वेगानं प्रवास करतं आहे. याचा अर्थ ते दररोज सरासरी 16 वेळा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतं. म्हणजेच दर 90 मिनिटांनी ते पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतं.
इतक्या वेगानं अंतराळ फिरत असलेल्या या विशाल यंत्रानं अचानक आणि अनियंत्रितपणे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला तर काय होईल, याची कल्पनादेखील अतिशय भयावह आहे.
अशी परिस्थिती उद्धभवू नये म्हणूनच नासानं 2031 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामागचं कारण स्पष्ट आहे. हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आता जुनं होत चाललं आहे.
रशिया, अमेरिका, कॅनडा, जपान आणि अनेक युरोपियन देशांनी एकत्रितरित्या 1998 मध्ये या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची निर्मिती केली होती.
नंतरच्या काळात विविध टप्प्यांमध्ये त्यात सुधारणा करण्यात आली. सुरुवातीला त्याचं डिझाईन 15 वर्षे कार्यान्वित राहण्यासाठी करण्यात आलं होतं.
मात्र अंतराळातील वैज्ञानिक संशोधनातील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचं सातत्यपूर्ण यश आणि अंतराळ उद्योगातील आंतरराष्ट्रीय सहकार्यामुळे ते नष्ट करण्याचा कालावधी अनेकदा वाढवण्यात आला.
शेवटी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सरकारनं (2021) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा कार्यकाळ 2030 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता.
अर्थात 2021 मध्येच रशियाकडून या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाबाबत एक इशारा देण्यात आला होता.
त्यात म्हटलं होतं की उपकरणं आणि हार्डवेअरमुळे यात अशाप्रकारच्या समस्या येऊ शकतात, ज्यांना दुरुस्त केलं जाऊ शकत नाही.
रशियाचे माजी अंतराळवीर व्लादिमीर सोलोव्योव्ह म्हणाले की आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील रशियन भागाची 80 टक्के इन्स्ट्रूमेशन सिस्टम म्हणजे उपकरणीय यंत्रणा जुनी झाली आहे.
त्याव्यतिरिक्त यामध्ये छोट्या भेगा निर्माण झाल्या आहेत आणि कालांतरानं त्या मोठ्या होऊ शकतात.
दरम्यान, इलॉन मस्क यांनी फेब्रुवारी महिन्यात एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटलं होतं की आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला 2030 पर्यंतचा कालावधीदेखील देता कामा नये. याला दोन वर्षांच्या आतच बंद केलं पाहिजे. त्यांनी लिहिलं होतं की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी याबाबतीत निर्णय घेतला पाहिजे.
इलॉन मस्क यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं, "आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला त्याच्या कक्षेतून हटवण्याचं काम सुरू करण्याची वेळ आली आहे. ज्या उद्दिष्टासाठी याची निर्मिती करण्यात आली होती, ते आता पूर्ण झालं आहे. आता आपण मंगळ ग्रहावर लक्ष केंद्रीत करू शकतो."
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक कसं संपुष्टात येईल?
आधीच म्हटल्याप्रमाणं, जेव्हा फुटबॉल मैदानाच्या आकाराचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पृथ्वीभोवती फिरतं, तेव्हा त्याची कक्षा वेळोवेळी वातावरणातील ताणामुळं प्रभावित होते.
जर ते असंच सोडलं तर यावर सूर्याचा परिणाम होईल आणि एक-दोन वर्षांत तो आपल्या कक्षेपासून पूर्णपणे विचलित होऊन पृथ्वीच्या दिशेने पडेल.
यामुळं पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना मोठा धोका निर्माण होईल. त्यामुळंच 'रि-बूस्ट' ही प्रक्रिया सुरु आहे. याचा अर्थ स्पेस स्टेशन (अंतराळ स्थानक) कार्यरत ठेवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक बंद करण्याचं काम लवकरच सुरू होईल, असं नासाचं म्हणणं आहे.
या अंतर्गत, एक सुरुवातीचं पाऊल म्हणून, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला वातावरणातील ताणाअंतर्गत स्वतःलाच नष्ट करण्याची परवानगी दिली जाईल. याचा अर्थ रि-बूस्ट प्रक्रिया कमी होईल.
याशिवाय आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा वेग कमी करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात येणार आहे.
यासाठी स्पेस स्टेशनमध्ये असलेल्या प्रोग्रेस (रशियन अंतराळ यान) सारख्या स्पेसक्राफ्ट आणि इतर प्रोपल्शन मॉड्यूल्सचा वापर केला जाईल.
त्याचे अनावश्यक मॉड्यूल वेगळे केले जाऊ शकतात आणि कक्षेतून एक एक करून ते हटवले जाऊ शकतात.
या कालावधीत (2026 ते 2030) त्याची उंची 415 किलोमीटर पासून हळूहळू कमी होत जाईल.
यानंतर स्पेस स्टेशनची उंची 280 किलोमीटरपर्यंत कमी होईल. त्यानंतर एका विशेष अंतराळ यानाच्या मदतीनं त्याचं अंतर 120 किलोमीटरपर्यंत कमी करण्यासाठी अंतिम गती दिली जाईल.
नियोजनानुसार हा प्रयत्न यशस्वी झाला, तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पृथ्वीपासून 120 किलोमीटर अंतरावर पोहोचण्याची अपेक्षा आहे.
जर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक 120 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचले तर ते ताशी 29 हजार किलोमीटरच्या वेगानं पृथ्वीच्या वातावरणाला धडकेल.
परंतु, नासाचं म्हणणं आहे की वातावरणात पुन्हा प्रवेश करताना, अति उष्णतेमुळं, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे बहुतेक भाग जळतील आणि स्वतःच नष्ट होतील.
त्याचा उर्वरित भाग पॅसिफिक महासागराच्या 'पॉइंट निमो' नावाच्या भागात पडेल. नासाचं म्हणणं आहे की, ते ठिकाण लोकवस्तीचं नसल्याने कोणतीही हानी होणार नाही. सहसा नको असलेले अवकाशयान येथे पडतात.
गेल्या वर्षी जूनमध्ये नासानं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक बंद करून ते नष्ट करण्यासाठी एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सची निवड केली होती. यासाठी या कंपनीसोबत 84.30 दशलक्ष डॉलर किमतीचा करार केला होता.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला पर्याय काय आहे?
नासाचं म्हणणं आहे की, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक बंद होण्यापूर्वी खासगी अंतराळ स्थानकं सुरु होतील. त्यामुळं पृथ्वीच्या खालच्या कक्षेत व्यावसायिक अवकाश सेवा सुरू होऊ शकणार आहेत.
यासाठी ॲक्सीओम स्पेस आणि ब्लू ओरिजिन या कंपन्यांशी करार करण्यात आले आहेत.
नासानं असंही म्हटले आहे की, 2031 नंतर ते मानवांना पृथ्वीच्या कमी कक्षेच्या पलीकडे चंद्र आणि मंगळ सारख्या ठिकाणी पाठविण्यावर लक्ष केंद्रित करेल.
यासोबतच इतर देशही आपापले अंतराळ स्थानक बनवण्याच्या तयारीत आहेत.
वर्ष 2035 पर्यंत इंडियन स्पेस स्टेशन (भारतीय अंतराळ स्थानक) नावाचं स्पेस स्टेशन स्थापन करण्याची भारताची योजना आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी त्याचा पहिला भाग 2028 मध्ये कार्यरत होईल, असं गेल्या वर्षी सांगितलं होत.
पहिल्या भाग सुरु झाल्यानंतर सात वर्षांनी, भारत आपले अंतराळ केंद्र पूर्णपणे ऑपरेट करण्यास सक्षम होईल.
चीनने 2022 मध्ये पृथ्वीच्या कक्षेत आपलं पहिलं अंतराळ स्थानक, तियांगॉन्गचे (स्वर्गीय महल) पहिले मॉड्यूल स्थापित केले होते. सध्याचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अनेक देशांनी संयुक्तपणे बांधलं आहे. पण एकट्या चीनने स्पेस स्टेशन बनवलं आहे.
चीनचा असा विश्वास आहे की, 2031 नंतर ते निश्चितपणे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची जागा घेतील.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.