You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुनीता विल्यम्सला ड्रॅगन कॅप्सूलमधून बाहेर पडल्यानंतर स्ट्रेचरवरुन का नेण्यात आलं?
- Author, नंदिनी वेल्लास्वामी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने आपल्या वेबसाईटवर वैज्ञानिक विक्टर ग्लोवर यांचा एक संवाद प्रसिद्ध केला आहे. ग्लोवर हे स्वत: एक अंतराळवीर आहेत.
या संवादामध्ये विक्टर यांची मुलगी त्यांना विचारते, "पृथ्वीवर परतल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी कशाचा वास आल्याचं जाणवलं?"
यावर विक्टर यांनी सांगितलं की, जेव्हा अंतराळयान समुद्रामध्ये उतरलं तेव्हा सर्वात आधी त्यांना समुद्राचा वास जाणवला.
त्यांनी म्हटलं, "तो गंध आणि ती हवा अद्भूत होती."
पुढे ग्लोवर यांनी सांगितलं की, पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारची आरोग्याची समस्या जाणवली नाही.
मात्र, सगळ्याच अंतराळवीरांना अशाच प्रकारचा अनुभव येतो का?
भारतीय वंशांच्या सुनीता विल्यम्स या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये (आयएसएस) 286 दिवस घालवल्यानंतर पृथ्वीवर परतल्या आहेत. त्यांना 19 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 3 वाजून 27 मिनिटांनी स्पेसएक्सच्या 'ड्रॅगन' या अंतराळयानामधून अमेरिकेतील फ्लोरिडा राज्याजवळच्या समुद्रामध्ये उतरवण्यात आलं.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे आयएसएसच्या चालक दलातील अमेरिकन अंतराळवीर निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर कोरबुनोव्ह यांच्यासमवेत पृथ्वीवर परतले आहेत.
ड्रॅगन कॅप्सूलमधून स्प्लॅशडाऊन केल्यानंतर नासाच्या बचाव पथकानं सुनीता विल्यम्सला बाहेर काढताना स्ट्रेचरचा वापर केला.
अंतराळात शरीरामध्ये काय बदल होतात?
अंतराळात नऊ महिन्यांहून अधिक काळ घालवल्यानंतर सुनीता विल्यम्सच्या शरीरामध्ये काय बदल झाले असतील, हे जाणून घेणं नक्कीच रंजक आहे.
अंतराळातून पृथ्वीवर परतणं ही निश्चितच एक कठीण आणि आव्हानात्मक गोष्ट आहे. अगदी त्याचप्रकारे, अंतराळात दीर्घकाळ घालवल्यानंतर पृथ्वीवर परतल्यानंतरही अंतराळवीरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
वैज्ञानिकांच्या मतानुसार, अंतराळात दीर्घकाळ राहून पृथ्वीवर परतलेल्या अंतराळवीरांना सामान्यत: उभं राहणं आणि त्यानंतर चालणं या दोन्हीही क्रिया करताना अडचणी येतात.
म्हणूनच, पृथ्वीवर परतल्यानंतर ते लगेचच आपल्या आप्तस्वकीयांना भेटण्यासाठी घरी जाऊ शकत नाहीत. अशा अंतराळवीरांना फक्त शारीरिक समस्यांचाच नव्हे, तर मानसिक समस्यांचाही सामना करावा लागू शकतो.
अंतराळातून पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांच्या शरीरामध्ये काय बदल होतो? ते शारीरिक तसेच मानसिक अडचणींचा सामना कशाप्रकारे करतात? यासाठी किती काळ लागतो? असे काही प्रश्न पडणं साहजिक आहे.
प्रत्येक 90 मिनिटाला सूर्योदय
अंतराळवीर शून्य गुरुत्वाकर्षण असलेल्या अवस्थेमध्ये अंतराळात राहतात. ते प्रत्येक 90 मिनिटाला सूर्योदय पाहतात. याचा अर्थ असा आहे की, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक प्रत्येक 90 मिनिटाला पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण करतं.
त्यामुळेच, अंतराळ स्थानक जेव्हा पृथ्वीवरील रात्र असलेल्या भागातून जातं तेव्हा रात्र दिसते, तर जेव्हा दिवस असलेल्या भागातून जातं तेव्हा अंतराळवीरांना दिवस अनुभवायला मिळतो.
खरं तर वरकरणी ही गोष्ट फारच भारी वाटू शकते; मात्र, यामुळेच अंतराळवीरांच्या शरीरामध्ये असे बदल निर्माण होतात, जे आव्हानात्मक ठरु शकतात.
अंतराळात दीर्घकाळ राहिल्याने शरीरावर झालेल्या अशा परिणामांमधून स्वत:ला बरं करण्यासाठी काही दिवस, आठवडे वा महिनेही लागू शकतात.
कारण, अंतराळात राहून आलेल्या अंतराळवीरांना आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
नासाचे अंतराळवीर स्कॉट केली आणि क्रिस्टीना कोच हे अंतराळ स्थानकामध्ये जवळपास एक वर्ष राहणारे पहिले अमेरिकन अंतराळवीर आहेत.
अंतराळातील दिवसांमध्ये शरीरात होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी स्कॉट केली आणि त्यांचा जुळा भाऊ मार्क केली यांच्यावर 'ट्विन स्टडी' नावाचा एक अभ्यास करण्यात आला. मार्क केली हे सेवानिवृत्त वैज्ञानिक आहेत. या अभ्यासातून अनेक नव्या गोष्टी उघडकीस आल्या होत्या.
डोळ्यांपासून ते हाडांपर्यंतच्या शारीरिक समस्या
अंतराळात दीर्घकाळ राहणाऱ्या अंतराळवीरांना प्रामुख्याने हाडांच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांची हाडे कमकुवत होतात, असं निरिक्षण आहे.
याचं महत्त्वाचं कारण अर्थातच गुरुत्वाकर्षणाचा अभाव हेच आहे. पृथ्वीवर वावरताना पाठीचा कणा आणि नितंब यांचा जितका वापर होतो, तितका वापर अंतराळात होत नाही. पृथ्वीवर आपल्या शरीराचा भार सहन करण्यासाठी शरीरातील हे दोन्हीही भाग अत्यंत महत्त्वाचे ठरत असतात.
म्हणूनच, अंतराळातील वास्तव्याचे दिवस जसजसे वाढत जातात, तसतसं हाडांची घनता प्रत्येक महिन्यात एक ते दीड टक्क्यांनी कमी होत जाते.
पृथ्वीवर वावरताना जी कामे करावी लागतात, त्यातून आपल्या शरीरातील स्नायू अधिक मजबूत होतात. मात्र, अंतराळात आपण तेवढं शारीरिक काम करू शकत नाही. त्यामुळे, स्नायूंचं सैल पडणं हीदेखील एक मोठी समस्या आहे.
स्नायू आणि हाडांचं कमकुवत होणं या दोन्ही गोष्टींपासून वाचण्यासाठी अंतराळवीरांना ट्रेडमीलवर व्यायाम करावा लागतो.
अंतराळवीरांनी व्यायाम न केल्यास काय होईल?
अंतराळात राहून पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीर लागलीच स्वत:च्या पायावर उभे राहू शकत नाहीत. इतकंच काय, त्यांना चालताही येत नाही.
गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे शरीरातील द्रवपदार्थ डोक्याच्या दिशेने वरच्या बाजूला जातात. त्यामुळे डोळ्यांमध्ये दबाव निर्माण होतो आणि दृष्टीशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
नासाने दिलेल्या माहितीनुसार, दीर्घकाळ अंतराळात राहिल्याने वजन कमी होतं. याशिवाय, न्यूरोलॉजिकल बदल, दृष्टी तसेच त्वचेच्या देखील समस्या निर्माण होतात.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) सतीश धवन अंतराळ केंद्राचे माजी संचालक डॉ. एस पांडियन सांगतात "जेव्हा आपण अंतराळात असतो, तेव्हा आपली उंची वाढते."
"उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीची उंची 150 सेंटीमीटर असेल, तर त्याची उंची अंतराळात तीन ते चार सेंटीमीटरने वाढते. पृथ्वीवर असताना गुरुत्वाकर्षणामुळे पाठीच्या कण्यामधील चकती खाली खेचली जाते. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे पाठीच्या कण्याची ही चकती वरच्या बाजूला खेचली जाते. त्यामुळेच, आपली उंची अंतराळात वाढते."
नासानं आपल्या वेबसाईटवर सांगितलंय की, जर आपण काळजी घेतली नाही, तर शरीरामध्ये डिहायड्रेशनमुळे (पाण्याची कमतरता) किडनी स्टोन होण्याची शक्यता असते.
चालण्या-फिरण्यात येते अडचण
नासाच्या म्हणण्यानुसार, पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना डोके, हात आणि डोळे यांच्यातील समन्वयाचा त्रास होतो. यामुळे चालताना वा फिरताना शरीराचं संतुलन राखण्यामध्येही अडचण निर्माण होते.
इतकंच नाही, तर आपण अजूनही अंतराळातच आहोत, असाही भास अंतराळवीरांना पृथ्वीवर परतल्यानंतर काही काळ जाणवू शकतो.
याशिवाय कानाच्या पडद्यावर दाब निर्माण झाल्याने 'न्यूरल ट्यूब डिफेक्ट' होण्याचीही शक्यता असते.
'इस्रो'चे डॉ. पांडियन म्हणतात, "कानाचा पडदा देखील आपल्या शरीराच्या संतुलनात महत्त्वाची भूमिका बजावतो. यामध्ये काही अडचण आल्यास उभं राहण्यास त्रास होऊ शकतो."
अंतराळातून परतलेल्या लोकांना चक्कर येणं आणि शुद्ध हरपल्यासारखं देखील जाणवू शकते. पृथ्वीवर अचानक सरळ उभे राहिल्यामुळे त्यांना त्यांचा रक्तदाब नीट नियंत्रित करता येत नाही.
डॉ. पांडियन सांगतात की, अंतराळातील मोठ्या प्रवासानंतर अंतराळवीर ताठ उभे राहू शकत नाहीत. त्यामुळेच, अंतराळवीरांना स्ट्रेचरवरुन घेऊन जावं लागतं.
अंतराळवीरांना कोणते उपचार आणि प्रशिक्षण दिलं जातं?
अंतराळवीरांना नासामध्ये प्रशिक्षणासाठी जवळपास 45 दिवसांपर्यंत ठेवलं जातं. त्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बरं होण्यासाठी ट्रेनिंग दिलं जातं.
डॉ. पांडियन सांगतात, "ज्याप्रकारे एखाद्या दुर्घटनेतून वाचलेला व्यक्ती तातडीने नेहमीसारख्या गोष्टी करु शकत नाही. त्याचप्रकारे, अंतराळवीरांचीही अवस्था असते. ते तातडीने उभे राहू शकत नाहीत वा चालू शकत नाहीत. बरेचदा ते बेशुद्ध पडतात."
ते पुढे सांगतात, "अंतराळवीरांना चार टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं. पहिल्या टप्पा आहे वॉर्म-अपचा. त्यानंतर त्यांचं स्ट्रेचिंग केलं जातं. त्यानंतर कार्डिओव्हस्क्यूलर व्यायामाचंही ट्रेनिंग दिलं जातं. त्यानंतर अंतराळवीर अंतराळ स्थानकामध्ये जे व्यायाम करतात, तेच सगळे व्यायाम ते करतात."
"उदाहरणार्थ, ट्रेडमिलवर धावणं वा सायकल चालवणं इत्यादी."
मात्र, अंतराळवीर हे सगळं एकट्याने करु शकत नाहीत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच हे सगळे व्यायाम त्यांच्याकडून करवून घेतले जातात.
यासाठी नासाच्या काही गाईडलाईन्सही आहेत.
तज्ज्ञांची एक टीम अंतराळवीरांची हाडे आणि स्नायू मजबूत करणारे व्यायाम घेते. तसेच त्यांची मालिश वगैरे करते.
डॉ. पांडियन पुढे सांगतात, "अंतराळवीरांना पूर्णपणे बरं होण्यासाठी जवळपास सहा महिने लागतात. कारण, हाडांचं झालेलं नुकसान पूर्णपणे भरुन येण्यासाठी तेवढा काळ जावा लागतो. हळूहळू त्यांचं आरोग्य पूर्वपदावर येतं."
मात्र, नासाच्या म्हणण्यानुसार, अंतराळात राहिल्याने हाडांना झालेलं नुकसान पूर्णपणे भरुन निघणंही शक्य नसतं. हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका पुढेही कायम राहतो.
"अंतराळवीर आधीसारखं जेवण खाऊ शकत नाहीत. त्यांना वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली भाज्या आणि फळांचा संतुलित आहार दिला जातो. त्यांच्या शरीरात झालेले इतर काही बदल वा समस्या असतील, तर त्याचीही तपासणी केली जाते. त्यानुसार, त्यांच्यावर आवश्यक तो उपचार केला जातो," असं डॉ. पांडियन सांगतात.
मेंदूच्या आरोग्यावर होतो परिणाम
अंतराळात अनेक कारणांमुळे शरीरातील हार्मोन्सचा स्तर वाढतो. त्यामुळे, अंतराळात मानसिक थकवाही खूप येतो.
दीर्घकाळ आपल्या कुटुंबापासून दूर राहणं तसेच त्यांच्यासमवेत आपुलकीचे क्षण अनुभवू न शकणं, यामुळेही अंतराळवीरांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
नासाच्या म्हणण्यानुसार, यामुळे मानसिक आरोग्याच्या समस्याही निर्माण होऊ शकतात.
अंतराळवीरांना कोणत्याही मनोरंजनाशिवाय अंतराळात राहण्यासाठीदेखील प्रशिक्षित केलं जातं.
पृथ्वीवर परतल्यानंतर मानसिकदृष्ट्या सामान्य स्थितीत येण्यासाठीही काही काळ जाऊ शकतो.
यासाठीही आवश्यक ती वैद्यकीय मदत घेतली जाते.
मानसिक समस्यांमधून बरं होण्यासाठी अंतराळवीरांचे कुटुंबीय महत्त्वाची भूमिका बजावतात, असंही डॉ. पांडियन सांगतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)