You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुनीता विल्यम्स परतणार 'स्वग्रही', स्पेस एक्सचं अंतराळयान पोहोचलं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात
- Author, पल्लब घोष
- Role, विज्ञान, प्रतिनिधी
स्पेस एक्सचं अंतराळयान नव्या टीमसह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) (ISS)पोहोचलं आहे. याच अंतराळयानातून भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतणार आहेत.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघे अंतराळावीर फक्त आठ दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले होते. मात्र अंतराळयानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते दोघेही तिथे नऊ महिन्यांपासून अडकले आहेत.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा पृथ्वीवर परतीचा प्रवास या आठवड्याच्या शेवटी सुरू होईल. नासाशी संबंधित स्टीव्ह स्टिच म्हणाले की या दोघांच्या परतीच्या प्रवासाबद्दल ते उत्साही आहेत.
ते म्हणाले, "बुच आणि सुनीता यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे आणि त्यांना अंतराळातून परत आणण्यासाठी आम्ही उत्साही आहोत."
स्पेस एक्स क्रू ड्रॅगन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला जोडलं जाताना (डॉकिंग करताना) आणि हॅच ओपन होतानाचं लाईव्ह फुटेज आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS), नासा आणि स्पेसएक्स यांनी सोशल मीडियावर दाखवलं.
त्यानंतर अंतराळवीर एकमेकांची गळाभेट घेताना दिसले.
अंतराळवीरांचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील सहकारी असलेले नासाचे निक हेग त्यांना मदत करतील.
याशिवाय रॉसकॉसमॉस या रशियाच्या अंतराळ संस्थेचे अंतराळवीर अलेक्सांद्र गोरबुनोव, जपान आणि अमेरिकेचे दोन-दोन अंतराळवीर देखील त्यांची मदत करणार आहेत.
सुनीता विल्यम्स आणि बुच यांच्या जुनी टीमला, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या कामाची जबाबदारी नव्या टीमला हस्तांतरित (हँडओव्हर) करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागेल. त्यानंतर सुनीता आणि बुच यांच्या पृथ्वीवरील परतीच्या प्रवासाला सुरूवात होईल.
आणखी वेळ लागू शकतो का?
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या व्यवस्थापक डाना वीगेल यांच्या मते, "अंतराळवीरांच्या परतीच्या प्रवासाला अजूनही थोडा उशीर होऊ शकतो. कारण पृथ्वीवरील परतीच्या प्रवासात सर्व घटक, हवामानाची स्थिती अनुकूल आहे की नाही, सर्व व्यवस्थित आहे की नाही, हे पाहणं देखील आवश्यक आहे."
त्या म्हणाल्या, "अंतराळ प्रवासात हवामान नेहमीच महत्त्वाचं असतं. जर परिस्थिती अनुकूल नसेल तर परतीच्या प्रवासासाठी आम्ही आणखी वेळ घेऊ."
डाना वीगेल म्हणाल्या की अंतराळवीरांनी गेल्या आठवड्यातच कामाची जबाबदारी हस्तांतरित करण्याची तयारी सुरू केली होती.
त्या म्हणाल्या, "जेव्हा सुनीता विल्यम्स यांनी अंतराळवीर ॲलेक्सी ओवचिनिन यांच्याकडे सूत्रं दिली तेव्हा बुच यांनी अधिकृत घंटा वाजवली."
अंतराळवीरांनी सातत्यानं सांगितलं आहे की ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आनंदी आहेत. सुनीता यांनी हे 'हॅप्पी प्लेस' असल्याचं देखील सांगितलं.
अर्थात ओपन युनिव्हर्सिटीशी संबंधित डॉक्टर शिमोअन बारबर म्हणाले की, "तिथे राहणं हा एक नशीबाचा भाग आहे."
ते म्हणाले, "जेव्हा तुम्हाला एक आठवड्याच्या प्रवासासाठी पाठवलं जातं, तेव्हा तुमच्या मनात असा विचार येत नाही की त्या प्रवासाला जवळपास वर्षभराचा वेळ लागणार आहे."
"तिथे इतका प्रदीर्घ काळ राहिल्याचा परिणाम त्यांच्या कौटुंबिक आयुष्यावर देखील झाला असेल. घरी बरंच काही झालं असेल ज्याचा ते सहभागी होऊ शकले नाहीत. यात काही काळ भावनिक उलथा-पालथीचा देखील राहिला असेल."
परतीच्या प्रवासाला उशीर करण्याचा निर्णय नासानं का घेतला?
जून 2024 मध्ये स्टारलायनर या अंतराळयानातून बुच आणि सुनीता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले होते. हे अंतराळयान बोईंग कंपनीनं बनवलं होतं.
अंतराळयानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अंतराळ मोहिमेत अनेक वर्षांचा उशीर झाला. या अंतराळयानाला अंतराळात पाठवण्याच्या वेळेस अनेक समस्या येत होत्या.
यात अशा समस्या होत्या ज्यांचा परिणाम पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना झाला असता. यामध्ये हेलियम वायूच्या गळतीची समस्यादेखील होती.
त्यामुळे नासानं निर्णय घेतला होता की सुनीता आणि बुच यांच्या पृथ्वीवरील परतीच्या प्रवासात थोडीदेखील जोखीम घेतली जाणार नाही. कारण त्यांच्याकडे स्पेस एक्सच्या अंतराळयानाद्वारे परतीच्या प्रवासाचा पर्याय उपलब्ध आहे.
नासाला अंतराळवीराचं रोटेशन हा एक चांगला पर्याय वाटला. मग त्यासाठी अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अनेक महिने राहावं लागलं तरी नासासाठी ते योग्य ठरणार होतं.
अर्थात बोईंगनं सातत्यानं दावा केला आहे की सुनीता आणि बुच यांचा परतीचा प्रवास स्टारलायनर या अंतराळयानातून करणं सुरक्षित आहे.
बोईंगनं स्पेस एक्सच्या अंतराळयानातून अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्याबाबत नाराजीदेखील व्यक्त केली होती.
डॉक्टर बारबर म्हणाले, "आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीच्या अंतराळयानातून अंतराळवीरांचा परतीचा प्रवास पाहणं हे बोईंगसाठी चांगलं नाही."
ट्रम्प आणि मस्क यांनी केला होता अंतराळवीरांना परत आणण्याचा दावा
फेब्रुवारीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि स्पेस एक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी फॉक्स न्यूज मुलाखत दिली होती. त्यात ते म्हणाले होते की ते लवकरच सुनीता आणि बुच यांना पृथ्वीवर परत आणतील.
ट्रम्प म्हणाले होते, "अंतराळवीर अंतराळात अडकले आहेत."
मुलाखत घेणाऱ्या सॉन हॅनिटी यांनी विचारलं होतं की, "अंतराळवीर आठ दिवसांसाठी अंतराळात गेले होते आणि ते आता जवळपास 300 दिवसांपासून तिथे आहेत."
त्यावर ट्रम्प यांनी एका शब्दात उत्तर दिलं होतं, "बायडन."
इलॉन मस्क यांनी पुढे या प्रश्नाचं देत म्हटलं होतं, "ते राजकीय कारणांमुळे तिथे आहेत."
अर्थात नासाचे स्टीव्ह स्टिच यांनी हे मुद्दे फेटाळले. ते म्हणाले, "आम्ही अनेक पर्यायांची चाचपणी केली. आम्ही स्पेस एक्सबरोबर काम केलं आणि सर्वोत्तम पर्याय निवडण्याचा प्रयत्न केला."
लंडनमधील सायन्स म्युझियमच्या प्रमुख डॉक्टर लिब्बी जॅक्सन यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला. त्या युरोपात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या नियंत्रण केंद्राबरोबर देखील काम करतात.
त्या म्हणाल्या, "बुच आणि सुनीता यांच्या सुरक्षिततेलाच सर्वांनी प्राधान्य दिलं आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सर्वात चांगला पर्याय काय असू शकतो, याचा विचार करूनच निर्णय घेण्यात आले आहेत."
"अनेक तांत्रिक बाबी लक्षात घेऊनच नासानं हे निर्णय घेतले आहेत. त्यांनी सुनीता आणि बुच यांना सुरक्षित परत आणण्याचा मार्ग शोधला आहे. मी त्यांच्या पृथ्वीवरील परतीच्या प्रवासाकडे पाहते आहे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.