You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सर्गेई क्रिकालेव्ह : अंतराळात असताना त्याच्या देशाचं अस्तित्व संपलं आणि त्याला अंतराळातच अडकून पडावं लागलं...
- Author, कार्लोस सेरानो
- Role, बीबीसी न्यूज वर्ल्ड
अंतराळवीर सर्गेई क्रिकालेव्ह सोव्हियत संघाच्या एमआयआर स्पेस स्टेशनमधून पूर्ण पृथ्वी पाहू शकत होते, पण त्या उंचीवरुन त्यांना तो राजकीय संघर्ष दिसत नव्हता ज्यात त्यांचा देश जळत होता.
ही गोष्ट 18 मे 1991 ची आहे जेव्हा क्रिकालेव्ह सोयूज स्पेस क्राफ्टमध्ये बसून पाच महिन्यांच्या दीर्घ मिशनवर एमआयआर स्पेस स्टेशनला पोहचले होते. त्यांच्याबरोबर सोव्हियत यूनियनचे आणखी एक वैज्ञानिक अनातोली अर्टेबास्की आणि ब्रिटनच्या वैज्ञानिक हेलन शर्मनही होत्या.
त्यांचं यान कझाकिस्तानातल्या बैकानूर अंतराळ केंद्रातून लॉन्च झालं. याच केंद्राच्या मदतीने सोव्हियत संघाने अमेरिकेला अंतराळ स्पर्धेत मागे टाकून पृथ्वीच्या कक्षेत पहिला उपग्रह सोडला होता, अंतराळात लायका नावाचे कुत्रे पाठवले होती आणि पहिला माणूस अंतराळात पाठवायचं श्रेयही त्यांचंच.
एमआयआर स्पेस स्टेशन (मीर स्पेस स्टेशन) आतापर्यंत अंतराळ मोहिमांच्या बाबतीत सोव्हियत यूनियनच्या ताकदीचं एक प्रतीक बनलं होतं.
क्रिकालेव्ह एका नेहमीच्या मोहिमेअंतर्गत अंतराळात गेले होते. त्यांना तिथे काही दुरुस्ती करायची होती. पण एका बाजूला अंतराळात सगळं सुरळीत चालू असताना पृथ्वीवर सोव्हियत संघाचे वेगाने तुकडे होत होते.
क्रिकालेव्ह अंतराळातच असताना सोव्हियत संघाचं विघटन झालं आणि एका सोप्या मिशनसाठी अंतराळात गेलेले क्रिकालेव्ह अनेक महिन्यांसाठी अंतराळातच अडकून पडले. त्यांना आधी ठरल्यापेक्षा दुप्पट वेळ अंतराळात काढावा लागला.
सर्गेई क्रिकालेव्ह दहा महिने अंतराळात होते आणि पृथ्वीवर आले तेव्हा त्यांच्या देशाचं अस्तित्व पृथ्वीवरून नष्ट झालं होतं. याच गोष्टमुळे त्यांना 'सोव्हिएत संघाचा शेवटचा नागरिक' म्हणूनही ओळखलं जातं.
कोण होते सर्गेई क्रिकालेव्ह?
सर्गेई यांचा जन्म 1958 साली सोव्हियत यूनियनच्या लेनिनग्राड शहरात झाला. आता या शहराला सेंट पीटर्सबर्ग असं म्हटलं जातं.
त्यांनी 1981 मध्ये लेनिनग्राड मेकॅनिकल इंस्टीट्यूटमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली. चार वर्षांच्या ट्रेनिंगनंतर ते अंतराळवीर बनले.
ते 1988 साली पहिल्यांदा मीर स्पेस स्टेशनमध्ये पोहचले. हे स्पेस स्टेशन पृथ्वीपासून 400 किलोमीटर उंचावर स्थित आहे आणि पृथ्वीभोवती फिरत असतं.
सध्या क्रिकालेव्ह रशियन अंतराळ संस्था रॉसकॉसमॉसच्या अंतराळवीर अवकाशात पाठवणाऱ्या विभागाचे प्रमुख आहेत. 1991 साली मे महिन्यात क्रिकालेव्ह दुसऱ्या अंतराळ मोहिमेवर गेले.
अंतराळ मोहिमांच्या इतिहासकार कॅथलीन लेविस म्हणतात की, "क्रिकालेव्ह जगभरात फारच लोकप्रिय झाले होते कारण ते असे अंतराळवीर होते ज्यांनी स्पेस स्टेशनमधून पृथ्वीवरच्या लोकांशी रेडियोव्दारे संवाद साधला होता."
"स्पेस स्टेशनमध्ये ते एकटे नव्हते पण लोकांची रेडिओव्दारे संवाद साधणारे ते एकटेच होते. त्यामुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली."
कॅथरिन यांच्यामते अंतराळ केंद्रात त्यांच्याबरोबर आणखी एक सोव्हियत नागरिक अलेक्झांडर वोल्कोव होते. पण जगभरात क्रिकालेव्ह सोव्हिएत युनियनचे 'शेवटचे नागरिक' म्हणून चर्चिले गेले.
'जेव्हा सोव्हियत यूनियनचे तुकडे झाले'
सन 1990 ते 1991 पर्यंत सगळ्या गणराज्यांनी आपलं स्वातंत्र्य घोषित केलं जे एकत्रितरित्या सोव्हियत यूनियन म्हणून ओळखले जायचे.
याच काळात सोव्हियत संघाचे राष्ट्रपती मिखाईल गोर्बाचेव आपल्या पेरेस्त्रोइका मोहेमेव्दार देशाचं आधुनिकीकरण करू पाहात होते. सोव्हियत यूनियनमध्ये भांडवलशाहीचा चंचूप्रवेश झाला होता आणि अनेक कंपन्यांच्या आर्थिक ताकदींचं विकेंद्रीकरण झालं होतं. याचबरोबर त्यांनी खाजगी व्यवसायांचा रस्ता मोकळा केला.
कम्युनिस्ट पक्षातून या मोहिमेला खूप विरोध झाला. 19 ते 21 ऑगस्ट 1991 या काळात कम्युनिस्ट पक्षाच्या एका शक्तीशाली गटाने गोर्बाचेव यांची सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला.
हे बंड अयशस्वी ठरलं पण यामुळे सोव्हियत यूनियनचं बरंच नुकसान झालं.
'सगळं ठीक आहे'
जेव्हा गोर्बाचेव्हच्या हातातून देश निसटत चालला होता तेव्हा क्रिकालेव्ह अंतराळात होते.
सोव्हियत संघासमोर उभ्या ठाकलेल्या राजकीय आणि आर्थिक संकटामुळे त्यांना अंतराळात राहायला सांगितलं गेलं.
बीबीसीच्या 1993 साली प्रसिद्ध झालेल्या एका डॉक्युमेंट्रीत क्रिकालेव्ह यांनी म्हटलं होतं की, "ते सगळं कल्पनेच्या पलीकडचं होतं. काय होतंय काहीच समजत नव्हतं."
क्रिकलेव्ह यांना जे काही कळलं ते पाश्चात्य देशांमधल्या सहकाऱ्यांशी बोलून कळलं, कारण सोव्हियत संघात तर 'सगळं काही ठीक आहे' हेच वारंवार सांगितलं जात होतं.
क्रिकालेव्ह यांच्या पत्नी एलिना तेरेखिना सोव्हियत स्पेस कार्यक्रमात एक रेडिओ ऑपरेटर म्हणून काम करत होत्या.
त्या क्रिकालेव्ह यांच्याशी बोलायच्या देशात काय घडतंय हे पतीला सांगू शकल्या नाहीत.
बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीत एलिना म्हणतात, "मला त्याला वाईट गोष्टी सांगायच्या नव्हत्या. मला वाटतं तोही असंच करत होता."
कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी
क्रिकालेव्हा यांनी अंतराळात जास्त काळ राहाण्याचं मान्य केलं पण असं करणं त्यांच्यासाठी नक्कीच सोपं नव्हतं.
जुन्या दिवसांची आठवण काढून ते म्हणतात, "माझ्या शरीरात तितकी ताकद राहील का? इतका मोठा काळ इथे थांबण्यासाठी मी स्वतःला मानसिकदृष्ट्या सक्षम करू शकतो का? या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नव्हती.
क्रिकालेव्ह आणि वोल्कोव कधीही परत येऊ शकत होते पण मग अंतराळ केंद्रात कोणीच राहीलं नसतं.
लेविस म्हणतात, "हा एक प्रशायकीय पेच होता. रशियाला स्टेशन सोडायचं नव्हतं पण त्यांच्याकडे दुसरा अंतराळवीर आकाशात सोडण्यासाठी पैसेही नव्हते."
याच काळात रशियन सरकारने कझाकिस्तानबरोबरचे आपले संबंध सुधारण्यासाठी म्हटलं की ते एका कझाक अंतराळवीराला क्रिकालेव्ह यांच्या जागी पाठवतील.
पण कझाकिस्तानकडे क्रिकालेव्ह यांच्याइतका अनुभवी अंतराळवीर नव्हता. अशा व्यक्तीला प्रशिक्षण देऊन या मोहिमेसाठी तयार करण्यात वेळ तर नक्कीच गेला असता.
क्रिकालेव्ह यांना अंतराळ केंद्रावरच्या दहा महिन्यांच्या काळात शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या काय सहन करावं लागलं याची आजही पूर्ण माहिती उपलब्ध नाही.
नासाचं म्हणणं आहे की अंतराळात जास्त काळ घालवला तर रेडिएशनला बळी पडण्याचा धोका असतो ज्यामुळे कॅन्सरसारखे जीवघेणे आजार होऊ शकतात.
गुरुत्वाकर्षण कमी असल्यामुळे स्नायू आणि हाडाचं कमजोर होतात आणि रोगप्रतिकार क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. तसंच इतका प्रदीर्घ काळ एकटं राहिल्यामुळे मानसिक आरोग्यही धोक्यात येऊ शकतं.
पण क्रिकालेव्ह म्हणतात की स्पेस स्टेशनवर राहाणं त्यांचं कर्तव्य होतं.
क्रिकालेव्ह यांच्या जागी कोणीच आलं नाही
यानंतर ऑक्टोबर महिन्यात तीन नवे अंतराळवीर मीर स्पेस स्टेशनात पोहचले. पण तरी यापैकी कोणालाही क्रिकालेव्ह यांची जागा घेण्याइतका अनुभव किंवा प्रशिक्षण नव्हतं.
लेविस म्हणतात की क्रिकालेव्ह यांची खरी काळजी तर सोव्हियत संघाच्या बाहेरच्या लोकांना होती. ज्या माणसाला अंतराळात सोडून दिलं आहे त्याचे काय हाल होतं असतील याची चिंता इतर देश करत होते.
रशियन सरकार समोर वेगळे प्रश्न होते आणि त्यांच्या प्राथमिकताही वेगळ्या होत्या.
यानंतर 25 ऑक्टोबर 1991 ला कझाकिस्तानने आपल्या स्वायत्ततेची घोषणा केली आणि क्रिकालेव्ह यांना परत आणण्यासाठी जे अवकाशयान जाणार होतं ते रशियाच्या हातातून गेलं.
यानंतर एकाच महिन्यात सोव्हियत यूनियनचं पूर्णपणे विघटन झालं. गोर्बाचेव्ह यांनी प्रकृतीचं कारण सांगून राजीनामा दिला.
सोव्हियत यूनियन 15 वेगवेगळ्या देशांमध्ये विभाजित झाली आणि ज्या देशाने क्रिकालेव्ह यांना अंतराळात पाठवलं होतं त्या देशाचं रूपांतर रशियात झालं. जिथे क्रिकालेव्ह यांचा जन्म झाला होता, त्यांचं शिक्षण झालं होतं त्या शहराचं नाव बदलून सेंट पीटर्सबर्ग झालं.
परत आले क्रिकालेव्ह
मार्च 1992 ला क्रिकालेव्ह आणि वोल्कोव पृथ्वीवर परत आले. अशाप्रकारे क्रिकालेव्ह यांनी अंतराळात 312 दिवस काढले आणि पृथ्वीला 5000 फेऱ्या मारल्या.
ते म्हणतात, "परत येण्याचा आनंद वेगळाच होता. गुरुत्वाकर्षणामुळे सुरुवातीला त्रास झाला पण मानसिक तणावातून आमची मुक्तता झाली होती."
या लांबलचक यात्रेनंतरही क्रिकालेव्ह यांच्या आयुष्यात रोमांचकारी क्षण आले. ते सन 2000 मध्ये आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर जाणाऱ्या पहिल्या टीमचे सदस्य बनले.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन एका नव्या अंतराळ युगाचं प्रतिक आहे जिथे जुनी भांडणं विसरून सगळे देश विश्वाची रहस्य समजून घेण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करत आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)